आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

…आणि आता ‘पी2-जी2’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही गोष्ट आहे मुंबईतील एका टॅक्सीवाल्याची. तीही ‘उबेर’ टॅक्सीवाल्याची. एकदा अगदी जवळच्या मित्रानं सांगितलेली.
अलीकडेच उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकांनंतर हा मित्र त्या ‘उबेर’ टॅक्सीतून जात होता. टॅक्सीवाला उत्तर भारतीय वाटला, म्हणून कुतूहलापोटी त्याने विचारलं की, ‘उत्तर प्रदेश के चुनाव मे व्होट देने गये थे क्या?’ त्यावर त्या टॅक्सीचालकानं त्वरित होकारार्थी उत्तर दिले आणि मग ‘कोणाला मत दिलं’ या प्रश्नावर ‘मोदी साबको’ असं उत्तरही देऊन टाकलं. मग या मित्रानं टॅक्सीवाल्याशी एकंदरच गप्पा मारायला सुरुवात केली. तेव्हा भाववाढ, नोटाबंदी, गुन्हेगारी, बायकांवरील अत्याचार इत्यादी अनेक मुद्दे आले. त्या प्रत्येक मुद्द्यावर टॅक्सीवाला सरकारवर पुरता नाराज होता.

‘नोटाबंदीमुळे तर माझं ४९ हजारांचं नुकसान झालं’, असं त्यानं तक्रारीच्या सुरात सुनावलं. हे सगळं ऐकल्यावर त्या मित्रानं टॅक्सीवाल्याला विचारलं की, ‘इतक्या सगळ्या गोष्टी तुझ्या मते चुकीच्या होत आहेत आणि त्याचा तुला त्रास झाला आहे, मग मोदी साहेबांना मत का दिलंस?’ त्यावर त्या टॅक्सीचालकानं सांगून टाकलं की, ‘मोदी साब कुछ तो करेंगे ऐसा सब लोक बोल रहे है, अभी तक बहेनजी, नेताजी, काँग्रेस इन सब लोगों को व्होट दिया, कुछ हुआ नही, अभी मोदी साब को देके देखेंगे क्या करते है.’
 
त्या मित्रानं काही दिवसांपूर्वी टॅक्सीवाल्याशी झालेल्या या गप्पांची कहाणी आठवली, ती मायावती यांच्या ताज्या विधानामुळे. ‘भाजपच्या जे विरोधात आहेत, त्या कोणाशीही हातमिळवणी करण्यास आम्ही तयार आहोत, मुख्य शत्रू हा भाजप आहे’, असं मायावती यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर आता जनता दल (युनायटेड)चे - म्हणजे नितीशकुमार यांच्या पक्षाचे - नेते के. सी. त्यागी यांनी म्हटलं आहे की, ‘सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात.’
 
हे सगळं घडत असताना ओडिशातील भुवनेश्वर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. भुवनेश्वर येथे मोदी यांचा भव्य ‘रोड शो’ही झाला. कार्यकारिणीत मोदी यांनी केलेल्या भाषणाचा जो गोषवारा नितीन गडकरी यांनी पत्रकारांना सांगितला आणि त्यासंबंधीच्या ज्या बातम्या प्रसिद्ध आहेत, त्यातून पुढे आलेले मुद्दे म्हणजे १) सामाजिक न्याय मुस्लिमांपर्यंत पोहोचायलाच हवा, तोही संवादानं, संघर्षाच्या मार्गाने नव्हे. २) मुस्लिम आया - बहिणींना न्याय देण्याच्या मुद्द्याची चर्चा करताना ‘जुबानी तलाक’चाही उल्लेख पंतप्रधानांनी केला. ३) जरा गप्प बसायला शिका, अशा कानपिचक्याही मोदी यांनी भाजप नेते व कार्यकर्ते यांना दिल्या. भुवनेश्वर येथेच झालेल्या एका समारंभात मोदी यांनी ‘विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकां’चा सत्कार केला आणि ‘स्वातंत्र्यलढ्यात फक्त काही कुटुंबांचा सहभाग असल्याचं चित्र उभं  केलं जात आलं आहे’, असंही सांगितल्याचं या समारंभाच्या बातमीत म्हटलं आहे.
 
भुवनेश्वर येथे भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होण्याआधी आठवडाभर ओडिशातील भद्रक या किनारपट्टीवरील शहरात जातीय दंगा भडकला होता. ‘फेसबुक’वर राम व सीता यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर असल्याचं निमित्त हा दंगा भडकण्यास झालं होतं.

