आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवमतदारांनी ‘आप’लासा केलेला पक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये मोदी इफेक्टपेक्षा अरविंद केजरीवाल यांच्या आपची दमदार एंट्री लक्षवेधी ठरली. केजरीवाल यांनी मैदानात उतरून आपल्याला हवे ते करून दाखवावे, असे सांगणा-या पत्रपंडितांना 28 जागा जिंकून केजरीवाल यांनी सणसणीत चपराक लगावली. निवडणुकीच्या राजकारणात उतरून केजरीवाल चूक करीत आहेत असे या लेखकासह काहींचे मत होते. म. गांधींच्या, राजकारणाबाहेर राहून राजकारणावर अंकुश ठेवणा-या लोकनीतीचा केजरीवाल यांनी अंगीकार करावा, कारण निवडणुकीचे राजकारण केजरीवाल यांना झेपणार नाही अशी या लेखकाची समजूत होती. ही समजूत चुकीची होती हे केजरीवाल यांनी दाखवून दिले. राजकारणात एक नवे दार उघडले गेले. या पार्श्वभूमीवर ‘आप’ मधील नावीन्य, क्षमता व मर्यादा यांची चर्चा केली पाहिजे.
कोणत्याही राजकीय वा वैचारिक आयडिओलॉजीशिवाय उभा राहिलेला ‘आप’ हा पहिलाच पक्ष आहे. पक्षीय राजकारणातील कोणत्याही प्रवाहातून वा चळवळीतून आप पुढे आलेला नाही. लोकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी हा पक्ष पुढे आला. समाजवादी, साम्यवादी, हिंदुत्ववादी, काँग्रेसी अशा कोणत्याही विचारसरणीचे जोखड आपवर नाही. रस्ते, पाणी, वीज, महागाई, भ्रष्टाचार या समस्या सोडवण्यासाठी कसल्याही आयडिओलॉजीची गरज नसते. लोकांना समस्या सुटण्याशी मतलब. ही बाब आपने स्पष्टपणे समोर आणली. आपचे नावीन्य यामध्ये आहे. मंडल, कमंडल आणि लांगूलचालन या तिन्ही प्रवाहांचा स्पर्श अद्याप आपला झालेला नाही. या तिन्ही आमिषांना न भुलणारा नवा वर्ग समाजात पुढे येतो आहे. समस्या सोडवणारा प्रामाणिक व सचोटीचा असेल तर जात, धर्म, पंथ, वर्ग, आर्थिक स्तर, विचारधारा यापलीकडे जाऊन मतदान करण्याची या वर्गाची तयारी आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळालेल्यांनी या वेळी मोठ्या संख्येने मतदान केले़. हे मतदार 1990 ते 95 यामध्ये जन्माला आलेले आहेत. यामुळे त्यांच्यावर मंडल, कमंडलचा तितकासा प्रभाव नाही.
मुक्त आर्थिक व्यवस्थेत त्यांची जडणघडण झाली आहे. नव्या अर्थव्यवस्थेची फळे चाखणा-या या मतदाराला चीड आहे ती भ्रष्टाचाराची. नव्या अर्थव्यवस्थेचे चटके बसलेलाही मतदार आहे. त्याला काँग्रेसने फक्त हक्क दिले, पण महागाई कमी करून दाखवली नाही. परिणामी चटके सोसणारा हा मतदारही आपकडे वळला. मतदारांची ही बदललेली मानसिकता सध्या मेट्रो शहरांपुरती मर्यादित असली तरी आपच्या यशामुळे ती अनेक लहान शहरांत पसरण्यास सुरुवात होईल. यामुळे नव्या उमेदवारांना मैदान खुले होईल. हा वर्ग समाजातील सर्व थरांमध्ये पसरला आहे. ‘आप’ ला मिळालेल्या मतांवरून हे लक्षात येते. हा नवा मतदार लक्षात न घेता जातीची समीकरणे आणि मतदारांचे लांगूलचालन याचभोवती काँग्रेसचे राजकारण फिरत राहिले. सरकारने फुकट काहीही देऊ नये. त्यापेक्षा सर्वांच्या आशा-आकांक्षांना वाव मिळेल अशी व्यवस्था व आर्थिक वातावरण तयार करावे ही जनतेची अपेक्षा होती. याचबरोबर केवळ काँग्रेसविरोध हे भांडवल पुरेसे होईल ही भाजपची समजूत मतदारांनी धुळीला मिळवली. केजरीवाल यांच्यासारखा थेट समस्येला भिडून सरकारला धारेवर धरणारा पर्याय समोर येताच त्यांनी भाजपलाही बाजूला सारले. आपचा प्रयोग नावीन्यपूर्ण व आश्वासक असला तरी त्याच्या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत.केजरीवाल यांच्या यशामध्ये अण्णा हजारे यांनी केलेल्या वातावरणनिर्मितीचा वाटा मोठा आहे.
