सतीशशी माझी ओळख बरीच जुनी. जवळपास तीस-पस्तीस वर्षे सहज झाली असतील. तो तेव्हा मुंबईत एका बँकेत नोकरी करत होता. दर शनिवारी-रविवारी बँकेला सुटी असली की, तो इथे लोकवाङ्मयच्या ऑफिसला येऊन गप्पा मारायचा. फोर्टच्या ‘पीपल्स बुक हाऊस’ला तो रोजच यायचा. पुस्तकाचं त्याला भयंकर वेड होतं. हे वेड केवळ वाचनापुरतं नव्हतं, तर तो त्याला आवडलेली पुस्तकं ठिकठिकाणाहून गोळा करून ‘पीपल्स’मध्ये आणायचा आणि विकायचा. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, राजवाडे इथून त्याला अनेक जुनी पुस्तकं मिळायची, जो ती आवर्जून आमच्या इथे घेऊन यायचा. आपल्याला जे आवडतं ते लोकांनीही वाचावं, या भावनेनं तो हा सव्यापसव्य करायचा.
सतीशचं पहिलं पुस्तक आम्हीच प्रकाशित केलं होतं. ‘कविता लेनिनसाठी’ या नावाचं. त्यानंतर त्याचे इतरही कवितासंग्रह निघाले. आम्हीही त्यातील ‘साक्षात’, ‘इंद्रियोपनिषद’ असे काव्यसंग्रह काढले. त्यानंतर ‘वाचणा-याची रोजनिशी’ हा लेखसंग्रह प्रकाशित केला. त्यालाच या वेळेसचा साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. ‘वाचणा-याची रोजनिशी’ची कल्पना आमच्या गप्पांमधूनच स्फुरली. तसं काही गद्यात लिहावं, असं त्याच्या डोक्यात नव्हतं. पण असा विषय निघाल्यावर आपण पुस्तकं वाचतो तर त्यासंबंधीच लिहावं या भावनेतून त्यानं ‘वाङ्मय वृत्त’मध्ये ते सदर सुरू केलं. विविध विषयांवरची पुस्तकं आणि साहित्य व्यवहाराच्या विविधांगांविषयी त्यानं यात लिहिलं आहे. नंतर मात्र तो कंटाळला आणि म्हणाला की, आपण आता हे थांबवूया. कारण तोवर साधारण तीन वर्षे हे सदर सुरू होतं. काळसेकरांनी त्यांना आवडलेल्या पुस्तकांबद्दलची आपली मते, समकालीन साहित्यविश्वात घडणा-या विविध घडामोडी यांच्यावर केलेली टीका-टिप्पणी यांचा या सदरात समावेश असायचा. त्याचबरोबर संगीत, चित्रपट आणि नृत्याबद्दलही चर्चा होते. अर्थशास्त्राबद्दलच्या एका माहितीपूर्ण, पण सुबोध नियतकालिकाची माहिती येते. लोकभाषांच्या शब्दसंपदेबद्दल आणि जागतिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामांबद्दल ते लिहितात. मार्खेझच्या कादंब-यांच्याच जोडीने सुधीर पटवर्धनांच्या चित्रांची चर्चा होते आणि हिंदी भाषक कवी मंगेश डबरालबद्दल सांगत असताना संगीत हेही पूरक वाचन कसं ठरू शकतं याबद्दलही काळसेकर लिहून जातात. चांगलं लेखन म्हणजे काय, हे समजण्यासाठी जरी अधूनमधून असले धक्के सोसणं गरजेचं असलं तरी एखादा खंदा मार्गदर्शक असला तर बराच फरक पडू शकतो. हे पुस्तक ती भूमिका पार पाडतं. नेमक्या शब्दांत त्या त्या पुस्तकाचं मर्म वाचकापर्यंत पोहोचवण्याचं कसब काळसेकरांकडे आहे.
