आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा दौरा आशा, की स्वप्नरंजन?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांचा राज्याचा दौरा संपला त्यांची दौर्‍यातली शेवटची सभा जळगावला होती आणि ते सभेत काय बोलणार याचे संकेत दुपारीच मिळाले ते राज ठाकरे यांचे आवडते लक्ष्य अजित पवार यांनी इंदापुरातील सभेत टगेगिरीचा कळस गाठल्यामुळे . इंदापूरच्या सभेत अजित पवार जे काही बोलले ते सभ्यपणाला शरमेने मान खाली घालायला लावणारे, शिष्टाचाराच्या सर्व सीमांचे उल्लंघन करणारे , शिवराळपणाची हद्द ओलांडणारे आहे यात शंकाच नाही. त्यावर राज ठाकरेंनी ओढलेले कोरडे काही संतवाणी नव्हती हेही विसरता येणार नाही, पण लोकांना राज ठाकरे यांची शिवराळ भाषा मुळीच खटकली नाही कारण प्रत्येकाला अजित पवार यांचा मनापासून संताप आलेला होता . अजित पवार जे काही बोलले तो सत्तेचा माज आहे, सत्तेत असणार्‍या बहुसंख्यांना असाच माज चढलेला आहे, असा समज सार्वत्रिक पसरलेला आहे आणि राज यांनी सोडलेले टीकास्त्र हे त्या माजाला दिले जाणारे उत्तर आहे, असे आता सर्वसामान्य माणसालाच नव्हे, तर बहुसंख्य बुद्धिवंतांनाही वाटू लागले आहे .

राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या भाषेचे त्यांच्या समथर्कांसोबतच बहुसंख्य बुद्धिवंत, पुरोगामी, (सध्या कारागृहात असणार्‍या लक्ष्मण माने यांनी उल्लेख केलेल्या) साडेतीन टक्के संस्कृतीतील तसेच विशेषत: मुंबईतील बहुसंख्य पत्रकारांनाही कौतुक आहे . भाषेच्या ज्या शिवराळपणामुळे या बहुसंख्य बुद्धिवंत / पुरोगामी / परिवर्तनशील / डाव्या मंडळींना बाळासाहेब ठाकरे आवडत नव्हते तीच, खरे तर त्यापेक्षा थोडी जास्तच आक्रमक भाषा वापरणारे राज ठाकरे या बहुसंख्य मंडळीना आवडतात हा विरोधाभास असला तरी ते सत्य आहे. ती ठाकरी शैली आहे, असा कौतुकभरला उल्लेख मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही केला जातो. अजित पवार यांच्या याच भाषेला फटकळपणा, फार फार तर स्पष्टवक्तेपणा ही मंडळी मानतात. या दोघांच्याही खुर्चीला खुर्ची लावून बसण्यात किंवा सत्कार स्वीकारण्यात वर उल्लेख केलेल्या या बहुसंख्य वर्गाला आपण काही वावगे करतो आहोत, असे वाटत नाही. दिवस बदलले म्हणतात ते असे, पण ते असो. मूळ मुद्दा भाषेचा नसून जे बोलले गेले ते काय समजले जाते याचा आहे. अजित पवार यांच्यासह सत्तेतले बहुसंख्य बोलतात तो माज आहे, कैफ आहे; तसा पद्धतशीर प्रचारच केला गेला आहे.

बहुसंख्येने सर्वसामान्य माणसालाही वाटावे व पटावे असे वर्तन या सत्तेतील मंडळीकडून होत आहे. सर्वसामान्य माणसाला कायम गृहीत धरणे, त्याची हेटाळणी-उपमर्द करणे, त्या सर्वसामान्य माणसाला वेठीला धरून स्वत:साठीच सत्ता राबवणे सुरू असल्याने या मंडळींना माज चढला आहे, अशी भावना सर्वसामान्य माणसाच्या मनात ठाम झालेली आहे आणि त्याविरोधात एक असंतोष सामान्य माणसाच्या मनात दाटलेला आहे. या असंतोषाला व्यक्त करण्याचे धाडस राज ठाकरे दाखवतात, असे सर्वसामान्य माणसाला वाटते म्हणून राज ठाकरे यांची भाषा सत्तेच्या कैफाने माखलेली आहे हे त्याला पटतच नाही. राजकीय भूमिकेत वावरत असताना राज ठाकरे सर्वसामान्य माणसावर टीकास्त्र सोडत नाहीत, त्याला हात लावत नाहीत की त्याला ओरबाडतही नाहीत. सत्तेतल्यावर टीका करताना मात्र राज हातचे काहीच राखून ठेवत नाहीत. राज आपला नेता आहे, आपली आशा आहे, असे आता लोकांना वाटू लागले म्हणूनच ते एवढी गर्दी माझ्या सभांना करतात, असा दावा राज यांचा आहे. संत तुकारामाचा एक अभंग असा आहे -
विंचू देव्हार्‍याशी आला , देवपूजा नावडे त्याला ,
तेथे पैजाराचे काम , अधमासी व्हावे अधम !
राज यांच्या सत्तेत असणार्‍यावर टीकेविषयी सर्वसामान्य माणसात ही भावना आता ठाम होत आहे. याच महाराष्ट्र दौर्‍यात राज ठाकरे यांची निवांतपणाने म्हणता येईल अशी भेट झाली. जवळ जवळ चाळीस मिनिटे आम्ही सोबत होतो. झालेली सर्र्व चर्चा उघड करणे शिष्टाचारसंमत ठरणार नाही. राज्याच्या या दौर्‍याकडे राज ठाकरे कसे पाहतात आणि त्यांचा अजेंडा काय आहे हे या भेटीतून जे समजून घेता आले ते महत्त्वाचे आहे. सोलापूर-जालना-अमरावती-जळगाव या सर्व सभातून शिवसेनेशी किंवा भाजपशी निवडणूकपूर्व युती नाही आणि स्वबळावर सत्ता संपादन हेच मनसेचे ध्येय असल्याचे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जाहीर केले आणि उद्धव-राज जवळ येण्याच्या माध्यमांनी उडवलेल्या वावड्यांमधली हवाच काढून घेतली! राज ठाकरे यांनी तोडीची भाषा केली आणि भाजपचा तडफडाट झाला, एकतर्र्फी ताणाताणी झाली, सिद्ध करण्याच्या आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा झाली आणि सर्व शांत झाले.

