आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश धर्मसंसदेनुसार चालणार का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साईबाबांचा जन्म १८३६ मध्ये आणि देहांत १९१८ मध्ये झाला. ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लिम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात घालवली. शिर्डीत आल्यानंतर साईबाबांनी आपली जात कधी कुणाला सांगितली नाही. ‘सबका मालिक एक’ हे त्यांचे बोल होते. त्यांनी ‘श्रद्धा आणि सबुरी’चा मंत्र दिला. हळूहळू फकीर असणाऱ्या साईबाबांचे भक्त त्यांच्या देहांतानंतर वाढू लागले. भक्तांनी सोने, चांदी, पैसे ‘दान’ दिले. आज त्यांचे मंदिर गडगंज श्रीमंत झाले आहे. हे मंदिर साईबाबा संस्थान हे ट्रस्ट चालवते. मध्यंतरी संस्थानांच्या कामात अनियमितता असल्याचे आढळून आल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची बातमी होती.

द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद यांनी सर्वात आधी साईबाबा देव नाहीत, असे विधान केले होते. साईबाबा देव आहेत की नाहीत, याचा निर्णय दोनदिवसीय (२४, २५ ऑगस्ट २०१४) धर्मसंसदेत झाला. पहिल्या दिवशी १३ आखाडे आणि शंकराचार्यांनी आपापले युक्तिवाद मांडले. त्यानंतर साई हे ईश्वर नाहीत; त्यांची पूजा केली जाऊ नये,
या मुद्द्यावर या सर्वांचे एकमत झाले. देशात अनेक समाधीवास्तूंची पूजा केली जाते, पण देवाला त्या वास्तूंशी जोडणं चुकीचं आहे, असं मतही या प्रमुखांनी नोंदवलं. या संसदेत आलेल्या साईभक्तांना त्यांचे म्हणणे मांडू दिले नाही. त्यांना धक्काबुक्की झाली, त्यांचे कपडे फाडले अशी असहिष्णू वर्तनाची बातमी आणि ‘साईबाबांची मूर्ती काढून ती गंगेत बुडवा आणि सनातन धर्मात परत या; अन्यथा आखाड्याचे लोक ती मूर्ती काढून फेकतील,’ असा दमदाटी करणारा धर्मसंसदेचा इशारा ‘दिव्य मराठी’त (२६ ऑगस्ट) प्रसिद्ध झाला आहे. अशाच आशयाच्या बातम्या मीडियाने दिल्या आहेत. हे धर्मसंसदेतील तथाकथित साधू-संतांचे वागणे सभ्यतेला शोभणारे नाही. प्रतिक्रिया उमटल्यामुळे कदाचित त्या बातमीबाबत खुलासा दिला गेला असावा. त्याचीही बातमी २७ ऑगस्टच्या ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाली आहे.

तिचा साधारण आशय असा आहे :
धर्मसंसदेत असा ठराव पारित झालेला नाही, आकसाने विरोधक खोट्या बातम्या पसरवत आहेत. आधी विधाने करून प्रतिक्रिया जोखायची आणि विधाने अंगलट आली तर
कोलांटउडी मारून ‘असे बोललोच नव्हतो,’ अशी बतावणी करण्याचा वाचकांना भरपूर अनुभव राजकीय नेत्यांनी दिलेला आहे. या उड्या-कोलांटउड्यांच्या राजकारणाच्या निमित्ताने आणि भाजपमुळे स्वतःचीच सत्ता आल्याची सोयीस्कर कल्पना करून घेणाऱ्या धर्मसंसदेची पूर्वपीठिका थोडक्यात पाहणे गरजेचे झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक गोळवलकर गुरुजी आणि आपटे यांनी १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेची (विहिंप) स्थापना केली. तिचे पहिले प्रमुख स्वामी चिन्मयानंद होते. प्रयागच्या कुंभमेळ्यादरम्यान (१९६६) ‘विश्व हिंदू मेळावा’ भरवून विहिंप प्रत्यक्ष कामाला लागली. विहिंपने १९८४ मध्ये धर्मसंसदेची स्थापना रामजन्मभूमी आंदोलनासाठी केली. तीमधील साधू-संतांच्या आदेशांप्रमाणे त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात रथयात्रादेखील काढली; परंतु त्याच महिन्याच्या अखेरीस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि रथयात्राही स्थगित झाली. विहिंपप्रणीत चौथी धर्मसंसद १९९१ मध्ये भरली होती. तिच्या आदेशामुळे देशाचे राजकारणच बदलले.
लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा रथयात्रा झाली आणि त्यात बाबरी मशीद उद््ध्वस्त केली. थोडक्यात म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि नंतर भाजपप्रमाणे धर्मसंसददेखील संघ परिवाराशी जोडली गेलेली आहे. तिची गाठ आता विकासाच्या मुद्द्यावर सर्वात जास्त खासदार संसदेत पाठवून २०१४ मध्ये सत्ताग्रहण केलेल्या भाजप सरकारशी आहे.

