आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘टोला’, जो बसलाच नाही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी जनतेने यापुढच्या काळात कोणत्याही टोलनाक्यावर टोल अर्थात पैसे भरू नयेत, ज्या ठिकाणी टोल नाक्यावाले दांडगाई करतील तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मदतीसाठी उभे राहतील, टोलच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणावी अशा एक ना अनेक घोषणा करीत राज ठाकरे यांनी टोलधारी शासनकर्त्यांच्या अक्षरश: राई राई एवढ्या चिंधड्या उडवण्याचे काम मध्यंतरी केले. पण त्यांची ही आरंभशूरता पहिल्या धाडसी वा आक्रमक प्रयोगानंतर हळूहळू मावळत गेली. आजघडीला राज्यातील सर्वच टोलनाक्यांवर पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. टोलला एक और धक्का दिल्याचे समाधान साहेबाला मिळाले खरे, परंतु प्रश्नांची दाहकता काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकली नाही.
टोल अर्थात पथकराची वसुली हा विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा होताच; पण तो उत्तरोत्तर अधिक जाचक बनत गेला. टोल वसुलीच्या ठेक्यातील काही राजकीय मुखंडांचा असलेला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग अन् त्यातूनच मग सत्ताधारी मंडळींची त्या प्रश्नाप्रति आपसूक पाझरणारी आपुलकी हा तर सार्वत्रिक चर्चेचा विषय ठरला आहे. टोलवसुलीला सुरुवात करण्यापूर्वी संबंधित टोलधारी रस्त्यावर किती खर्च केला, त्या रस्त्याची गुणवत्ता काय, रस्ता बांधल्यानंतर तो किती दिवस सुस्थितीत राहू शकेल, टोलवसुलीची मुदत वा कालावधी किती असेल या बाबी आजवर काळ्या डांबराच्या छायेखाली दडलेल्या असायच्या वा आजघडीला त्या तशाच दडवून ठेवण्यावर शासनकर्त्यांचा भर असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे, ‘बीओटी’ अर्थात बांधा, वापरा अन् हस्तांतरित करा हा प्रयोग सुरू झाल्यानंतर त्याचे एक-एक किस्से आता उजेडात येऊ लागले आहेत. या बांधा, वापरा अन्् हस्तांतरित करण्यामध्ये कुणीतरी मंत्री असतो नाही तर त्याचा मुलगा, मुलगी, सून अथवा लांबचा सोम्या-गोम्या नातेवाईक यांची भागीदारी असते. राज्यामध्ये शिवसेना-भाजप युती सत्तारूढ असताना मुंबईत आणि मुंबईबाहेर मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल उभारणीची कामे हाती घेण्यात आली होती. रस्ते वा उड्डाणपुलांच्या कामांचा झपाटा पाहता, तसेच ही कामे नाशिकस्थित एका बिल्डरला दिली गेल्यामुळे दीड दशकापूर्वीही नाशिकच्या नावाचा बोलबाला देशपातळीवर झाला होता. हा अगदी अलीकडचा इतिहास नजरेआड करून मुळीच चालणार नाही. हे नमूद करण्याचे कारण एवढेच की, टोलवसुलीचा फंडा नवीन नाही. पण टोलच्या नावाखाली कोण कशी अन् कोणत्या पद्धतीने व किती प्रमाणात वसुली करतो हा खरा कळीचा मुद्दा आहे.
या एकूण पार्श्वभूमीवर टोलवसुलीचा अर्थात पथकर वसुलीबाबतचा कळीचा विषय राज ठाकरे यांनी समयसूचकता दाखवत अतिशय योग्य वेळी उचलला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये जुंपलेली असताना तसेच दिल्लीमुक्कामी साक्षात शरदराव पवार यांच्याकरवी असंतोषाचे हलकेफुलके धमाके उडत असल्याने एकूणच देशात आणि राज्यात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी राज ठाकरे यांनी मराठी जनतेला टोल न भरण्याचे आवाहन करून लाखो मुक्याबिचा-या टोल भरणा-यांची सहानुभूती कॅश करण्याचा प्रयत्न चांगलाच यशस्वी केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ज्या ज्या भागामध्ये दरारा आहे, तेथे टोल वसुली बंद आंदोलन चांगलेच यशस्वी झाले. उदाहरणार्थ, नाशिक जिल्ह्यात तेही प्रामुख्याने नाशिक तालुका परिसरात मनसेच्या मावळ्यांनी दशकभरात पाय रोवले आहेत. नाशिक तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतून पहिल्याच धडाक्यामध्ये आमदार निवडून यावेत आणि खासदारकीच्या निवडणुकीतील उमेदवाराचा निसटता पराभव व्हावा या बाबी लक्षात घेता सबंध राज्यात खरे तर टोलवसुली बंद आंदोलनाला दूरगामी यश प्राप्त होणे अगत्याचे होते. तसे होऊ शकलेले नाही. राजकीय नेते असो की हाताखालील कार्यकर्ते, कालौघात त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये बदल ठरलेला असतो. मनसेच्या बाबतीतही उपरोक्त नियम अपवाद ठरू शकलेला नाही. कारण टोलवसुलीचे आंदोलन त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये फारसे यशस्वी होऊ शकलेले नाही. पोलिसांकरवी धरपकड सुरू होताच आंदोलनातील हवा हळूहळू गुल होत गेली, मावळे इतरत्र पांगू लागले तर काही नेतेमंडळींनी मावळ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याकामी रसच दाखवला नाही. थोडक्यात काय, तर त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली.
असो. मनसेच्या टोल वसुली बंद आंदोलनाने पथकर, त्याची वसुलीची पद्धत, तो लागू करण्याबाबतची प्रणाली, त्यातील राज्यकर्त्यांचा छुपा सहभाग आदी कधीच चर्चेत न आलेले मुद्दे चव्हाट्यावर आणण्याचे काम केले आहे. पथकर वसुलीच्या कामात जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, तोपर्यंत जनतेने कर भरू नये, असे कळकळीचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. एवढेच नाही तर जेथे टोलवसुली करताना दांडगाई केली जाईल, तेथे मनसेचे कार्यकर्ते मदतीला धावून जातील, असा दिलासाही दिला होता. आंदोलन अन् तेही ठाकरे यांचे म्हटल्यानंतर घोषणेच्या दिवशी ठिकठिकाणच्या टोलनाक्यांवरून वाहने पैसे न भरताच सोडली गेली. आंदोलन प्रभावहीन होऊ लागले तसे वसुली करणा-यांचीही मुजोरी वाढत गेली. पुन्हा पहिले पाढे पंचावन्नगत एकूण स्थिती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अकाली जाणवलेल्या हृदयाच्या ठोक्याने मनसेच्या ठाकरेंचा जीव टांगणीला लागला. त्यांंच्या शुश्रूषेमध्ये हे गुंतले अन् त्यातच टोलवसुलीचा प्रश्नही लांबणीवर पडला. प्रत्येक टोलनाक्यावरून जाणा-या वाहनांची गणती करणे वा त्यापोटी वसूल होणारी रोकड याची गोळाबेरीज करणे एवढेच या घडीला आता मागे उरले आहे...!