आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादावर उतारा सलोख्याचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परामर्श - मुस्लिम विरोध हा हिंदुत्व विचारसरणीचा गाभा आहे.
सलोखा व सामंजस्य यांची शिकवण देणारा सुफी विचार व अबुल कलाम आझाद यांच्यासारख्यांनी केलेली सैद्धांतिक मांडणी यांच्या आधारेच दहशतवादाचे आव्हान पेलता येऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन भेटीत दोन्ही देशांनी एकत्रितपणे दहशतवादाच्या विरोधात लढण्याच्या मुद्द्यावर बराच खल होऊन काही तास उलटायच्या आतच फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरावर ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. जागतिक स्तरावरील दहशतवादाच्या संकटाचं भीषण स्वरूप अधोरेखित करणारी ही घटना आहे.

ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच्या पत्रकार परिषदेत दहशतवादासंबंधी बोलताना मोदी यांनी सुफी पंथाचा उल्लेख केला. इस्लाममधील जहालांना तोंड देण्यासाठी सुफी पंथाच्या विचारांचा आधार घेता येऊ शकतो, असे मोदी यांना बहुधा सुचवायचे असावे. तसा मोदी यांचा रोख होता असे मानले तर त्यांची ही भूमिका अतिशय योग्य आहे हे मान्यच करायला हवे. त्या अंगाने पाठपुरावा केला गेल्यास जागतिक स्तरावरही इस्लामी जहालांना वैचारिक स्तरावर तोंड देण्यात भारत अग्रेसर पवित्रा घेऊ शकतो.

या आघाडीवर भारताचे मोठे योगदान असू शकते. ते अशासाठी की, आज जागतिक दहशतवाद ज्या इस्लामी जहालवादाचा आधार घेतो त्याचा वैचारिक पाया महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे जन्माला आलेल्या आणि नंतर जमात-इ-इस्लामी ही संघटना स्थापन करणाऱ्या अबू अला मौदुदी यांनी घातला आहे. वहाबी पंथाचा संस्थापक सय्यद कुत्ब अथवा इजिप्तमधील ‘मुस्लिम ब्रदरहूड’ किंवा अगदी अलीकडचे तालिबान असू दे किंवा अल कायदा वा आता ‘इसिस’.. या संघटना आपल्या दहशतवादी कृत्याच्या समर्थनार्थ जो काही इस्लाम सांगत आहे त्याचे मूळ मौदुदी यांनी जी ‘तौहिद’ची संकल्पना मांडली आहे त्यात आहे.

विश्वावर अल्लाचे सार्वभौमत्व हे संपूर्ण आहे आणि कोणीही माणूस ते नाकारू शकत नाही, असे फर्मावून मौदुदी पुढे म्हणतात की, ‘अल्लाने जे काही सांगून ठेवले आहे त्या चौकटीतच माणसाने जगले पाहिजे. कायदेशीर वा राजकीय अथवा इतर दृष्टीने विचार करण्याचे स्वातंत्र्य माणसाला नाही. अल्लाच्या आदेशानुसार वागण्याचे बंधन प्रत्येकावर आहे. त्यामुळे सार्वभौमत्व हे अल्लाचे आहे, जनतेचे वा कोणा व्यक्तीचे नाही.’ अशी ही मौदुदी यांची मांडणी होती. साहजिकच पाश्चिमात्य धर्तीची लोकशाही अस्तित्वातच असता कामा नये, असे मौदुदी मानत होते.
शरियतच्या चौकटीत कारभार करणारी कट्टर इस्लामी राज्यसंस्था उभारण्याचा मार्ग कोणता, हे मौदुदी यांनी ‘अल जिहा, फिल इस्लाम’ (इस्लाममधील जिहाद) या आपल्या ग्रंथात सांगून ठेवले आहे. आज ‘इसिस’ जे करीत आहे किंवा अल्पकाळासाठी सत्ता हाती आल्यावर इजिप्तमध्ये ‘मुस्लिम ब्रदरहूड’ने जे काही केलं ते मौदुदी यांच्या या मांडणीनुसारच.
मौदुदी ही मांडणी करीत असतानाच डॉ. अबुल कलाम आझाद यांच्यासारख्या इस्लामी विचारवंतानं वेगळ्या पद्धतीने मांडणी करीत इस्लाममधील ‘इज्तिहाद’ या संकल्पनेचे वेगळ्या पद्धतीने विश्लेषण केले. इस्लामची सर्व मांडणी ही ‘मुस्लिम बहुसंख्य असतील’ याच चौकटीत झाली आहे आणि ‘अल्पसंख्याकांना कसे वागवायचे’ यासंबंधी कुराणात आदेश आहेत. पण इतरधर्मीय बहुसंख्य असल्यास काय करायचे हे इस्लाम सांगत नाही. नेमका येथेच ‘जिहाद’ व मौदुदी जे सांगत आहेत त्याचा संबंध येतो. सर्व समाज इस्लामधर्मीय बनवणे आणि त्याला अल्लाचं सार्वभौमत्व मान्य करायला लावणे हे प्रत्येक श्रद्धावान मुस्लिमाचे धर्मकर्तव्य असल्याचे जहालवादी सांगत आले आहेत. मौदुदी तेच सांगत होते. उलट ‘आपल्या सद््सद््विवेकबुद्धीला स्मरून वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक श्रद्धाळू मुस्लिमाला कुराणातील इज्तिहादची संकल्पना देते,’ अशी मांडणी आझाद यांनी केली. अल्लाच्या संपूर्ण सार्वभौमत्वाच्या पलीकडे व्यक्तिगतरीत्या प्रत्येक श्रद्धाळू मुस्लिमाची सद्सद्विवेकबुद्धीही महत्त्वाची आहे, अशी ही मांडणी होती. हा सगळा जुना तपशील पुन्हा एकदा आठवायचे कारण म्हणजे मोदी यांनी केलेला सुफीपंथीयांचा उल्लेख व नंतर काही तासांतच पॅरिस येथे झालेला दहशतवादी हल्ला.