जळगावच्या सभेत सुरेशदादा जैन यांचा हवाला देऊन आणि जैन यांच्या बोलण्याची नक्कल करत राज यांनी विधान परिषद निवडणुकीत नाथाभाऊ यांनी कोट्यवधी रुपये कसे खर्च केले याचा आकडाच सांगितला ... त्यावर मात्र नाथाभाऊ काय किंवा भाजप काय कोणाकडूनच प्रतिक्रिया आलेली नाही, मौनच बाळगले गेले! मी जे बोलतो तेच खरं आहे कारण, मला राजकारण करताना सामान्य ओरबाडून काढायचं नाहीये या राज ठाकरे यांच्या म्हणण्यात तथ्य असण्यावरच शिक्कामोर्तब करणारे हे मौन आहे.

मध्यंतरी काही काळ राज्यातील टोल नाक्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यावर अचानक मवाळ भूमिका मनसेने घेतली. त्यावर मनसेने तोड केली असा जो प्रचार सुरू झाला होता त्याला राज ठाकरेला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे, असे ठणठणीत उत्तर राज यांनी दिले आणि त्यावर जनतेने मोहोर लावली हीदेखील या दौर्‍याची एक जमेची बाजू समजावी लागेल .

राज ठाकरे आणि मनसे राज्याच्या सत्तेत येणार किंवा नाही हे 2014 ची विधानसभा निवडणूक ठरवेल, पण सत्तेत येण्याचा राज यांचा आत्मविश्वास पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याआधी बराक ओबामा यांच्यात तेव्हा दिसलेल्या आत्मविश्वासाशी करता येईल. मला राज्याला आणि राज्यातील जनतेला ओरबाडायचे नाहीये, माझ्याजवळ महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार आहे, महत्त्वाचे म्हणजे सत्तेचा माज चढलेल्यांना धडा शिकवायला जनता आतुर आहे आणि पर्याय म्हणून मी समोर दिसतो आहे, असे राज यांचे म्हणणे आहे. ही केवळ गर्र्दी आहे तो प्रतिसाद नाही आणि पाठिंबा नाहीच नाही, ही गर्र्दी मतात परावर्तित होणार नाही, असा आजवरचा राजकीय इतिहास आहे हे राजकारणातल्या बुजुुर्गांचे म्हणणे राज ठाकरे याना मान्य नाही. ही केवळ गर्र्दी नाही तर ती आशा आहे आणि त्यांच्या मनात बदल करण्याची उमेद मला दिसते आहे, असा राज ठाकरे यांचा दावा आहे. माझ्याविषयी या गर्र्दीला वाटणारी खात्री हाच या आशेचा आणि बदलाचा आधार आहे, असे राज यांचे म्हणणे आहे.

विधानसभेच्या निवडणुकांची चाहूल आता स्पष्टपणे लागलेली आहे. राज ठाकरे आणि अजित पवार हे दोघे या निवडणुकीचे खरे हीरो असतील, असे गेल्या पंधरवड्यापर्यंत म्हटले जात होते. मात्र, अजित पवार सध्या तरी सेल्फ आऊट, झालेले आहेत. मत मागायला नाही मत मांडायला आलो, असे भावनिक आवाहन करत मत राखून ठेवायला हेतू मनाशी बाळगून, संघटनात्मक बांधणी घडी बसवत महाराष्ट्राचा दौरा पूर्ण करताना म्हणूनच राज ठाकरे यांच्या राज्याच्या सत्तेत बदल होण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. आशा बाळगायला आणि स्वप्नरंजन करायला कोणी कोणाला रोखू थोडीच
प्रवीण बर्दापूरकर