आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी चुकलेच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी जे बोलले, ते बरोबरच होतं. पण त्यांनी तसं बोलायला नको होतं. 
...कारण २०१४ नंतर आता तीन वर्षे उलटून गेली असली, तरीही त्या वेळच्या काँग्रेसविरोधाची समाजमनातील धार कमी झालेली नाही, हे राहुल यांनी लक्षात घ्यायला हवं होतं. भ्रष्टाचारात बरबटलेला, नातेवाईकशाहीच्या दलदलीत रुतलेला हा पक्ष आहे, ही जनमनात काँग्रेसची प्रतिमा तयार करण्यात संघाच्या फॅसिस्ट प्रचारतंत्राला आलेलं यश अजूनही पुरेसं ओसरलेलं नाही, याची दखल राहुल यांनी घ्यायला हवी होती. त्यामुळं मुलाखतकारानं घराणेशाहीच्या संबंधात प्रश्न विचारल्यावर तो राहुल यांनी कौशल्यानं टोलवून लावण्याची गरज होती. 

मात्र राहुल यांनी तसं केलं नाही. भारतीय समाज घराणेशाहीवरच चालतो, हे सत्य त्यांनी सांगितलं आणि संघाला टीकेसाठी त्यांनी मोकळं मैदानच दिलं. 

हे वास्तव लक्षात न घेतल्यामुळेच, ‘राहुल गांधी ‘पप्पू’ आहेत, तर त्यांच्या वक्तव्याची इतकी दखल का घेता, असा निरर्थक  सवाल संघाचे विरोधक विचारत आहोत. एखादी गोष्ट जनमनावर कायमची बिंबवायची असल्यास  ती सतत आक्रमकपणे  सांगत राहणं आवश्यक असतं, हा फॅसिस्ट प्रचारतंत्राचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळं एकीकडे राहुल गांधी हे ‘पप्पू’ आहेत, हे दर्शवण्याकरिता त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची जशी खिल्ली उडवली जात असते, तसंच त्याची प्रतिमा सतत डागाळत राहण्याचीही आवश्यकता असते. राहुल गांधी यांना जसं उमगतं, तशी भारतीय समाजाबाबतची उमज संघालाही आहे. किंबहुना संघाला राहुल किंवा भाजपच्या विरोधकांपेक्षा काकणभर अधिकच आहे. त्यामुळं घराणेशाही हे भारतातील समाजातील वास्तव आहे, हे राहुल गांधी यांचं विधान वस्तुस्थितीचं निदर्शक आहे आणि त्यावर टीकेची झोड लगेच उठवली नाही, तर राहुल यांची प्रतिमा डागाळावयाच्या डावपेचांना ‘खो’ बसू शकतो, याची संघाला कल्पना आहे.  

आपला मुलगा (मुलगी नव्हे) आपल्याच व्यवसायात यावा, अशी बहुतांश भारतीयांची इच्छा असते. त्यामुळंच डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ पाहतो. मग त्याची कुवत असो वा नसो. या मुलाचे वडील जर जरा सुस्थितीतील डॉक्टर असतील, तर ते त्याला काहीही करून, कसंही करून डॉक्टरीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवतातच. ज्यांना शक्य आहे, ते परदेशात पाठवून मुलाला डॉक्टरीची पदवी मिळवून परत येऊन आपल्या व्यवसायात घेऊन स्थिरस्थावर करण्यावरही भर देत असतात. ही प्रवृत्ती समाजातील प्रत्येक क्षेत्रात आहे. मग वकिली असो, व्यापार वा उद्योग किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो. मग ते बिर्ला असोत किवा अंबानी वा टाटा. रतन टाटा यांनी मारे मोठा आव आणून निवृत्ती जाहीर केली अणि सायरस मिस्त्री यांच्या हाती आपल्या कंपन्यांचा कारभार दिला. पण पडद्याआडून तेच सूत्रं हलवत राहिले. त्याला मिस्त्री यांनी आक्षेप घेतला, तेव्हा ‘टाटा संस्कृती’चा मुद्दा उपस्थित करून रतन टाटा यांनी मिस्त्री यांना अखेर कंपनीतून हुसकावून लावलंच ना? हीच गोष्ट नारायण मूर्ती यांची. विशाल सिक्का यांच्या हाती त्यांनीच कंपनीची सूत्रं दिली. पण सिक्का आपल्या मर्जीनुसार कंपनीचा कारभार चालवत नाहीत, असं वाटल्यावर मूर्ती यांना अचानक ‘इन्फोसिसच्या  संस्कृती’ची आठवण झाली आणि आरोपांची राळ उडवून त्यांनी सिक्का यांना हैराण करून टाकलं. अखेर सिक्का यांनी राजीनामा दिला. सांगावयाचा मुद्दा इतकाच की, घराणेशाही हा भारतीय समाजव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. जातिव्यवस्थेच्या उतरंडीमुळे कोणी कोणता व्यवसाय करायचा, हे ठरून गेलं आहे. त्यामुळं पदव्युत्तर शिक्षण घेऊन सफाई कामगाराचा मुलगा रस्ते व गटारंच साफ करताना आढळत असतो.  

