आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका तामिळी ब्राह्मणाच्या बंडाची भाषा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपला दक्षिणेत कोंडीत पकडण्यासाठी मोदी विरोधकांना कमल हासन हा मोहरा उपयोगी पडणार आहे. कमल म्हणजे कमळ. दक्षिणेत कमळ विरुद्ध कमल अशी लढाई उभी राहणार हे उघड आहे. कमल हासन यांनी बंड तर केलंय, त्या बंडाची भाषा आणि दिशाही स्पष्ट केलीय. 


ख्यातनाम अभिनेता व पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले कमल हासन यांनी ‘हिंदू कट्टरवादा’विरुद्ध नापसंती व्यक्त केली आणि ते चर्चेत आले. एक मित्र चर्चेत म्हणाला, ‘कमल हासन मुस्लिम आहे काय?’ मी म्हणालो, ‘मुस्लिम नाही. तो तर ब्राह्मण आहे.’ ‘ब्राह्मण असून एवढे धाडस!’ ही मित्राची प्रतिक्रिया. 


कमल हासन ब्राह्मण असूनही हिंदू कट्टरवादाच्या विरुद्ध भूमिका घेतो यात आश्चर्य वाटायचं खरं तर काही कारण नाही. भारतात बंडखोर ब्राह्मणांची खूप मोठी परंपरा आहे. पं. जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट ही काही पटकन समोर येणारी नावं आहेत. त्यांनी सर्व धर्मांतल्या अतिरेकी प्रवृत्तींना नेहमीच विरोध केला. धर्मनिरपेक्षता आणि संवादाचा आग्रह धरला. कमल हासन त्याच वाटेने जात आहेत एवढेच म्हणता येईल. तामिळी ब्राह्मणांमध्येही बंडखोरीची, वेगळी वाट चालण्याची परंपरा आहे. ती परंपरा कमल हासन चालवताहेत. कमल हासन राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांना ‘आप’मध्ये येण्याचं निमंत्रण देताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राजकारण मला पसंत नाही हे कमल हासन यांनी जाहीर केलंय. काँग्रेस पक्षावर किंवा राहुल गांधींबद्दल मात्र त्यांनी अजून काही मत व्यक्त केलेलं नाही. कमल हासनसारखेच तामिळनाडूत रजनीकांत हे लोकप्रिय अभिनेतेही राजकारणात येऊ पाहताहेत. 


कमल हासन आणि रजनीकांत हे दोघे एकत्र येऊन तामिळ राजकारणात प्रस्थापित अण्णाद्रमुक आणि करुणानिधींचा द्रमुक या दोन पक्षांना पर्यायी तिसरा पर्याय तयार करतात की दोघे वेगवेगळे पक्ष काढतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा रजनीकांतला भाजपमध्ये ओढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याला अजून रजनीकांत यांनी प्रतिसाद दिलेला नसला तरी भाजपशी संवादाचे दरवाजे त्यांनी उघडे ठेवलेले दिसतात. 


जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळ राजकारणात नेतृत्वाची एक पोकळी आहे. ती भरून काढण्याची संधी कमल हासन यांना आहे. कमल हे विचारी व्यक्ती आहेत. राजकारणात येणारे नट, नट्या केवळ प्रसिद्धीच्या जोरावर फार काळ टिकत नाहीत. टिकल्या तरी फारशा प्रभावी राजकारणी ठरत नाहीत हे अमिताभ बच्चन, हेमामालिनी, रेखा, विनोद खन्ना, गोविंदा यांच्या राजकीय कारकीर्दीतून स्पष्ट झालं आहे. रजनीकांत हे जरी लोकप्रिय असले तरी त्यांच्याजवळ वैचारिक बैठक नाही. त्यामुळे त्यांची गत अमिताभ बच्चन, गोविंदासारखी होणारच नाही असं नाही. 


तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांत मात्र विचारी अभिनेते राजकारणात येऊन त्यांनी इतिहास घडवल्याची उदाहरणे आहेत. तामिळनाडूत अभिनेते एम. जी. रामचंद्रन, अभिनेत्री जयललिता यांनी प्रभावी राजकारण केलं. आंध्रात तेलगू देसम पक्ष काढून अभिनेते एन. टी. रामाराव यांनी स्वतःचा प्रभाव पाडला. कमल हासन यांची वैचारिक बैठक बघता त्यांना एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव, जयललिता यांच्यासारखी महत्त्वाची भूमिका बजावता येऊ शकेल. चेन्नई आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी ते प्रभावी ठरू शकतील. 


