आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prashant Dixit Article About Modi\'s Address To Student On Teacher\'s Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टास्क मास्टर, स्ट्रीट स्मार्ट, हिंदुस्थानी मोदी (विशेष लेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी नावाचे गुजराती रसायन सध्या तरी जनतेला पसंत पडले आहे आणि त्याचे विश्लेषण भारतातील प्रचलित पाश्चात्त्य बौद्धिक चौकटींमध्ये करता येत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजी व नेतृत्वाप्रमाणे मोदींची शैली आहे.
नरेंद्र मोदी हे रसायन समजून घेणे बऱ्याच जणांना कठीण जाते. त्यांना कोणत्या साच्यात बसवायचे हे राजकीय नेत्यांना व मुख्यत: पत्रकारांना समजत नाही. मोदी खूप वेगळे आहेत, राजकीय खेळात निष्णात आहेत वा प्रतिभावान आहेत म्हणून असे होते असे नाही. खरे कारण भारतातील बोलघेवडे नेते व अहंमन्य मीडिया यांचे जनतेशी नाते तुटले आहे. जनतेला काय हवे हे मोदींना बरोबर समजते, कारण त्यांनी मातीशी संबंध तोडलेला नाही. आज देशात स्थिती अशी आहे की मुख्य नेत्याचा लोकांशी थेट संबंध आहे, पण मीिडया वा तथाकथित बुद्धिवंतांचा नाही. यामुळे मोदींबाबत तिरकस शैलीत कोरडे ओढण्याचे काम जोमाने चालते आणि अर्थातच जनतेला ते आवडत नाही.

मोदी जे काही करीत आहेत ते सर्वोत्कृष्ट आहे असा याचा अर्थ नाही. मोदींची आरती गावी असेही येथे म्हणायचे नाही. मोदींचे यशापयश मोजण्यासाठी अजून बराच काळ आपल्या हाती आहे. त्यांच्यावर टीका करण्याची भरपूर संधी पुढील साडेचार वर्षांत सर्वांनाच मिळणार आहे. तथापि, आत्ता गरज मोदींची कार्यपद्धती समजून घेण्याची आहे. ती समजून न घेताच त्यांच्यावर टीका करीत सुटणे बरोबर ठरणार नाही. इथे प्रयत्न मोदींची कार्यशैली समजून घेण्याचा आहे.
मोदींची काम करण्याची पद्धत ही इंदिरा गांधींशी जुळणारी आहे असे म्हटले जाते. लोकप्रियता, प्रशासनावर जरब बसवण्याचे कौशल्य, परराष्ट्र राजकारणाची जाण व प्रखर राष्ट्रीय बाणा अशा काही बाबतीत इंदिरा गांधी व मोदी यांच्यात बरेच साम्य आढळते. इंदिराजींचाही लोकांशी थेट संबंध होता. त्या वेळच्या बुद्धिजीवींमध्ये त्यांच्याबद्दल राग होता, जसा आता मोदींबद्दल आहे. इंदिराजी थेट लोकांपर्यंत पोहोचत. तेच तंत्र मोदी वापरत आहेत. रेडिओ, चित्रवाणी माध्यमांचा इंदिरा गांधींनी कुशल उपयोग करून घेतला. मोदी तसेच करतात. इंदिराजींचे मंत्रिमंडळ त्यांच्या इशाऱ्यावर नाचे. मोदी सरकारची स्थिती वेगळी नाही. परराष्ट्र धोरणात इंदिराजी खमक्या होत्या. नेहरूंचे धोरण राबवताना त्यांनी भारतीय अस्मिता बरोबर जपली. पहिल्या टप्प्यातील मोदींचे धोरण त्याच प्रकारचे आहे.

तरीही इंदिरा गांधींचे सरकार व मोदींचे सरकार यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. त्या फरकाकडे फार कुणाचे लक्ष गेलेले नाही. स्वत: इंदिरा गांधी या थेट जनतेपर्यंत जात असल्या तरी त्यांचे सरकार हे मुख्यत: बुद्धिजीवी वर्गातील लोकांचे सरकार होते. परदेशी शिक्षण, पाश्चात्त्य आचारविचार आणि कल्याणकारी राज्यांसंबंधी पाश्चात्त्य कल्पना यांचा जबरदस्त प्रभाव सरकार, प्रशासन व राजकीय पक्षांवरही होता. पाश्चात्त्य सिद्धांत हे उच्च असून या समाजात ते रुजवण्यासाठी काम करायचे आहे अशी समजूत होती. पाश्चात्त्य विद्याविभूषितांचा दबदबा काँग्रेसी सरकारमध्ये असे. हे अगदी कालपर्यंत सुरू होते. मनमोहनसिंग सरकारमधील महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या सर्व मंत्र्यांचे शिक्षण तपासले असता ते पाश्चात्त्य विश्वविद्यालयातील पदवीधर असल्याचे आढळून येईल. हे केवळ सरकारपुरते मर्यादित नाही. माध्यमांमध्येही पाश्चात्त्य संकल्पनांवर अंधविश्वास असणाऱ्यांची संख्या फार मोठी होती व आजही आहे. पाश्चात्त्य चश्मा चढवून भारतातील घटनांची तपासणी करण्याचा नाद अनेक पत्रपंडितांना लागलेला असतो. या चश्म्यातूनच इंदिरा गांधींचे कौतुक केले जाई वा त्यांच्यावर टीका केली जात असे.
मोदी सरकारचे तसे नाही. परदेशी बुद्धिमत्तेचा वारा न लागलेले हे पहिले सरकार आहे. यातील कोणीही मंत्री परदेशात शिकलेला नाही. तो मुख्यत: मध्यमवर्गीय व ग्रामीण भागातून आलेला आहे. मोदी जसे आहेत तसेच त्यांचे मंत्रिमंडळ आहे. बहुतेक सर्वजण टक्केटोणपे खात शिकले आहेत, राजकारणात वर आले आहेत. स्वत: मोदी हे स्ट्रीट स्मार्ट आहेत. साधेसुधे अनेक व्यवसाय केल्यामुळे त्यांच्यात ही हुशारी आली आहे. मोदींसमोर विद्वत्ता पाजळून चालत नाही. थिअरीमध्ये त्यांना रस नसतो, त्यांना रिझल्ट हवे असतात. रिझल्टकडे पाहण्याचा गुजराती व्यापाराचा गुण मोदींमध्ये पुरेपूर उतरला आहे. यामुळेच ते अर्थशास्त्रींची मदत घेत नाहीत. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी अनेक अर्थशास्त्रींची नावे त्यांचे सल्लागार म्हणून पुढे येत होती. पण मोदींनी कुणालाही थारा दिलेला नाही. त्यांचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे व मुख्यमंत्री म्हणून दहा वर्षे केलेल्या कामातून ते घडलेले आहे.