जागतिक स्तरावरच्या दहशतवादाच्या विरोधातील वैचारिक संघर्षाची सुरुवात आझाद यांच्या मांडणीच्या आधारे मौदुदीच्या सिद्धांताला छेद देत भारत करू शकतो. मात्र, त्यासाठी केवळ तोंडदेखलेपणापलीकडे जाऊन मुस्लिमही भारतात व जगातील ज्या ज्या देशात ते राहतात तेथील ते समान नागरिक आहेत ही भूमिका मूलतःच मान्य असायला हवी. तिथेच घोडे पेंड खाते. कारण मोदी यांचा वैचारिक पिंड ज्या हिंदुत्वाच्या विचारांवर पोसला गेला आहे त्याला सामाजिक सामंजस्याऐवजी सामाजिक संघर्ष अधिक जवळचा आहे.

‘मुस्लिम विरोध’ हा हिंदुत्वाच्या विचारसरणीचा गाभा आहे. त्यामुळे होते आहे असे की, परदेशात मोदी पंतप्रधान म्हणून ‘भारत ये धरती भगवान बुद्ध और गांधीजी की है’ असं सांगतात आणि इकडे महात्माजींचा खुनी नथुरामला फाशी दिली त्या १५ नोव्हेंबरला ‘बलिदान दिवस’ पाळण्याचा संकल्प हिंदुत्व परिवारातील संघटना सोडत असतात. मात्र, याच हिंदुत्ववाद्यांना विष्णू गणेश पिंगळे या गोडसेप्रमाणेच मराठी, ब्राह्मण व पुणे जिल्ह्यातील असलेल्या क्रांतिकारकाला ब्रिटिशांनी फाशी दिल्याला १६ नोव्हेंबरला १०० वर्षे पुरी झाली याची साधी आठवणही होत नाही. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या पिंगळे याचा तेथे गदर पक्षाशी संबंध आला आणि नंतर भारतात येऊन सशस्त्र उठाव करण्याची योजना त्याने कर्तारसिंह सराभा याच्या मदतीने आखली होती.

हा बेत फसल्यावर या दोघांना ब्रिटिशांनी अटक केली आणि नंतर १६ नोव्हेंबर १९१५ रोजी फासावर चढवले. ‘मी या दोघांपासून प्रेरणा घेतली,’ असं भगतसिंग याने लिहून ठेवलं आहे. भगतसिंगबरोबर फाशी गेलेला राजगुरू हा पुण्याचा, मराठी व ब्राह्मण असूनही त्याची कुठे हिंदुत्ववाद्यांना आठवण होते?

...आणि म्हणूनच दहशतवादावरील उतारा हा हिंदुत्व असूच शकत नाही. उलट हिंदुत्व हे जहाल इस्लामला पूरकच ठरणारे आहे. सलोखा व सामंजस्य यांची शिकवण देणारा सुफी विचार व अबुल कलाम आझाद यांच्यासारख्यांनी केलेली सैद्धांतिक मांडणी यांच्या आधारेच दहशतवादाचे आव्हान पेलता येऊ शकते. तुर्कस्तानमार्गे भारतात परत आल्यावर आता मोदी आपल्या कट्टर हिंदुत्वाला मुरड घालून त्या दिशेने कशी व काय पावले टाकतात ते बघायचे!
prakaaaa@gmail.com