आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pramod Chunchuwar Artical On Shiv Sena's Shivbandhan Program

शिवबंधन व्हाया उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणात आपल्या गौरवशाली इतिहासाचे, थोर पुरुषांचे गुणगान गाऊन किंवा आपल्या पक्षातील थोर नेत्यांचे, दिवंगत नेत्यांच्या महानतेचे पोवाडे गाऊन मतदारांना भुरळ घालण्याचे प्रकार नवे नाहीत. काँग्रेस पक्ष गेली सहा दशके म. गांधी, पं. नेहरू या राष्ट्रपुरुषांच्या थोरवीचा आपल्या राजकीय लाभासाठी, निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी वापर करीत आला आहे. आता निवडणुका तोंडावर आल्यावर सरकारतर्फे टीव्हीवर दाखविल्या जात असलेल्या जाहिरातींमध्ये राजीव गांधींना दाखविले जात आहे. राजीव गांधींनी आणलेल्या संगणक क्रांतीने आज समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच बदलला. त्याची आठवण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मतदारांना करून देणे, हे काँग्रेसला निवडणूक जिंकण्यासाठी आजही महत्त्वाचे वाटते.
राष्ट्रवादी तर नवाच पक्ष आहे. उणीपुरी स्थापनेची 14 वर्षे त्याला पूर्ण झालीत. सुरुवातीला त्यांनीही म. गांधींचे छायाचित्र वापरले. मात्र हळूहळू म. गांधी कोप-यात फेकले गेले आणि सबकुछ शरद पवार झाले. पक्षाचे मुख्यालय असो की प्रचारासाठी देण्यात येणा-या जाहिराती, राजकीय सभांमध्ये स्टेजवर किंवा परिसरात लागलेले बॅनर्स असो, त्यात पवार कुटुंबीय आणि आयोजनात महत्त्वाची भूमिका असलेल्या मोजक्याच नेत्यांच्या प्रतिमा झळकत असतात. भाजपही याला अपवाद नाहीच. दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमा औपचारिकता पूर्ण करण्यासाठी लावण्यात येत असल्या तरी नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांची मोठमोठी चित्रे पाहणे आता सवयीचे झाले आहे. या सर्व स्थित्यंतराचा राजकीय अर्थ एवढाच की, एकेकाळी आपल्या विचारांमुळे थोर ठरलेल्या विभूतींच्या नावाने चालणारे राजकारण हे आता मते, मंत्रिपदे वा सर्व प्रकारची सत्ता मिळवून देण्यास उपयुक्त ठरणा-या व्यक्तींभोवतीच केंद्रित झाले आहे. त्यामुळे एका अर्थाने विभूतिवादातून व्यक्तिवादाकडे राजकारणाचा प्रवास वेगात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नुकत्याच केलेल्या शिवबंधन आणि शपथ ग्रहणाकडे पाहिले पाहिजे. मुळातच या पक्षाला सामाजिक-राजकीय-आर्थिक विचारांची बैठक वा स्वत:ची काही स्वतंत्र विचारधारा नसल्याचे वारंवार बोलले जाते. काँग्रेस-भाजपसह अन्य राजकीय पक्षांची अधिवेशने होतात तेव्हा त्या पक्षांचे सामाजिक-राजकीय-आर्थिक, परराष्ट्रविषयक धोरणे स्पष्ट करणारे प्रस्ताव चर्चेला येतात. संबंधित पक्षाच्या ध्येयधोरणांवर साधक-बाधक चर्चा माध्यमांत, तज्ज्ञांंच्या वर्तुळात घडते. मात्र, शिवसेनेचे तसे नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापर्यंत ते सांगतील तोच अंतिम शब्द, तेच धोरण आणि तेच विचार, हीच पक्षाची ओळख होती. त्यामुळेच मराठी अस्मितेची ढाल पुढे करून राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देत एनडीएच्या उमेदवाराला विरोध करणारी शिवसेना धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर आयुष्यभर राजकारण करणा-या आणि मराठी नसलेल्या प्रणव मुखर्जी या यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा देत पुन्हा एनडीएच्या उमेदवारास विरोध का करते याचे ‘रिलाएबल’ उत्तर एवढेच की साहेबांची मर्जी वा इच्छा.
