आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prof H M Desarda Article About Sleet Storm, Divya Marathi

गारपिटीमुळे हवामान बदलावर दृष्टिक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी-मार्च महिन्यात महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांत जो अवकाळी पाऊ स व गारपीट झाली, त्याने शेती व शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले. छोट्या क्षेत्रात तुरळक स्वरूपाची गारपीट ही काही नवलाईची बाब खचीतच नाही. तथापि, राज्याच्या 28 जिल्ह्यांत लागोपाठ दोन-तीन आठवडे गारपीट ही बाब नक्कीच अभूतपूर्व म्हणावी लागेल. 200 हून अधिक तालुक्यांतील तब्बल पंधरा हजार गावांना याचा तीव्र फटका बसला. उण्यापुर्‍या वीस लाख हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, इत्यादी पिके तसेच द्राक्ष, आंबा, डाळिंब, मोसंबी, आदी फळबागा, भाजीपाला बरबाद झाला. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली. 30 माणसे, लहान-मोठी दोन हजार जनावरे दगावली. बरीच जखमी झाली. विविध अंदाजांनुसार जवळपास वीस हजार कोटी रुपयांची वित्तहानी झाली. याचा धक्का किती जबरदस्त आहे, याची कल्पना या गावातील रानाची, गुराढोरांची, माणसांची स्थिती प्रत्यक्ष बघितल्याखेरीज लक्षात येण्याची सुतराम शक्यता नाही.
राज्य सरकारने उणेपुरे पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत व विशेषत: आचारसंहितेची आडकाठी येऊ नये म्हणून निवडणूक आयोगाची परवानगी मिळवली. मात्र, नोकरशाही मानवी संवेदनेने वागेल तसेच शेतकर्‍यांपर्यंत मदत त्वरित व पूर्णपणे मिळेल, अशी अपेक्षा करणे अवघड आहे. पंचनामे जारी आहेत. झारीतील शुक्राचार्य व टाळूवरचे लोणी खाण्यास चटावलेले, निर्ढावलेले अधिकारी-कर्मचारी काही वेगळे वागतील असे चित्र दिसत नाही.

उपरोल्लिखित पार्श्वभूमी व परिप्रेक्ष्य समोर ठेवून अवर्षण, अतिवृष्टी, पूर, अनपेक्षित हिमवृष्टी, ढगफुटी, सुनामी, भूकंप, वादळे आदी घटनांचा विचार केल्यास काय जाणवते? शास्त्रज्ञांची याबाबत काय कारणमीमांसा आहे? असे प्रश्न पडणे साहजिकच आहे. एक बाब तर स्पष्ट आहे की, ऋतुचक्रात मोठा बदल, म्हटले तर बिघाड जाणवतो. अन्यथा ज्या घटना अगदी तुरळक व अपवादात्मक स्वरूपाच्या होत्या त्यांची वारंवारिता व व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

याचे मूळ व मुख्य कारण जागतिक तापमानात होत असलेली वाढ हे आहे. टोकाचे थंड व उष्ण तापमान. उत्तर अमेरिकेत उणे (-) 50 डिग्री सेल्सियस, तर ऑस्ट्रेलियात 50 डिग्री तापमान असते! दीड ते दोन डिग्रीने तापमान वाढल्याने हे घडत आहे. 450 कोटी वर्षांचे आयुर्मान असलेल्या आपल्या पृथ्वी ग्रहात दोन-तीन शतकांत तापमानात एवढ्या प्रमाणात कधीच वाढ झालेली नव्हती, ही बाब विसरता कामा नये!

रासायनिक व औद्यागिक शेतीमुळे शेतकरी गोत्यात आला असून कर्जबाजारी झाला आहे, हे त्याच्या सर्व समस्यांचे खरे कारण आहे.
या सर्व चुकीच्या वाढ विस्तारवादी, सामाजिक-आर्थिक, राजकीय धोरणांमुळे लक्षणीय स्वरूपाचा हवामान बदल झाला. (क्लायमेट चेंज) आणि कमालीच्या अवकाळी घटना (एक्स्ट्रिम इव्हेंट) घडत आहेत. त्याचाच परिणाम सध्याची गारपीट हा भाग होय. दिवसेंदिवस या अवकाळी घटनांची व्याप्ती व तीव्रता वाढणार, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

उत्तरोत्तर वेगाने ओढवणार्‍या या आकस्मिक घटना व अवकाळी उत्पाताचे निराकरण करण्यासाठी अंतर्मुख होऊ न आपली जीवनशैली बदलणे हे तर मुख्य आव्हान आहेच. त्याकडे पाठ फिरवून आपणास संकटाच्या या गर्तेतून कदापि बाहेर पडता येणार नाही, ही बाब कोणाही सुबुद्ध व विवेकी माणसाला नाकारता येणार नाही. किंबहुना, ते आजचे ढळढळीत वास्तव आहे.

शेतकर्‍यांचे उदाहरण घेतले, तर त्यांच्यासारख्या जीवनावश्यक बाबींचे उत्पादन करणार्‍यांना माफक दराने पीक विमा अगर चरितार्थ हमीचे कोणतेही संरक्षण नाही. भारतातील उद्योगपतींना गत 10 वर्षांत दरवर्षी चार ते पाच लाख कोटी रुपयांची करात सूट व सवलत दिली गेली. मात्र, शेतकर्‍याला 60-70 हजार कोटी एकदा माफ केले, त्याची इतकी टिंगल केली गेली, विचारता सोय नाही. रोजगार हमी, अन्न सुरक्षा याचाही बोलबाला खूप होत असला, तरी 30 कोटी उपाशी पोटी झोपणार्‍या जनतेला, अर्धपोटी, कुपोषित वंचित विस्थापितांना त्याचा फारसा उपयोग नाही. या अस्मानी-सुलतानी विळख्यातून आपली केव्हा सुटका होणार?

हे सर्व वास्तव लक्षात घेऊन ‘अस्मानी’ संकटाची ही सुलतानी बाजू नीट समजावून घेऊन समतावादी शाश्वत विकासाचा मार्ग अखत्यार करण्याखेरीज तरणोपाय नाही.
(लेखक महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाचे माजी सदस्य आहेत)