आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरूंचा आशावाद सार्थ ठरो!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघापासून देशाला असलेला धोका ओळखून, त्या संघटनेच्या परिघापासून दूर राहत, तिचा वैचारिक मुकाबला करण्यावर नेहरूकालीन राजकारणात भर होता. उलट आज भाजपचे माजी अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या साठीच्या समारंभाला काँग्रेसचे नेते हजेरी लावतात, त्यांची स्तुती करतात.
 
ग्रॅनव्हील ऑस्टिन हे नाव आजच्या पिढीला- त्यात सध्याचे राजकारणीही आले - माहीत असण्याची शक्यताही नाही. अगदी ‘राज्यघटना हा माझा धर्म आहे’, असं म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही. मात्र, तीन वर्षांपूर्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यात निधन पावलेले ऑस्टिन हे भारतीय राज्यघटनेचे पहिले भाष्यकार होते. ‘इंडियन कॉन्स्टिट्युशन : कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन’ हा ऑस्टिन यांचा भारतीय राज्यघटनेची चिकित्सा करणारा पहिलाच ग्रंथ होता. राज्यघटना बनवण्याच्या भारतीयांच्या प्रयत्नांबद्दल ऑस्टिन यांनी म्हटलं होतं की, ‘समृद्ध सांस्कृतिक वारसा, आधुनिक जगातील कला व विज्ञान या क्षेत्रांत प्रगती करण्याची जिद्द आणि कारभार चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो हा ठाम विश्वास या घटकांमुळे भारतीयांत एक नैसर्गिक प्रगल्भता येऊन, सरकार स्थापन करून ते विवेकी पद्धतीनं चालवण्याची क्षमता त्यांच्यात आली आहे.’ 

अशा या ग्रॅनव्हील ऑस्टिन यांची आठवण झाली, ती पंडितजींच्या निधनानंतर लगेचच न्यूयॉर्क येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ करंट वर्ल्ड अफेअर्स’ या संस्थेच्या कार्यकारी संचालकांना नवी दिल्लीहून त्यांनी लिहिलेले पत्र नेहरूंच्या ५३ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाजमाध्यमांवर वाचायला मिळाल्याने. पंडितजींच्या निधनानंतर भारतीय राजधानीवर जी शोककळा पसरली, त्याचं वर्णन करणाऱ्या या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदात ऑस्टिन यांनी म्हटलं आहे की, ‘केंब्रिज विद्यापीठात नेहरूंबरोबर असलेले, नंतर तुरुंगात पंडितजींची साथ करणारे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सहकारी डॉ. सय्यद महमूद यांना दुःखावेग आवरत नव्हता. तेव्हा जगजीवनराम यांनी त्यांना आधार दिला व पंडितजींच्या अंत्यदर्शनासाठी ते त्यांना आत घेऊन गेले. एका ब्राह्मणाच्या मृत्यूचा शोक एका मुस्लिमाला अनावर झाल्यावर त्याला आधार देतो आहे तो एक दलित, हे चित्र म्हणजेच ‘नेहरूंच्या भारता’चं प्रतीक होतं.’ 
 
उघडच आहे की, आज हा भारत अस्तंगत झाला आहे. तसं घडून येण्यास नेहरू ज्या काँग्रेसचे नेते होते, तीच जबाबदार आहे, याबद्दलही दुमत असता कामा नये. नेहरूंची स्मृतीच आज संघाला पुसून टाकायची आहे, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या बहुसंख्याकांच्या जमातवादाचा पुरस्कार करतो, त्याचा अल्पसंख्याकांच्या जमातवादाएवढाच देशाला भविष्यात किती व कसा धोका आहे, हे उघडपणे सतत सांगत राहिले होते, ते पंडित नेहरूच. नथुरामनं महात्माजींची हत्या करण्याच्या आधी सात आठवडे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात पंडितजींनी म्हटलं होतं की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती एखाद्या खासगी सशस्त्र सेनेच्या स्वरूपाची असल्याचा सबळ पुरावा आमच्याकडे जमा झाला आहे. नाझी पक्षाप्रमाणेच संघाचं संघटन आहे. राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्याचा आमचा अजिबात विचार नाही. कोणत्याही विचाराचा प्रचार व प्रसार करण्याला आम्ही प्रतिबंध घालू इच्छित नाही...... पण शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जात असेल, तर  ती वापरण्याचा संघाचा इरादा आहे, ही गोष्टही डोळ्याआड करून चालणार नाही. म्हणूनच राज्यांच्या सरकारांनी अशा प्रकारांवर नजर ठेवून त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे. काही राज्यांत अशा प्रकारांना तेथील सरकारे अप्रत्यक्षरीत्या पाठबळ देत असल्याचंही आमच्या निदर्शनास आलं आहे. राज्यांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. मात्र, जर्मनीत नाझी पक्ष कसा सत्तेवर आला, याची मला चांगलीच कल्पना आहे. तत्कालीन परिस्थितीचं वरवरचं विश्लेषण, समस्यांवर सुचवलेले सोपे तोडगे आणि आकर्षक घोषणा यामुळे जर्मन समाजातील तरुण वर्ग व इतर घटक मोठ्या प्रमाणावर नाझी पक्षाकडे ओढले गेले. नकारात्मक प्रचाराचा या वर्गांच्या मनावर पगडा बसला आणि नाझी पक्ष सत्तेवर येऊ शकला. मात्र, नाझी राजवटीनं जर्मनीचा विनाश घडवून आणला. त्यामुळे अशा नाझी प्रवृत्तीचा देशात प्रसार व प्रचार झाला तर अखेरीस ते भारताचं मोठं नुकसान घडवून आणतील, असं मला वाटतं. अर्थात त्यातूनही भारत सावरेल, याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. मात्र, देशाची जी अपरिमित हानी होईल, त्यातून सावरण्यास मोठा कालावधी जावा लागेल.’ 
 
