आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Presence Of Indian Actors And Actress Increasing In Caan's Film Festival

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कान्स महोत्सवातील भारतीय कलाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात आयोजित केल्या जाणा-या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कान्स चित्रपट महोत्सवाचे एक वेगळे स्थान आहे. या महोत्सवात चित्रपट प्रदर्शनाकडे मोठ्या आदराने पाहिले जाते, त्यामुळे या महोत्सवाचे आमंत्रण मिळणे ही आनंददायक बाब असते. त्यामुळेच 2002 मध्ये ऐश्वर्या रायला जेव्हा कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटसाठी आमंत्रित करण्यात आले, तेव्हा ती सगळ्यात मोठी बातमी ठरली होती. गेली 11 वर्षे ऐश्वर्या कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावत आहे. गेल्या काही वर्षांपासून मल्लिका शेरावतही कान्स चित्रपट महोत्सवात वेगवेगळे रूप दाखवत आहे. दोन वर्षांपूर्वी अजगर खांद्यावर खेळवत आणि त्याचे चुंबन घेत तिने रेड कार्पेट एंट्री घेतली होती. ऐश्वर्यासह मल्लिकाही आता कान्स चित्रपट महोत्सवाची नेहमीची सेलिब्रिटी झाली आहे.
चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन करून आंतरराष्ट्रीय व्यवसाय करण्याचा विचार असतो. त्यामुळे या महोत्सवासाठी चित्रपटाची निवड व्हावी यासाठी भारतीय निर्माते प्रयत्न करत असतात. यंदाच्या कान्स महोत्सवात अनुराग कश्यपच्या ‘गँग आॅफ वास्सेपुर’, असीम अहलुवालियांचा ‘मिस लव्हली’ आणि उदय शंकर यांच्या ‘कल्पना’ चित्रपटासह मराठी चित्रपट ‘खालती डोकं वरती पाय’चाही समावेश करण्यात आला होता. परंतु भारतीय चित्रपट गोरे समीक्षक गंभीरतेने पाहत नाहीत आणि त्यांची विशेष चर्चाही होत नाही. फक्त स्वत:च्या संतुष्टीसाठी आणि भारतीय मीडियात चर्चा होण्यासाठी अशा चित्रपट महोत्सवांचा उपयोग भारतीय निर्माते करून घेतात. अर्थात, हा एक वेगळा विषय आहे. आपण आज भारतीय कलाकारांच्या वाढत्या राबत्याबद्दल चर्चा करू.
कान्स महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी ‘स्लमडॉग मिलेनियर’ प्रसिद्ध नायिका फ्रीडा पिंटोला आमंत्रित करण्यात आले होते. तिच्यासह यंदा ऐश्वर्या, सोनम कपूर, कल्की कोहलीन, माजी मिस इंडिया निहारिका सिंह आपल्या ‘मिस लव्हली’ चित्रपटाच्या निमित्ताने आणि मल्लिका शेरावत चित्रपट महोत्सवाला उपस्थित होत्या. ऐश्वर्या राय बच्चन लॉरियल या ब्रँडची सदिच्छा दूत असल्याने तिला नेहमी आमंत्रित केले जाते. यंदा तिने एड्सग्रस्तांसाठी आयोजित भोजन समारंभात भाग घेऊन त्यांच्यासाठी पैसे गोळा करण्याचे काम केले. सलग दुस-यांदा सोनम कपूर आपल्या ‘चोपार्ड ब्रँड’च्या ब्रँडिंगसाठी कान्समध्ये पोहोचली होती, तर अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेरलाही यंदा प्रथमच आमंत्रित करण्यात आले होते. शिवास रिगलचे सदिच्छा दूत असल्याने त्यांना हा मान मिळाला होता.
कान्सला जाण्यापूर्वीपासूनच हे कलाकार भारतीय मीडियात आपला उदोउदो करण्यास सुरुवात करतात. कोणते कपडे घालणार इथपासून ते तिथे जाऊन काय-काय करणार, याची माहिती मीडियाला पुरवली जाते. खरे तर त्याला काहीही अर्थ नसतो. फक्त गुळगुळीत कागदावर बातम्या छापून येण्याएवढेच त्याचे तसूभर महत्त्व असते. रेड कार्पेटवर भारतीय कलाकारांनी कोणते कपडे घातले आहेत याची जास्त चर्चा होते ती फक्त भारतीयांमध्येच आणि या भारतीयांना आपल्या ब्रँडकडे आकर्षित करण्यासाठीच विदेशी कंपन्या भारतीय कलाकारांचा वापर करून घेतात.
परदेशातील अनिवासी भारतीयांत बॉलीवूड कलाकारांची प्रचंड क्रेझ असते, हे अनुभवलेले आहे. मोठे कलाकार तर सोडा, बोमन इराणीसारख्या कलाकाराचेही प्रचंड फॅन परदेशात आढळून आलेले आहेत. या लोकांमुळेच परदेशात बॉलीवूडचे पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. प्रचंड महागडी तिकिटे घेऊन हे अनिवासी भारतीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला गर्दी करतात. अनिवासी भारतीयांचे हे वेडच भारतीय कलाकारांचा राबता वाढण्यामागचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. रेड कार्पेटजवळ जी गर्दी असते ती भारतीयांचीच असते. आपला महोत्सव वा उत्पादने भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बॉलीवूड कलाकारांपेक्षा दुसरा सोपा आणि स्वस्त उपाय नसल्यानेच भारतीय कलाकारांना मोठ्या प्रमाणावर आमंत्रित केले जाते. त्यामुळे कान्समध्ये भारतीय कलाकारांचा राबता वाढल्याचा आनंद असला तरी त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही, असे वाटते.