आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप आवश्यक, केजरीवाल अनावश्यक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली पालिका निवडणुकीतील आपच्या पराभवाचा दोन अंगानी विचार केला पाहिजे. केवळ दोन वर्षांपूर्वी पाशवी बहुमत मिळविलेल्या या पक्षाची निवडणुकीत इतकी वाताहत का व्हावी आणि आपसारख्या पक्षाची भारतीय लोकशाही व्यवस्थेत गरज आहे की हा प्रयोग फसला आहे

अण्णा हजारे यांच्या २०१२ मधील दिल्ली उपोषणाने राजकीय मतप्रवाह बदलला. अण्णांच्या व्यासपीठावरून आपचा उदय झाला व केजरीवाल यांना राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपची वाटचाल चांगली सुरू झाली. दिल्लीच्या पहिल्या निवडणुकीत आपला बहुमताइतके यश मिळाले  नसले तरी पुढील निवडणुकीत आपने एकदम झेप घेऊन दिल्ली विधानसभेत एकहाती बहुमत प्रस्थापित केले. लोकशाहीतील हा चमत्कार होता. या पाशवी बहुमतामुळे केजरीवाल व त्यांच्या मित्रांना स्फूरण चढले. आत्मविश्वासाची जागा अहंकाराने घेतली. राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. मात्र पंजाब व गोव्यात ‘आप’ला लोकांनी नाकारले आणि आता दिल्ली पालिका निवडणुकीत आपची मतसंख्या ५२ टक्क्यांनी घटली. अवघ्या दोन वर्षांत अन्य कोणत्याही पक्षाचा जनाधार निम्म्याहून अधिक कमी झालेला नाही. 

या पराभवाचे खापर आपने प्रथम मतदान यंत्रांवर फोडले. मात्र नंतर गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत ईव्हीएमचा उच्चार करण्यात आला नाही. उलट नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी ईश्वराची शपथ घालण्यात आली. स्वच्छ चारित्र्य, ईश्वर अशा गोष्टी आणून आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला अाध्यात्मिक रूप देण्याची धडपड अनेकजण करतात. केजरीवाल त्यातील एक. मात्र पक्षाने आत्मविश्वास गमावला असल्याचे यातून दिसते.
 
आपचा जनाधार घसरण्यामागे केजरीवाल व त्यांच्या भगतगणांची चुकलेली राजकीय व्यूहरचना कारणीभूत आहे. काही गटांनी सुरू केलेल्या मोदीविरोधी मोहिमेत केजरीवाल फसले ही त्यांची पहिली चूक. मोदी सत्तेवर आल्यानंतर हे पापयोनीतील सरकार आहे, असा प्रचार सुरू झाला. केजरीवाल यांनी तो खरा मानला आणि जनतेचेही तसेच मत आहे अशी समजूत करून घेतली. दिल्लीतील विजयानंतर लोकांचे ऐकणे केजरीवाल यांनी बंद केले. आपण प्रेषित असल्याचा भ्रम त्यांना होऊ लागला. संपूर्ण व्यवस्था किडलेली आहे, भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली आहे व ती व्यवस्था उलथून टाकण्यासाठी माझा जन्म झाला आहे, अशा क्रांतिकारी भ्रमात केजरीवाल यांची वाटचाल सुरू झाली व तेथेच आपच्या घसरणीला प्रारंभ झाला. 
मोदींविरुद्ध केजरीवाल यांनी बंड पुकारले. पण या बंडात जनतेला ते बरोबर घेऊ शकले नाहीत. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई हे आपचे मुख्य अस्त्र होते. परंतु, मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराचे कुठलेही प्रकरण बाहेर आले नसल्याने हे अस्त्र फुकट जात होते. गरिबांचे हितरक्षक या आपच्या दुसऱ्या अस्त्रालाही मोदींनी धूर्तपणाने सुरुंग लावला. ‘सूटबूट की सरकार’ अशी टीका होताच वेळीच सावध होऊन मोदींनी सरकारचा चेहरा बदलला. असा चेहरा बदलताना मोदींचे लक्ष्य काँग्रेस असले तरी त्याचा फटका आपलाही बसला. 

मोदी हे खलनायक आहेत या काही गटांनी उभ्या केलेल्या प्रतिमेत केजरीवाल अडकले. या खलनायकाचा नि:पात करण्याची जबाबदारी नियतीने आपल्यावर सोपविली आहे, असा भ्रम त्यांना होऊ लागला. मोदी हे सज्जनपणाचा पुतळा नाहीत. पण जनता त्यांना खलनायक मानत नाही हे केजरीवाल यांच्या लक्षात आले नाही. मोदींना लक्ष्य केल्याने राष्ट्रीय नेते म्हणून जनता आपल्याला मान्यता देईल हा दुसरा भ्रम केजरीवाल यांना झाला. कोणाला राष्ट्रीय नेते करायचे, कोणाला प्रदेशाचे नेते करायचे, कोणाला स्थानिक पातळीवर ठेवायचे आणि कोणाच्या फक्त भाषणांना गर्दी करायची याबाबत भारतीय जनतेची काही गणिते ठरलेली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात याची अनेक उदाहरणे सापडतील. केजरीवाल यांना ही गणिते समजली नाहीत. जनतेने दिल्ली त्यांच्या हवाली केली होती. दिल्ली त्यांनी नीट चालवावी इतकीच जनतेची अपेक्षा होती. 

