आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर मेळावा : राजकारण बदलेल काय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज अहमदनगर जिल्ह्यात चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी राज्यातला धनगर समाजाचा मेळावा भरत आहे. या मेळाव्यात धनगर आरक्षणाच्या मागणीचं पाऊल पुढे पडलं तर या समाजात योग्य राजकीय संदेश जाईल. त्या दृष्टीने या मेळाव्यात काय घडतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९२वी जयंती महाराष्ट्रात आज ३१ मे रोजी धूमधडाक्यात साजरी होत आहे. दरवर्षी ३१ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यात चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी राज्यातला धनगर समाज बहुसंख्येने जमतो. भक्तिभावानं अहिल्यादेवींच्या प्रेरक चरित्राचं जागरण करतो. त्यापासून स्फूर्ती घेतो. यावर्षीही आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठा मेळावा होतोय. मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून धनगर समाजातले सर्व आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, विविध पक्षांचे राजकीय कार्यकर्ते इथे उपस्थित होणार आहेत. या वेळी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री एस. पी. सिंग बघेल हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अण्णा डांगे, खासदार डॉ. विकास महात्मेही आहेत. चोंडीचा मेळावा हा समाजाचा एकोपा आणि राजकीय जागृती दर्शवणारा कार्यक्रम असतो. गेल्या पाच वर्षांत धनगर समाज अधिक संघटित होऊन राज्याच्या राजकीय वातावरणात स्वत:ची जागा शोधताना दिसतोय. अनुसूचित जातीत समाविष्ट करा (एस. टी. आरक्षण द्या), या मागणीने जोर धरल्यानंतर धनगर समाजातील तरुण पिढी मोठ्या संख्येनं राजकीयदृष्ट्या जागृत झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाने माेठमोठी आंदोलनं उभी केली होती. त्यातलं बारामती (जि. पुणे)चं आंदोलन वादळी ठरलं होतं. या आंदोलनातून जागी झालेली धनगर समाजातील तरुणांची नवी पिढी आरक्षण नाकारणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात बंड करती झाली. भाजपचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी, भाजप सरकार आले की पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देऊ, या आश्वासनामुळे हा समाज एकमुखी भाजपमागे एकवटला होता. आरक्षणाचं आंदोलन उभारून आणि भाजपची सोबत देऊन धनगर समाजाने राज्याच्या सत्ताबदलात आपला वाटा उचलला होता. ही कृती धनगर समाजाची राजकीय जाणीव टोकदार होतेय, हे दर्शवणारी व आत्मविश्वास दुणावणारीही ठरली. 
 
खरं तर राज्यात जनसंघाचे नेते वसंतराव भागवत यांनी सत्ताधारी काँग्रेसविरोधात माळी, धनगर, वंजारी (माधवं) एकजुटीचा फॉर्म्युला मांडला. त्यातून अण्णा डांगे, प्रा. ना. स. फरांदे आणि गोपीनाथ मुंडे हे नेते पुढे आले. त्या काळापासूनच धनगर समाज संघटित, जागृत व्हायला सुरुवात झाली होती. आधी जनसंघ, नंतर भाजपने ठरवून धनगर समाजात काम उभे केले होते. माधवं जागृतीमुळे भाजपला राज्यात पाय रोवता आले. माधवं फॉर्म्युल्यातल्या माळी व वंजारी या जातींनी जागृत होऊन सत्तेत आपला लक्षणीय वाटा पदरात पाडून घेतला. त्या तुलनेत धनगर समाजाला त्याच्या संख्येच्या, स्थानाच्या प्रमाणात वाटा मिळत नव्हता, ही टोचणी वाढत होती. या टोचणीचं अस्वस्थतेत रूपांतर होऊन पुढे आरक्षणाचं आंदोलन जन्माला आलं. 
आरक्षण ही या समाजाची प्रमुख मागणी असली तरी धनगर समाजाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडलेले आहेत. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती व शेळी-मेंढीपालन हा आहे. शेतकरी म्हणून जे प्रश्न इतर समुदायांचे आहेत त्यात धनगर समाजही भरडला जातोच आहे. मेंढपाळ म्हणून असणारे प्रश्नही तेवढेच भीषण आहेत. शेळ्या-मेंढ्यांना चारा न मिळणं, पाऊस कमी होतो त्यातून चराईची रानं कमी होणं, त्यामुळे चाऱ्याच्या शोधात मेंढ्या-शेळ्या घेऊन कुटुंबासह भटकंती वाढणं, पूर्वी सहा महिन्याची चारणी करावी लागे, आता वर्षभर मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्या-घोडे-मुलंबाळं घेऊन रानावनात भटकंती करावी लागते. त्यातून सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात. रानावनात भटकणाऱ्या या मेंढपाळांपर्यंत पोलिस पोहोचत नाहीत. त्यामुळे या समाजाची लुबाडणूक करणारे गैरफायदा घेतात. “ख्वाडा’ या चित्रपटाने मेंढपाळांचे अनेक प्रश्न मांडले. 
 
