आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमीद अन्सारी काय चुकीचं बोलले?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच आपण ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पुरी होत असतानाच, गेल्या सात दशकांत प्रथमच असं घडलं की, मावळत्या उपराष्ट्रपतींनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून निरोपाचं भाषण सभागृहात करताना प्रस्थापित सरकारवरच टीका केली. तीही भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती बनलेल्या सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या एका भाषणातील वाक्यं उद््धृत करून. ...आणि नव्या उपराष्ट्रपतींनी शपथ घेताना ही टीका खोडून काढली आहे.
 
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या टीकेचा मुद्दा होता, तो देशातील अल्पसंख्याकांना वाटत असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेचा आणि लोकशाही राज्यव्यवस्थेत अल्पसंख्याकांप्रति राज्यसंस्थेच्या कर्तव्याचा. तो मांडताना अन्सारी यांनी राज्यघटनेतील तरतूद आणि संसदीय राज्यपद्धतीची चाकोरी व परंपरा यांचा आधार घेतला. अन्सारी यांची टीका खोडून काढताना नवे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही राज्यघटनेतील तरतूद आणि संसदीय राज्यपद्धतीची चाकोरी व परंपरा यावरच भर दिला.
 
मात्र स्वातंत्र्यानंतर गेल्या सात दशकांत प्रथमच असं घडलं की, ‘राज्यघटना म्हणजे निव्वळ गोधडी असून ती टाकून दिली पाहिजे,’ अशा वैचारिक मांडणीच्या आधारे ज्या संघटनेचा पाया घातला गेला, तिच्याशी आपली जन्मजात बांधिलकी आहे, असं मानणारे व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदी बसले आहेत.  
म्हणजे एक प्रकारे राज्यघटनेला माझ्या लेखी दुय्यम स्थान आहे, हेच नवे उपराष्ट्रपती अप्रत्यक्षपणे सांगत आहेत. हीच गोष्ट राष्ट्रपती व पंतप्रधान यांचीही आहे. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ध्येयं आणि उद्दिष्टं ही भारतीय राज्यघटनेशी सुसंगतच आहेत, असा दावा देशातील तीन सर्वाेच्च पदांवर बसलेल्या व्यक्ती करीत राहतील, हा भाग वेगळा. मात्र देशाच्या स्वातंत्र्याला सात दशकं पुरी होत असताना राज्यघटनेचा पाया असलेली मूलभूत तत्त्वंच मान्य नसलेल्या तीन व्यक्ती देशातील तीन सर्वाेच्च घटनात्मक पदांवर जाऊन बसल्या आहेत. त्याही घटनात्मक चौकटीतच. याचा परिणाम काय होऊ शकतो, ते लगेचच स्वातंत्र्यदिनाशी संबंधित असलेल्या दोन घटनांनी निदर्शनास आणून दिलं आहे.  
 
ईशान्येतील त्रिपुरा या राज्यात येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. देशात केरळ व त्रिपुरा या दोनच राज्यांत कम्युनिस्टांची सत्ता आहे. त्यात केरळात संघ व कम्युनिस्ट यांच्यात हाणामारी व खूनबाजी चालू आहे, केरळात एवढ्यात निवडणुका नाहीत. पण लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं वातावरण ढवळून काढण्यासाठी संघ पराकाष्ठेचे प्रयत्न करीत आहे. संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात २००३ पर्यंत जाणीवपूर्वक तिरंगा न फडकवणारे सरसंघचालक यंदाच्या स्वातंत्र्यदिनी केरळात पोचले. कारण पलक्कड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत ध्वजारोहण करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं.  
 
अगदी गेल्या वर्षीपर्यंत स्वातंत्र्यदिन वा प्रजासत्ताकदिन वगळता इतर दिवशी कोणाही नागरिकाला ध्वज फडकवता येत नसे. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर कोणाही व्यक्तीला आपल्या कार्यालयावर वा घरावरही ध्वज फडकवण्याची मुभा मिळाली आहे. मात्र स्वातंत्र्यदिनी सरकारी कचेऱ्या व इतर आस्थापनांत ध्वजारोहण कोणी कसं करायचं, याचे नियम आहेत. त्यानुसार अधिकृत व्यक्तींनीच तेथे ध्वजारोहण करणं बंधनकारक असतं. सरसंघचालक सरकारी शाळेत जाऊन तेथे ध्वजारोहण करू शकत नाहीत. अर्थात या शाळेच्या भिंतीबाहेर ध्वजारोहण करण्याची मुभा त्यांना आहे.  पण ती शाळा ज्या जिल्ह्यात आहे, तेथील मंत्री वा लोकप्रतिनिधी, ते उपलब्ध नसल्यास जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय वा पोलिस अधिकारी आणि यापैकी कोणीच उपलब्ध नसल्यास शाळेचे मुख्याध्यापक अशा क्रमानं ध्वजारोहण करण्याचं बंधन ‘फ्लॅग कोड’मध्ये आहे. त्यामुळं सरकारी शाळेत जाऊन सरसंघचालकांनी ध्वजारोहण करण्यानं नियमांचा भंग झाला. हे घडू नये म्हणूनच सरकारी शाळेत सरसंघचालक ध्वजारोहण करणार हे जेव्हा जाहीर झालं, तेव्हा पलक्कडच्या दंडाधिकाऱ्यांनी सरसंघचालकांच्या जिल्हा प्रवेशाला बंदी घातली होती. ती मोडून सरसंघचालकांनी ध्वजारोहण केलं. शिवाय ध्वजारोहण झाल्यावर राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक आहे. पण सरसंघचालकांच्या या कार्यक्रमात राष्ट्रगीताऐवजी ‘वंदे मातरम’ म्हटलं गेलं.  
 