गेली वीस वर्षे अण्णांनी विविध आंदोलने करून माहिती अधिकारासह अहिंसक, विधायक मार्गाने बदल घडवून आणता येतात हे दाखवून दिले. उपोषण, सत्याग्रह, गांधी टोपी, साधी राहणी, प्रार्थना, व्यक्तिगत चारित्र्य अशा भारतीय जनतेला पसंत पडणा-या सिम्बॉल्सचा खुबीने वापर करीत अण्णांनी बदल घडवण्याची प्रेरणा जनतेमध्ये निर्माण केली. जनतेच्या अबोध मनावर ही सिम्बॉल्स खूप प्रभाव टाकतात. भारताच्या धार्मिक परंपरांशी ती जुळलेली आहेत. रामलीला मैदानावरील व्यासपीठावर तुलसीदास वा तुकारामाचे अभंग पुटपुटत हलकेच टाळ्या वाजवत बसलेले अण्णांचे व्यक्तिमत्त्व आठवा. भारतीय परंपरेशी जोडणारे एक नाट्य त्यामध्ये होते. गांधींजीच्या चळवळी वरून साधासुध्या वाटल्या तरी त्यामध्ये नाट्य असे. अण्णा व केजरीवाल या दोघांनीही रामलीला मैदानावर हे नाट्य बरोबर पकडले होते. केजरीवाल यांनीही गांधींचाच सिम्बॉल वापरण्यास सुरुवात केली, पण ती अलीकडच्या काळात. राजकीय व प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त व्हावी हाच अण्णांप्रमाणे केजरीवाल यांचाही उद्देश होता. मात्र, त्यांचे काम एनजीओमार्फत सुरू होते. मॅगसेसे पुरस्कार देऊन त्याचे कौतुक झाले असले तरीही ती चळवळ झाली नव्हती. चळवळीसाठी सिम्बॉल्सची गरज असते. त्याचबरोबर त्या सिम्बॉल्सना विश्वासार्हता देणारा चेहरा असावा लागतो. अण्णा हा तसा चेहरा होता.
केजरीवाल मेहनती होते, नि:स्वार्थी होते, त्यांचे नेटवर्कही होते. केजरीवाल यांना सिम्बॉल्स व चेह-याची गरज होती, तर अण्णांना नेटवर्कची. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था हा दोघांचा उद्देश समान होता. परस्परांना पूरक अशी ही व्यवस्था अडीच वर्षांपूर्वी दिल्लीत जमली आणि नवे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले. येथपर्यंत दोघांचे उद्देश समान होते, मार्गही समान होते. मात्र गेल्या वर्षापासून दोघांचे मार्ग बदलले. केजरीवाल यांनी राजकीय क्षेत्राकडे लक्ष वळवले. अण्णांनी जागवलेले मूळ गांधीप्रणीत सिम्बॉल्स त्यांनी राजकीय उद्दिष्टासाठी वापरण्यास सुरुवात केली. टोपी, झाडू, उपोषण, साधी राहणी, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, पैशाशी नफरत असे हे सिम्बॉल्स आहेत. इथे अण्णांचे व केजरीवाल यांचे बिनसले.
अण्णांनी कधीही ही सिम्बॉल्स आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे जाऊ दिली नव्हती. पण केजरीवाल यांना ते अटकाव करू शकत नव्हते. ही सिम्बॉल्स यशस्वी होण्यासाठी लागणारी विश्वासार्हता केजरीवाल यांनीही मिळवली होती. त्याला मेहनत, आधुनिक व्यवस्थापन मूल्ये व उत्तम नेटवर्किंगची जोड दिली. त्याचबरोबर कार्यकुशल अशा माणसांची टीम जमवली. अण्णा हजारेंनी नकाराचा सूर लावूनही केजरीवाल दिल्लीत यशस्वी झाले ते या गुणांमुळे.
अण्णांना हे जमले नाही. यामुळे महाराष्‍ट्रात अण्णांना चळवळ उभी करता आली नाही. अण्णांना महाराष्‍ट्रात केजरीवाल सापडला नाही असे म्हणण्यापेक्षा केजरीवाल उभा होईल अशी व्यवस्था अण्णा व त्यांच्याभोवती असलेल्या शागीर्दांनी निर्माण होऊ दिली नाही. मोठ्या अपेक्षेने अण्णांभोवती गोळा झालेल्यांपैकी अनेक चांगले कार्यकर्ते पांगले, कारण अण्णांची कार्यशैली व्यक्तिकेंद्रित राहिली. या दोघांमधील आणखी एक महत्त्वाचा फरक असा की, केजरीवाल राजकीय नेत्यांना थेट व टोकाचे आव्हान देत राहिले, तर एका मर्यादेनंतर अण्णा राजकीय व्यवस्थेशी जुळवून घेत राहिले. अण्णांना मोठेपणा देत त्यांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचे तंत्र महाराष्‍ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी तयार केले. महाराष्‍ट्रातील जनतेच्या हे लक्षात आले. यामुळे अण्णांचे स्थान आदराचे राहिले असले तरी महाराष्‍ट्रातील जनसमूह त्यांच्यामागे लोटला नाही. अण्णांचे मुंबईतील आंदोलन फसण्यामागे हेही महत्त्वाचे कारण होते. आपची लहर महाराष्‍ट्रात चालणार नाही असे काँग्रेस व राष्टÑवादीचे नेते म्हणतात ते या इतिहासामुळे. गांधीजींनी जनतेमध्ये रुजवलेल्या सिम्बॉल्सच्या बळावर अण्णा व केजरीवाल यांची इमारत उभी आहे. ही सिम्बॉल्स खूप अर्थपूर्ण असली तरी वास्तवाच्या परिस्थितीच्या रेट्यासमोर ती कोलमडून पडण्याचा दाहक अनुभवही गांधीजींनी घेतला होता. फाळणी फार पुढची गोष्ट झाली. त्याआधी राजकोट (1939)सारखे त्यांचे काही सत्याग्रह पुरते फसले होते, याचा विसर पडता कामा नये. आदर्श आवश्यक असतात; पण ते पूर्णपणे साध्य होणे अशक्य असते याचे भान नेते व जनता या दोघांनीही ठेवले की सिनिसिझम येत नाही.
prashant.dixit@dainikbhaskargroup.com