आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांच्या राशीला मेहता, देसाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आणि अधिवेशन कारणी लागले, असं सांगितलं आहे, पण या अधिवेशनात विरोधकांनी सरकारचे दोन मंत्री गंभीर घोटाळ्यात अडकल्याचे आरोप करून फडणवीस सरकारला चांगलेच अडचणीत आणले आहे.  

ही अडचण किती चिघळू शकते याची झलक उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या नाटकाने दिसली.
देसाई व मेहता या दोघांनीही राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे दिले होते, पण ते स्वीकारले नाहीत. दोन्ही मंत्र्यांना फडणवीसांनी वाचवले आहे. पण हे प्रकरण पुढे फडणवीस यांना जड जाईल, असे दिसतंय. कारण यातल्या मेहतांच्या घोटाळ्याच्या आरोपात एमपी मिल येथील झोपू योजनेच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे, असा शेरा लिहिलेला आहे. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती दिली गेली होती किंवा नाही याविषयी विधिमंडळात आरोप- प्रत्यारोप झाले. विधान परिषदेत तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या युक्तिवादावेळी सरकारला सभागृहातून सभात्याग करावा लागला होता, ही सरकारची खूप मोठी नाचक्की होती. कारण इतिहासात पहिल्यांदा असा सभात्याग सरकार पक्षाला करावा लागला होता.
 
मेहता यांच्या घोटाळ्याची लोकायुक्तांमार्फत चौकशी करू आणि देसाई यांचीही स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी करू, असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे खरे; पण यातही ग्यानबाची मेख आहे. देसाई यांनी एमआयडीसीसाठी संपादित केलेली सुमारे ३२ हजार एकर जमीन परत
करण्यात घोटाळा केला, असा आरोप आहे, हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची व्याप्ती राज्यव्यापी आहे. त्याची चौकशी करायची फक्त ढोबळ घोषणा करणं, ती नेमकी कशी करणार याबाबत संशयाला मोठी वाट ठेवणं यातून मुख्यमंत्री काय संदेश देत आहेत? यामुळे विरोधकांच्या हाती कोलीत दिल्यासारखे होणार आहे.  

मेहता यांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करायची घोषणा केली; पण या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे किंवा नाही हे पुढे येण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे खुलासे , माहिती मागावी लागेल, पण मुख्यमंत्री यांची चौकशी करण्याचे अधिकार लोकयुक्तांना मुळातच नाहीत, लोकायुक्त कायद्यातच त्याची तरतूद करून ठेवली आहे, म्हणजे मेहतांच्या लोकायुक्त चौकशीत मुख्यमंत्र्यांच्या सहभागाची चौकशी होणार नाही, हे उघड आहे. म्हणून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी होती की मेहता आणि देसाई या दोघांची न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशीत ‘दूध का दूध, पानी का पानी’ हे उघड होईल, पण फडणवीसांनी दोन वेगवेगळ्या चौकशा लावून विरोधकांना आरोपबाजी करायला एक प्रकारे संधी दिली आहे.
 
देसाई आणि मेहता यांच्या राजीनामा नाट्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही सरकार पक्षातले राजकारण पुढे आले आहे. फडणवीस हे मेहता यांना वाचवण्यासाठी देसाई यांचा राजीनामा घेत नाहीत, एकमेकांना वाचवण्यासाठी हा खेळ सुरू आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. या प्रकरणात फडणवीसांची मजबुरी पुढे येताना दिसतेय. एकनाथ खडसे यांच्या वेळी भ्रष्टाचाराविरोधात बाणेदार भूमिका घेणारे फडणवीस मेहता यांना का वाचवत आहेत की दिल्लीतून कुणी नेते मेहतांना वाचवण्याचा संदेश देताहेत, याबद्दल आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

मुळात हे समजून घेतलं पाहिजे की, प्रकाश मेहता ही काही साधीसुधी असामी नाही. ते मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक लॉबीचे वजनदार नेते आहेत. या लॉबीने भाजपला सतत पक्ष चालवण्यासाठी पैसे पुरवले आहेत. भाजपला दिल्लीपर्यंत निधी मुंबईतून जातो, ज्या वेळी भाजपची राज्यात आणि केंद्रात काही ताकद नव्हती, अशा अडचणीच्या काळात मेहता आणि त्यांच्या लॉबीने पक्षासाठी निधी पुरवण्याचे अवघड कार्य केले आहे, आता पक्षाला ‘अच्छे दिन’ आल्यानंतर या लोकांना दुखावण्याचा उपद्व्याप कोण करील? भाजप हा राजकारणात चाणक्याला प्रमाण मानणारा पक्ष आहे, त्यामुळे या पक्षात मेहतांसारख्या बहुउपयोगी लोकांना दुखावण्याचा अविचार दिल्लीतले नेते करणार नाहीत, असं बोललं जातंय. दिल्लीच्या वर्तुळात प्रकाश मेहता यांना विरोध कुणी करणार नसेल तर राज्यातही कुणी मेहतांविरोधात अवाक्षर काढणार नाही, भाजप
तसाही शिस्तीच्या बाबतीत खूप काटेकोर पक्ष आहे. म्हणून एकनाथ खडसे यांना जो न्याय लावला तो प्रकाश मेहता यांना फडणवीस लावणार नाहीत.
 
मेहता प्रकरणात जशी फडणवीसांची अडचण झाली त्याहीपेक्षा मोठी अडचण सुभाष देसाई प्रकरणात झाली आहे. देसाई यांच्याविषयी शिवसेनेतच मोठी नाराजी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सेनेच्या आमदारांनी देसाई यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या, सेनेत मंत्र्याविरुद्ध आमदार असा संघर्ष उभा आहे, तो हाताळताना उद्धव यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात देसाई यांचे वय झालेय, त्यांची नुकतीच पंचाहत्तरी झाली आहे. वय आणि त्यांच्यावरचे आरोप पाहता खुद्द उद्धव हे देसाई यांना पक्षकामात जबाबदारी देण्याच्या तयारीत आहेत, असे सेनेत बोलले जात आहे. असं असलं तरी देसाई त्यांच्यावरचे आरोप गंभीर असल्याने उद्धव ठाकरे राजीनामा नाट्यातही राजकारण करू पाहतात हे दिसलं. सेनेत राजीनामा उद्धव यांच्याकडे देण्याची प्रथा आहे, ती मोडून देसाई यांनी फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला, तो फेटाळला गेला, यातलं सारं अर्थात उद्धव यांच्या सांगण्यावरूनच झालं असणार, हा राजीनामा घेतला तर  मेहतांनाही वाचवता येणार नाही, ही फडणवीसांची अडचण सेनेने करून एक डाव पुढचा टाकला.  
 
एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि देसाई, मेहतांना भलताच न्याय लावून फडणवीसांनी स्वतःचीही अडचण करून घेतली आहे. आजपर्यंत फडणवीस स्वतःची प्रतिमा ‘मिस्टर क्लीन’ अशी रंगवण्यात यशस्वी झालेले आहेत, पण देसाई, मेहता प्रकरण पुढे चिघळले तर फडणवीसांना आपली पूर्वीची प्रतिमा जपण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. एका अर्थाने फडणवीस यांच्या ‘क्लीन’ राशीला मेहता आणि देसाई यांच्या घोटाळ्याच्या आरोपांची अडचण येत्या काळात उभी राहिली नाही तरच नवल!
 
 rajak2008@gmail.com
बातम्या आणखी आहेत...