आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण स्वप्नांच्या सौद्याचं!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील समाजजीवनाची घडी जातिव्यवस्थेच्या आणि संपत्तीच्या असमान वाटपाच्या अंगाने बसली असल्यामुळे गुन्हेगार असणं, भ्रष्टाचार करणं हा जनमनात गुन्हा मानला जात नाही. मात्र एखादा गुन्हेगार राजकारणी अथवा धनवान आपलं शोषण करतो, आपल्याला नागवतो अशी भावना असली की लोक त्याच्याविरोधात जातात.
 
‘इमानदार का सन्मान होगा’  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे रविवारी ग्वाही दिली. त्याचबरोबर भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणाला आळा घालण्यासाठी ठोस पावले टाकली जातील, असेही पंतप्रधानांनी ठामपणे सांगितलं. निमित्त होतं उत्तर प्रदेशातील शेवटच्या फेरीतील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी केलेल्या भाषणाचं. 

मोदी हे आश्वासन तिकडे उत्तर भारतात देत असतानाच इकडे मुंबईत गीता गवळी या महापालिका निवडणुकीनंतर भाजपत प्रवेश केलेल्या अपक्ष नगरसेविकेचं विधानही प्रसिद्ध झालं. स्थायी समिती वा आरोग्य समितीचं अध्यक्षपद देण्याचं भाजपचं मला आश्वासन आहे, असं गीता गवळी यांनी पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितलं. या गीता गवळी म्हणजे मुंबईच्या मध्य भागात एकेकाळी दहशत माजवणारा डॉन ‘डॅडी’ अरुण गवळी यांची मुलगी. न्यायालयाने शिक्षा देण्याआधी गवळी याने पक्ष काढला. तो तुरुंगात गेल्यावर त्याच्या पत्नीने पक्ष चालवला आणि आता त्याची मुलगी गीता ही अपक्ष म्हणून निवडून आली आहे. ‘दगडी चाळ’ हा जो अरुण गवळी याचा बालेकिल्ला होता आणि जेथून त्याच्या सर्व गुन्हेगारी कारवाया चालत असत तो पोलिसांनी उद््ध्वस्त केला तरीही त्या परिसरातून अरुण गवळी याची पत्नी व मुलगी अजून निवडून येत असते. 

उत्तर प्रदेशातील निवडणुका संपण्याच्या बेतात आहेत. या निवडणुकांत भाग घेणाऱ्या प्रत्येक तीन उमेदवारांपैकी एक हा गुन्हेगार आहे. बहुजन समाज पार्टीचे ४० टक्के, भाजपचे ३७ टक्के, समाजवादी पक्षाचे ३० टक्के आणि काँग्रेसचे ३२ टक्के उमेदवार गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत अडकले आहेत. हे प्रमाण २०१२ च्या निवडणुकीत सरासरी १९ टक्के होते. आज ही सरासरी ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. निवडणूक लढविणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी १,४५७ हे कोट्यधीश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही व आश्वासन या पार्श्वभूमीवर हे परखड वास्तव कसं बघायचं? 

उमेदवार गुन्हेगार आहे की नाही याचं मतदारांना फारसं काही देणंघेणं नसतं, असं दर्शवणारं हे वास्तव आहे. एखादा गुन्हेगार राजकारणी ‘रॉबिनहूड’गिरी करीत असेल आणि फक्त धनवानांना लक्ष्य करीत असेल तर सर्वसामान्यांना त्याची काहीच चिंता नसते. ‘तो आपला आहे’ ही त्यांची भावना असते. श्रीमंत, धनवान हे आपलं शोषण करतात ही भावना सर्वसामान्य भारतीयांत रुजली आहे. भारतातील समाजजीवनाची जी घडी जातिव्यवस्थेच्या आणि संपत्तीच्या असमान वाटपाच्या अंगाने बसली आहे त्यामुळे गुन्हेगार असणं, भ्रष्टाचार करणं हा  जनमनात गुन्हा मानला जात नाही. मात्र एखादा गुन्हेगार राजकारणी अथवा धनवान आपलं शोषण करतो, केवळ स्वतःचे व गोतावळ्याचेच पाहतो, आपल्याला नागवतो अशी भावना असली की लोक त्याच्याविरोधात जातात.  

‘इमानदारी का सन्मान होगा’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात किंवा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पारदर्शकते’चा आग्रह धरीत राहतात. त्यामागे ‘आमच्याशिवाय सगळे राजकारणी तुमचं शोषण करणारे आहेत,’ हे त्यांना जनतेच्या मनावर बिंबवायचं असतं. त्यासाठी मग प्रसिद्धीचा प्रकाशझोत पक्षापेक्षा मोदी वा फडणवीस यांच्यावरच ठेवला जातो.  
अर्थात, मोदी हे सडेफटिंग आहेत. त्यांना ना कुटुंब, ना नातेवाईक. उत्तर प्रदेश भाजपच्या उमेदवारांपैकी ३२ टक्के गुन्हेगार असले तरी मोदी यांना त्याचं उत्तर द्यावं लागत नाही. ते ‘स्वच्छ’ आहेत, त्यांना देशाचा कारभार सुधारायचा आहे, ते देशाचा विकास करू पाहत आहेत. पक्षात असे काही लोकं असतील, पण राजकारण असंच चालतं ही जनमतात भावना आहे. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, असं समीकरण मोदी यांनी २०१३ पासून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे प्रसारमाध्यमाद्वारे प्रभावी प्रचार करून जनमनावर बिंबवलं आहे. त्यामागे राजकारणातील भ्रष्टाचार हा मुद्दा नाही हे आतापर्यंत क्वचितच लक्षात घेतलं गेलं आहे. खरा मुद्दा आहे तो काँग्रेसने सहा दशकं राज्य करताना त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतःचं भलं करून जनतेला नागवलं, देशाची बरबादी केली हे मोदी सतत सांगत आले आहेत. त्याचबरोबर मोदींनी भाजपपासून स्वतःला कटाक्षाने वेगळं ठेवलं आहे. शिवाय ‘गरीब सर्वसामान्य घरातून आलेल्या हा राजकारणी देशासाठी खरंच काही करू पाहतो आहे, इतरांनी तरी आतापर्यंत काय केलं, आता हा काही करू पाहतो आहे, तर त्याला संधी द्यायला काय हरकत आहे?’ ही भावना मोदी यांनी जनमनात रुजवली आहे. मात्र हा प्रभाव मोदी यांचा आहे, भाजपचा नाही. मोदी यांनी हे जे स्वप्नं दाखवलं आहे ते प्रत्यक्षात आणण्यात त्यांना मदत करायला काय हरकत आहे? असं जनतेला वाटत आहे, असं दिसतं. म्हणूनच महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालात जे यश मिळालं ते भाजपचं नव्हतं, मोदींचं होतं. 

स्वप्नांच्या या सौद्याचं हे राजकारण देशस्तरावरही २०१४ नंतर पुन्हा एकदा यशस्वी ठरतं काय हे येत्या शनिवारी उत्तर प्रदेश व इतर चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागले की, दिसून येईलच!
 
(ज्येष्ठ पत्रकार)
prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...