आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पब्लिक मंडे को बोलती है...’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यंदा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला दोन लाख लोकांनी हजेरी लावली, त्यातले काही निव्वळ फॅशन म्हणून आलेही असतील. पण बाकीचे तर लेखकाला पाहावे, ऐकावे, भेटावे या इच्छेनेच आले होते असे मानायला वाव आहे. केवळ टाइमपास करायला, कोणी तरी पाहावे म्हणून आलेली व्यक्ती एक तास शांतपणे एखाद्या विषयावरची चर्चा ऐकण्याच्या मन:स्थितीत नसते. ती समोर जे बोलले जात असते, ते ऐकून त्याचा अर्थ कळून त्यावर प्रतिसाद देण्याच्या तयारीत नसते. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये शेवटच्या दिवशी, सोमवारी वगळता, कोणत्याही सत्रात बसायलाही जागा नव्हती. अनेक सत्रांना लोक समोरच्या व बाजूच्या मोकळ्या जागेवर, जमिनीवर मांडी घालून बसले होते. फेस्टिव्हलचे एक संचालक विल्यम डॅलरिम्पल यांनादेखील एका सत्रात असेच खाली बसावे लागले होते. गीतकार जावेद अख्तर व शबाना आझमी एका सत्रात बसायला जागा मिळावी म्हणून जेवण अर्धे सोडून, हातात रोटी घेऊन सत्र सुरू होण्यापूर्वी येऊन बसले होते. अशी गर्दी केवळ शबाना/शर्मिला/राहुल द्रविड/दलाई लामा/शोभा डे यांच्या सत्रांनाच नव्हती तर रुचिर शर्मा, मायकेल सँडल, गायत्री चक्रवर्ती स्पिवाक, टिमथी गार्टन अ‍ॅश, मानिल सुरी, डॉ. बिनायक सेन, उर्वशी बुटालिया, पवन वर्मा, अशोक वाजपायी, भालचंद्र नेमाडे, जीत थयिल आदी विचारवंत लेखकांच्या सत्रांनाही होती. सर्व सत्रांनंतर प्रश्न विचारणा-या प्रेक्षकांना वेळ पुरत नसे. हे प्रश्नही सामाजिक, राजकीय, आर्थिक व अर्थातच साहित्यिक अशा सर्व प्रांतांतले होते.

अनेक वर्षांपासून चित्रपट, विशेषकरून हिंदी चित्रपट, भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. त्यांतले संवाद आणि गाणी आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा भाग नकळत होऊन गेलेले असतात. हिंदी चित्रपटांचा मोठा काळ गाजवला डाव्या विचारसरणीच्या व सामाजिक/वैचारिक अंगाने लिहिणा-या पटकथाकार/संवादलेखक आणि गीतकारांनी. मात्र, हल्लीहल्ली अनेक तरुण पटकथाकार, गीतकार व संवादलेखकांची वेगळी ओळख पे्रक्षकाला होऊ लागली आहे. पटकथा आणि संवाद हा सारा शब्दांचाच खेळ. म्हणूनच जयदीप साहनी, गौरव सोळंकी, नीलेश मिश्र या नव्या पिढीतल्या गीतकार/पटकथाकारांना जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये नसरीन मुन्नी कबीर यांनी बोलते केले तेव्हा ते अस्थानी तर वाटले नाहीच, परंतु पे्रक्षकांचाही त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. नसरीन यांचीही चित्रपटविषयक अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. या तिघांमधला नीलेश चाळिशीच्या जवळ पोचलेला व अत्यंत गंभीर प्रकृतीचे काम करणारा पत्रकार, स्वत:ला तो दहा वर्षांपासून ‘बॉलीवूडमधला आऊटसायडर’ आहे, असे म्हणवतो. जादू है नशा है, मदहोशियाँ हैं (जिस्म 2003) हे त्याचे पहिलेच गाणे अतिशय गाजले. नीलेश गेल्या वर्षीच्या बहुचर्चित ‘एक था टायगर’चा सहलेखक. नसरीन त्याला म्हणाल्या, ‘हे गाणं मी शेकडो वेळा ऐकलं असेल.’ तर तो लगेच म्हणाला, ‘पण मला त्याची रॉयल्टी एकदाच मिळालीय...’ नीलेश एरवीही फार अघळपघळ बोलत नाही.

