आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या पदासह राहुल यांचे शरसंधान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संगणक जगतात क्रांती घडवणा-या ‘अ‍ॅपल’ या प्रसिद्ध कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांची आत्मकथा नुकतीच माझ्या वाचनात आली. या पुस्तकाच्या प्रारंभीच स्टीव्ह जॉब्ज यांनी, ते या स्थानावर कसे पोहोचले इथपासून ते त्यांनी कोणकोणत्या चुका केल्या याची माहिती, स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांना सांगितली आहे. एका ठिकाणी ते म्हणतात, जीवनात तुम्हाला वेळच अत्यंत कमी मिळालेला आहे, अन्य कोणाचे जीवन जगून तो वाया घालवू नका. यावरून मला नुकतेच पार पडलेले काँग्रेसचे चिंतन शिबिर आठवले. या शिबिरातच राहुल गांधींना औपचारिकरीत्या सोनिया गांधींनंतर क्रमांक दोनचे नेतेपद देण्यात आले, पण मी स्टीव्ह जॉब्जचे उदाहरण देऊन विचारू इच्छितो की, राहुल गांधी स्वत:चे आयुष्य मनमोकळेपणाने जगू शकतील का? किंवा त्यांची स्वप्ने ते प्रत्यक्षात आणू शकतील का? कारण त्यांनीच म्हटले आहे की, काँग्रेसच आता त्यांचे जीवन आहे. मग दुस-यांची स्वप्ने आणि आयुष्य जगण्यातच ते आपला वेळ घालवणार आहेत का?

कोणताही मोठा नेता जेव्हा जाणीवपूर्वक काही बोलतो तेव्हा तो किती चांगले बोलला असेच सर्वसामान्यांना वाटत असते. या वेळी राहुल गांधीही त्याच पद्धतीने बोलले. राहुल गांधींनी बरीच भाषणे किंवा वक्तव्ये केल्याचे बहुतांश लोकांच्या ऐकण्यात नाही. 2004 पासून आतापर्यंतच्या भाषणांपैकी आताच्या भाषणात ते मनापासून बोलले, असेही अनेक जण म्हणतील. राहुल गांधींचे भाषण अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले असेल, यात शंका नाही. कारण त्याचा उल्लेख भविष्यात वारंवार होणार आहे.

या भाषणाद्वारेच राहुल आईच्या उपस्थितीत काँग्रेसची धुरा सांभाळत होते. या भाषणामुळेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य सळसळणार आहे; परंतु या भाषणात त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींची प्रत्यक्षात अंमलबजावणी ते करू शकणार आहेत का? हेच त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.

राहुल गांधींनी आपल्या भाषणात म्हटले की, पक्षात कार्यकर्ताच महत्त्वाचा आहे. काँग्रेसची संस्कृती कशी आहे, हे आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून माहीत आहे. शक्तीचे पूर्णपणे केंद्रीकरण या सूत्रावरच हा पक्ष चालतो. येथे पक्षश्रेष्ठीच सर्वोच्च आहेत. पक्षात काही नेते असेही आहेत की ज्यांना जनाधार नाही, पण ते खुर्चीला वर्षानुवर्षे खिळून बसलेले आहेत. काँग्रेसमध्ये चमचेगिरी खोलवर रुजलेली आहे. राहुल गांधी हा डीएनए बदलू शकणार आहेत का? दीर्घकाळापासून हा डीएनए पक्षात प्रचंड बलशाली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना माहीत होते की काही काळानंतर राहुल गांधी पक्षात क्रमांक दोनचे नेते होतील आणि ते तसे झालेही. मग ही संस्कृती बदलण्यासाठी ते आतापर्यंत काय करू शकले? पुढे तरी काय करू शकतील? काँग्रेसमध्ये उच्च पदांचे वाटप कशा रीतीने करण्यात येते हे त्यांना आणि सर्वांनाच चांगले माहीत आहे. ही पद्धत बदलणार आहे का? सत्ताच जर बंद दरवाजाच्या आत बंदिस्त असेल तर तिला मुक्त कसे करणार? हे सर्व राहुल गांधीही दीर्घकाळापासून पाहत आलेले आहेत. लाल दिव्याच्या गाडीतून फिरणा-या नेत्यांबाबत जनतेच्या मनात कोणत्या भावना आहेत, हेसुद्धा त्यांना माहीत आहे. राहुल ही परिस्थिती कशी बदलणार आहेत हे त्यांना दाखवून द्यावे लागणार आहे.

त्यांच्या भाषणातील एक भाग मला खूप रंजक वाटला. आपल्या पक्षात नियम-कायदे गुंडाळून ठेवले जातात, तरीही आपण निवडणुका जिंकतो कशा? याचे मलाही आश्चर्य वाटते, असा उल्लेख त्यांनी केला होता; परंतु पक्षातील अनेक नेत्यांचे दु:ख असे आहे की, त्यांनी निवडणुकीच्या लढाईत आणि विजय खेचून आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, उच्च पदांवर त्यांच्याऐवजी इतरांनाच बसवले गेले. नियम-कायद्यांशिवाय पक्ष चालतो कसा हे विचारणा-या राहुल गांधी यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. निवडणुका ज्या नेत्यांच्या लोकप्रियतेच्या बळावर जिंकल्या जातात, त्यांच्याऐवजी हायकमांड दुस-या लाच आणतात. हे काँग्रेस पक्षातच घडते. जनतेला याबाबत जाणून घेण्याचा हक्क आहे की, त्यांचा नेता कोण आहे आणि कशा प्रकारचा आहे. ही केवळ टीका नव्हे, पण ज्या प्रकारचा बदल राहुल गांधींना हवा आहे, तो काँग्रेसच्या या संस्कृतीत अथवा विचारसरणीत ते कितपत करू शकतील?
शेवटी, राहुल गांधींचा हा मुद्दा भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, की राजकारण हे मूठभर लोकांच्या हातातले बाहुले बनलेले आहे आणि युवकांना वाटते की, सत्तेत आम्हाला स्थानच नाही. राहुल गांधींना काँग्रेसमध्ये नवा जोश निर्माण करण्यासाठी युवावर्गाची गरज आहे. मात्र, वारंवार मागण्या मांडूनही न्याय मिळत नाही, या भावनेतूनच युवावर्ग त्वरित संतप्त होतो. आता खूप झाले, असे उद्गार युवावर्गाच्या तोंडून आपण ब-या चदा ऐकले असतील. काळनुरूप हा बदल घडवण्याचे मोठे आव्हान राहुल गांधींसमोर आहे. कारण सरकारही त्यांचेच आहे. आता तर त्यांची जबाबदारीही कित्येकपट वाढली आहे. काँग्रेस देशातील सर्वात जुना पक्ष असून निवडणुका जर वेळेवर झाल्या तर सलग दहा वर्षे राज्य करण्याचा कार्यकाळ हा पक्ष पूर्ण करेल.

या कार्यकाळाबाबत जनता तर जाब विचारेलच. त्याची उत्तरे राहुल गांधींना आता पक्षाचा नेता म्हणून द्यावी लागणार आहेत. सरकारचे कार्य आणि उपाययोजनांवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि बड्या मंत्र्यांची बैठक झाली होती. तेव्हाच स्पष्ट झाले होते की, सोनिया गांधी यांच्याबरोबरच राहुल गांधींनाही आपल्या कार्याचा अहवाल त्यांना द्यावा लागणार आहे, पण मी आधी म्हटल्यानुसार, आपल्या सरकारकडून अहवाल घेऊन राहुल गांधींना तो जनतेलाही द्यावा लागणार आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
p.abhigyan@gmail.com