हा सगळा प्रकार मुद्दामच केला गेला. ध्वजारोहणाला व ‘वंदे मातरम’ला कम्युनिस्टांचा विरोध आहे, हे दर्शवण्यासाठी हा प्रकार केला गेला आणि लगेच संघ व भाजपनं केरळातील डाव्या आघाडीच्या सरकारच्या विरोधात या मुद्द्यावरून मोहीमच उघडली. अशा रीतीनं सरसंघचालकांनी राज्यघटनेतील राष्ट्रध्वजासंबंधीच्या तरतुदींचा भंग करूनही ‘राज्यघटना हा माझा धर्म आहे’, असं म्हणणारे पंतप्रधान मोदी मूग गिळून बसले आहेत.मात्र लोकनियुक्त सरकारचे मुख्यमंत्री असलेले कम्युनिस्ट पक्षाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचं स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला उद्देशून दूरदर्शन व आकाशवाणी या सरकारी माध्यमांतून (ही दोन्ही माध्यमं प्रसार भारती या स्वायत्त महामंडळाकडं असली, तरी त्यावर सरकारचंच नियंत्रण असतं. या महामंडळाची स्वायत्तता ही नावापुरतीच असते.) भाषण करू दिलं गेलं नाही. कारण काय?
 
...तर केंद्र सरकारच्या रोजगार निर्मितीच्या धोरणावर, गोरक्षक घालत असलेल्या धुमाकुळाबद्दल माणिक सरकार यांच्या ध्वनिमुद्रित भाषणात उल्लेख होते. ते वगळा, तरच भाषण प्रक्षेपित करू, अशी अट प्रसार भारतीनं घातली. ती माणिक सरकार मान्य करणं शक्यच नव्हतं.  त्यामुळं भाषण प्रक्षेपितच केलं गेलं नाही. उलट प्रसार भारतीनं मूळ मुद्द्याला बगल देत स्वातंत्र्यदिनाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना कशी प्रसिद्धी देण्यात आली, याचाच खुलासा केला. मात्र एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना प्रा. राकेश सिन्हा या संघाच्या प्रचारकानं स्पष्टपणे सांगितलं की, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात येणाऱ्या भाषणात देशासंबंधीच्या विधायक व स्फूर्तिदायी मुद्द्यांवर भर दिला गेला पाहिजे. एक प्रकारे तसं न झाल्यानं भाषण प्रसारित केलं गेलं नाही व ते योग्यच होतं, असं प्रा. सिन्हा सुचवत होते.  
 
मुस्लिम द्वेष हा संघाच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळंच गोमांसाच्या मुद्द्यावरून अखलाख व त्याच्यासारख्या इतर मुस्लिमांना लक्ष्य केलं जात असतं. मात्र ‘वेळ पडल्यास गोमांस आयात करू,’ असं उघडपणे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणतात. अखलाख व इतरांना संघ परिवार जो ‘न्याय’ देऊ पाहतो, तो पर्रीकरांना का लावायचा नाही? केवळ पर्रीकर हे हिंदू व संघाचे आहेत म्हणून? हीच गोष्ट केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांची. गोमांस खाणं हा माझ्या जीवन पद्धतीचा भाग आहे, असं रिजिजू म्हणाले तरी चालतं; कारण ते संघाचे आहेत व हिंदू आहेत म्हणूनच ना? गोमांस खाणं हा मुस्लिमांच्याही जीवन पद्धतीचा भाग आहे, मग त्यांना का लक्ष्य केलं जातं? केवळ मुस्लिम म्हणूनच ना?
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नेमकं याच वास्तवावर बोट ठेवलं आणि औचित्याचं व संसदीय कामकाजाच्या मर्यादांचं भान राखत मोदी सरकार खरं काय करू पाहत आहे, याकडे लक्ष वेधलं. शिवाय राज्यघटनेतील तरतुदी व लोकशाही परंपरांशी मोदी सरकार टाकत असलेली पावलं कशी विसंगत आहेत, हेही अन्सारी यांनी संयतपणे व सभ्यरीत्या दाखवून दिलं.
 
बातम्या आणखी आहेत...