जयदीप साहनीच्या तोंडून शब्द निवांत घरंगळल्यासारखे बाहेर पडतात. त्याच्या नावावर जमा ‘चक दे’, ‘खोसला का घोसला’, ‘बंटी और बबली’. ‘चक दे’ प्रदर्शित झाला तेव्हा तो अमेरिकेत होता. ‘त्या शुक्रवारी यशजींचा फोन आला, ‘पिट गयी फिल्म.’ पण सोमवारनंतर प्रेक्षक बोलू लागले, आणि सिनेमा धो धो चालला. शुक्रवार को पिक्चर बोलती है, पब्लिक मंडे को बोलती है.’‘तुम्ही कोणते चित्रपट पाहायचात, तुमचे आवडते चित्रपट कोणते?’ यावर एकमुखी उत्तर होतं ‘प्यासा.’ पण नुकतीच पंचविशी ओलांडलेल्या गौरवने आवर्जून सांगितलं की ‘आवारा’ त्याला अजिबात आवडला नाही. जे चित्रपट आपल्याकडे क्लासिक म्हणून ओळखले जातात, ते सर्व आजच्या पिढीला आवडतीलच असे नाही, किंबहुना नाही आवडत, हे जाहीरपणे सांगितल्याने उपस्थितांपैकी तरुणांनी त्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

‘प्रत्येकालाच त्याच्या तारुण्यात पाहिलेले चित्रपट आवडतात, त्यामुळे कुठले चांगले, वाईट हे प्रत्येकासाठी वेगळे असते. त्याचा आपण आदर केला पाहिजे.’ जयदीप म्हणाला, ‘नॉस्टॅल्जिया चांगला किंवा वाईट ही गोष्ट सोडा, पण ती पटकथाकारावर फेकून मारायची गोष्ट नक्की नव्हे. एकदम ओरिजिनल कथा लिही, त्या अमुक प्रसिद्ध चित्रपटासारखी, हे वाक्य प्रत्येक पटकथाकाराला अनेकदा ऐकावे लागलेले असते.’

पटकथा अभिनेत्यांसमोर पहिल्यांदा कशी सादर होते, यावरची तिघांची उत्तरे मनोरंजक तर होतीच, पण डोळे उघडणारीही होती. ‘पटकथा वाचून काय दाखवायची, मला जे म्हणायचंय, ते मी मला जमणा-या माध्यमातून मांडलंय. ते वाचून तू तुला जमणा-या माध्यमातून, म्हणजेच अभिनयातून, लोकांसमोर मांडायचंय असं माझं मत. पण अनेक अभिनेत्यांना वाटतं की पटकथाकाराने किंवा निर्मात्याने पटकथा वाचून दाखवली की त्याची त्यातली इन्व्हॉल्व्हमेंट, तो कुठल्या अँगलने त्या कथेकडे पाहतोय, ते लक्षात येतं. म्हणून ती वाचून दाखवायची.’ जयदीपला यात वेगळंच आव्हानही वाटतं.

समजा एका अभिनेत्याने पटकथा ऐकून चित्रपट करायला नकार दिला. मग दुस-या कडे किंवा तिस-या कडेही जाऊन, ती जणू त्याच्याचसाठी लिहिली आहे, अशा प्रकारे सांगायची, हे आव्हान खरेच ना?
‘मध्यंतर वा इंटरव्हल हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणा-या च्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. कारण त्या वेळात त्याला फोन करायचा असतो, प्रसाधनगृहात जायचं असतं, पॉपकॉर्न खायचा असतो, इ. त्यामुळे त्याने इंटरव्हलनंतर परत यावे असे वाटत असेल, नुसते थिएटरमध्ये परत नव्हे तर कथेतही, तर इंटरव्हल अशाच एका इंटरेस्टिंग क्षणावर करावा लागतो. आणि कथेत असा क्षण बरोबर मध्यभागीच असावा लागतो, चाळिसाव्या मिनिटाला येऊन नाही चालत. मग कधी-कधी पटकथाकार म्हणून थोडीफार ओढाताण होते,’ हे जयदीपने मान्य केले. मग, त्यावर गाजरहलव्यात घालतो तसे काजू किसमिस घालावे लागतात. तर नीलेश म्हणाला की ‘मला इंटरव्हल आव्हानात्मक वाटतो. तो योग्य क्षण पकडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.’

पटकथाकार कोणतेच प्रशिक्षण न घेता कसे काम करू शकतात, असा प्रश्न एका पे्रक्षकाने नंतर विचारला. त्यावर नीलेशचे उत्तर होते, ‘कोणताही लेखक, पटकथाकार काहीही लिहितो, ते त्याला मुंबईतच आणावं लागतं. आणि मुंबईत त्याची सृजनशीलता हरवून जाते.’ नीलेशने मुंबईत पटकथाकारांना शिकवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु तिघांनीही सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पटकथाकार व्हायचे तर ‘प्रचंड सहनशक्ती बाळगा, तुमचीच नव्हे तर घरातल्या सर्वांची नोकरी चालू ठेवा आणि बँकेत 20 वर्षे पुरेल इतका पैसा असू द्या.’ वरवर थिल्लर वाटणा-या पटकथा या विषयावरच्या या सत्रातून उपस्थितांना भारतीय जनमानसाचा कानोसा निश्चित घेता आला. तो पुढचे चित्रपट पाहताना संदर्भासारखा कामी येईल, अशी शक्यताही वाटते. तेच, ‘जेएलएफ’सारख्या उपक्रमांचे यश म्हणावेसे वाटते.

rmrinmayee.r@dainikbhaskargroup.com