मग ते बंद झालं. त्यानंतर स्वाभाविकपणे त्याचं पुस्तक करावं, असं आमच्या मनात होतंच. त्याचदरम्यान श्री. पु. भागवत मला एकदा म्हणाले की, हे पुस्तक काढण्याचा पहिला अधिकार ‘लोकवाङ्मय’चा आहे. पण ते जर काढत नसतील तर मग आम्ही ‘मौजे’तर्फे त्याचं प्रकाशन करू. सतीशच्या पुस्तकाला ही श्रीपुंसारख्या जाणत्या संपादकाची कौतुकाची थापच होती. सतीशचे त्यांच्याशी चांगले संबंध होते आणि आमच्याशीही. पण तरीही हे पुस्तक ‘लोकवाङ्मय’ने काढायचं ठरवलं. तसं आम्ही श्रीपुंना कळवलं तेव्हा ते म्हणाले, ‘पुस्तक तुम्ही काढा, पण त्याची प्रुफं मात्र मी तपासीन.’ सतीशवर त्यांचं असं प्रेम होतं. पण असं काही होण्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यामुळे नंतर पुस्तक निघाल्यावर आम्हा सर्वांनाच त्यांच्या नसण्याची हळहळ वाटली. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला याचा त्यांना अधिक आनंद झाला असता. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर सतीश रोजच आमच्या इथे यायचा. ‘वाङ्मय वृत्त’ या मासिक चालवण्यासोबतच पुस्तकांचं संपादन करणं यात त्यानं लक्ष घातलं. नंतर तेच तो सारं बघायला लागला. माझी भूमिका फक्त पुस्तकाच्या निर्मितीपुरती उरली. लेखकांशी बोलणं, त्यांना लिहायला प्रवृत्त करणं, नवे लेखक-पुस्तकं मिळवणं ही कामं त्याच्या अधिक आवडीची. लोकांशी बोलायला त्याला आवडतं. सतीश हा स्वभावत: कवी आहे. त्यामुळे त्याच्या कवितासंग्रहाला अकादमी पुरस्कार मिळायला हवा होता, असं इतरांप्रमाणेच मलाही वाटतं. सतीशला आजवर अनेक पुरस्कार त्याच्या विविध काव्यसंग्रहांसाठी मिळाले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार त्याला एका वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाला द्यावा, असाही अकादमीच्या विचार यामागे असू शकतो. निदान आम्हाला तरी यात आनंद आहे की, अशा पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. सतीशच्या पुस्तकांसंबंधीच्या लिखाणाचं मूल्य किती होतं हेच त्यातून दिसतं. त्याला हा पुरस्कार मिळाला तेव्हा असंख्य लोकांनी त्याचं अभिनंदन केलं. त्यामुळे तोही जरा भांबावला होता. त्याचा जनसंपर्क तगडा आहेच. पण तरीही वाचकांच्या या प्रतिसादानं तो भारावला. कारण तो काही पॉप्युलिस्ट साहित्यिक नाही. एक कवी म्हणून आणि जाणता वाचक म्हणून तसेच संपादक म्हणून त्याची एका मर्यादित वर्तुळात ओळख आहे. पण त्याची ‘वाचणा-याची रोजनिशी’ हा अनेकांच्या आवडीचा भाग होता. लोकांनी अधिकाधिक आणि चांगलंचुंगलं वाचावं हा जो त्याचा ध्यास होता त्याला मिळालेली ही पावती होती. त्यामुळेच सामान्य वाचकांनी मोठ्या प्रमाणात सतीशच्या या पुरस्काराचं कौतुक केलं असं मला वाटतं. मुख्य म्हणजे असं आहे की, आम्ही काही हे पुस्तक अकादमीकडे पुरस्कारासाठी पाठवलं नव्हतं. अकादमी स्वत:च त्यांना योग्य वाटलेली पुस्तकं विकत घेऊन पुरस्कारांची घोषणा करते. त्यामुळे अकादमीच्या निवडीचा आनंदच मानायला हवा खरं तर.
एक व्यक्ती म्हणून सतीश अतिशय उमदा माणूस आहे. कोणत्याही प्रसंगी तो डगमगणारा नाही. एक ध्येय म्हणूनच त्याची आजवरची वाटचाल सुरू आहे.
मित्र म्हणून तर तो ग्रेटच आहे. माणसं जोडणं, मैत्री निभावणं त्याला जमतं आणि आवडतंही. सतीशच्या मुलाबाबत जो दुर्दैवी प्रकार घडला तेव्हा तो कायम माझ्या संपर्कात असायचा. बराच काळ आम्ही एकत्रच होतो. मोठ्या धैर्याने त्यानं तो आघात सोसला. सतीशचा कवी म्हणून आम्हा सा-यांवरच मोठा प्रभाव आहे. आम्ही त्याच्या कवितांचे वेडे आहोत, असं म्हटलं तरी चालेल. लोकवाङ्मयला येण्याआधीच त्याच्या कविता मी वाचलेल्या होत्या. कारण माझी मैत्री त्याच्याशी त्याही आधीपासूनची होती. त्यामुळे आमच्या भेटींमध्ये त्याच्या नवीन कविता तो आम्हाला वाचून दाखवायचा. मला स्वत:ला त्याच्या ‘इंद्रियोपनिषद’ या कवितासंग्रहातल्या सगळ्या कविता पाठ होत्या. कवी म्हणून तो ग्रेटच आहे. येत्या काळात त्याचा आणखी एक कवितासंग्रह आम्ही प्रकाशित करतोय. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या त्याला कायमच शुभेच्छा आहेतच.
lokvangmayagriha@gmail.com