आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार संधींमधील सद्य:स्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘असोचेम’ म्हणजेच असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे देशांतर्गत नव्यानेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सद्य:स्थितीत विविध उद्योग आणि महानगरांमध्ये उपलब्ध असणा-या वा नजीकच्या काळात उपलब्ध होऊ घातलेल्या रोजगार संधींचा जो ऊहापोह करण्यात आला आहे तो अनेक कारणांनी विचारशील आणि चिंतनीय ठरला आहे.


या सर्वेक्षणात रोजगार संधींच्या संदर्भात प्रामुख्याने आढळून आलेली बाब म्हणजे पुणे आणि परिसरातील उद्योगांमधील रोजगार संधींमध्ये सुमारे 17%नी घट झाली असून रोजगार संधींमध्ये सर्वाधिक वाढ ही राजधानी क्षेत्र दिल्ली महानगर परिसरात झाली असून या सर्वाधिक वाढीची टक्केवारी 27% आहे. महानगरांमधील वाढीव रोजगार संधींच्या संदर्भात सांगायचे झाल्यास सर्वाधिक रोजगारवाढीची टक्केवारी कोलकाता येथे 19% असून बंगळुरूमधील रोजगार संधींची वाढीव टक्केवारी अवघ्या 8%वर स्थिरावली आहे. याउलट रोजगारांमधील अंदाजे होणारी सर्वाधिक घट मुंबईमध्ये 28%, चेन्नई येथे 21%, तर हैदराबाद येथे 5% नोंदवण्यात आली आहे. द्वितीय श्रेणीच्या महानगरांमधील रोजगार संधींमधील अनुमानित घट सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार सुरत 38%, इंदूर 23%, पुणे 17%, तर भोपाळ येथे 12% याप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.


‘असोचेम’चे हे सर्वेक्षण एप्रिल, जून 2013 या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत करण्यात आले असून या सर्वेक्षण प्रकल्पाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय स्तरावर विविध उद्योगक्षेत्र आणि महानगरांमधील प्रचलित रोजगार स्थितीचे आकलन करणे हा होता. उद्योगांच्या प्रस्तावित रोजगार संधींच्या संदर्भात या सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट झालेली प्रमुख बाब म्हणजे औद्योगिक स्तरावरील प्रचलित परिस्थितीत संगणक, संगणक सेवा उद्योगांमधील रोजगारांबाबत प्रामुख्याने चिंतेची स्थिती असून त्याउलट बांधकाम व मूलभूत सेवा-सुविधा, उत्पादन क्षेत्र, रिटेल, वाहन उद्योग या क्षेत्रातील मंदीचा विपरीत फटका या क्षेत्रातील रोजगारांचे प्रमाण आणि संधींनाही बसला आहे. सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झालेली अन्य आश्चर्याची बाब म्हणजे सद्य:स्थितीत उद्योगनिहाय रोजगार संधींमध्ये सर्वाधिक वाढ ही शिक्षण क्षेत्रात असून त्याची टक्केवारी 14% असून त्याखालोखाल बँका, वित्तीय सेवा व विमा क्षेत्रातील रोजगारातील वाढीचे प्रमाण 6% असे नमूद करण्यात आले आहे.


नोकरी, रोजगाराच्या या बदलत्या आणि ढासळत्या संख्या आणि टक्केवारीमागे अमेरिका व इंग्लंडमध्ये अद्यापही स्थिरावलेली मंदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणावर झालेली घसरण ही कारणे प्रामुख्याने पुढे आली असून सर्वेक्षणानुसार त्याला जोड मिळाली आहे ती मोठ्या संख्येत अपूर्णावस्थेत राहिलेल्या प्रकल्पांची. 1999च्या महामंदीनंतर आर्थिक क्षेत्रात मोठी जोखीम उठवणा-यांची संख्या आणि प्रमाण आता जवळजवळ नगण्य झाले आहे. त्यालाच जोड मिळाली आहे ती औद्योगिक क्षेत्रातील अपुरा व नगण्य स्वरूपातील फायदा व वाढता आर्थिक तोटा आणि नुकसानीची. या दुहेरी संकटामुळे उद्योग आणि उद्योजक नव्या गुंतवणुकीच्या संदर्भात पुरेसे धास्तावलेले आहेत.


पुणे आणि परिसरातील औद्योगिक सद्य:स्थिती व रोजगाराच्या संदर्भात ‘असोचेम’च्या या सर्वेक्षणात दोन महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार पुण्यातील संगणक, सेवा क्षेत्राला सध्या विकासाच्या संदर्भात पूरक स्थिती निर्माण झाली असली तरी वाहन उद्योगाला बसलेल्या व्यावसायिक फटक्याचा परिणाम या उद्योगावर अपरिहार्यपणे झाला आहे. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुणे, चाकण, परिसरात परंपरागत स्वरूपात वाहन निर्मिती व्यवसाय मोठ्या संख्येत प्रस्थापित झाले असून वाहन व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाल्यास त्याचा अपरिहार्य परिणाम पुण्यातील वाहन उद्योगाला पूरक व्यवसायावर होतोच होतो. त्यामुळे पुणे आणि परिसरातील वाहन उद्योगाला सुटे भाग पुरवणा-या उद्योगात गेल्या सुमारे 2 वर्षांपासून एकीकडे नवे रोजगार थंडावले असतानाच कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे प्रमाण कायमच राहिले आहे. परिणामी पुणे आणि परिसरातील रोजगार संधींमध्ये मोठीच घसरण झाली आहे.


सद्य:स्थितीतील नोकरी, उद्योगातील रोजगार संधींवर आधारित या सर्वेक्षणाच्या संदर्भात ‘असोचेम’द्वारे जी टिप्पणी प्रकाशित करण्यात आली आहे त्यानुसार 1913-14 या आर्थिक वर्षातील एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत सुमारे 1,25,500 नव्या रोजगारांची निर्मिती झाली होती, तर गेल्यावर्षीच्या पहिल्या आर्थिक तिमाहीत 1,27,700 नवे रोजगार निर्माण झाले होते. टक्केवारीच्या संदर्भात हे प्रमाण 2% नी कमी झाले असले तरी एकूण आर्थिक औद्योगिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती चिंताजनक आहे.