आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Pawar Article On Kabir Kala Manch And Laxman Mane

शाहीर गेला तुरुंगात, नाही बाहेर आवाज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबंध पुरोगामी चळवळीला धक्का बसेल अशा या दोन घटना...
सबंध आयुष्य भटक्या-विमुक्तांसाठी, दलित चळवळीसाठी खर्च करणारे ‘उपरा’कार लक्ष्मण माने त्यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपामुळे गेले काही दिवस तोंड लपवून फिरत आहेत. पोलिसांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ते ‘फरारी’ आहेत. समाजपरिवर्तनाच्या चळवळीने जे समोर येईल त्याला निर्भयतेने तोंड द्यायला शिकवले असताना लक्ष्मण माने अद्याप का दडून बसले आहेत, ही सबंध पुरोगाम्यांच्या मनातली खंत... एसएम जोशींनी ज्यांना आपले मानसपुत्र मानले, यदुनाथ थत्तेंनी ज्यांना घर थाटून दिले, बाबा आढावांनी ज्यांच्या पाठीशी चळवळीचे बळ उभे केले आणि हजारो कार्यकर्त्यांनी ज्यांना आपला मोठा भाऊ मानले ते लक्ष्मण माने असे का वागत आहेत? बौद्ध धम्म स्वीकारून तथागताच्या मार्गाने जे जायला निघाले त्यांनी सत्याचा प्रकाश इतका काळ का रोखून धरावा...?
दुसरीकडे दीडशेपेक्षाही जास्त विद्रोही गाणी, दोन गीतसंग्रह, एक पुस्तक, दोन ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून शेतकरी, आदिवासी, मजूर व शोषितांचा आवाज जनतेसमोर मांडणारे आणि हे प्रबोधन करत असताना एकही हिंसात्मक कारवाई न करणारे कबीर कला मंचचे दोन शाहीर कलावंत शीतल साठे आणि सचिन माळी दीड वर्ष भूमिगत राहून काल पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांच्याच भाषेत हे कलावंतदेखील ‘फरारी’च.. कारण या कलावंतांवर शिक्का बसलाय तो नक्षलवादी असल्याचा. मात्र या कलावंतांच्याच भाषेत सांगायचे झाले तर हे आमचे आत्मसमर्पण नसून हा आमचा सत्याग्रह आहे. ‘सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज’असे सुनावत शीतल साठे आणि सचिन माळी यांनी विधान भवनाबाहेर सत्याग्रह केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
महाराष्ट्राच्या पुरोगामी वर्तुळात या दोन्ही घटनांचे खूप तीव्र पडसाद उमटले आहेत. सबंध आयुष्य पणाला लावून तिशीच्या आतील शीतल साठे आणि सचिन माळी जर हे धाडस दाखवू शकतात, तर आयुष्याच्या उतरणीला आलेले लक्ष्मण माने असे धाडस का दाखवू शकत नाहीत? कबीर कला मंचच्या काही कलाकारांना नक्षलवाद्यांचा शिक्का मारून तुरुंगात डांबल्यानंतर शीतल आणि सचिन हे गेल्या दीड वर्षापासून भूमिगत राहिले. आता लक्ष्मण मानेही भूमिगत आहेत, परंतु या दोघांच्या भूमिगत असण्यामागे जमीन-अस्मानचा फरक आहे. शीतल आणि सचिन माळीच्या भूमिगत असण्याला शोषितांच्या लढ्याची जोड आहे, कलेच्या माध्यमातून प्रबोधनाच्या चळवळीची जोड आहे, मात्र लक्ष्मण मानेंच्या भूमिगत असण्याला सराईत गुन्हेगाराची जोड आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची या राज्याला खरोखर गरज आहे आणि म्हणूनच हेच विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणार्‍या कबीर कला मंचच्या कलावंतांचे आता काय होणार, हा भीतीयुक्त प्रश्न पुरोगाम्यांच्या मनात सतत रेंगाळत आहे, तर भटक्या-विमुक्तांसाठी सुरू केलेल्या संस्थेत गैरव्यवहार आणि त्याच संस्थेतील तब्बल पाच महिलांनी केलेले विनयभंगाचे आरोप यामुळे माने यांच्यामुळे चळवळीची मान शरमेने खाली गेली, असे मत पुरोगाम्यांनी व्यक्त केले आहे.
