आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद यादव जयप्रकाश होतील का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपविरोधी प्रयोगात शरद यादव जयप्रकाशांची भूमिका बजावू शकतील काय? या प्रश्नाचं उत्तर काळाच्या पोटात दडलेलं आहे. राजकारण ही खूप ठिसूळ  प्रक्रिया असते. त्यात काय काय घडेल हे सांगता येत नाही. पण शरद यादव हे अभ्यासू, लढाऊ आणि चारित्र्यवान नेते आहेत. हवाला पैसा देवघेवीत नाव आलं तर त्यांनी तत्काळ  खासदारकी सोडली होती. ते सत्तेमागे पळणारे नेते नाहीत. सत्तेला अंगावर घेणारे आहेत. सर्व पक्षांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटताना दिसतोय. 

जनता दल युनायटेडचे खासदार शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह देशभरातील समविचारी पक्षांनी ‘सांझी विरासत बचाव’ आंदोलन सुरू केलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपच्या बगलेत गेले आणि शरद यादव यांनी भाजपविरोधी ही आघाडी गतिमान केली. काँग्रेसला ते हवंच होतं. सध्या काँग्रेसला वाईट दिवस आलेत. प्रभावशाली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रथ अडवायचा तर एकटे राहुल गांधी, एकटी काँग्रेस पुरी पडणार नाही, हे वास्तव काँग्रेसवाल्यांच्या लक्षात आलंय. म्हणून खुद्द राहुल गांधींनी दिल्लीत झालेल्या पहिल्या ‘सांझी विरासत बचाव’ संमेलनाला हजेरी लावली होती. या अभियानात भाजपेतर १८ पक्ष एकत्र आलेत.  

दिल्लीपाठोपाठ सांझी विरासतची जयपूर, इंदूर, अहमदाबाद या ठिकाणी मोठमोठी संमेलनं झाली. मुंबईत २७ ऑक्टोबरला संमेलन झालं. त्याला लोकांचा प्रतिसाद चांगला होता. षण्मुखानंद हॉल गर्दीने तुडुंब भरला होता. देशभर विविध राज्यांतल्या मोठमोठ्या शहरांत अशी संमेलनं होणार आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपविरोधी वातावरण तापवत न्यायचं, त्यासाठी १९७७ मध्ये जसं काँग्रेसविरोधी, इंदिरा गांधी यांच्या एकछत्री नेतृत्वाविरोधात ‘जनता प्रयोग’ झाला होता तसा प्रयोग मोदींविरोधात करायचा. जनता प्रयोगात काँग्रेसविरोधाच्या असंतोषाचा चेहरा म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण यांना पुढे करण्यात आलं होतं. तसं भाजपविरोधी, मोदींविरोधी बंडाचं नेतृत्व शरद यादव यांच्या गळ्यात टाकून त्यांना दुसरा जयप्रकाश बनवायचा अशी ही रचना दिसतेय.  

या रचनेचा भाग म्हणून मुंबईत जनता दल युनायटेडचे राज्य अध्यक्ष आमदार कपिल पाटील व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ‘सांझी विरासत संमेलन’ घेतलं होतं. राज्यभरातून कार्यकर्ते, प्रतिनिधी संमेलनात सहभागी झाले होते. मंचावर शरद यादव, कॉम्रेड सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर, काँग्रेसचे नेते खासदार आनंद शर्मा, खासदार अशोक चव्हाण, कॉम्रेड डी. राजा, खासदार अन्वर अली, झारखंड विकास मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार जयप्रकाश यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी, जनता दल युनायटेडच्या शेतकरी नेत्या सुशीला मोराळे, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुकेन्दु शेखर रॉय, लोकदलाचे नेते संजय अजित चौधरी या नेत्यांचा समावेश होता.  

