आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात बदलाची झुळूक?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दहशतवादाच्या विरोधातील कारवायांत अाडकाठी आणणाऱ्या काश्मिरी तरुणांना देशद्रोही मानून त्यांना धडा शिकवला जाईल’, असं भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बजावलं आहे. जनरल रावत हा इशारा देत असतानाच सीमेपलीकडे पाकिस्तानात त्या देशाचे नवे लष्करप्रमुख जनरल उमर जावेद बाजवा हे सैन्यातील अधिकाऱ्यांना सांगत होते की, 
 
भारतीय लष्कर कसं वागतं ते समजून घेण्यासाठी  ‘आर्मी अँड नेशन : द मिलिटरी अँड इंडियन डेमॉक्रसी सिन्स इंडिपेंडन्स’ हे पुस्तक वाचा. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील भारत व दक्षिण आशियाविषयक अभ्यास केंद्रातील प्राध्यापक स्टिव्हन विल्किसन यांचं हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. 
 
जनरल बाजवा यांचं हे वक्तव्य पाकिस्तानमधील लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून केलेलं आहे. तेही एका गोपनीय स्वरूपाच्या बैठकीत. तरीही या वक्तव्यातील भारतासंबंधीचे उद्गार माध्यमांच्या प्रकाशझोतात आले आणि असं काही झाल्यास पाकिस्तानच्या लष्करातर्फे कायम जो इन्कारायचा धोशा लावला जातो, तसंही काही झालं नाही. याचा अर्थच असा की, पाक लष्करप्रमुखांना हे उद्गार त्या देशातील जनता व जगापुढेही यायला हवे होते.  
याच संदर्भात पाकच्या दहशतवादविरोधी कायद्याखाली ‘लष्कर-ए-तय्यबा’चा प्रमुख हाफीझ सईद याचं नाव पंजाब सरकारनं दहशतवाद्यांच्या यादीत घालणं ही घटनाही बोलकी आहे.
 
पाकिस्तानच्या या कायद्यानुसार एकदा एखाद्याचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत घातलं की, त्या व्यक्तीवर विविध प्रकारचे निर्बंध टाकता येतात आणि त्याला अटकही करता येऊ शकते.  दहशतवाद्यांच्या यादीत सईदचं नाव घातलं जाण्याच्या आगेमागे पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी मोठे आत्मघातकी बॉम्बस्फोट होत आले आहेत. त्यामागे ‘इसिस’चा हात असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय तालिबानचा एक  गट ‘इसिस’ला साथ देत असल्याचंही बोललं जात आहे. 

सईद यांच्यावर कारवाई करण्यात आल्यावर दोनच दिवसांच्या आत आणखी एक मोठा आत्मघातकी बॉम्बस्फोट सुफी दर्ग्याच्या आवारात झाला आणि त्यात ७० पेक्षा जास्त नागरिक मारले गेले.
 
त्याचा बदला म्हणून पाकस्तानी लष्करानं तालिबानी गटाच्या तळावर हल्ले करून १००पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या कारवाईच्या दिवशीच अफगाणिस्तानच्या युनोतील राजदूतांनी ‘इसिस’चा किती मोठा धोका हा पाकिस्तानसह आपल्या देशाला आहे, हे लक्षात घेण्याचं आवाहन जाहीररीत्या केलं आहे. 
 
इराक व सिरियातील ‘इसिस’चे तळ आता उद्ध्वस्त होत आहेत आणि या दहशतवादी संघटनेवर माघार घेण्याची पाळी आली आहे, त्यामुळे अफगाण-पाकिस्तान भागात पाय रोवण्याचा ‘इसिस’चा प्रयत्न असल्याचा युक्तिवाद त्या राजदूतांनी केला आहे. जनरल बाजवा यांचं वक्तव्य आणि या सगळ्या घटना यांचा एकत्रित विचार केल्यास आपण काय निष्कर्ष काढू शकतो? 

बदलाची हलकीशी झुळूक पाकमध्ये येत आहे की काय, असं वाटावं, इतपतच या घटनांबाबत ठामपणे आपण काही आज म्हणू शकतो. याचं कारण पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत आडाखे बांधताना त्या देशातील अनेक प्रकारची अनिश्चितता हा एक मोठा अडथळा असतो.
 
उदाहरणार्थ, पाकिस्तानी लष्कराचा राज्यसंस्थेत असलेला निर्णायक स्वरूपाचा सहभाग.
 तसा तो असण्याची अनेक ऐतिहासिक कारणं आहेत. त्याचा इतक्या मर्यादित शब्दांच्या स्तंभात विचार करणं अशक्य आहे.
 
पाकिस्तानची अर्ध्यापेक्षा जास्त अर्थव्यवस्था लष्कराच्या नियंत्रणाखली आहे, इतकं लक्षात घेतलं, तरी कल्पना येऊ शकते. साहजिकच पाकिस्तानी लष्कराचे-म्हणजे वरिष्ठच नव्हे, तर मधल्या फळीतील व त्या खालच्या स्तरांतील अधिकाऱ्यांचेही- प्रस्थापित व्यवस्थेत हितसंबंध निर्माण झाले आहेत.
 
 शिवाय जागतिक राजकारणातील सत्तासमतोल, वरचष्मा व दक्षिण आशियातील परिस्थिती, अमेरिकेतील ट्रम्प सरकारची बदलती भूमिका, चीनची भूमिका असे इतर अनेक घटकही त्या त्या वेळी महत्त्वाचे ठरू शकतात. म्हणून भारतीय लष्कराकडे बघा, असं जनरल बाजवा यांनी सांगितलं, म्हणून आता बदल होणारच, असं मानणं हे मनाचे मांडे खाण्यासारखंच  होईल.
 
मात्र, जनरल बाजवा यांच्याप्रमाणे विधान आतापर्यंत एकाही पाकिस्तानी लष्करप्रमुखानं केलेलं नव्हतं. त्यामुळंच बदलाची हलकीशी झुळूक येण्याची शक्यता आहे, इतकंच सध्या म्हणता येऊ शकतं. 
 
इतकी मर्यादित शक्यताही भारताच्या दृष्टीनं मोक्याची व मोलाचीही आहे. नेमक्या याच वेळी भारत-पाकिस्तानमधील मूळ प्रश्न असलेल्या काश्मीरच्या समस्येचा विचका आपण करत आहोत. लष्करप्रमुखांचे उद्गार हा विचका आणखी वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहेत.
 
काश्मीर ही समस्या राजकीय आहे. ती चर्चा व संवाद याद्वारेच सुटू शकते. तोच मुद्दा अत्यंत आग्रहानं लष्कराच्या उत्तर विभागाचे अगदी कालपरवापर्यंत प्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल हुडा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रविवारी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मुलाखतीत ठोसपणे मांडला आहे. 
 
या चर्चा व संवादात आतापर्यंत पाकिस्तानचा अडथळा होता. पुढेही राहू शकेल. पण जनरल बाजवा यांचे वक्तव्य थोडीशी का होईना, आशेला जागा निर्माण करणारं आहे, तर भारतीय लष्करप्रमुखांचे उद्गार ही जी काही थोडीशी जागा आहे, त्याची दखलच न घेणारं आहे. 


prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...