देव मानण्याच्या संदर्भातील भारतीय इतिहास पाहण्याजोगा आहे. वेद काळात इंद्र, उषा, वरुण, मरुत या निसर्गातील घटनांनाच ईश्वरपद दिले गेले. याच काळात काही लोकांनी वड, पिंपळ, आंबा अशा वृक्षांना आणि नाग, कासव, वराह (डुक्कर), वाघ अशा प्राण्यांना देव मानले. नंतरच्या काळात माणसाला तुलनेने जास्त स्थैर्य लाभले.
तेव्हा त्याने शास्त्रे रचली. त्यात शिव, शक्ती, गणेश, विष्णू, सूर्य व विष्णूच्या २४ अवतारांची पूजा केली जाऊ लागली. या अवतारांत बुद्धांचा समावेश ही अगदी अलीकडची घटना आहे. भारतीय उपखंडात ईश्वराला अनेक रूपे बहाल केली गेली. काही मान्यवर अभ्यासकांच्या मतांनुसार प्राचीन भारतातील सहा दर्शनांपैकी (तत्त्वज्ञाने) पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही केवळ दोन दर्शने वेद मानणारी आहेत; बाकी न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग ही चार दर्शने वेदांना प्रमाण मानत नाहीत. चार्वाक, लोकायत, जैन आणि बौद्ध ही तत्त्वज्ञाने तर अवैदिक आणि निरीश्वरवादी आहेत. त्यांच्यात वादविवाद, वितंडवाद तर कधी हिंसात्मक घटना घडल्या; परंतु तो काळ प्राचीन होता. थोड्यापुढील काळातील रामायण आणि महाभारत या महाकाव्यांतील राम-कृष्ण ही केवळ पात्रे नसून त्या ऐतिहासिक व्यक्ती आहेत, हे सिद्ध करण्याचा आटापिटा चाललेला असतो. राम-कृष्ण ही महाकाव्यातील पात्रे किंवा ऐतिहासिक व्यक्ती असतील तर त्यांनादेखील ही धर्मसंसद साईबाबांप्रमाणे देव मानू शकणार नाही. आजच्या महाराष्ट्रात
साईबाबांप्रमाणे ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, डॉ. आंबेडकर, जाेतिबा फुले, छत्रपती शिवाजी असे अनेकांचे फोटो, मूर्ती आणि शिल्पांची पूजा देवाच्या पूजेप्रमाणेच केली जाते. यांच्या पूजा करण्याला धर्मसंसदेचा विरोध असणे तर्काधिष्ठित आहे; परंतु तसा विरोधही मुळीच दिसत नाही.
साईबाबांनीच या धर्मसंसदेचे काय घोडे मारले आहे ते कळत नाही. ते काहीही असले तरी लोकशाहीमध्ये हिंसात्मक घटना टाळल्याच पाहिजेत. विचारस्वातंत्र्य, धर्म आणि धर्मचिकित्सा यांचे स्वातंत्र्य मान्य करण्याचा लोकशाही पायंडा मोडणे ही धर्मसंसदेला शरमिंदी करणारी घटना आहे. याबद्दल धर्मसंसदेने माफी मागितली पाहिजे.

वास्तविक कोणी कोणाला देव मानावे आणि कोणाला देव मानू नये, याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असले पाहिजे. त्यात धर्मसंसदेला पडायचे कारण नाही व ते लोकशाहीशी सुसंगत नाही. शिवाय तो घटनेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधी असल्याने तो बेकायदा आहे. या तुलनेत स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची भूमिका ज्या विश्वधर्म संसदेत मांडली होती, तिची आठवण ठेवली पाहिजे. तीमध्ये अनेक धर्मांच्या आणि पंथांच्या मांडण्या झाल्या होत्या. तेथे कोणीच कोणाला धक्काबुक्की केली नाही की दमदाटीचे इशारे दिले नाहीत. सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले गेले. धर्म, पंथ अथवा ईश्वरी कल्पना यामध्ये आम्हीच सर्वश्रेष्ठ असल्याचे वाद तेथे उपस्थित झाले नाहीत. या गोष्टींचा भारतीय धर्मसंसदेला सोयीस्कर विसर पडल्याचे स्पष्ट आहे.

संसद हे काही कोणाच्या घराचे नाव नाही. जिथे विविधतेचे स्वागत होते, विविध मतभेद मांडले जातात, त्यांचा साकल्याने विचार होतो अशी जागा हा ‘संसद’ या शब्दाचा अर्थ आहे. हा अर्थ लोकशाहीचा पाया आहे. भारतातील कायदे लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभांच्या मिळून होणाऱ्या संसद भवनात मान्य होतात. संसदेतील चर्चा घटनेने दिलेल्या मर्यादेत होणे अभिप्रेत असते. असंसदीय बोलण्या-वागण्याबद्दल तेथे माफी मागावी लागते. भाजपच्या नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान या नात्याने सत्ताग्रहण करताना घेतलेल्या शपथेप्रमाणे धर्मसंसदेच्या अशा आततायी कामांना चाप लावावा लागणार आहे. मोदीसरकारपुढे धर्मसंसदेने देश भारतीय राज्यघटनेनुसार चालणार की धर्मसंसदेच्या घटनेनुसार, असे शब्दश: ‘धर्मसंकट’ उभे केले आहे. पाहूयात ते यातून कोणता मार्ग निवडतात ते!

(सामाजिक कार्यकर्ते)
prakashburte123@gmail.com