पंतप्रधान मोदींना समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री मोदींना समजून घेणे आवश्यक आहे, याकडे बिझनेस स्टँडर्डचे श्रीकांत साबरनी यांनी लक्ष वेधले होते त्याची आठवण येते. तेथेही मोदींनी कुणाही अर्थशास्त्रीची मदत घेतली नव्हती. सध्या कर्नाटकचे राज्यपाल असलेले वजुभाई वाला हे मोदींचे विश्वासू. स्ट्रीट स्मार्ट अशीच त्यांचीही ओळख आहे. वजुभाई वालांना माध्यमात महत्त्व नसेल, पण गुजरातची अर्थव्यवस्था त्यांच्या कल्पनांमुळे सुधारली. सामान्य शिक्षण असलेल्या या माणसाने गुजरातमध्ये १८ अर्थसंकल्प मांडले. त्यापैकी १२ अर्थसंकल्पांमध्ये करवाढ नव्हती. अभ्यासकांच्या मते मोदींच्या पहिल्या अर्थसंकल्पावर वजुभाई वालांच्या शैलीचा प्रभाव आहे. मी हेडमास्तर नसून टास्क मास्टर आहे, असे मोदी यांनी स्वत:च सांगितले आहे. विश्वासू तरुण व्यक्ती टास्क फोर्समध्ये उपयोगी पडतात. कारण ते जादा अक्कल पाजळत नाहीत. नितीन पटेल व सौरभ पटेल हे मोदींचे गुजरातमधील विश्वासू. गुजरातमध्ये २४ तास वीज येण्याचे व उद्योगक्षेत्रात गुजरातची प्रतिमा उभी करण्याचे काम या दोन पटेलांनी केले. दिल्लीत ती जागा पीयूष गोयल व धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली आहे व वालांच्या जागी अरुण जेटली आहेत. अर्थव्यवस्था सावकाश विस्तारण्याचे तंत्र वाला यांचे होते. जेटली तेच वापरीत आहेत.
भारतीय संस्कृतीचा आधार घेत धंदा करण्याची क्लृप्ती गुजरातने जगभर साधली. मोदी तीच देशाच्या पातळीवर राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदू संस्कृतीवर त्यांची श्रद्धा आहे. म्हणून ते हिंदुस्थान असाच उल्लेख नेहमी करतात. याचा खोलवर परिणाम बहुसंख्य भारतीयांवर होतो. याला ते आर्थिक शहाणपणा वा चतुराईची जोड देतात व हा शहाणपणा पुस्तकातून आलेला नसतो. तो रस्त्यावरील वा गल्ल्यावरील अनुभवातून आलेला असतो. या अनुभवामुळे लोकांना नेमके काय हवे असते हे त्यांना बरोबर समजते. १५ ऑगस्टच्या भाषणाचे बौद्धिक वर्तुळात कौतुक झाले नाही, पण जनतेने दाद दिली. शुक्रवारच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर माध्यमांत टीका झाली असली तर मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांना ती शिक्षा वाटली नाही. आता या सर्वावरील टीकाटिप्पणी पुस्तकातून राजकारण वा देश समजून घेणाऱ्यांना करता येणार नाही. लोकांशी संवाद पण माध्यमातील बुद्धिवंतांशी विसंवाद अशी मोदींची सध्याची अवस्था आहे. मात्र माध्यमांवर स्वार कसे व्हायचे याची कला त्यांना साधल्यामुळे ते या विसंवादाची फारशी फिकीर करीत नाहीत.

टास्क मास्टर, स्ट्रीट स्मार्ट तरीही हिंदुस्थानी अशी प्रतिमा घेऊन मोदी जनतेसमोर आले. हे गुजराती रसायन सध्या तरी जनतेला पसंत पडले आहे आणि त्याचे विश्लेषण भारतातील प्रचलित पाश्चात्त्य बौद्धिक चौकटींमध्ये करता येत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजी व नेतृत्वाप्रमाणे मोदींची शैली आहे. धोनीचा खेळ कोणत्या ब्रिटिश बुकात बसवायचा हे समीक्षकांना कळत नव्हते, पण तो सामने जिंकत होता. सध्याच्या राजकीय समीक्षकांची तशीच पंचाईत झाली आहे. मात्र धोनीप्रमाणे मोदी यशस्वी ठरतील का, हे आत्ताच सांगता धाडसाचे ठरेल.

prashant.dixit@dbcorp.in