Home | Magazine | Pratima | public-relation-lobing-industory-nira-radiya

नीरा राडिया : जनसंपर्क, लॉबिंग क्षेत्रातील ‘हायफाय लेडी’चा अस्त..

प्रसाद केरकर | Update - Nov 05, 2011, 02:03 AM IST

अलीकडेच टू जी संदर्भात गाजलेल्या टेप प्रकरणात लोकांसमोर आलेल्या नीरा राडिया या जनसंपर्क व लॉबिंग क्षेत्रातील ‘हायफाय लेडी’ने आपल्या चार कंपन्या बंद करण्याची घोषणा दिवाळी आटोपल्यावर केल्याने त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या अस्त झाला आहे.

  • public-relation-lobing-industory-nira-radiya

    अलीकडेच टू जी संदर्भात गाजलेल्या टेप प्रकरणात लोकांसमोर आलेल्या नीरा राडिया या जनसंपर्क व लॉबिंग क्षेत्रातील ‘हायफाय लेडी’ने आपल्या चार कंपन्या बंद करण्याची घोषणा दिवाळी आटोपल्यावर केल्याने त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या अस्त झाला आहे. राडिया यांनी दिवाळीनंतर म्हणजे 31 ऑक्टेबरला ही घोषणा केली. खरे तर दुस-याच दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरला त्यांनी स्थापन केलेली जनसंपर्क कंपनी वैष्णवीचा दहावा वाढदिवस होता, परंतु या कंपनीने अखेर दहा वर्षे पूर्ण केली नाहीतच. राडिया यांनी तडकाफडकी आपल्या चार कंपन्यांचा गाशा गुंडाळल्याने 200 कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. राडिया यांची गेल्या दहा वर्षांतील व्यावसायिक वाटचाल ही अनेकांची नजर लागेल अशीच होती. केनियात जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये शिक्षण झालेल्या नीरा यांचे लग्न ब्रिटनमध्येच एका उद्योगपतीशी झाले. मात्र, त्यांचा घटस्फोट झाला आणि त्या भारतात परतल्या. तसे पाहता त्यांना जनसंपर्क व लॉबिंग या दोन्ही क्षेत्राचा कधीही अनुभव नव्हता; परंतु यात त्यांनी या क्षेत्रात अल्पावधीत चांगलेच नाव कमावले. राडिया यांनी देशाच्या जनसंपर्क क्षेत्रात प्रवेश केला त्या वेळी हे क्षेत्र तसे सर्वांनाच परिचित होते. मात्र, क्षेत्रात धडाक्याने काम करणारे कुणी एखादी व्यक्ती नव्हती. त्याच्या जोडीला लॉबिंगचे काम करण्यास राडिया यांनी प्रथमच सुरुवात केल्याने याची त्यांना ‘क्लायंट’ मिळवण्यास मोठी मदत झाली. कारण आजवर देशातले कॉर्पोरेटस लॉबिंग जरूर करीत होते. मात्र, त्यांना राडिया ज्या प्रकारे व्यावसायिक पद्धतीने लॉबिंग करीत होत्या ते अन्य कुणाला जमणारे नव्हते. त्यामुळे हळूहळू राडियांचा राजधानी दिल्लीत व आर्थिक राजधानी मुंबईत दबदबा वाढत गेला. लॉबिंग करण्यासाठी राडिया यांनी दिल्ली दरबारी आपले चांगलेच बस्तान बसवले होते. त्यांना पहिले मोठे काम मिळाले ते टाटा उद्योग समूहाचे. नोव्हेंबर 2001 मध्ये त्यांनी टाटांच्या जनसंपर्क व लॉबिंगच्या कामासाठी वैष्णवी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली. मात्र, टाटासारख्या एवढ्या मोठ्या समूहाने त्यांना हे काम कसे दिले हे मात्र गुलदस्त्यातच होते. कदाचित त्यांच्या असलेल्या दिल्लीतील संपर्कातूनच टाटांचे काम मिळाले असावे. टाटांचे काम त्यांनी चोख केल्याने नीरा राडिया हे नाव हळूहळू कॉर्पोरेट क्षेत्रात गाजू लागले. 2007 मध्ये त्यांनी ‘व्हिटकॉम’ ही आणखी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत लाइफस्टाइल उद्योगातील कंपन्यांच्या जनसंपर्काचे काम हाताळण्यास प्रारंभ केला. यात त्यांच्याकडे अनेक चॅनल्सच्या प्रसिद्धीचे काम आले. त्याचबरोबर नीता अंबानी व प्रियंका चोप्रा या दोघा सेलिब्रेटींच्या प्रसिद्धीचेही कंत्राट मिळाले. अशा नामवंत लोकांची कामे आल्यावर राडिया यांच्याकडे ‘क्लायंट्स’चा ओघ सुरू झाला. त्यामुळे त्याच वर्षी त्यांनी ‘नोएसिस स्ट्रॅटीजी’ ही आणखी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीत ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल व माजी वित्त सचिव सी. एम. वासुदेव यांचाही भांडवली सहभाग होता. मात्र, कालांतराने त्यांनी आपला भांडवली वाटा राडिया यांनाच विकला. या कंपनीकडे प्रामुख्याने टेलिकॉम उद्योगातील कंपन्यांची कामे होती. 2008 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे काम त्यांना मिळाले. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र ‘न्यूकॉम’ ही आणखी एक कंपनी स्थापन केली. राडिया यांच्या या चारही कंपन्यांची उलाढाल सुमारे 300 कोटी रुपयांच्या घरात असावी असा एक अंदाज आहे. केवळ दहा वर्षांच्या काळात राडिया यांनी आपले या क्षेत्रात चांगलेच बस्तान बसवले. टू जी स्पेक्ट्रमप्रकरणी लॉबिंग करण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यात दिल्लीतील काही पत्रकारांचीही नावे चर्चेत होती. ज्या वेळी राडिया यांच्या टेप्स बाहेर आल्या त्या वेळी त्यांच्या लॉबिंगच्या अनेक सुरस कथा बाहेर आल्या आणि निरा राडिया हे नाव आम जनतेला समजले. आता त्यांनी जनसंपर्क व लॉबिंगच्या क्षेत्रातून माघार घेतल्याने पुढील काळात या राडियाबाई कोणत्या क्षेत्रात उतरणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.Trending