यंदा आंबेडकर जयंतीला खास नागपुरात जाऊन ‘भीम अॅप’ हा डिजिटालायझेशनचा कसा मूलमंत्र आहे आणि भ्रष्टाचार विरोधाच्या मोहिमेला सशक्त व परिणामकारक बनवण्यासाठी रोकडविरहित व्यवहाराला चालना देण्याची कशी गरज आहे, याचं विवेचन मोदी यांनी केलं होतं.
या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि टॅक्सीचालकाच्या कहाणीतून व्यक्त झालेल्या भावना लक्षात घेतल्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करू पाहत आहे, याची पुरेशी जाण भाजपच्या विरोधात उभ्या राहू पाहणाऱ्या पक्षांना आलेली दिसत नाही. ‘भाजपच्या विरोधात एकत्र’ येण्याचे हे प्रयत्न दर्शवतात. मुस्लिमांपर्यंत सामाजिक न्याय संवादातर्फे नेऊन पोहोचवला पाहिजे, असं आवाहन भाजप नेते व कार्यकर्ते यांना करणारे पंतप्रधान भद्रकमध्ये दंगल उसळून मुस्लिमांवर हल्ले होऊन त्यांची मालमत्ता नष्ट करून टाकण्यात आल्यावरही ओडिशात असूनही या घटनेचा निषेध सोडा, त्याबद्दल चकार शब्दही उच्चारत नाहीत.  
याचा अर्थ काय होतो?
 
सांस्कृतिक अंगानं भारत हा आता ‘हिंदूंचा देश’ म्हणूनच घडवला जाणार आहे आणि त्यात मुस्लिमांना वेगळी वागणूक मिळणार नाही. त्यांना आम्ही ‘न्याय’ देऊ, पण ‘सवलती’ मिळणार नाहीत. ‘जुबानी तलाक’चा मुद्दा पंतप्रधान लावून धरत आहेत, तो त्यासाठीच. या प्रथेमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होत आहे आणि तो दूर फक्त आम्हीच करू शकतो; कारण आम्ही ‘हिंदू व मस्लिम असा भेद’ मानतच नाही, ही ती भूमिका आहे.
‘आम्ही देश सशक्त व सामर्थ्यवान बनवू पाहत आहोत, त्यात आम्हाला साथ द्या, तुम्हाला न्याय मिळेल; पण त्यासाठी बहुसंख्याकांच्या संस्कृतीच्या चौकटीतच स्वतःचा धर्म पाळू शकता, त्यापलीकडे काही चालणार नाही’, अशी भूमिका आहे.
 
त्याचबरोबर पाकिस्तान, काश्मीर, दहशतवाद इत्यादी मुद्द्यांवर वरकरणी कणखर भूमिका घेत असल्याचं दाखवत एकीकडे धार्मिक ध्रुवीकरण करण्याची रणनीती अमलात आणली जात आहे. दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भ्रष्टाचारविरहित विकासाच्या संधी देण्याचा आमचा प्रयत्न कसा चालू आहे, हेही जनमनावर ठसवलं जात आहे.  

येथेच नेमका त्या टॅक्सीवाल्याच्या कहाणीचा संबंध पोहोचतो. ‘केवळ मोदीच हे करू शकतात’अशी भावना सर्वसामान्य भारतीयाच्या मनात निर्माण करण्यात संघ यशस्वी झाला आहे. भुवनेश्वर येथील भाषणात मोदी यांनी जे ‘पी२-जी२’- म्हणजे ‘प्रो पुअर व ‘गुड गव्हर्नन्स’ असं समीकरण मांडलं, त्याचा उद्देश हीच प्रतिमा जनमनावर ठसवण्यासाठी कटिबद्ध व्हा, हे भाजप नेते व कार्यकर्ते यांना सांगण्याच्या उद्देशानंच. त्याचबरोबर या देशात ‘मुस्लिम समस्या’ आहे, हे ‘हिंदू मना’वर ठसवण्यासाठी पाक, काश्मीर, दहशतवाद यासंबंधी वारंवार प्रचार केला जात आला आहे.  ही बहुसंख्याकांची लोकशाहीची चौकट आहे. पण भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत बहुसांस्कृतिकतेच्या पायावर उभ्या असलेल्या लोकशाहीच्या संकल्पनेच्या विरोधातील आहे.   
 
...आणि ‘हिंदू’ मनाला ती मान्य व्हावी आणि मुस्लिमांनी ती अपरिहार्यपणे स्वीकारावी, यासाठी संघाची पावलं पडत आहेत. जातीपातीची गणितं, मोदीविरोधी विधानं इत्यादींच्या आधारे जनमनातील ही भावना खोडून काढणं विरोधी पक्षांना शक्य नाही; कारण प्रत्येक वेळी ‘तुम्ही काय केलं’, असा प्रश्न विचारला जाणार आहे. हे टाळण्यासाठी राजकीय-सामाजिक-आर्थिक चर्चाविश्वात एक पर्यायी मतप्रवाह आकाराला आणण्याची गरज आहे. आधीच्या चुका व गैरकारभाराची कबुली देतानाच, मोदी यांच्या कारभारात भपका व चमकोगिरी किती आहे (उदाहरणार्थ पी२-जी२) आणि प्रत्यक्षात काय घडत आहे, हे कोणत्याही प्रकारचा-पक्षीय, जातीय वा धार्मिक -  अभिनिवेश टाळून वस्तुनिष्ठरीत्या जनतेपुढे मांडण्याची मोठी व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. असं काही घडू शकलं तरच सर्वसामान्यांच्या मनातील ‘मोदीच फक्त हे करू शकतात’, ही भावना खोडून काढण्यासाठी काही प्राथमिक पावलं टाकली जाऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...