आज नेहरूंची भीती प्रत्यक्षात खरी ठरली आहे. नेहरूंना जे दिसत होतं, ते त्यांच्या मुलीला, नातवाला आणि नंतर नातसुनेला व पणतूला काही उमगलेलं नाही. काँग्रेस विरोधानं भान हरपलेल्या विरोधकांचा अदूरदर्शीपणा इतका होता की, त्यांना हा धोका दिसणं अशक्यच होतं.  
संघ आज भारतातील समाजात पसरला आहे. मोदी व भाजप हे लोकशाही पद्धतीनं निवडून आले आहेत आणि त्यामुळे त्यांना विरोध करणं, हे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही, असा सूर लावला जात आहे. मात्र, लोकशाहीचा अर्थ मुक्तपणे मतभेद व्यक्त करण्याला वाव असणं, हाच आहे. अगदी लोकनियुक्त सरकार असलं तरीही त्याच्या विरोधात उभं राहण्याचा हक्क लोकशाही देते आणि मतभेदाचा मुद्दा काय आहे, हे ऐकून घेणं, हे लोकशाही राज्यव्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांचं कर्तव्यच असतं. अगदी ‘हे सरकार माझं नाही’, ‘हे पंतप्रधान मला मान्य नाहीत’, असं कोणी म्हणालं तरी तशी भूमिका मांडण्याचा त्या व्यक्तीचा हक्क सत्ताधाऱ्यांनी मान्य करायचा असतो.
 ही खरी लोकशाही असते. 
नेमकं हेच ग्रॅनव्हील ऑस्टिन यांच्या सुरुवातीस उल्लेख केलेल्या मतप्रदर्शनात त्यांनी अधोरेखित केलं होतं. त्यांनी ज्या ‘समृद्ध सांस्कृतिक वारशा’चा उल्लेख केला होता, तो विविध जाती-जमाती, पंथ, वंश, भाषिक गट यांच्या हजारो वर्षांच्या सहजीवनाचा आहे. या वाटचालीत संघर्षाची व आक्रमणांची अनेक पर्वं आली; पण या संस्कृतीची सर्वसमावेशकतेची वीण काही उसवली नाही. 

भारतात आज अशी परिस्थिती राहिलेली नाही. भारतीय राज्यघटनाच मान्य नसल्याचं कायम सांगत आलेल्या आणि जशी वेळ येईल व संधी मिळेल, तसा या राज्यघटनेत बदल करण्याचं उद्दिष्ट असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या पक्षाचं सरकार सत्तेत आलं आहे. ‘हिंदू’ ही भारताची खरी ओळख असल्याचं जनमनात रुजवलं जात आहे. ज्यांना हे मान्य नाही, ते देशद्रोही ठरवले जात आहेत.  

दुर्दैवानं समाजातील शहाणेसुरते लोकही या बुद्धिभेद करणाऱ्या प्रचाराला बळी पडत आहेत. संघापासून देशाला असलेला धोका ओळखून, त्या संघटनेच्या परिघापासून दूर राहत, तिचा वैचारिक मुकाबला करण्यावर नेहरूकालीन राजकारणात भर होता. उलट आज भाजपचे माजी अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या साठीच्या समारंभाला काँग्रेसचे नेते हजेरी लावतात, त्यांची स्तुती करतात आणि गडकरी हे संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत, दसऱ्याच्या दिवशी संघाच्या गणवेशात ते या संघटनेच्या कार्यक्रमाला हजर असतात, हे काँग्रेसचे नेते सोईस्करपणे विसरून जातात. संघाचं खरं स्वरूप न ओळखता किंवा ते ओळखूनही राजकीय फायद्याच्या हिशेबापायी ते डोळ्याआड करण्याच्या प्रवृत्तीमुळे या संघटनेला पसरण्यास वाव मिळत गेला आहे. 
...आणि पंडित नेहरूंची भीती सार्थ ठरली आहे. ‘असं घडलं तरी अखेरीस भारत सावरेल’, हा पंडितजींचा आशावाद सार्थ ठरतो काय, हे आता बघायचं! 

prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...