अशा परिस्थितीत राहुल गांधी जे बोलले, त्याचा प्रतिवाद केला नाही, तर समाजातील दैनंदिन जीवनातलं हे वास्तव लोकांना पटण्यास फारसा वेळ लागणार नाही आणि मग आपण कसोशीनं काँग्रेसी घराणेशाहीबाबत जे जनमत आकाराला आणलं, ते विरायला फारसा वेळ लागणार नाही, हे संघाला ठाऊक आहे. म्हणून राहुल गांधी बोलल्यावर संघाचे -मुद्दामच भाजपचे नेते असं म्हटलं नाही; कारण संघच भाजपच्या मुखातून बोलत असतो- नेते व प्रवक्ते त्यांच्यावर तुटून पडणार हे अपेक्षितच होतं. 

...कारण गेल्या दोन दशकांतील आर्थिक सुधारणांच्या ओघात समाजात जे स्थित्यंतर घडून येत गेलं आणि त्यामुळं ज्या अनेक विसंगती निर्माण होत गेल्या, त्याचा संघानं अत्यंत कौशल्यानं वापर करून घेतला आहे. या २१ व्या शतकातील भारतातील लोकसंख्येचं आजचं सरासरी वय २५ ते ३० आहे. देशातील लोकसंख्येत आज हा वयोगट ६० कोटींच्या आसपास आहे. हा तरुण वर्ग स्वातंत्र्यानंतरच नव्हे, तर ८० च्या दशकाच्या मध्यानंतर जन्माला आला आहे. तो खऱ्या अर्थानं आधुनिकोत्तर समाजव्यवस्थेचा एक भाग आहे. त्याला दिसणारं जग हे प्रगत तंत्रज्ञानाचं आहे. आधुनिक विज्ञानाचं आहे. कार्यक्षम व पारदर्शी कारभाराचं आहे. हा तरुण वर्ग एकूण समाजाऐवजी स्वत:च्या प्रगतीला प्राधान्य देणारा आहे. त्याला झटपट निर्णय घेतले गेलेले हवे आहेत. या तरुण वर्गाला नुसत्या अपेक्षा नाहीत, तर त्यांची प्रेरणा ही विविधांगी आकांक्षांची आहे आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम करण्याची त्याची तयारी आहे. या तरुण वर्गाला कोणत्याही विषयातील ‘प्रक्रिया’ (प्रोसेस) महत्त्वाची वाटत नाही. त्याला ‘रिझल्ट’ हवा आहे. त्या अंगानं हा वर्ग ‘रिझल्ट ओरिएंटेड’ आहे. त्यामुळं इतिहासात काय घडलं, राजकारणात पूर्वी काय होतं, समाज कसा घडत गेला वगैरे गोष्टींत त्याला रस नाही. आता काय घडत आहे, असं का घडत आहे, ते बदलायचं कसं अशा  तात्कालिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची त्याची वृत्ती आहे.   

ही या तरुण वर्गाची प्रवृत्ती आणि गेल्या दोन दशकांच्या आर्थिक सुधारणांमुळे उदयाला येत गेलेला जो संपन्न समाजघटक आहे, त्याच्या आणखी उत्कर्षाच्या आकांक्षा म्हणजेच देशाच्या खऱ्या उन्नतीचा मार्ग, ही भावना माहिती तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमांच्या प्रभावी वापरानं समाजाच्या सर्व थरांत पोहोचवण्याची रणनीती संघानं अमलात आणली. पंतप्रधान मोदी हे साठीतील असूनही ते या तरुण वर्गाला आणि उदयाला येत असलेल्या संपन्न समाजघटकांना आकर्षित करून घेऊ शकले; कारण ते या वर्गाची ‘भाषा’ बोलत होते. उलट या तरुण वर्गातील एक असूनही राहुल गांधी यांची ‘भाषा’ जुनीच होती. राहुल व काँग्रेस हे फक्त ‘अपेक्षा’च सांगत बसले आहेत. पण ‘आकांक्षा’ची दखलच ते घेताना आढळत नाहीत.. ‘अपेक्षा’ हे भारतातील ‘वास्तव’ होतं व आहे. त्याला हा तरुण विटला होता. नवमध्यमवर्ग तर त्यापासून खूप दूर गेला होता. 

या समाजघटकांची ‘मोदीमय’ता ओसरणं संघाला परवडणारं नाही. म्हणूनच राहुल गांधी यांनी वास्तव सांगूनही संघ त्यांच्यावर तुटून पडला आणि ‘अपेक्षां’च्या जुनाट परिभाषेत अडकलेल्या राहुल, काँग्रेस व इतर भाजप विरोधकांना संघ का असं करीत आहे, ते उमगलं नाही.
 
- प्रकाश बाळ
prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...