आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pramod Gaikwad Article About Facebook And Whats Aaps Contents

आभासी जगातील माथेफिरूंना आवरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकवर राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर व फोटो टाकल्याने महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला आणि सोशल मीडियाच्या बेजबाबदार वापराचा मुद्दा चर्चेत आला. ही घटना होऊन एका आठवड्याच्या आत पुन्हा अशाच प्रकारची गरळ ओकल्याने सोशल मीडियावरील अमर्यादित व्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही अनेकदा फेसबुक, ऑर्कुट किंवा अन्य सोशल नेटवर्किंग साइट्सवर राष्ट्रपुरुषांची बदनामी, फोटोशॉपसारखे अ‍ॅप्लिकेशन वापरून तयार केलेले विकृत फोटो, राजकीय व्यक्तींवरील चिखलफेक असे अनेक प्रकार या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊन दंगल, जाळपोळ, लुटालूट असे प्रकार झालेले आहेत. भावनिक, सामाजिक, धार्मिक अथवा जातीय अस्थिरता निर्माण करून आपला हेतू साध्य करण्यासाठी काही समाजकंटक सोशल मीडियाचा असा वापर करतात आणि आधुनिक संवादाचे हे नवे माध्यम आपसूकच बदनाम होते. तथापि या माध्यमाने व्यक्त होण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्यही नको त्या लोकांच्या हाती दिल्याचे अशा घटनांनंतर सिद्ध होते आणि व्यक्तिस्वातंत्र्य नको पण या विकृतांना आवरा, असे म्हणण्याची वेळ येते. आताही तेच झाले आहे.

प्राथमिक पोलिस तपासात असे आढळून आले आहे की, इतिहासपुरुषांवरील पूर्वी कुणी चालू केलेले फेसबुकवरील एक पेज कुणीतरी हॅक केले आणि त्या पेजवर आक्षेपार्ह मजकूर व फोटो अपलोड केले. निषेध करावा तितका कमी, असेच हे कृत्य आहे. तांत्रिकदृष्ट्या पेज कुणी हॅक केले आणि त्यामागचा कर्ताकरविता कोण, हे सिद्धही न होता दोन गटांनी एकमेकांवर चिखलफेक करणे, सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली वाहणे, बसेसची जाळपोळ, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार लगेच सुरू झाले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, असे प्रकार घडल्या घडल्या ‘दंगल तर होणारच’, असे पोस्टरही सोशल मीडियावर लगोलग अपलोड केले जातात. हे कृत्य कुणी केले? त्यामागचा कर्ता कोण? हे अजून गुलदस्त्यातच असताना दंगल घडविण्याची भाषा करणार्‍या सडक्या मेंदूंचा हेतू कुणालाही कळेल. म्हणूनच सोशल मीडियावर होणार्‍या एखाद्या बेजबाबदार क्रियेची प्रतिक्रियाही तितक्याच जबाबदारीने यायला हवी, याचे भान प्रत्येक सोशल नेटवर्कचा वापर करणार्‍याने ठेवणे गरजेचे आहे. मध्यंतरी ‘राष्ट्रपुरुष हे डोक्यात ठेवण्याऐवजी डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय झाले आहेत,’ असे एक समर्पक स्टेटस सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.

आपापल्या काळात आसपासच्या गोरगरिबांना जगविण्यासाठी, सामाजिक-आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी वा गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला स्वत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे युगपुरुष भारतात होऊन गेले, ही खरे तर आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु त्यांचे विचार डोक्यात ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याऐवजी जयंतीदिनी दारूच्या नशेत पुतळे डोक्यावर ठेवून बेभानपणे अंगविक्षेप करणार्‍या मिरवणुका पाहिल्यावर वरील वाक्य आजच्या समाजाला किती तंतोतंत लागू पडते, हे सहज लक्षात येईल. याचीच पुढची पायरी म्हणजे आपापल्या जातिधर्मातील थोर व्यक्तिमत्त्वांविषयी आपल्या सर्वांच्या भावना या इतक्या स्वस्त झाल्या आहेत की, कधी कुणी एखाद्या फालतू बिनडोकाने असे काही कृत्य केले की लगेच लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर हवेत वार करत उतरलेच पाहिजे. बरेचदा हे असले प्रकार होतात, तेव्हा फारच छोट्या स्वरूपात असतात. परंतु अंध अनुयायी सर्वच माध्यमातून या घटनांना प्रचंड प्रसिद्धी देऊन समाजकंटकांचा आपापसात तेढ निर्माण करण्याचा उद्देश सफल करून टाकतात. काही घटनांमध्ये एखाद्या जातीच्या किंवा धर्माच्या व्यक्तीनेच आपल्या दैवताची बदनामी करणारा मजकूर प्रसारित केलेला आहे, हेसुद्धा उघडकीस आले आहे.