संजय निरुपम यांनी सुरुवातीला संमेलनाची भूमिका सांगितली. ते म्हणाले, ‘सांझी विरासत म्हणजे आपल्या सगळ्यांची संयुक्त विरासत. सर्वांचा वारसा. हजारो वर्षे आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहतोय. विविध धर्म, हजारो जाती, अनेक पंथ, विभाग या सर्व विविधतेत आपण भारतीय होऊन जगतोय. या संयुक्त वारशाला साडेतीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने धक्के मारायला सुरुवात केली. सत्तेची नशा त्यांना एवढी चढली की ते विकासाच्या नावावर मते मिळालीत हे विसरले आणि या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवायला सुरुवात केली. हा अजेंडा देश, समाज तोडण्याचा आहे. देश वाचवण्यासाठी या मंचावर १८ पक्ष एक झालेत. आम्ही मिळून २०१९ ला भाजपला हरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतल्या या पाचव्या सांझी विरासत संमेलनात भाजपला धूळ चारण्याचा निर्धार करूयात.’ निरुपम यांनी संमेलनाचा संदेशच सांगितला. त्यानंतर कपिल पाटील यांनी शरद यादव यांचं म. फुले पगडी, घोंगडी देऊन स्वागत केलं. शरद यादवांनी डोक्यावरची फुले पगडी समारंभात शेवटपर्यंत ठेवली होती. त्यानंतर सीताराम येचुरींसह इतर नेत्यांचाही घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.  सत्कारानंतर प्रमुख नेत्यांची मनोगतं सुरू झाली. त्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार सुकेन्दू शेखर रॉय म्हणाले, ‘मी बंगालच्या उपसागराच्या काठावरनं मुंबईत पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निरोप घेऊन आलोय. ममतादीदी म्हणाल्या की, सांझी विरासत संमेलनास बंगाली जनतेच्या शुभेच्छा आहेत. सांझी विरासत म्हणजे आपलं संविधान. हे संविधान भाजप सरकारने मोडीत काढण्याचा डाव टाकलेला आहे. तो सारे भारतीय मिळून हाणून पाडूयात. या आंदोलनात सारी बंगाली जनता आपल्यासोबत आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीत तृणमूल काँग्रेस नेहमी पुढे राहील.’
 
सुकेन्दू शेखर यांनी बंगाली जनतेचा निरोप संमेलनात सांगितल्यानंतर तारिक अन्वर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘साडेतीन वर्षांपासून देशात धर्माच्या नावावर फक्त देश तोडण्याची कृती होतेय. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, काशीतली हिंदू युनिव्हर्सिटी, पुण्यातली फिल्म इन्स्टिट्यूट, अलिगड विद्यापीठ, मुंबई विद्यापीठात रा. स्व. संघाच्या दबावाखाली कुलगुरू, संस्थाप्रमुख काम करतात. विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवतात. शिक्षणाचं संघीकरण करतात. गुजरात, उत्तर प्रदेशात गोरक्षक दलितांना टार्गेट करतात. उघडं-नागडं करून मारतात. विद्यार्थ्यांना गायब केलं जातं, रोहित वेमुलाला आत्महत्या करायला भाग पाडणारं वातावरण तयार केलं जातं. या घटना म्हणजे संविधानाला मोडीत काढण्याची पावलं आहेत. ही पावलं रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन संघाच्या अजेंड्याला विरोध केला पाहिजे.’ 
 
कम्युनिस्ट नेते डी. राजा यांनी तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच टार्गेट केलं. ते म्हणाले, ‘हा माणूस मुख्यमंत्री आहे की पुजारी? रामाची शेकडो लेकरं ऑक्सिजनशिवाय यांच्या राज्यात मरतात. रामाला किती दुःख होत असेल? लेकरांना दवाखान्यात हा मुख्यमंत्री ऑक्सिजन देऊ शकत नाही. मात्र, अयोध्येत शरयू नदीच्या काठी रामाचा भव्य पुतळा उभारण्याच्या घोषणा हा मुख्यमंत्री करतो. त्यासाठी करोडो रुपये देण्याचा निर्णय घेतो. याला काय म्हणावे? हे धार्मिक लोक आहेत की नरभक्षक? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यांना मोडीत काढायचं आहे. त्यांच्या या मनसुब्यांना हाणून पाडूयात.’ 
अशोक चव्हाण यांनी या संमेलनात प्रभावी भाषण केलं. त्यांच्या चेहऱ्यावर, देहबोलीत नांदेड विजयाची यशाची झलक दिसत होती. ते म्हणाले, ‘आम्ही नांदेडमध्ये भाजपला ३ नगरसेवकांवर आणून भुईसपाट केलं. दलित, मुस्लिम, शेतकरी, गरीब जनता आता भाजपच्या ढोंगाला वैतागली आहे. नोटाबंदी, जीएसटी, पेट्रोल-डिझेल महागाई, बेरोजगारी यांमुळे त्रस्त जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा वीट आलाय. मोदी म्हणतात, चाय, चाय.. योगी करतात, गाय, गाय.. लोक म्हणू लागलेत, बाय बाय..! लोक २०१९ च्या निवडणुकांत भाजपला बाय करणार आहेत. त्यासाठी सर्वांनी एक झालं पाहिजे.’ 

