आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prerana Mayekar Article About Valentine Day, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅलेंटाइन रोड - दुर्दैवी प्रेमाची कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘व्हॅलेंटाइन रोड’ हा मार्ता कनिंगहॅम यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट. 2008मध्ये झालेल्या ऑक्सनार्ड-कॅलिफच्या लॉरेन्स किंग या कुमारवयीन मुलाच्या क्रूर हत्येची हृदयद्रावक कहाणी तो सांगतो. लॉरेन्स किंग व ब्रँडन मॅकइल्नरी वर्गमित्र होते. किंग दहा वर्षांचा असल्यापासून मुलींसारखे राहायला, वावरायला लागला होता. तो युनिफॉर्मच्या आत मुलींचे कपडे घालत असे. मुलींसारखे कानातले घालणे, केशरचना, मेकअप, उंच टाचांचे बूट घालणे असे मुलांना न साजेसे त्याचे वर्तन असे. फेब्रुवारी 2008 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या काही दिवस आधी किंग याने ब्रँडन मॅकइल्नरीला ‘तू माझा व्हॅलेंटाइन होशील का?’ असे विचारले. किंगच्या या वागण्याने अपमानित झालेला मॅकइल्नरी बिथरला. काही दिवसांनी मॅकइल्नरी पिस्तूल घेऊन शाळेत आला व गोळ्या झाडून त्याने किंगला मारलं. 14 वर्षीय मॅकइल्नरीला प्रौढ मानून अटक झाली व 21 वर्षांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली.

वरवर एक नेहमीचं हत्या प्रकरण, अशीच ही घटना वाटू शकली असती; पण ते तसं नव्हतं. यात अनेक गोष्टी होत्या व त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या होत्या. नेमक्या याच कारणांमुळे मार्ता यांनी या विषयावर माहितीपट बनवण्याचा निर्णय घेतला. मार्ता यांचा दिग्दर्शन क्षेत्रातला हा पहिलाच प्रयत्न. या माहितीपटासाठी त्यांनी चार वर्षे संशोधन केले. त्यांनी लॉरेन्स किंगच्या काही मित्र-मैत्रिणींच्या तसेच मॅकइल्नरीच्या कुटुंबीयांच्या मुलाखती घेतल्या. कनिंगहॅम जेव्हा या फिल्मच्या निमित्ताने घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या-वर्गात त्या वेळी हजर असलेल्या कुमारवयीन मुलांना भेटल्या, तेव्हा कोणीही या घटनेविषयी बोलायला तयार नव्हते; पण मार्ताने हार मानली नाही. शक्य तितक्या पद्धतींनी या घटनेमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराची सामाजिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे असते. किंग व मॅकइल्नरी या दोघांचेही बालपण कौटुंबिक समस्याग्रस्त घरांमध्ये गेले होते. हत्या झाली त्या वेळी किंग ग्रुप होममध्ये राहत होता. कारण त्याला दत्तक घेतलेल्या पालकांनी त्याला घराबाहेर काढले होते. तर मॅकइल्नरीवर हिंसेचा, श्वेत असण्याचा प्रभाव होता.

या हत्याकांडातल्या काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे. किंग मुलगा असला तरी त्याला मुलींसारखं वर्तन करायची इच्छा होती. त्यातूनच आपला एक प्रियकर असावा, ही भावना त्याच्या मनात उपजली आणि व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने त्याने मॅकइल्नरीवरचं आपलं प्रेम प्रकट केलं. एका मुलानं सर्वांदेखत आपल्यावर प्रेम करावं आणि त्यातही जो काळा मुलगा आहे, हे मॅकइल्नरीला सहन झालं नाही. त्याची परिणती किंगचा खून करण्यात झाली. यात लॉरेन्स किंगचा गुन्हा काय? त्याला मुलींसारखे राहावेसे वाटले- जे नैसर्गिक होते- त्यासाठी त्याचा खून करण्यात आला? त्याला लैंगिक अभिव्यक्तीचा हक्क नाही का? मुले जेव्हा वयात येऊ लागतात तेव्हा स्वत:ची लैंगिक ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या मुलाला जर मुलीसारखे वर्तन करावेसे वाटले वा एखाद्या मुलीला जर मुलासारखे वर्तन करावेसे वाटले तर त्यात अनैसर्गिक, घाणेरडे काही नाही. आपण पालक म्हणून त्यांना समजून घेतले पाहिजे. आकडेवारी असे सांगते की, मुले स्वत:च्या वयापेक्षा लवकर लवकर मोठी होत आहेत. त्यामुळे लैंगिकतेविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात वादळ उठवत असतात. अशा वेळी शिक्षक म्हणून, पालक म्हणून आपण या समस्या कशा पद्धतीने हाताळाव्यात, या विषयी हा माहितीपट मार्गदर्शक ठरतो. त्याच वेळी लहान वयात आपल्या भावनांचं सार्वजनिक प्रदर्शन मांडलं तर त्याचे काय अनिष्ट परिणाम होऊ शकतात, याचंही हे उदाहरण आहे. प्रेमाचं किंवा अशाच सहजसुंदर भावनांचं जे व्यापारीकरण होत आहे, त्याचा एकूण समाजावरच मोठा परिणाम होत असतो. ही तर मुलंच. त्यांना या संकटातून वाचवण्याची गरज आहे. त्यामुळेच ‘व्हॅलेंटाइन रोड’ शाळा-शाळांमध्ये प्रशिक्षण साहित्य म्हणून दाखवली जावी व मुलांमध्ये तसेच शिक्षकांमध्येही याविषयी जाणीव जागृती व्हावी, अशी कनिंगहॅम यांना अपेक्षा आहे.

ही घटना परदेशातली असली तरी भारतीय संदर्भातील तिचे महत्त्व कमी होत नाही. अलीकडच्या काळात लैंगिक वर्तनांबाबत आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. मुलांच्या लहानपणावर परिणाम करणार्‍या घटकांमध्ये त्यांची कौटुंबिक स्थिती मोलाची भूमिका बजावत असते आणि याला भारतीय मुलेही अपवाद नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यामागची मानसिकता जाणीवपूर्वक समजून घेऊन जबाबदार वर्तन करण्याविषयी हा माहितीपट नक्कीच मार्गदर्शक आहे. मुलांच्या लैंगिक अभिव्यक्तीविषयी त्यांना दूषणे न देता त्यांचा सहजतेने स्वीकार करण्याची मानसिकता समाजात प्रस्थापित होत नाही, तोवर अशा प्रकारचे गुन्हे होतच राहणार. हिंसेचे हे चक्र कुठे तरी थांबलेच पाहिजे. नाही तर त्याला अंत नाही.
(mayekarpr@gmail.com)