आज सोशल मीडिया वापरणार्‍या लोकांची संख्या काही कोटींच्या घरात आहे. या सर्वावर नियंत्रण ठेवणे हे अवघड असले तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगाराला शोधून काढणे सोपे आहे. तांत्रिकदृष्ट्या आपण सर्व आपापल्या घरातून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप्लिकेशन्स वापरत असलो तरीही प्रत्यक्षात त्यांचे सर्व्हर हे अमेरिकेत असल्याने या कंपन्यांवर आपल्या देशातील कायदे बंधनकारक नसतात. अशा परिस्थितीत कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसवरून एखादा मजकूर अपलोड झाला आहे, हे कळण्यासाठी भारत सरकारला दिल्ली स्थित सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (उएफळ) या संस्थेच्या माध्यमातून त्या त्या वेबसाइटच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्यावे लागते. त्यानंतर या संदर्भातील कंपनीच्या पॉलिसी, अमेरिकेतील सायबर कायदे यांच्यातील नियमांप्रमाणे आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले संबंधित पेज ब्लॉक करणे आणि तो आयपी अ‍ॅड्रेस संबंधित देशातील सायबर सेलला कळवणे, असे निर्णय घेतले जातात. या प्रक्रियेला काही दिवस लागतात. पण तोपर्यंत भावना भडकलेल्या समाजाला धीर नसतो. त्याला काबूत ठेवणे ही शासकीय यंत्रणेलाही तारेवरची कसरत होऊन जाते. जिथे गुन्हेगार कोण आहे, हेच माहीत नसते; अशा परिस्थितीत रस्त्यावर तलवार घेऊन आपण कोणावर वार करणार आहोत, याचाही विचार न करणारे युवक बघावे लागतातच, यासारखे दुर्दैव ते कोणते? राष्ट्रपुरुष समाजासाठी आदर्शच असतात. तथापि थोड्या समाजघातक प्रवृत्तीमुळे त्यांचे अनुयायी एकमेकांवर शस्त्र घेऊन उतरतात, हेही तितकेच दुर्दैवी आहे. याचा अर्थ आपण या आदर्शांचे पाईक म्हणवण्यास पात्र नाही, असाच आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक हे खरे तर सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. परंतु काही समाजविघातक घटक मात्र या माध्यमाचा उपयोग अत्यंत विकृतपणे करताना दिसतात. म्हणूनच आपण सुज्ञ असाल आणि भारताचे सुजाण नागरिक म्हणून देशासाठी काही करू इच्छित असाल तर सोशल साइट्सचा वापर करताना आपण काय शेअर करतोय आणि या माहितीला काय आधार आहे, याचा विचार करून शेअर करायला हवे. गेल्या आठवड्यातील घटनेनंतर सातार्‍याला पाडण्यात आलेल्या मशिदीचा जो फोटो सोशल मीडियावर फिरत होता, तो प्रत्यक्षात अन्य देशातील भूकंपात पडलेल्या मशिदीचा होता, हे नंतर स्पष्ट झाले. अशा वेळेला खोटी माहिती प्रसारित करण्याचे पातक आणि गुन्हाही तुमच्या नावावर जमा होऊ शकतो. आपण समाजासाठी फार काही करू शकत नसलो तरी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या नाहीत तरी ती खूप मोठी समाजसेवा ठरेल आणि थोर युगपुरुषांचे खरे स्मरण होईल. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात संयम बाळगणे हीसुद्धा मोठी राष्ट्रभक्ती आहे, इतका तरी बोध आपण सर्वांनी नक्कीच घ्यायला हवा.
(संस्थापक, सोशल नेटर्वकिंग फोरम, नाशिक)
(siliconvalley.india@gmail.com)