आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनय आपटेंची नकोशी एक्झिट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मित्राची गोष्ट’ हे विजय तेंडुलकरांचं एक महत्त्वाचं नाटक. सत्तरच्या दशकात ‘लेस्बियन’ विषयावरचं हे नाटक आजही अनेकांना धक्कादायक वाटतं. याच नाटकानं विनय आपटे यांनी आपली दिग्दर्शकीय इनिंग सुरू केली. या नाटकाबाबत बोलताना आपटे यांनी एका मुलाखतीत काही विधानं केली होती. ‘आपटे हा माणूस, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता’ समजून घेण्यासाठी ही मुलाखत महत्त्वाची ठरते. नाटकातील ‘आपटे स्कूल’, जी पुढच्या काळात निर्माण झाली त्याची बीजेही याच नाटकातून रुजली. आपटे सांगतात, ‘‘फार कमी नाटककार आहेत, ज्यांना नाटक लिहिण्यापूर्वी ‘दिसतं.’ लिहिणा-याला आपलं लिखाण व्हिज्युअलाइझ करता येतंच असं नाही. तेंडुलकरांचं नाटक तेंडुलकरांना आधी ‘दिसायचं’ हे मला विशेष वाटतं. ‘मित्राची गोष्ट’ वाचलं तर असं लक्षात येईल की, दिग्दर्शकाला ते अनेक गोष्टी संहितेत सांगत असतात. दिग्दर्शकानं ते नाटक कसं बांधावं, कसं करावं, हेच जणू ते सांगत असतात.’’ आपटेंनी तेंडुलकरांचं हे सांगणं केवळ याच नाटकासाठी नाही तर नंतरच्याही त्यांच्या नाटकांसाठी प्रमाण मानलं. त्यामुळे त्यांच्या नाटकांवरची पकड ही सातत्यानं जाणवायची. नाटककाराचा हा हस्तक्षेप जाणीवपूर्वक मान्य करणा-या आपटेंनी त्यांच्या कलाकारांनाही हेच स्वातंत्र्य दिलं. त्यामुळेच त्यांनी ज्यांना आपल्या नाटकांतून पहिली संधी दिली असे अनेक कलाकार त्यांचं हे ऋण मोकळ्ेपणानं मान्य करतात.
आपटेंना त्यांच्या उमेदीच्या काळात तेंडुलकरांसारख्या जबरदस्त नाटककाराचं नाटक आणि पाठिंबा मिळणं ही त्यांच्या पुढच्या कारकीर्दीला वळण देणारी गोष्ट ठरली. तेंडुलकरांचे विषय वेगळे आणि काळाच्या, समाजातील समस्यांना कवटाळणारे असायचे. तेंडुलकरांच्या नाटकापासून आपटेंनी सुरुवात केल्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनाकडे पाहण्याची प्रेक्षकांची दृष्टी बदलली. त्यांच्याबद्दल वेगळ्या आणि गंभीर विषयांची अपेक्षा ठेवण्यात आली. आपटेंच्या एकंदर कारकीर्दीवर नजर टाकली तर या अपेक्षांना आपटेंनी न्याय दिलेला आढळतो. ‘कुसुम मनोहर लेले’ या सामाजिक प्रश्नावर बेतलेल्या, तरीही व्यावसायिक पद्धतीने बांधलेल्या नाटकालाही आपटेंनी आपल्या दिग्दर्शनाने एक वजन दिलं. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’सारख्या नाटकाचं दिग्दर्शन करून ही भूमिका त्यांनी कायम केली.
आपटे हे लौकिकार्थाने प्रेक्षणीय नव्हते, पण ते अस्सल अभिनेते होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी अभिनयाकडे फारसं लक्ष दिलं नाही. नंतर त्यात उतरल्यावर आपल्या अभिनयानं त्यांनी सर्वांनाच प्रभावित केलं. अभिनय काय असतो याचे प्रत्यक्ष धडे त्यांच्या अभिनयाने त्यांच्या सहअभिनेत्यांना, रंगभूमीवर पदार्पण करू इच्छिणा-या कलाकारांना मिळायचे. आवाजाची फेक, मुद्राभिनय, रंगभूमीवरील अवकाशाचा वापर करीत केलेला वावर आणि या सर्वांच्या पलीकडे त्यांच्या देहबोलीतून झळकणारी सहजता प्रेक्षकांना आकर्षित करायची. त्यांचा अभिनय कधीच भूमिकेच्या लांबीवर किंवा रूपरेखेवर अवलंबून नव्हता. ते काम करायला लागले की, त्यांच्यातला ‘विनय आपटे’ नाहीसा व्हायचा आणि तिथे फक्त ते पात्र तेवढं दिसायचं. आपटेंचा अभिनय ही त्यामुळेच जशी जाणत्या रसिकांसाठी ‘फिस्ट’ असायची तशीच सामान्य दर्शकांसाठीही तो काहीतरी ‘धांसू काम’ बघितल्याचा आनंद देणारा असायचा.
‘गणरंग नाट्यसंस्थे’च्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली. मराठीत ‘डेली सोप’चा फॉर्म्युला रुजवण्याचं श्रेय आपटेंना जसं जातं तसंच अनेक गुणवान कलाकारांना पुढे आणण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. महेश मांजरेकर, सुनील बर्वे, अतुल परचुरे, श्रीरंग गोडबोले यांना पहिला ब्रेक देतानाच त्यांना रंगभूमीच्या बाहेरही मदत करण्यात त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. नव्या कल्पना रुजवण्याची त्यांची नेहमी तयारी असल्यानं इतरांच्या अशा प्रयोगांना ते पाठिंबा द्यायचे. त्यामुळेच सचिन खेडेकर, सुनील बर्वे, सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्यासारखे कलाकार जेव्हा आपटेंना आपला ‘गॉडफादर किंवा गुरू’ मानतात तेव्हा ती आपटेंच्या एकूण रंगभूमीवरच्या वास्तव्याला दिलेली दाद असते. या अभिनेत्याचं वयाच्या बासष्टाव्या वर्षी निधन होणं हे अनेकांना धक्कादायक आहे. गेली काही वर्षे ते दम्याच्या आजारानं त्रस्त होते. त्यांना हृदयविकार आणि कमी रक्तदाबाचाही त्रास होता. वैद्यकीय कारणांसाठी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. विविध मालिकांमधील शूटिंंग्ज आणि नाट्य परिषदेच्या निवडणुका यांचं कारण देत त्यांनी विश्रांतीऐवजी कामाला महत्त्व दिलं. पण त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारी अनेक माणसं मग ती कोणत्याही क्षेत्रांतली असो, आपल्या आरोग्याकडे कळत-नकळत दुर्लक्ष करतात. आपटे दुर्दैवानं याला अपवाद ठरले नाहीत. आपटेंच्या अकाली आणि अकस्मात जाण्यानं ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली. त्या अर्थाने त्यांचा अभिनय हा जसा अनेकांना आदर्श होता त्याचप्रमाणे त्यांची ही ‘एक्झिट’देखील अनेकांसाठी धडा ठरू शकेल.