आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमोल्लंघनानंतरचं आव्हान!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगलं झालं, भारतानं अखेर पाकला धडा शिकवला. पूर्वीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आपलं लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसलं होतं. पण अशा कारवाया गुप्ततेच्या पडद्याअाड ठेवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यातील अशाच कारवाईला प्रसिद्धी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि तोही चांगलाच होता.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आम्ही कारवाई केली, असं जाहीर करण्यानं दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. उरी येथील भारतीय लष्करी तळावरील हल्ल्यानंतर जनतेत जो क्षोभ होता, त्याला प्रतिसाद देण्यासाठी या कारवाईची जाहीर वाच्यता करण्यात आली, हे त्यातील पहिलं कारण. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली काही वर्षे छुपं युद्ध खेळताना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं पाकिस्तान वारंवार उल्लंघन करीत आला आहे. यापुढं वेळ पडल्यास आम्हीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न पाळता कारवाई करू, हे भारत जगाला सांगू पाहत आहे. एक प्रकारे १९७२ च्या सिमला करारात जे ठरलं होतं, ते पाकिस्तान एकतर्फी मोडत आला होता, आता आम्हीही ते मोडू, असा संदेश या कारवाईनं भारतानं नुसत्या पाकिस्तानला नव्हे, तर जगालाही दिला.

भारताच्या या कारवाईमुळं आता भारत व पाकिस्तान यांच्या संबंधात एक नवा समतोल तयार होत आहे. त्यामुळं सीमोल्लंघन केल्यावर भारतापुढं नवं आव्हान उभं राहणार आहे. ही अटीतटी किती प्रमाणात वाढू द्यायची आणि संयमी रणनीती सोडली, तरी ही अटीतटी हाताबाहेर जाऊन प्रत्यक्ष युद्धापर्यंत पोहोचू नये, यादृष्टीनं काय आखणी नव्यानं करायची, हे भारतापुढंचं आता भविष्यातील खरं मोठं आव्हान आहे.

...कारण पाकिस्तान लष्कराचं स्वरूप आणि त्या देशातील राज्यसंस्थेवर या लष्कराची असलेली पकड लक्षात घेता, केवळ एका ‘सर्जिकल स्ट्राइक’मुळं पाकिस्तान आपली रणनीती बदलेल, याची सुतराम शक्यता नाही. तसं बघायला गेल्यास आजही पाकिस्तानमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यापेक्षा लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनाच जनमनांत मोठं स्थान आहे. किंबहुना सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाच्या दृष्टीनं कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा लष्कर हेच जास्त विश्वासार्ह आहे. याचं कारण लष्कर हेच देशाचं संरक्षण करू शकतं, अशी जनतेची भावना आहे. पाकिस्तानमधील जनतेशी संवाद साधायला हवा, असं सांगणारे जे गट भारतात आहेत, ते पाकिस्तानी जनतेची ही मनोभूमिका डोळ्याअाड करीत असतात. तात्पर्य इतकंच की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलाडून कारवाई करून तिला प्रसिद्धी दिल्यानं पाकिस्तानला अद्दल घडवली गेली आहे, असं मानणं हाही अज्ञानाचा वा भाबडेपणाचा भाग आहे. येथेच भारतापुढं नव्यानं उभ्या राहिलेल्या आव्हानाचा संबंध येतो.

अशी कारवाई होईपर्यंत आपल्याला प्रतिकार करण्याचा पर्याय उपलब्ध होता आणि भारतानं असा प्रतिकार केल्यास त्याला प्रत्युत्तर दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊन युद्धाची वेळ न येऊ देण्याची जबाबदारी पाकिस्तानची होती. पण आता पारडं पालटलं आहे. आपण कारवाई केली. त्याला पाकिस्तान काय उत्तर देतो-हा मजकूर लिहीत असताना बारामुल्ला येथील राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची बातमी आली आहे-आणि त्याला आपण किती व कसा प्रतिसाद देतो, यावर परिस्थिती युद्धापर्यंत जाणार की नाही, हे अवलंबून आहे. आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्याची जबाबदारी भारतावर येऊन पडली आहे.
‘सर्जिकल स्ट्राइक’ झालेलाच नाही, केवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन भारतीय लष्करानं केलं, असं पाकिस्तान सांगत राहिला आहे, याचा अर्थ काय ते जनतेला समजावून सांगण्याची गरज आहे. भारताच्या कारवाईनंतर जो नवा समतोल दोन्ही देशांतील संबंधात निर्माण झाला आहे, तो तसाच ठेवण्याची तयारी असल्याचं पाकिस्तान सुचवत आहे. पण आपण जर ‘सर्जिकल स्टाइक’ न झाल्याचं पाकिस्तान सांगतो, म्हणजे तो पळपुटा आहे, घाबरला आहे, असाच प्रचार आपण करीत राहिलो, तर पाकिस्तानमधील जनमताला प्रतिसाद देण्याची गरज त्या देशाच्या लष्करालाही भासू शकते. अशावेळी पाकिस्ताननं जर काही कारवाई केली, तर त्याला प्रतिसाद देणं आपल्याला भाग पडेल. उत्तर-प्रत्युत्तराचा या सरकत्या जिन्यावर (एक्सलेटर) चढलं की, पुढील मजला येईपर्यंत मध्ये उतरता येत नाही. हा पुढचा मजला युद्धाचाच असतो.

‘लष्करी कारवाईबाबत अतिरेकी व छाती पिटणारी विधानं करणं पक्षप्रवक्त्यांनी टाळावं’, असं जे आव्हान भाजपानं-म्हणजेच मोदी यांनी- केलं आहे, त्याचा संबंध भारतापुढच्या या आव्हानाशी आहे. देशात युद्धज्वर भडकत राहिल्यास त्यानं उत्तर-प्रत्युत्तराच्या सरकत्या जिन्यावर चढणं अपरिहार्य ठरेल, याची जाणीव मोदी सरकारला असल्याचं हे चांगलं लक्षण आहे.

पक्ष असा इतका स्पष्ट आवाहनात्मक इशारा देत असतानाही संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पाकिस्तानला कोपरखळी मारण्याचा मोह आवरता आलेला नाही. हा बाष्कळपणा आहे. तो सरकार कसा टाळणार आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी काय करणार, हेच मोदी यांच्यापुढील मोठं आव्हान आहे.

प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक)
prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...