आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कसोटी उद्धव यांचीच !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता उद्धव ठाकरे यांची कसोटी आहे. राजकीय धोका पत्करून प्रबळ प्रादेशिक पक्ष बनण्याची संधी साधायची की, भाजप-संघाच्या हिंदुत्वाच्या ताटाखालचे मांजर बनायचे, हे उद्धव यांना ठरवावे लागणार आहे.
 
भाजपपेक्षा निदान तीन जागा तरी जास्त मिळविण्याएवढं मुंबई महापालिका निवडणुकीचं गणित प्रचंड दमछाकीनंतर शिवसेनेला अखेर जमवता आलं आहे. मात्र भाजपनं आपलं संख्याबळ अडीच पटीनं वाढवून शिवसेनेच्या नाकाला मिरच्या झोंबविल्या आहेत.
 
शिवाय शिवसेनेला मुंबईतच गुंतवून ठेवून राज्याच्या इतर भागांत तिचा टक्का कसा घसरेल, याची रणनीती यशस्वीपणे अंमलात आणली आहे. एका व्यापक राष्ट्रीय स्तरावरच्या सत्ता समीकरणाचं भान ठेवून त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील या ‘मिनी’ विधानसभा निवडणूक निकालाकडे पाहणे आवश्यक आहे. 
 
भाजपनं २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवलं. मात्र त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका सोडल्यास भाजपला कोठेच यश मिळवता आलेलं नाही.
 
दिल्ली असो, वा बिहार किंवा पश्चिम बंगाल त्या त्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी भाजपला रोखलं. त्यामुळं ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा देऊनही त्या पक्षाप्रमाणं देशव्यापी राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या दिशेनं भाजपला फारशी वाटचाल करता आलेली नाही. 
 
काँग्रेसचं एकपक्षीय वर्चस्व ओसरू लागल्यावर विविध प्रादेशिक पक्ष उदयाला आले. त्यांना हाताशी धरून भाजपनं राजकारणाच्या परिघावरून मुख्य प्रवाहात पावलं टाकण्यास सुरुवात करून आपला जम बसवला.
 
मात्र हे प्रादेशिक पक्ष सत्तेसाठी भाजपची साथ देत होते. भाजप-संघाच्या हिंदुत्वाशी त्यांना काहीही देणंघेणं नव्हतं व आजही नाही. सत्ता हाती घेऊन ती बळकट करीत नेणं व त्याआधारे हिंदुत्वाची घडी बसवणं, हेच एकमेव उद्दिष्ट भाजप-संघ यांनी डोळ्यांपुढं ठेवलं आहे. 
 
जे कोणी बरोबर येतील, त्यांना साथीला घेण्याची रणनीती त्यांनी कायम आखली व अंमलातही आणली. जे भाजप-संघ यांच्या साथीनं पुढं जाऊ पाहतात, ते राजकारणात वजा होत जातात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ‘पीडीपी’ला तो अनुभव सध्या येत आहे. म्हणूनच बिजू पटनाईक यांनी ओरिसात वेळेवरच भाजपचा हात सोडला आणि नितीश कुमार यांनी बिहारमध्येही तेच केलं. 
 
या संदर्भात लक्षात घेण्याचा आणखी एक मुद्दा म्हणजे २०१४ च्या निवडणुकीनंतर आज अडीच वर्षांनीही मतदार काँग्रेसवर नाराज आहेत. जेथे भाजपचा सरळ सामना काँग्रेसशी असतो, तेथे मोदी प्रभावी ठरतात. हे परखड व कटू राजकीय वास्तव समजून घेऊन जनमनात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी पक्षाची पुनर्बांधणी करण्याची उमज अजूनही काँग्रेसला पडलेली नाही. त्यामुळं जेथे प्रबळ प्रादेशिक पक्ष नाहीत, तेथे भाजपला फायदा होत आहे. 
 
या पार्श्वभूमीवर भाजप-सेना यांच्यात गेला महिनाभर जो कलगीतुरा झडला आणि त्यानंतर आता लागलेले निवडणुकांचे निकाल बघायला हवेत. इतर राज्याप्रमाणं महाराष्ट्रात प्रबळ प्रादेशिक पक्ष नव्हता व आजही नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा सरळ सामना काँग्रेसशी होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना व ‘राष्ट्रवादी’ला आपल्या बाजूला वळवणं भाजपला भाग आहे.
 
 
 हे दोन्ही पक्ष एकाच वेळी भाजपची साथ देणं शक्य नाही. त्यामुळं पहिला पर्याय म्हणून शिवसेनेला चुचकारत, धमकावत, लक्ष्य करीत तिला आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न भाजप २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून करीत आला आहे
 
. सेना बधत नाही, असं दिसलं, तेव्हा ‘राष्ट्रवादी’चा पर्यायही मोदी-शहा यांनी वापरला आणि ‘तुम्ही नाही, तर राष्ट्रवादी’, असंही सेनेला बजावून पाहिलं. या पेचातून बाहेर पडण्यासाठी खरं तर सेनेनं स्वतःचं पाठबळ जोखत भाजपला आव्हान देणं क्रमप्राप्त होतं. 
 
मात्र कधी पक्ष फोडायची टांगती तलवार सेना नेतृत्वाच्या डोक्यावर धरत, तर कधी आर्थिक हितसंबंध कसे धोक्यात आणू शकतो, याचे गर्भित इशारे देत भाजप सेनेवर दबाव टाकत आला आहे. ताज्या निवडणुकांपर्यंत सेना नेतृत्वही कच खात आलं होतं.
 
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सेनेला तिची जागा दाखवून देण्याचा चंग भाजपनं बांधला आणि मग उद्धव ठाकरे यांच्यापुढं पर्यायच उरला नाही. त्यांनी कंबर कसली. 
 
...आणि युती तुटली 
मात्र १० जागा वाढवण्यापलीकडं सेनेला यश आलेलं नाही. उलट भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे. शिवाय राज्यातील इतर महापालिका व जिल्हा परिषदा येथे भाजप पुढं सरकत आहे. एक प्रकारे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार हा मुद्दा बनवून भाजपनं सेना नेतृत्वाला तेथेच बंदिस्त करून टाकलं.  
 
आता कसोटी शिवसेनेची आहे. पालिकेतील संख्याबळ असं आहे की, शिवसेना वा भाजप या दोघांनाही एकमेकांची वा इतरांची मदत घेतल्याविना आपला महापौर निवडून आणता येणार नाही. ‘आम्ही युती करू, पण पारदर्शीपणाच्या मुद्याच्या आधारे’, असं म्हणत भाजप उद्धव यांना नाक घासायला लावणार आहे.
 
 उलट भाजपला बाहेर ठेवायचं असल्यास शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेची मदत लागेल. हे घडू नये, म्हणून ‘चौकशी’ची गर्भित धमकीही ‘पारदर्शकते’च्या नावाखाली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच किरीट सोमय्य्या यांच्या आरोपाच्या निमित्तानं आधीच देऊन ठेवली आहे. येथेच उद्धव ठाकरे यांची कसोटी आहे.
बातम्या आणखी आहेत...