आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताडोबातील ‘रा’डोबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात प्रचंड दुष्काळ असताना महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी सज्ज असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुष्काळाने त्राही त्राही झालेल्या माणसांपेक्षा वाघांचाच अधिक कळवळा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करू, असे जाहीर केल्यावरही ते त्यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसवर जाऊन राहिले व आतादेखील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्याऐवजी ते ताडोबाच्या दौ-यावर गेले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांना मात्र स्थानिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत. सातारा जिल्ह्यातील मनसेच्या एका कार्यकर्त्याने अत्यंत उद्वेगाने ही व्यथा प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
वाघांची शिकार होत असल्याने त्यांची संख्या कमी होतेय हे निश्चितच चिंताजनक आहे. ताडोबासह अन्य अभयारण्यांमध्येही वाघांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जात आहे आणि यामध्ये वन खात्यातील अधिकारीही सामील असल्याचे आढळून आले आहे. मात्र यासाठी ठाकरे यांनी एखादी वाघ वाचवण्याची योजना तयार करून ती आपल्या आमदारांकरवी राज्य सरकारला मान्य करणे भाग पाडायला हवे होते, अशी चर्चा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. परंतु तसे न करता एखादी पिकनिक काढावी अशा पद्धतीने ते ताडोबाला मीडियासह संपूर्ण फौजफाटा घेऊन गेले आणि आपले प्रत्येक पाऊल वाहिन्यांवर कसे दिसेल याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. अभयारण्यात फिरताना वन खात्याचे नियम पाळायचे असतात; परंतु राज ठाकरे यांना मात्र या नियमांचा सोयीस्करपणे विसर पडल्याचेच त्यांच्या या दौ-यात दिसून येत आहे. या दौ-यात वनमंत्री पतंगराव कदम यांना वाघांपेक्षा जमिनींमध्ये रस असल्याची टीका केली होती. तसेच या दौ-याचे राजकारण करणार नाही, असे सांगूनही तसे करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
राज ठाकरे यांना एखाद्या समस्येविषयी विचारले की राग येतो. त्यांना जे हवे तेच पत्रकारांनी विचारावे असा त्यांचा कल असतो. त्यामुळेच नक्षलग्रस्त विभागात मारल्या गेलेल्या निरपराध नागरिकांबद्दल काही बोलत का नाही असे विचारता ते चिडले आणि त्यांनी देशात माणसाचे मरण स्वस्त झाले असल्याचे सांगून सगळे प्रश्न मीच सोडवू का, असा प्रतिप्रश्न केला. ठाकरे यांना कधीही असे प्रश्न विचारले की, माझ्या हातात सत्ता नाही मग माझ्याकडून अपेक्षा का करता, असा प्रतिप्रश्न ते विचारतात. मात्र कधीही एखादा प्रश्न समजून घेऊन त्याबाबत उत्तर देत नाहीत. असे असताना ते महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे करणार, ही त्यांच्यावरील टीका आता त्यांच्या काही समर्थकांनाही मान्य होऊ लागली आहे. दुष्काळग्रस्तांना ताबडतोब मदत करावी असे आदेश त्यांनी आपल्या पदाधिका-यांना दिले होते. मात्र मनसेने किती ठिकाणी दुष्काळग्रस्तांना मदत केली याची काहीही माहिती उपलब्ध नाही. पदाधिका-यांना फोटो पुरती आणि बातम्या येण्यासाठी मदत करू नका असा इशारा त्यांनी दिला. मात्र ताडोबाला ट्रेनने जाणार असल्याची बातमी मीडियाला पोहोचवून दौरा चर्चेत कसा राहील याची पुरेपूर काळजी घेतली. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान...’ ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडते, अशी टीका त्यामुळेच त्यांच्याबाबत सर्वच राजकीय पक्षांमधून केली जात आहे.