या पार्श्वभूमीवर मेंढपाळांना पोलिस संरक्षण द्या, शेळ्या-मेंढ्यांना चरायला वनजमिनी भाड्याने द्या,  शेळ्या-मेंढ्यांची खरेदी वजनावर, मटणाच्या बाजारभावानुसार करा, मेंढपाळांच्या मुला-मुलींना अनुसूचित जातीतल्या मुलांसारख्या शैक्षणिक सवलती द्या, शेळ्या-मेंढ्यांना आणि मेंढपाळ कुटुंबाला विमा सवलत द्या, शेळ्या-मेंढ्यांसाठी आरोग्य सुविधा पुरवा अशा मागण्या या समाजातून पुढे येत आहेत. हे प्रश्न सरकार सोडवत नाहीत त्या रागातून मग आरक्षणाच्या मागणीमागे या समाजाचा असंतोष एकवटलेला दिसतोय. 
 
आरक्षण आणि इतर प्रश्न यामुळे धनगर समाज अस्वस्थतेतून राजकीयदृष्ट्या संघटित होतोय. त्याचं प्रतिबिंब चोंडीच्या मेळाव्यात दिसणार आहे. चोंडीचा मेळावा सर्वपक्षीय व्हावा यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी प्रयत्न केले आहेत. राम शिंदे हे चोंडी गावचे नागरिक आहेत. आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली चोंडीचा मेळावा होतोय. चोंडी हे अहिल्यादेवींचं जन्मगाव. अहिल्यादेवी धनगर समाजाला प्रेरणा देणारं एक प्रतीक आहेत. सुभेदार मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींचा राज्यकारभार, लोककल्याणकारी कामं याचा स्वाभाविकपणे धनगर समाजाला अभिमान आहे. या मेळाव्यात धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार, हे उघड आहे. भाजप सरकार राज्यात सत्तेत येऊन अडीच वर्षे झालीत. केंद्रात तीन वर्षे भाजप सरकार आहे. एवढा मोठा कालावधी उलटला तरी आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाहीय. आरक्षणाचा प्रश्न तर सुटत नाहीच, उलट आरक्षण कधी मिळणार, असा सवाल करणाऱ्यांना राज्य सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी उलटसुलट उत्तरं दिली होती. जानकर हे धनगर समाजाच्या ताकदीवर राजकारणात आले. आता ते या समाजाचे नेते म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे सोडून “मी काही धनगरांमुळे मंत्री झालो नाही. मला बारामतीच्या धनगरांनी मतं दिली नाहीत’, अशी वादग्रस्त, डिवचणारी विधानं करून जानकरांनी कारण नसताना समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. स्वाभाविकपणे धनगर समाजाचा राग भाजप सरकारविरोधात व्यक्त होत आहे. 
 
राज्यात धनगर समाजाची संख्या जवळपास दीड कोटीच्या आसपास आहे. राज्यातल्या १५० विधानसभा मतदारसंघांत या समाजाची संख्या दखलपात्र आहे. राजकीयदृष्ट्या संघटितपणे एखाद्या पक्षाच्या मागे उभी राहण्याची या समाजाची वर्तन परंपरा आहे. माजी मंत्री शिवाजीराव शेडगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेससोबत राहत असे. अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने भाजप-शिवसेनेला १९९५मध्ये साथ दिली होती. त्यानंतर मधल्या काळात हा समाज शरद पवारांच्या सोबतही दिसला. मात्र, २०१४ नंतर हा समाज भाजपमागे एकवटला. भाजपनेही शिंदे, जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपदं दिली. डॉ. विकास महात्मेंना खासदार केलं. जिल्हा परिषद, पंचायत समितीत या समाजाला तिकिटं दिली. या सर्व घुसळणीतून हा समाज स्वत:चा सत्तेतला वाटा मागतोय. स्वत:ची राजकीय ओळख ठसवू बघतोय. बहुजन समाजातली एक महत्त्वाची जात असलेला हा समाज जागा होणं ही महत्त्वाची घटना आहे. समाजाच्या या जागृतीला सोबत घेऊन स्वत:चं नेतृत्व अधिक प्रगल्भ करण्याची संधी महादेव जानकरांकडे चालून आली होती, पण त्यांनी स्वकर्माने ती ठोकरल्याचं दिसतंय. जानकर समाजातल्या प्रवाहातून बाजूला पडत असताना राम शिंदे यांनी चोंडीत सर्व पक्षातले नेते आपल्या सोबत आहेत, हे स्पष्ट केलंय. जलसंधारण मंत्री म्हणून त्यांच्या कामाची मीडियात चर्चा आहे. शिंदे यांनी जानकरांवर मात करत भाजपमध्येही स्वत:चं बहुजन नेता हे स्थान पक्कं केलंय. चोंडीच्या मेळाव्यात आरक्षणाच्या मागणीचं पाऊल पुढे पडलं तर या समाजात योग्य राजकीय संदेश जाईल. त्या दृष्टीने या मेळाव्यात काय घडतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 
 rajak2008@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...