आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणखर नरेंद्र मोदी आहेत कुठे? (प्रशांत दीक्षित)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्ता राबवताना तीन गुण प्रगट होतील, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले होते. कणखर प्रशासन, वेगवान निर्णय, कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे कठोर नेतृत्व हे ते तीन गुण. वर्षभर चाललेल्या मोदींच्या कारभारावर जनता फार खुश नसली तरी वर उल्लेख केलेले हे तीन गुण मोदींकडे आहेत, असा विश्वास जनतेला अजूनही वाटतो. मात्र, गेल्या दोन आठवड्यांतील घडामोडींनंतर जनतेचे हे मत हळूहळू बदलण्याची शक्यता आहे. अपेक्षा होती तितका हा माणूस कणखर नाही, प्रशासनावर त्याची हुकूमत नाही आणि तत्त्वासाठी किंमत चुकवण्याचे धाडस या माणसामध्ये नसावे, अशा शंका जनतेच्या मनात येऊ लागल्या आहेत. ललित मोदी प्रकरण नरेंद्र मोदी व अमित शहा ज्या प्रकारे हाताळत आहेत, त्यातून या शंका उद््भवल्या आहेत.

‘मला इतर काही समजो न समजो; पण मला राजकारण बरोबर समजते हे तुम्ही मान्य कराल,’ असे उद््गार नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सोनिया गांधींकडे पाहून काढले होते. तेव्हा तो विषय मनरेगाचा होता. लोकसभेच्या प्रचारात नरेंद्र मोदींचे नेतृत्वगुण जगाला थक्क करून गेले होते. मात्र, त्या प्रचारात जो सुसंघटितपणा मोदींनी दाखवून दिला त्याचा पुरता अभाव ललित मोदी घोटाळ्याला तोंड देताना दिसला. राजकारणातील आपत्ती व्यवस्थापन भाजपला जमलेले नाही, असे जनतेचे मत बनत चालले.

सुषमा स्वराज जेव्हा या घोटाळ्यात अडकल्या तेव्हाच खरे तर शहा व मोदी यांनी सावध होऊन हे प्रकरण काँग्रेसवर शेकवायला हवे होते. ललित मोदी यांच्याबद्दल बरे बोलण्यासारखे काही नसले तरी त्यांच्या विरोधात ठोस पुरावाही नाही. चिदंबरम यांनी फक्त नोटिसा काढल्या, साधा एफआयआरही दाखल केला नाही. इंटरपोलला कसलीच माहिती दिली गेली नाही, हे इंटरपोलचे प्रमुख रोनाल्ड नोबेल यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मुलाखतीत नोबेल यांनी भारतीय तपास यंत्रणा व मीडिया यांचे वाभाडे काढले आहेत. ललित मोदींना पकडण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस निघालेली नाही, असे सांगून, अटक वॉरंट निघाले असेल तर ते प्रसिद्ध करा, असे जाहीर आव्हान जेटलींच्या अंमलबजावणी संचालनालयाला दिले आहे. म्हणजे अन्य देशांमध्ये ललित मोदींना ‘भगोडा’ समजत नाहीत. ललित मोदी यांनी शशी थरूर यांना अडचणीत आणून गांधी घराण्याला आव्हान दिले नसते तर आजही ते भारतात सुखाने राहिले असते.

आयपीएलची नशा त्यांच्या डोक्यात गेली व आपली पायरी विसरून शशी थरूर प्रकरणात त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी घराण्याला आव्हान दिले. त्याची फळे ते भोगत आहेत. ही वस्तुस्थिती विविध मार्गांनी जनतेसमोर आणून वातावरण बदलण्याची करामत भाजपला अजूनही करता आलेली नाही. भाजपने ललित मोदींची बाजू घेतली म्हणून जनाधार कमी झाला नसता. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी ललित मोदींना मदत केली असली तरी त्याला भारतात येण्याचा आग्रह धरला, असे सुषमा स्वराज म्हणू शकल्या असत्या. शरद पवार यांनी तसाच बचाव केला व या वादातून स्वत:ला हुशारीने सोडवून घेतले. उलट भाजप अडकत गेला. हे प्रकरण इतके तापेल, हेच स्वत:च्या हुशारीवर खुश असणार्‍या नरेंद्र मोदी व शहा यांच्या लक्षात आले नाही.