परंतु केजरीवाल यांची भूक मोठी असल्याने त्यांनी एकदम मोदींना आव्हान देण्याचा विडा उचलला. हे करताना त्यांनी व्यवस्थेलाच (सिस्टिम) आव्हान दिले. दिल्ली व केंद्र सरकार यांच्यामध्ये कसा कारभार चालावा याची व्यवस्था वर्षानुवर्षे व्यवस्थित सुरू होती. केजरीवाल यांनी ही व्यवस्थाच नाकारली. प्रत्येक पातळीवर अडेलतट्टू धोरण धरले. बेलगाम आरोप करीत संघर्षाचा पवित्रा घेतला. भारतीय जनतेला हे आवडत नाही. भारतीय जनतेच्या मनात क्रांतिकारकांबद्दल नितांत आदर असतो. पण व्यवस्थेला नाकारण्यापेक्षा व्यवस्था सुधारण्यावर, सिस्टिममध्ये राहून चांगले काम करून दाखविण्यावर भारतीय जनतेचा जास्त विश्वास आहे. व्यवस्थेबाहेर राहून व्यवस्थेला चार शब्द सुनावणाऱ्या अण्णांसारख्यांचा जनता मान ठेवते, पण व्यवस्थेत शिरून आततायीपणा करणे भारतीयांना मान्य होत नाही. (शिवसेनेला म्हणूनच महाराष्ट्रात फटका बसत आहे) राजकीय व्यवस्थेत राहूनही चांगले काम करता येते हे दिल्लीकरांनी शीला दीक्षितांच्या काळात अनुभवले होते. शीला दीक्षितांचा पराभव हा त्यांच्या कारभाराचा नव्हता तर काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराचा होता. दिल्लीत भाजपचा पराभव झाला तो अमित शहा यांच्या अरेरावी व्यवहारामुळे झाला. हर्षवर्धन यांच्या हाती दिल्लीच्या प्रचाराची सूत्रे असती तर आपला इतक्या जागा मिळाल्या नसत्या. केजरीवाल यांच्या हे लक्षात आले नाही. 

दिल्लीत त्यांनी काही चांगले निर्णय घेतले. वीज बिल कमी केले. पाणी मोफत पुरविले. पण हे करताना केंद्र सरकारविरुद्ध पुकारलेल्या रोजच्या लढाईमुळे आप ही अराजक माजविणारी टोळी आहे असा ग्रह केवळ दिल्ली नव्हे तर देशभर झाला. याचवेळी जवळचे टोळके सोडून देशातील प्रत्येकाबद्दल त्यांनी संशयी प्रचार सुरू केला. जग विकले गेले आहे, मीच काय तो एकमेव शुद्ध आहे अशा रीतीने ते मुलाखती देऊ लागले. आपल्याविरोधात बोलणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी जनतेच्या पैशातून यंत्रणा उभारण्याची तयारी त्यांनी केली. रशियात स्टॅलीनच्या काळात असे होत असे. आज मोदींच्या सांस्कृतिक दडपशाहीबद्दल तारस्वरात बोलले जाते, पण दिल्लीत तंत्रज्ञान वापरून छुपी हुकूमशाही उभी राहत होती. स्वच्छ स्वभावाचा माणूस जनतेला आवडतो. पण स्वच्छ स्वभावाचे भांडवल करून दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणे जनतेला मान्य नसते. दिल्लीत तसे घडत असल्याची चाहूल लागल्याने दिल्लीकर सावध झाले. केंद्र सरकारबरोबर खुल्या दिलाने कारभार करणारा नेता दिल्लीकरांना हवा होता. केजरीवाल  ती अपेक्षा पुरी करू शकले नाहीत. 

केजरीवालांच्या अशा चुकांमुळे आप या चांगल्या प्रयोगावरून लोकांचा विश्वास उडाला. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे एक वैशिष्ट्य होते. कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याची इच्छा नसणाऱ्या, पण सार्वजनिक कामाची आवड असणाऱ्या तरुणांना या आंदोलनातून प्रेरणा मिळाली होती. राजकीय विचारधारेची बांधिलकी न घेता जनतेला उपयोगी असे चांगले काम करण्याची तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांसाठी आप हे उत्तम व्यासपीठ होते. मध्यमवर्गीय उच्चशिक्षित तरुणांना राजकीय व्यवस्थेत प्रवेश करून देण्याची संधी त्यातून मिळत होती. राजकीय बांधिलकीची बाधा नसणे हे यातील सर्वात चांगले मूल्य होते. भ्रष्टाचारमुक्त चांगला कारभार करण्यासाठी राजकीय बांधिलकीची गरज नसते. जातपात, प्रादेशिकता, घराणेशाही, आर्थिक बळ यापासून दूर राहून सार्वजनिक कार्यात भाग घेण्याची संधी आपने मिळवून दिली होती. देशातील राजकीय व्यवस्थेपासून मध्यमवर्गीय उच्चशिक्षित तरुण वर्गाची फारकत झाली होती. ती आपने मिटविली होती. राजकीय पक्षांवर अंकुश ठेवणारे उत्तम व्यासपीठ तयार झाले होते. केजरीवाल यांच्या आततायी कारभाराने या चांगल्या कल्पनेचे मातेरे झाले. केजरीवाल यांची आप पराभूत झाली असली तरी आप या कल्पनेची गरज संपलेली नाही. सार्वजनिक काम करणारे अराजकीय व्यासपीठ म्हणून आपची गरज आहे, मात्र केजरीवालविना.
 
 prashant.dixit@dbcorp.in
बोला बिनधास्त
आजच्या राजकीय स्थितीत ‘आप’ची गरज आहे का? नोंदवा आपले मत ‘दिव्य मराठी’च्या फेसबुक पेजवर.
मत नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा
 
हे पण वाचा, 
बातम्या आणखी आहेत...