आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Dixit Article On India's Foreign Relation

वैचारिक मैत्रीचा व्यापारवाढीशी समन्वय (विशेष लेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापार व वैचारिक मैत्री यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न हे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पेरू व क्युबा या देशांच्या दौर्‍याचे मुख्य उद्दिष्ट होते असे मानले, तर ते बर्‍यापैकी साध्य झाले, असे म्हणता येईल. पेरूबरोबर व्यापारी संबंध सुधारण्यास या दौर्‍यामुळे अधिक वाव मिळाला, तर क्युबामध्ये प्रत्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी उपराष्ट्रपतींना विशेष भेट दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे तटस्थ धोरण स्पष्ट होण्यास मदत झाली. उपराष्ट्रपतींच्या दौर्‍याला महत्त्व देण्याची समज भारतीय माध्यमांना फारशी नाही. तथापि, आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भात हा दौरा महत्त्वाचा होता.

जगाच्या बाजारपेठेत आता दक्षिण अमेरिकेतील देशांनाही महत्त्वाचे स्थान मिळत आहे. दक्षिण अमेरिका नैसर्गिक साधनसामग्रीने समृद्ध आहे. तेथील अर्थव्यवस्था बळकट होऊ लागल्यामुळे नव्या बाजारपेठा निर्माण होत आहेत. दक्षिण अमेरिकेतील हा बदल चीनने वेळीच टिपला व अनेक वर्षांपासून या देशांशी व्यापार सुरू केला. तेथील खनिज संपत्ती चीनला हवी आहे. तसेच चीनमध्ये निर्माण होणारी स्वस्त उत्पादने तेथे विकायची आहेत. या देशांबरोबरचा चीनचा व्यापार कित्येक अब्ज डॉलर्समध्ये चालतो. दक्षिण अमेरिकेबद्दल भारत सरकारला उशिरा जाग आली, तरी भारतातील काही कंपन्यांनी याआधीच तेथे व्यापार सुरू केला होता. पेरू हा दक्षिण अमेरिकेतील लहानसा देश इंका संस्कृतीमुळे ओळखीचा आहे. पेरू ही दक्षिण अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असून याच वर्षी तिसर्‍या क्रमांकावरील चिलीचे स्थान तो देश घेईल. खनिजे व कृषी संपत्ती यांनी हा देश संपन्न आहे. उपराष्ट्रपतींच्या दौर्‍यात व्यापारविषयक करार झाले नाहीत, तर परस्परसंबंध दृढ करण्यावर अधिक भर देण्यात आला. अर्थात, त्याचा फायदा व्यापार वाढण्यास होईल. भारतासाठी तेच महत्त्वाचे आहे.
गेल्या एकाच वर्षात पेरूबरोबर व्यापारात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली. आज भारत व पेरू यांच्यातील उलाढाल एक अब्ज डॉलर्सहून अधिक झाली आहे. ब्राझील, चिली, मेक्सिको, अर्जेंटिना, कोलंबिया या देशांबरोबरचा व्यापार अब्जाच्या पुढे गेला आहे. या अन्य देशांना राष्ट्रपती व पंतप्रधानांपासून भारताच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भेट दिली असली, तरी पेरूकडे पंधरा वर्षांत कोणी फिरकले नव्हते. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या दौर्‍यामुळे ही उणीव भरून निघाली. अर्थातच पेरूने उपराष्ट्रपतींचे उत्साहाने स्वागत केले. दक्षिण अमेरिकेतील प्रत्येक राष्ट्राला स्वत:चे वैशिष्ट्य असले, तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. पेरू याला अपवाद नाही. यामुळे दक्षिण अमेरिकेचा संदर्भ घेऊनच पेरूचा विचार करावा लागतो. दक्षिण अमेरिका भारतापासून खूपच दूर असली, तरी तेथील प्रत्येक देशाला भारताबद्दल आस्था आहे. भारताइतकीच तेथील संस्कृती प्राचीन आहे. भारताकडे ते वेगवेगळ्या नजरेने पाहतात. धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचे माहेरघर असणार्‍या प्राचीन भारताबद्दल त्यांना आदर वाटतो. पाब्लो नेरुदा, आॅक्टाव्हिओ पाज्, असे नोबेल विजेते साहित्यिक भारताबद्दल गौरवाने बोलतात. मात्र, मधल्या काळात भारतात दैन्य, दारिद्र्य वाढले. भारत परतंत्र झाला. गरीब देश म्हणून ओळखला जाऊ लागला. ओल्ड इंडिया असे संबोधल्या जाणार्‍या या भारताबद्दल त्यांना आदर नाही. स्वातंत्र्यानंतर भारताने तटस्थ परराष्ट्र धोरण घडवले. त्यामध्ये हे देश सहभागी झाले नाहीत. मात्र, गेल्या वीस वर्षांत भारताने केलेली प्रगती आता या देशांच्या लक्षात येऊ लागली आहे. या देशांचे लक्ष वेधून घेण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योगाचा वाटा मोठा आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नॅनो तसेच बजाज, महिंद्रा, विप्रो अशा कंपन्यांनी दक्षिण अमेरिकेत व्यवसाय सुरू केला व भारताची प्रतिमा बदलली. दक्षिण अमेरिकेतील तरुण वर्गाला हा नवा भारत खुणावतो. केवळ खुणावत नाही, तर आपलासा वाटतो. ही किमया आहे बॉलीवूडची! हिंदी चित्रपट येथे लोकप्रिय आहेत. आपल्या देशात टिंगलीचा विषय असणार्‍या या चित्रपटांतील प्रणयरम्य कल्पना, गाणी व कौटुंबिक मूल्ये परदेशी लोकांना खूप आवडतात. पेरूप्रमाणेच क्युबा, ब्रिटन इतकेच नव्हे, तर जर्मनीतही बॉलीवूड लोकप्रिय आहे. या चित्रपटांमुळे भारत त्यांना जवळचा वाटतो.