अलीकडच्या काळात राजकारणाचे नवे वेगवेगळे व्यक्तिकेंद्रित पॅटर्न विकसित झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’चा प्रयोग आहे. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या राजकीय पक्षाचा ‘तेहरिक-ए-इन्साफ’चा प्रयोग आहे. असा नवा प्रयोग केला तर कमल हासन कोणत्या वाटेने जातील? ते तामिळनाडूचे केजरीवाल बनतील की दक्षिणेच्या राज्यातले इम्रान खान बनतील हे आताच सांगता येणार नाही. पण त्यांचा प्रभाव तामिळनाडूपुरता मर्यादित न राहता तो तामिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक या पाचही राज्यांवर पडेल हे आता म्हणायला जागा आहे. कारण मी राजकारणात उतरणार हे फक्त त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ३३ कोटी रुपये जमा करून दिले. अर्थात, ते त्यांनी परत करण्याची घोषणा केली. पण त्यांच्या चाहत्यांचा त्यांना किती मोठा पाठिंबा आहे हे त्यातून दिसतं. 


कमल हासन यांनी राजकारणाच्या मैदानात उतरताना स्पष्ट केलं की, भ्रष्टाचार, हिंसाचार आणि कट्टरवाद याला विरोध करीन. हिंदू धर्म भारतात मोठ्या भावाची भूमिका निभावतोय. मोठ्या भावाने इतरांना सांभाळून घ्यावे. इतर धर्मात कट्टरवाद आहे तोही वाईटच. पण हा कट्टरवाद निपटून काढण्याचे काम पोलिस आणि इतर यंत्रणांचे आहे. त्यांना त्यांचे काम करू द्यावे. हिंदू धर्मातल्या अतिरेकी गटांनी कायदा हातात घेऊ नये. त्यामुळे देशाच्या एकात्मतेला तडे जातात, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलीय. 


तामिळनाडूत राजकारण करायचंय, पण कमल हासन यांनी द्रविड चळवळीबद्दल काही उल्लेख केलेला नाही. अण्णा दुराई आणि द्रविड मुन्नेत्र कळघम ही चळवळ द्रविड अस्मितेचा टोकाचा पुरस्कार करत आलीय. १९६० च्या दशकात तर या चळवळीने स्वायत्त तामिळनाडू राज्याची मागणी केली होती. काश्मीरमध्ये जशी उग्र आंदोलने होतात तसं त्या काळी तामिळनाडूत वातावरण तापलेलं होतं. त्या चळवळीतून द्रमुक पक्ष उभे राहिले. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन हे नेते त्या चळवळीत घडले. करुणानिधी हे पटकथालेखक, तर रामचंद्रन हे अभिनेते होते. रामचंद्रन यांनीच पुढे स्वतःची राजकीय वारस म्हणून जयललितांना पुढे आणलं. 


तामिळनाडूत चित्रपट क्षेत्र आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रं हातात हात घालून चालतात. तामिळ माणूस अभिनेत्यांना नेता म्हणून बघतो आणि राजकीय नेत्यांनी अभिनेत्यांसारखं वागावं, असा हट्ट धरतो. म्हणून त्या राज्यात ही दोन्ही क्षेत्रं कमालीची लोकप्रिय आहेत. 


तामिळनाडूचं राजकारण ‘हिंदी’विरोध, दिल्ली विरोधावर जोर देणारं आहे. कमल हासन यांनाही त्या वाटेनेच जावं लागेल की ते नवी भूमिका घेणार हे अजून अस्पष्ट आहे. कमल हासन यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी या दोघांचा उल्लेख केला. या दोघांना ते वैचारिक आयकॉन मानतात. विवेकानंद हे दाक्षिणात्य, बंगाली असून देशभर त्यांना स्वीकारलं गेलं. म. गांधी हिंदू गुजराती असून त्यांनाही देशाचा नेता म्हणून लोकांनी मानलं. या दोन प्रतीकांमधून, महापुरुषांच्या विचारातून कमल हासन यांनी संकुचित प्रादेशिकतावाद, धार्मिक कट्टरवाद दूर ठेवणारं राजकारण मी करू इच्छितो ही भूमिका मांडलीय. 


हिंदू कट्टरवादाविरोधात भूमिका घेतल्यानंतर कमल हासन यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी भूमिका घेणाऱ्यांना कमल यांनी सांगितलंय की, स्वामी विवेकानंद आणि म. गांधी यांच्या हिंदू धर्माचा मी पाईक आहे. हा धर्म सर्व प्रकारच्या ओंगळ विचारांना विरोध करतो. तुम्ही विवेकानंद, म. गांधींचा हिंदू धर्म मानत नसाल तर तुमच्या हिंदू असण्याबद्दल शंका घेतली पाहिजे. 


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपला दक्षिणेत कोंडीत पकडण्यासाठी मोदी विरोधकांना कमल हासन हा मोहरा उपयोगी पडणार आहे. कमल म्हणजे कमळ. दक्षिणेत कमळ विरुद्ध कमल अशी लढाई उभी राहणार हे उघड आहे. कमल हासन यांनी बंड तर केलंय, त्या बंडाची भाषा आणि दिशाही स्पष्ट केलीय. आता हे एका तामिळी ब्राह्मणाचं बंड सुफळ संपूर्ण किती होईल, कसं होईल हे येत्या काळात पाहायचं. 

 

- राजा कांदळकर,  संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...