सेनेकडे नाही म्हणायला मराठी अस्मिता आणि हिंदुत्व असे दोन मुद्दे आहेत. मात्र, या दोन मुद्द्यांनुसार राज्याचा आणि देशाचा विकास कसा होईल, याचा कोणताही आराखडा वा प्रस्ताव आजवर कोणत्याही लिखित स्वरूपात त्यांनी जनतेसमोर मांडलेला दिसला नाही. स्थापनेपासूनच व्यक्तिकेंद्री असलेल्या शिवसेनेची त्यामुळे पंचाईत आहे. बाळासाहेबांचे त्यांचेच नाव वापरून राजकीय पक्षच नव्हे, तर स्वत:चे नेतृत्व जिवंत ठेवणे यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढविल्या जातात. शिवबंधन ही अशीच एक क्लृप्ती. यात भक्तीचा डबल तडका आहे. शिवाजी महाराजांवरील आणि बाळासाहेबांवरील शिवसैनिकांची भक्ती या दोघांचे बेमालूम मिश्रण या तडक्यात केले आहे. शिवरायांचे कुलदैवत तुळजापूरची आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन आलेले हे धागे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी वाटण्याचा हा भावनिक प्रकार कमी पडला म्हणून की काय वरून शिवसैनिकांना शपथही देण्यात आली. मुंबईतल्या सोमय्या मैदानावरील या कार्यक्रमात थेट बाळासाहेबच ‘अवतरले’. युतीची सत्ता येण्यापूर्वी नाशिकच्या गोल्फ मैदानावर 1994 मध्ये त्यांनी दिलेल्या अशाच एका शपथेची चित्रफीत या वेळेस दाखविण्यात आली. बाळासाहेबांनी तेव्हा दिलेली शपथ ही सत्तापरिवर्तनासाठी असली आणि या वेळेस देण्यात आलेली शपथ ही सत्तापरिवर्तनासाठी भासत असली तरीही निवडणुकीच्या तोंडावर कुणी आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून एक भावनिक आवाहन यामध्ये आहे. राजकारणी नेत्यांवर अशा शपथेचा आणि भावनिक मा-याचा फार परिणाम होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. (राज्यघटनेनुसार शपथ घेऊन राज्यकारभार हाकणारे नंतर या शपथेची कशी पायमल्ली करतात, हे आपण रोज पाहतोच.) मात्र मराठी अस्मितेच्या, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि बाळासाहेब आपल्यात नाहीत म्हणून भावुक होणा-या सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी ही शिवबंधन-गुटिका उपयुक्त ठरू शकते. या गुटिकेमुळे मनसेची बाधा होणार नाही आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटेही बोचणार नाहीत. बाळासाहेबांची मूर्ती एका मंदिरात बसविण्याची तयारी उत्तर महाराष्ट्रात सुरू असल्याचे अनेकांनी वाचले. याला उद्धव ठाकरे आक्षेप घेतील, ही अपेक्षाही फोल ठरली. अन्य राजकीय पक्ष विभूतिवादातून व्यक्तिवादाकडे प्रवास करीत असताना शिवसेना मात्र वेगळ्या अर्थाने व्यक्तिवादी राजकारण केल्यानंतर आता ‘विभूति’वादाकडे उलटा प्रवास करू लागली आहे!
महाराष्ट्रात शिवशाही आणणारच, अशी प्रतिज्ञा या वेळेस सर्वांना देण्यात आली. ‘‘मी धगधगत्या निखा-यासारखा जगेन. माझ्यावर कधीही राख साचू देणार नाही. माता -भगिनींच्या आयुष्यात सुखा-समाधानाचे क्षण आणेन,’’ ही शपथ उद्धव ठाकरे यांनी दिली आणि या वेळेस सर्व उपस्थित शिवसैनिकांनी ती घेतली. मात्र, इतरांना अशी शपथ देणा-या उद्धव ठाकरेंनाच बहुधा या शपथेचा विसर पडला असावा, अशी स्थिती आहे. राख साचू देणार नाही, असे म्हणणा-या शिवसेनेच्या जैतापूरविरोधी आंदोलनावर राख का साचली? हे आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेल्या आंदोलकाच्या कुटुंबीयांना भेटण्याऐवजी दूर विदर्भात एका अभयारण्यात ठाकरे का गेले? पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे या शिवसेनेचे एक आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर गंभीर आरोप करीत असताना शिवशाहीची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे हे गप्प का राहिले? म्हात्रेंचे गा-हाणे व वेदना त्यांनी का ऐकल्या नाहीत? शिवशाहीत शिवरायांनी या आरोपांची शहानिशा केली असती, पीडित महिलांना दिलासा दिला असता आणि दोषींचे हात कलम केले असते.
आधुनिक लोकशाहीला साजेशी कोणती कारवाई ठाकरेंनी याप्रकरणी केली? या महिलांचे म्हणणेही ऐकून घेण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. याउलट त्यांच्या हेतूंबद्दलच श्ांका व्यक्त केली. त्या मनसेत जात आहेत म्हणून असा पद्धतशीर प्रचार करण्यात आला, तरीही ठाकरे म्हणतात माता-भगिनींच्या आयुष्यात सुखा-समाधानाचे क्षण आणणार! जो नेता आपल्याच पक्षात शिवशाही आणू शकत नाही तो राज्यात कशी शिवशाही आणू शकेल?