आज या देशांशी असलेला चीनचा व्यापार भारतापेक्षा कित्येक पट अधिक आहे. चीनचे अतिवरिष्ठ नेते या देशांना वारंवार भेटी देतात. व्यापार वाढवण्यासाठी पनामा कालव्यापासून कंबोडियातून रेल्वे मार्ग टाकण्यासही चीन सुरुवात करणार आहे. चीनच्या बँका या देशांना अल्प दरात वारेमाप कर्ज देतात. साहजिक चीनचा येथे खूप दबदबा आहे. व्यवहारासाठी या देशांना चीनची गरज असली, तरी भारत त्यांंना सांस्कृतिकदृष्ट्या जवळचा वाटतो. भारताच्या या सांस्कृतिक सुप्त शक्तीचा उपयोग व्यापारासाठी करून घेतला पाहिजे. या देशांमध्ये नवश्रीमंंत मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. युरोप-अमेरिकेची उत्पादने त्याला परवड नाहीत आणि चीनची स्वस्त उत्पादने त्याला कमी दर्जाची वाटतात. दक्षिण अमेरिकेतील या नवमध्यमवर्गाची गरज भारतातील उत्पादने भागवू शकतात. मात्र, त्यासाठी भारत सरकारने चीनप्रमाणे उत्पादकांना सर्व साहाय्य करायला हवे. हे करण्यासाठी आवश्यक ती पायाभरणी हमीद अन्सारी यांच्या दौर्‍याने करून दिली. क्युबामध्ये व्यवहारापेक्षा मैत्री अधिक महत्त्वाची होती. क्युबाला अनेक अडचणींमध्ये भारताने मदत केली आहे. अमेरिकेचे दडपण झुगारून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने कायम क्युबाची पाठराखण केली. क्युबावरील आर्थिक निर्बंध दूर व्हावेत, अशी मागणी करणार्‍या युनोच्या ठरावावर आज फक्त अमेरिका व इस्रायल वगळता 183 देशांची सहमती असली, तरी पूर्वी भारत व रशिया असे मोजकेच देश क्युबाच्या मागे उभे होते. नाम चळवळीत संस्थापनेपासून क्युबाचा सहभाग होता. इंदिरा गांधींबद्दल फिडेल कॅस्ट्रो यांना आत्मीयता होती. कॅस्ट्रो सध्या फारसे कोणालाही भेटत नाहीत; पण अन्सारी यांच्यासाठी त्यांनी तासभर वेळ काढला. कॅस्ट्रोंची भेट ही उपराष्ट्रपतींच्या दौर्‍याची फार मोठी उपलब्धी मानता येईल. यातून जगाला एक संदेश गेला. भारताला आपण अत्यंत जवळचा मित्र मानतो, हे या भेटीतून क्युबाने दाखवून दिले, तर परराष्ट्र राजकारण हे अमेरिकेच्या तंत्राने चाललेले नाही, हे भारताने जगाला स्पष्ट केले. उपराष्ट्रपतींच्या दौर्‍याआधीच पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी रशिया व चीनचा दौरा केला होता. अमेरिकेपेक्षा वेगळी विचारधारा जपणार्‍या रशिया, चीन, क्युबा यासारख्या देशांना एकाच आठवड्यात भारतातील उच्चपदस्थांनी भेटी देणे हा महत्त्वाचा संकेत मानला जातो. क्युबामध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा, शिक्षण हे मोफत आहे. याचे बरेच कौतुक भारतीय शिष्टमंडळाकडून होत होते; पण हे सर्व उधारीवर होते व नागरिकांना स्वातंत्र्य बिलकूल नाही याकडे दुर्लक्ष करता येत नाही. पूर्वी रशिया व अलीकडे व्हेनेझुएला यांच्या मदतीवर क्युबाचा कारभार सुरू असतो. क्युबातील वैद्यकीय सेवा चांगली असली, तरी देशाची आर्थिक प्रकृती तोळामासा आहे. अमेरिकेबरोबर आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत यासाठी क्युबाची धडपड सुरू आहे. ते व्यवहार सुरळीत सुरू झाल्यानंतर भारताच्या मैत्रीची क्युबाला आजच्याप्रमाणे जाणीव राहील का, याचाही विचार केला पाहिजे. कम्युनिझमचा हट्टाग्रह धरून घर चालवता येत नाही, हे क्युबाकडून शिकता येते. मात्र, जैवतंत्रज्ञान व औषधनिर्माण या क्षेत्रांत क्युबाशी फायदेशीर व्यवहार होऊ शकतो. व्यवहाराकडे लक्ष ठेवल्याने वैचारिक मैत्रीला बाधा येण्याचे कारण नाही. जगातील अनेक देश हे दोन्ही साधतात. अमेरिकेबद्दल पूर्वग्रह बाळगणारा मोठा वर्ग भारतीय राजकारणात व नोकरशाहीत आहे. त्यांना क्युुबाचे कौतुक वाटते. क्युबातील क्रांतीच्या कल्पनारंजनात हा वर्ग रंगतो. कल्पनारंजन मनाला आल्हाद देत असले, तरी परराष्ट्रधोरणात व्यवहाराला अधिक महत्त्व असते. उपराष्ट्रपतींच्या दौर्‍यात हे दोन्ही साधले. यामुळे हा दौरा यशस्वी म्हणता येईल.

(prashant.dixit@dainikbhaskargroup.com)