2000 च्या सुमारास पुण्याचे कबीर कला मंचचे कलाकार प्रकाशझोतात आले ते ‘क्रांतिकारी जलसा’च्या माध्यमातून. अनुभवाचे चटके, दलितांचा इतिहास, मनुस्मृतीने दिलेली वागणूक, जातिभेदाची सद्य:स्थिती, शिक्षणाचे महत्त्व, सेझ, भांडवलशाही या ज्वलंत विषयांवर त्यांचा डफ आणि आवाज घुमू लागला. खुनशी हत्यारं जातीची, सडा रक्ताचा शिंपला, ऐक मैतरा रांगड्या, खैरलांजीची ही कथा, रमाबाईची ही कहाणी, ऐक दलितांची व्यथा...! ‘शब्द हेच शस्त्र’ ही त्यांची भूमिका तळागाळापर्यंत खोलवर रुजली. सातत्याने सरकारच्या विरोधात बोलणार्‍या आणि हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी, श्रमिक यांच्या मेंदूला लावलेले टाळे आपल्या कलेच्या माध्यमातून खोलणार्‍या कबीर कला मंचच्या शीतल आणि सचिन या गुणी आणि विद्रोही कलाकारांवर ते नक्षलवादी असल्याचा आरोप ठेवला जातो. यामुळेच व्यथित होऊन या कलाकारांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या या आत्मसमर्पणामागे एक आशेचा किरणही आहे. एप्रिल 2011 मध्ये गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या अँजेला सोनटक्केसह चौघा माओवाद्यांना अटक केली.
मुंबई व पुण्यासह राज्याच्या शहरी भागातील विद्यार्थ्यांत माओवादी चळवळीचा प्रसार अँजेला व तिच्या साथीदारांकडून केला जात होता. तपासामध्ये कबीर कला मंचचे कलाकार गोल्डन कॉरिडॉर कमिटीशी संबंधित असल्याचे तसेच नक्षलवाद्यांना मदत करत असल्याचे पुढे आले होते. तेव्हापासूनच एटीएस या कलावंतांच्या मागावर होते. सर्वप्रथम एटीएसच्या हाती कबीर कला मंचचे दीपक डेंगळे आणि सिद्धार्थ भोसले लागले. गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात खितपत पडल्यानंतर अलीकडेच उच्च न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करत असताना न्यायमूर्तींनी जो शेरा दिला तोच कबीर कला मंचच्या इतर कलाकारांसाठी आशेचा किरण ठरण्याची शक्यता आहे. स्वत: गुन्हा केला नसताना केवळ विशिष्ट विचारप्रवाहाचे आकर्षण वाटल्यास व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केल्यामुळेच शीतल साठे आणि सचिन माळी यांनी लोकांसमोर येण्याचा निर्णय घेतला. सचिनने पुणे विद्यापीठातून एम.फिल. आणि पीएच.डी. केली आहे, तर शीतलने राज्यशास्त्रातून सुवर्णपदकासह एम.ए. केले आहे. त्यांचा खरोखरच नक्षलवादी चळवळीशी संबध आहे की नाही हे तपासात ठरेलच आणि तसे झाले तर मात्र हे दलित चळवळीसाठी धोक्याचे लक्षण आहे. दलित चळवळीतील राजकीय नेतृत्वाचा अभाव लक्षात घेऊनच माओवाद्यांनी त्यात घुसखोरी केल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकेल. आदिवासी क्षेत्रात आपला पाया घट्ट रोवल्यानंतर त्याचा मोठा फटकाही माओवाद्यांना अलीकडच्या काळात बसला आहे. त्यामुळे देशभरात माओवादी चळवळ पुन्हा तीव्र करण्यासाठी दलित-मुस्लिम आणि बहुजनवर्गातील तरुणांना आकर्षित करण्याचे शिस्तबद्ध प्रयत्न माओवाद्यांकडून सुरू झाले असावे, असे म्हणता येऊ शकेल. परंतु या मुलांनी कधीही हातात बंदूक घेतलेली नाही, हेच वास्तव आहे. घेतली ती लेखणी आणि ढोलकी. पाड्या-पाड्यांवर, बेड्या-बेड्यांवर बाबासाहेबांचे, भगतसिंगांचे आणि महात्मा फुल्यांचे विचार पोहोचवण्याचे काम करीत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ‘घुंगराची काठी रं दादा, सावकाराच्या माथी हान’म्हणत स्वाभिमान पेरत आहेत. ‘जयभीम म्हणण्याआधी आपलं रगत तपासा’असे सुनावत बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणार्‍यांवर आसूड ओढत आहेत. मग आपल्या हक्काबद्दल लोकशाही मार्गाने, गाणी, कविता, लेख यांच्या माध्यमातून बोलणे म्हणजे नक्षलवादी का? दलित, श्रमिक यांच्या उद्धारासाठी सबंध आयुष्य वाहून घेणार्‍या या उच्चशिक्षित तरुणांच्या माथी नक्षलवादी असल्याचा आरोप आणि त्यांच्या ‘विद्रोही’या मासिकावरही बंदी आणण्याची मागणी... पुरोगाम्यांच्या महाराष्ट्रात हा कसला न्याय,असे या दोघा कलावंतांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘कबीर कला मंच बचाव समिती’चे म्हणणे आहे. शासनाची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास खरोखर महानगरातील दलित-आदिवासी नक्षलवादी होतील. असे होऊ नये हे शासनाच्याच हाती आहे, पण सध्या तरी शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या आत्मसमर्पणाच्या निर्णयामुळे निश्चितच डाव्या चळवळीत काम करताना हे दोघेही ‘उजवे’ ठरले आहेत.

prashant.pawar@dainikbhaskargroup.com