सत्तर-ऐंशीचं दशक अनेक अर्थांनी हिंदी चित्रपटसृष्टीला कलाटणी देणारं दशक ठरलं होतं. याच काळात राजेश खन्ना या पहिल्या सुपरस्टारच्या अस्ताला सुरुवात झाली आणि त्याच्यासोबत एक रोमँटिक युगही संपलं. अमिताभ बच्चनच्या रूपात एका महानायकाचा जन्म झाला. चित्रपटसृष्टी अधिकाधिक व्यावसायिक होऊ लागली. ‘लार्जर दॅन लाइफ’ची संकल्पना अमिताभच्या काळाने रुजवली. याच काळात समांतर चित्रपटांनी मात्र अजूनही वास्तवाशी आपलं नातं तुटू दिलं नव्हतं. या समांतर धारेचे फारूख शेख हे महत्त्वाचे कलाकार. त्यांच्या चित्रपटांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. 25 मार्च 1948 रोजी गुजरातमध्ये जन्म पावलेल्या फारूख शेख यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. याच काळात ते रंगभूमीवर अभिनय करू लागले. ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’च्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यांच्या याच अभिनयाच्या बळावर 1973 मध्ये त्यांना एम. एस. मॅथ्यूचा ‘गर्म हवा’ हा पहिला हिंदी चित्रपट मिळाला.
इस्मत चुगताई यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात सहभागी सारे लोक रंगमंचाशी जुळलेले होते आणि आपल्या कामांबाबत अतिशय प्रामाणिक आणि गंभीर होते. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांना बलराज साहनी यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. साहनींच्या स्वाभाविक अभिनयाचा फारूख शेख यांच्यावर कायमस्वरूपी प्रभाव पडला. सत्यजित रे यांनी जेव्हा ‘गर्म हवा’ पाहिली त्या वेळी या तरुण अभिनेत्याचा अभिनय त्यांनाही मोहवून गेला. आपल्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटासाठी त्यांनी फारूखची निवड केली. त्यानंतर आला मुझफ्फर अली यांचा ‘गमन’ हा चित्रपट. ‘गमन’ चित्रपट आज लक्षात राहतो तो त्यातील ‘सीने में जलन आँखों में तुफान सा क्यूँ है। इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है।’ या गाण्यासाठी. पोटापाण्यासाठी आपलं घर, गाव आणि राज्यही सोडाव्या लागणा-या बेरोजगार उत्तर भारतीय तरुणांची मानसिकता आणि कामाच्या शोधात फिरताना होणारे हाल याचं उत्तम चित्रण या चित्रपटात आहे. फारूख यांचा सामान्य चेहरा हा त्या युवकांचा चेहरा होता. मुंबईतील जीवघेण्या स्पर्धेची ती सुरुवात होती. भविष्यात तिचे होणारे परिणाम या चित्रपटात दर्शवले होते.
पण फारूख यांची प्रेक्षकांना ओळख आहे ती सई परांजपे यांच्या ‘चष्मेबद्दूर’ या चित्रपटामुळे. यातील सिद्धार्थ पाराशर या प्रेमात पडलेल्या युवकाची कथा कोणत्याही काळातील युवकाशी जुळणारी होती. एक मध्यमवर्गीय नायक, जो गोंधळलेला आहे; पण प्रामाणिक आहे. त्यांचा हा नायक प्रेक्षकांना आपलासा वाटला. कारण त्याच्यात आणि आजूबाजूला दृष्टीस पडणा-या तरुण प्रेमी मंडळींत फरक जाणवत नाही. नंतरच्या काळात ‘उमराव जान’, ‘नुरी’, ‘लोरी’, ‘बाजार’ अशा अनेक महत्त्वपूर्ण चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. नैसर्गिक सहज सुंदर अभिनय ही त्यांची खासियत होती. त्यांच्या भाषेला असलेली खास उर्दू ढंगाची अदब यामुळे त्यांची संवादफेक कमालीची परिणामकारक व्हायची. मध्यंतराच्या काळात ते चित्रपटांपासून दूर राहिले. बदलत्या चित्रपटसृष्टीत त्यांच्या सारख्या संवेदनशील अभिनेत्याला कामं मिळणं आणि त्यांनीही कामं करणं हे शक्य नव्हतं. फारूख शेख यांनी दूरदर्शनवरही अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘जी, मंत्रीजी’ ही त्यांची मालिका अतिशय लोकप्रिय होती. जयंत कृपलानींच्या प्रशासकीय अधिका-यासोबतचा फारूख यांनी रंगवलेला काहीसा भोळा, काहीसा लबाड नेत्याचा अभिनय अतिशय संस्मरणीय होता. भारतीय राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील कुरघोडींवर आधारित ही मालिका विनोदाच्या माध्यमातून या दोन्हींवर परखड टीका करणारी होती. ‘जीना इसी का नाम है’ ही त्यांची अँकरिंग असलेली मालिकाही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती.
रंगभूमीशी असलेलं नातंही त्यांनी तोडलं नाही. फिरोज अब्बास खान यांच्या ‘तुम्हारी अमृता’ या नाटकात फारूखजींनी शबाना आझमींच्या सोबत पुन्हा एकदा रंगभूमीवरील अभिनयाला सुरुवात केली होती. फारूख शेख हे त्यांच्या शालीन, सभ्य, विनम्र आणि विनोदप्रिय स्वभावासाठी प्रसिद्ध होते. चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेतही त्यांनी अनेक स्मरणीय भूमिका केल्या. 2010 मध्ये आलेल्या ‘लाहोर’ चित्रपटासाठी त्यांना सहायक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी राष्टÑीय पुरस्कारही मिळाला. अलीकडेच ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘क्लब 60’ या चित्रपटांत त्यांनी काम केले होते. ‘लिसन अमाया’ या चित्रपटात त्यांची जोडी पुन्हा एकदा दीप्ती नवल यांच्यासोबत होती. ज्यांच्यासोबत त्यांनी पूर्वी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. सत्तरच्या काळात राजेश खन्नाचा अस्त होत होता आणि अमिताभ नावाचा महानायक जन्माला येत होता त्याच काळात समांतर चित्रपटांच्या माध्यमातून सामान्य लोकांचा चेहरा असलेला, त्यांच्या सुख-दु:खांची प्रामाणिकपणे मांडणी करणारा एक साधासुधा नायक फारूख शेख यांच्या रूपाने चमकत होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील सवंगपणात त्यांचा अभिनय एक हवाहवासा बदल आणि आश्वासक दिलासा होता.