राजू शेट्टी यांनी या वेळी सांगितलं की, भाजपने शेतकऱ्यांना फसवलं. भाजपच्या लोकांनाच फक्त अच्छे दिन आलेत. बाकी कष्टकरी, कामगारांना या सरकारने पीडा दिलीय. शेतीमालाला किफायतशीर भाव, दरवर्षी दोन कोटी रोजगार ही आश्वासनं न पाळता दररोज नवनव्या पोकळ घोषणा करणाऱ्या  सरकारला जनता विटली आहे.’ राजू शेट्टींच्या भाषणाला लोक टाळ्यांनी दाद देत होते.  

या संमेलनात आनंद शर्मा, सीताराम येचुरी, शरद यादव यांची भाषणं मोदी सरकारवर हल्ला चढवणारी होती. गेल्या ७० वर्षांत एवढं वाईट सरकार भारतीय जनतेनं पाहिलं नव्हतं, अशी साऱ्यांची मांडणी होती. शरद यादव यांच्याभोवती सर्व विरोधी पक्ष एकत्र करायचे आणि २०१९ ला मोदी, भाजपला हरवायचं असा सगळ्यांचा निर्धार दिसला. काँग्रेसच्या पुढाकाराने एकत्र आलेल्या अशा या मंचावर राजू शेट्टी पहिल्यांदा दिसले. शेट्टी यांचं राजकारण काँग्रेसविरोधी राहिलंय. शरद यादव हेही समाजवादी नेते व डॉ. राममनोहर लोहियांचे शिष्य. लोहिया, यादव, जयप्रकाश हे काँग्रेसविरोधी राजकारण करणारे नेते. पण आज समीकरणं बदलली. भाजप काँग्रेसपेक्षा बदतर झाल्याची शरद यादवांची मांडणी आहे. २००४ मध्ये सोनिया गांधींनी भाजपविरोधी पक्षांना एक करून सत्ता मिळवली होती. त्यापुढे जाऊन राहुल गांधी बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत.  

या नव्या भाजपविरोधी प्रयोगात शरद यादव जयप्रकाशांची भूमिका बजावू शकतील काय? या प्रश्नाचं उत्तर काळाच्या पोटात दडलेलं आहे. राजकारण ही खूप ठिसूळ  प्रक्रिया असते. त्यात काय काय घडेल हे सांगता येत नाही. पण शरद यादव हे अभ्यासू, लढाऊ आणि चारित्र्यवान नेते आहेत. हवाला पैसा देव-घेवीत नाव आलं तर त्यांनी तत्काळ  खासदारकी सोडली होती. ते सत्तेमागे पळणारे नेते नाहीत. सत्तेला अंगावर घेणारे आहेत. सर्व पक्षांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटताना दिसतोय. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक म्हणूनही त्यांचा अनुभव मोठा आहे. सध्याच्या घडीला भाजप विरोधकांकडे त्यांच्याइतका अनुभवी आणि विश्वासार्ह नेता कुणी नाही. या नेत्याच्या भोवती जमून विरोधक भाजपला कसं राजकीय आव्हान देतात, हे येत्या काळात बघणं कुतूहलाचं ठरणार आहे. 

- राजा कांदळकर, संपादक, लोकमुद्रा. rajak2008@gmail.com
बातम्या आणखी आहेत...