आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prof Shravan Devare Article About Comrade Sharad Patil, Divya Marathi

जातिअंताचे पुरस्कर्ते शरद पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय दरारा, जातीय (सरंजामी) दरारा, आर्थिक दरारा असे अनेक दरारा असलेले नेते गल्लोगल्ली पायलीचे पंधरा सापडतात. परंतु वैचारिक-तात्त्विक दरारा असलेली व्यक्ती युगात एखादीच असते. मोजकेच राजकीय पक्ष घेऊन देशाच्या राजकारणाला व तत्त्वकारणाला जातिअंताचे क्रांतिकारक वळण देण्याची जबरदस्त इच्छाशक्ती बाळगणारा स्वातंत्र्योत्तर (सत्तरीनंतरच्या) काळातील एकमेव महापुरुष शपा होय! सत्यशोधक मार्क्सवादी मासिकातील काही अंक नुसते चाळले तरी या वैचारिक-तात्त्विक दरार्‍याची कल्पना येते.

माणसं राजकीय व सामाजिक जीवनात जेवढी मोठी असतात तेवढीच ती व्यक्तिगत जीवनात लहान व संकुचितही असतात. याला कधी काळाच्या मर्यादा म्हटल्या जातात, तर भारतीय संदर्भात या जातीय मर्यादाही असू शकतात; परंतु त्यांच्या या मर्यादा कोणत्या काळात किती प्राधान्याने मांडाव्यात, याचेही भान असले पाहिजे. बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या स्वभावाचे भांडवल करून त्यांच्यापासून व चळवळीपासून लांब गेली होती. त्यांच्या वैचारिक दरार्‍याने आकर्षित झालेले कार्यकर्ते त्यांच्या स्वभावाच्या दरार्‍याने जेव्हा पळून जाण्याची भाषा करीत तेव्हा ते म्हणतं, ‘‘या चळवळीत तुम्ही क्रांती करण्यासाठी आला आहात की माझे सौंदर्य बघण्यासाठी आला आहात?’’ , असाच एक आरोप- ‘‘तुम्ही फार बोजड लिहिता, समजायला फार कठीण, भलेभले विचारवंतही हतबल होतात.’’ त्यावर ते म्हणतात- ‘इतिहास, भूगोल हे विषय सोपे असतात, सायन्स कठीण! फिजिक्स, केमिस्ट्रीची पुस्तकं इतिहास-भूगोलच्या परिभाषेत कशी लिहिणार?’ असे अनेक व्यक्तिगत व कौटुंबिक प्रसंग सांगायचे म्हणजे अनेक खंडी कादंबरी लिहू शकणारा नव्या युगाचा नेमाडेच जन्मावा लागेल. यातील काही प्रसंग शपांची उंची वाढविणारे आहेत, तर बरेचसे प्रसंग शपांची खरी उंची दाखविणारे आहेत; परंतु हा विषय नाही.

एक कार्यकर्ता म्हणून मला भावलेल्या त्यांच्या काही क्रांतिकारक सिद्धांतांची मला येथे चर्चा करायची आहे. हे सिद्धांत त्यांनीच प्रथमत: मांडले आहेत असे नाही तर आधीच्या महापुरुषांनी मांडलेल्या काही क्रांतिकारक सिद्धांतांना 180 डिग्रीमध्ये वळवून त्यांना पायावर उभे करण्याचे काम शपांनी केले आहे. याचे श्रेय ते त्यांच्या बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीला देतात. ही अर्थातच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात केवळ नवी भर नाही तर नवे क्रांतिकारक वळण होय. जातिअंताच्या प्रश्नाला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत उच्चतर स्थानावर नेऊन बसविणे, हे तसे सोपे काम नव्हते. आज काही विचारकांना ते सोपे वाटते. हे विचारवंत भारतीय जातिव्यवस्थेची पाळंमुळं शोधण्यासाठी आवश्यक असलेला प्राच्यविद्येचा कोणताही अभ्यास करण्याची तसदी न घेता, मार्क्सवादाचा ढोबळ वापर करून जातिअंताचे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतात व फसतात. त्यामुळे आपल्याच लोकांनी उभे केलेल्या प्रश्नांना ‘फेस’ करताना त्यांच्या तोंडालाच फेस येतो.

मार्क्सने ज्या प्रमाणे हेगेल व फायरबाखच्या तत्त्वज्ञानाला विकसित करून एक नवेच क्रांतिकारक तत्त्वज्ञान निर्माण केले, त्याप्रमाणे कॉ. शरद पाटील यांनी मार्क्स, फुले, आंबेडकर यांची खिचडी तयार केली आहे, असे कुचेष्टेने म्हटले जात होते. त्यांच्या ‘वर्गजातस्त्रीदास्यअंतक’ तत्त्वज्ञानाचे खरे नाव ‘सौत्रांतिक मार्क्सवाद’ असे होते. तथापि त्यांनी त्याचे व्यावहारीकरण (सोपेकरण नव्हे) करण्यासाठी ‘मार्क्सवाद फुलेआंबेडकरवाद’ असे तात्पुरते नामकरण केले होते. फुले-आंबेडकरांचे नाव घेतले म्हणजे जातिअंताची क्रांती करणारी दलित-ओबीसी फौज स्वनिर्मित नवे तत्त्वज्ञान घेऊन क्रांती करेल असा त्यांचा अंदाज होता. ‘माफुआ’चे धोरण घेऊन जातिअंताचे सैन्य उभारण्यात त्यांना किती यश आले हे आपण पाहतच आहोत; परंतु त्यात त्यांना यश प्राप्त झाले असते तरी त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचे नामांतर ठरावीक काळानंतर ‘सौत्रांतिक मार्क्सवाद’ असे केलेच असते, जे त्यांनी ठरवल्याप्रमाणे केलेलेच आहे.