नरेंद्र मोदी इकडे सावध नव्हते; पण तिकडे ललित मोदी सावध झाले आणि आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी वसुंधराराजे शिंदे यांचेही नाव घेतले. पाठोपाठ प्रथम सही नसलेली व नंतर सहीची कागदपत्रे बाहेर काढून वसुंधराराजेंना पुरते गोत्यात आणले. ब्रिटिश न्यायालयाच्या अखत्यारीतील कागदपत्रांना अचानक पाय कसे काय फुटले? अशी आणखी कागदपत्रे निघतील, असा इशारा ललित मोदी देत आहेत. मुळात ललित मोदींबद्दल सरकारची निश्चित भूमिका काय, ते चोर आहेत की बळीचा बकरा आहेत, हे अमित शहा व नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या बैठकीत स्पष्ट करायला हवे होते. एकीकडे सुषमा स्वराज ललित मोदींचा पाठराखण करीत होत्या, तर दुसरीकडे अरुण जेटलींचे खाते त्यांना चोरटा ठरवत होते. नरेंद्र मोदींची प्रशासनावर जबरदस्त पकड आहे व प्रत्येक मंत्री त्यांच्या दहशतीखाली असतो, असे चित्र गेले वर्षभर उभे केले गेले होते. ती पकड इथे दिसली नाही. माध्यमांतून होणार्‍या चर्चांमध्ये प्रतिहल्ला कसा करायचा याबाबत भाजपचे प्रवक्ते पूर्णपणे गोंधळलेले असल्याचे जनतेला रोज दिसते आहे. ललित मोदींना मदत करणार्‍या पत्रावरील सही आपलीच आहे, हे वसुंधराराजे शिंदे यांनी मान्य केले; पण राजीनामा देण्यास नकार देऊन नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले. नरेंद्र मोदींची पक्षावर म्हणावी तशी सत्ता नाही, असा अर्थ यातून निघतो.

भारताची आर्थिक क्षमता वाढवण्याचे जे भव्य लक्ष्य नरेंद्र मोदींनी जनतेसमोर ठेवले आहे, ते गाठण्यासाठी भूसंपादनाबरोबरच संसदेत अनेक चांगली विधेयके संमत होणे गरजेचे आहे. आता निदान पुढील दोन अधिवेशनांत स्वराज, वसुंधरा, इराणी व पंकजा यांच्या कारभारावरून विरोधक सरकारची कोंडी करणार. आर्थिक सुधारणांचा गाडा यात गडगडणार, गुंतवणूक थांबणार व रोजगारांची वानवा तशीच चालू राहणार. संसद थांबवणे हे विरोधी पक्षांचे कामच आहे, असा युक्तिवाद भाजपनेच एकेकाळी केल्यामुळे काँग्रेसवर टीका करता येणार नाही.

मनमोहनसिंग सरकारच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीतील फक्त शेवटच्या दीड वर्षात सरकारची वाताहत झाली. मोदी सरकारला दुसर्‍याच वर्षी राजकीय संकटाने घेरले आहे आणि नेतेच संभ्रमात आहेत. ललित मोदींना अटक करून भारतात आणणे व काही काळ वादग्रस्त महिलांना घरी बसवणे हाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो. मात्र, हे सोपे नाही. ललित मोदींनी इथे येऊन आपल्याला अडचणीत आणू नये म्हणून अनेक शक्ती कार्यरत आहेत व त्यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. देशाच्या आर्थिक गाड्यापेक्षा स्वत:चा आर्थिक गाडा चालू राहणे या नेत्यांसाठी महत्त्वाचे असल्याने ते याला विरोध करतील. त्याचबरोबर भ्रष्ट कारभारासाठी मंत्र्यांचा राजीनामा घेणे हे स्वत:वर निहायत खुश असणार्‍या नरेंद्र मोदींंना जमणार नाही. ते तो स्वत:चा पराभव मानतील. तेव्हा निर्णय घेण्यात मोदींच्या राजकीय कौशल्याची कसोटी आहे.

यातून ते विजयी होऊन बाहेर पडले तर देशावरील त्यांची हुकूमत सिद्ध होईल. जागतिक योग दिन व स्मार्ट सिटी योजनेचा आरंभ या दोन महत्त्वाच्या घटना या आठवड्यात घडल्या; पण जनतेवर त्याचा प्रभाव पडला नाही. एकदा जनतेच्या मनात शंका उद््भवल्या की त्याचा ठसा नाहीसा करणे कठीण जाते. कणखर नेतृत्वाची प्रतिमा जनतेवर ठसवण्यासाठी नरेंद्र मोदींना त्वरित पावले उचलावी लागतील.

प्रशांत दीक्षित, संपादक (महाराष्ट्र)
prashant.dixit@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...