‘माफुआ’ नामांतरित सौत्रांतिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान अजून प्रत्यक्ष संघटन व संघर्षाच्या पातळीवर प्रभावी ठरलेले नसले तरी त्याने निर्माण केलेल्या किंवा वापरात आणलेल्या शब्द-संकल्पना आज चळवळीवर प्रभाव गाजवत आहेत. ‘माफुआ’, ‘वर्गजातस्त्रीदास्यअंत’, ‘ब्राह्मणी-अब्राह्मणी’, ‘संगिती’ आदी शब्द शपांची टिंगलटवाळी करण्यासाठी सर्रास वापरले जात होते, आता या संकल्पना चळवळीत गंभीरपणे वापरल्या जात आहेत. ही यशाची पहिली पायरी मानली पाहिजे. आज ‘परिवर्तनाचा वाटसरू’ सारख्या वैचारिक-तात्त्विक मान्यताप्राप्त मासिकाने शपांवर विशेषांक काढावा, हा केवळ शपांचा गौरव नव्हे, तर त्यांनी मांडलेल्या सौत्रांतिक मार्क्सवादाचाही गौरव आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात जातिव्यवस्थेचा प्रश्न अधिकच तीव्र होत असताना त्याची दखल क्रांतिकारक म्हणविणार्‍या मार्क्सवाद्यांनी व समाजवाद्यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. त्यामुळे जातिअंताचे लढे जात संघटनांच्या बॅनरखाली लढले जाऊ लागले. रिडल्स, नामांतर, मंडल आयोग ही त्याची उदाहरणे होत. त्यामुळे जातसंघटनांना पुरोगामित्व लाभत गेले व त्यांचे उदात्तीकरण होऊ लागले. हे लढे जातिअंतक म्हणून क्रांतिकारक असूनही सत्ताधार्‍यांना लाभदायक ठरत होते. या लढ्यांतून निर्माण झालेले नेतृत्व प्रस्थापित-सत्ताधार्‍यांशी संघर्ष करीत मोठे झालेले दिसत असले तरी ते प्रत्यक्षात सत्ताधार्‍यांनीच ‘लाँच’ केलेले नेतृत्व होते की काय अशी शंका घ्यायला जागा राहते. कारण हे नेतृत्व सहज व बेमालूमपणे प्रतिक्रांतिकारकांच्या छावणीत जाते आणि मजेची गोष्ट म्हणजे ते प्रतिक्रांतिकारकांच्या छावणीत असूनही त्यांच्या कपाळावरचा पुरोगामित्वाचा शिक्का पुसण्याची कोणी हिंमत करू शकत नाही. कधी पुलोआ, तर कधी डालोआच्या नावाने डावे या नेत्यांशी युती करण्यासाठी उत्सुक असतात.

मंडल आयोगाचा लढा तर जातिव्यवस्थेच्या पेकाटात निर्णायकपणे लाथ हाणणारा लढा होता. आजही तो तेवढ्याच क्रांतिकारक मार्गाने लढला जाऊ शकतो. या लढ्याचे क्रांतिकारक पोटेन्शियल पाहता सर्वच प्रतिक्रांतिकारक पक्ष-संघटनांनी 1985 पासूनच आपापले ‘ओबीसी नेते’ लाँच करायला सुरुवात केली. ज्या पक्षांकडे लाँच करण्यासाठी ओबीसी नेते नव्हते त्यांनी मंडल आयोग लागू होताच दुसर्‍या पक्षाकडून ते आयात केले. प्रत्येक जातीलढ्याचा लाभ अंतिमत: प्रस्थापित छावणीलाच का होतो, याचे आत्मपरीक्षण करण्याची तसदी डाव्यांनी कधीच घेतली नाही व आजही ते घेत नाहीत. जातीचा प्रश्न सत्तरीनंतर तीव्र व्हायला लागला. नेमका याच काळापासून शपांचा ‘वर्गजातस्त्रीदास्यअंतक’, ‘माफुआ’ आकार घेत होता. हा काही योगायोग नव्हता, काळाची गरज म्हणून ती काळाचीच निपज होती, एवढेही डायलेक्टिक्स-ज्ञान भारतीय मार्क्सवाद्यांकडे नसेल तर ते कसली क्रांती येथे करणार आहेत? विशेष महत्त्वाची बाब ही की, कट्टर वर्गीय सनातनवाद जोपासणार्‍या सीपीएमच्या गर्भातच हे जातिअंताचे तत्त्वज्ञान जन्म घेत होते. सीपीएमने त्याचे नैसर्गिक बाळंतपण नाकारल्यामुळे ‘माफुआ’ला पोट फाडूनच बाहेर यावे लागले. कालचे हे अर्भक आज सौत्रांतिक मार्क्सवादाच्या रूपाने तरणेताठे झाले आहे, जातिव्यवस्थेचा प्रश्न जसजसा तीव्र होत जाईल, तसतसा या तत्त्वज्ञानाला मान्यता मिळत जाईल.

माझ्या दृष्टीने संघर्षाच्या व्यावहारिक पातळीवरचा ‘माफुआ’चा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत हा - ‘वर्गीय संघटनांच्या माध्यमातूनच जातीलढा’! असा आहे. पद्मभूषण कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जातीय पायावरच्या वर्गीय लढ्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वर्गीय पायावरच्या जातिलढ्याचाच पर्याय शिल्लक होता, जो शपांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडलेला होता.