Home | Editorial | Columns | Raja kandlkar write about Warakari & sai Bhakta

वारकरी, साईभक्तांना का डिवचताय?

राजा कांदळकर | Update - Oct 10, 2017, 03:00 AM IST

पंढरपूर, शिर्डी ही ठिकाणं महाराष्ट्राच्या समन्वयी सांस्कृतिक, अाध्यात्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेली केंद्रं आहेत. प

 • Raja kandlkar write about Warakari & sai Bhakta
  पंढरपूर, शिर्डी ही ठिकाणं महाराष्ट्राच्या समन्वयी सांस्कृतिक, अाध्यात्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेली केंद्रं आहेत. पंढरपूरच्या देवस्थानात राजकारण करणं किंवा साईबाबांच्या शिर्डीत त्रिशूळ आणून सबुरी आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाला नख लावणं, भक्तांच्या श्रद्धा दुखावणं या फंदात शहाण्या राज्यकर्त्यांनी पडू नये हेच सोईस्कर असतं.

  देवेंद्र फडणवीस सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या समाजघटकांची दिवसेंदिवस वाढच होताना दिसतेय. आधीच शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी रागात आहेत. मुंबईतले लोकल प्रवासी चेंगराचेंगरीने झालेल्या २३ जणांच्या मृत्यूमुळे संतप्त आहेत. पेट्रोलच्या भाववाढीने मध्यमवर्गात अस्वस्थता आहे. जीएसटीने छोटे व्यापारी चिडलेत. त्यात आता वारकरी आणि शिर्डीच्या साईबाबांचे भक्तही सरकारवर संताप व्यक्त करत आहेत. वारकरी आज १० ऑक्टोबरला मुंबईत आझाद मैदानात जमून सरकारचा टाळ-मृदंग वाजवून हरिनामाचा गजर करत निषेध करणार आहेत. तिकडे शिर्डीत साईभक्त पत्रकं काढून निषेध नोंदवताहेत. सरकार साईबाबांच्या स्मृती शताब्दी वर्षात बाबांच्या विचाराला मारक कृती करतंय, आमच्या श्रद्धा-भावनांना डिवचतंय, असा साईभक्तांचा रोष व्यक्त होतोय.
  वारकरी का आंदोलन करताहेत?

  वारकऱ्यांनी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मागणी केली होती की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर राजकारण्यांना न घेता वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी. वारकऱ्यांचा देव वारकऱ्यांच्या ताब्यात द्या, पुढाऱ्यांची मुजोरी इथं नको. आम्ही ४० वर्षे संघर्ष करून बडवे, उत्पात, सेवेकरी हटवले. आता पुन्हा आमच्या देवाला पुढाऱ्यांचा गराडा पडलाय. मंदिर समितीच्या ११ सदस्यांपैकी बहुतांश पुढारी आहेत. अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे कराड (सातारा)चे अतुल भोसले यांची नेमणूक केलीय. ही नियुक्ती ३ जुलै २०१७ रोजी झाली. तेव्हापासून वारकरी संघर्षाच्या पवित्र्यात होते. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसमोर वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तरी दाद मिळाली नाही. त्यानंतरही सरकारला वेळ दिला गेला, पण काहीच घडत नव्हतं. त्यामुळे नाइलाजाने वारकऱ्यांना मुंबईत यावं लागतंय, असं वारकऱ्यांचे नेते राजाभाऊ चोपदार यांचं म्हणणं आहे.

  १० ऑक्टोबर(आज)च्या आंदोलनाला फडणवीस सरकार काय प्रतिसाद देतंय ते पाहायचंय. या वारकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढचं आंदोलन राज्यभर नेण्याचा बंडातात्या कराडकर, राजाभाऊ चोपदार, श्यामसुंदर सोन्नर यांचा निर्धार आहे. राज्यातले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार या आंदोलनात आघाडीवर आहेत. वारकरी संस्था-संघटनांची संघटित शक्ती आहे. या शक्तीला प्रतिसाद न देणं सरकारला खूप महागात पडेल. कारण कीर्तनकार, प्रवचनकार यांचा समाजमनावर मोठा प्रभाव पडतो. या वर्गाने सरकारविरोधी रान उठवलं तर सरकारच्या विश्वासार्हतेला झटका नक्कीच बसेल. वारकऱ्यांना असं वाटतंय की, आपल्याला हे सरकार सन्मान देत नाही. तसंच साईभक्तांनाही वाटू लागलंय की, आपल्या श्रद्धांना हे सरकार डिवचत आहे. जाणूनबुजून एक शक्ती साईबाबांच्या विचारांवर हल्ला करतेय.

  साईभक्तांना असं का वाटतंय?
  सध्या साईभक्तांची स्मृती शताब्दी सुरू आहे. १८५८ मध्ये साई शिर्डीत १६ व्या वर्षी प्रकटले आणि १५ ऑक्टोबर १९१८ रोजी साईंनी समाधी घेतली. स्मृती शताब्दीच्या निमित्ताने नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी भाषणात उल्लेख केला की, साईबाबांची जन्मभूमी पाथरी (जि. परभणी) हे गाव असून त्या गावाचा विकास सरकार करेल. राष्ट्रपतींचा शब्द हा खूप महत्त्वाचा असतो. त्या भाषणाचं सरकारी रेकॉर्ड होतं. पाथरीच्या उल्लेखाने शिर्डीकर दुखावले गेले. पाथरीचा जावईशोध कुणी लावला? खरं म्हणजे स्वतः साईबाबांनी त्यांचं कूळ आणि मूळ गूढ ठेवलं. त्यांची जात, त्यांचा धर्म याबद्दलची माहिती संदिग्ध आहे. त्यामुळे साई सर्वधर्मीयांना आपले वाटतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत असे वेगवेगळ्या धर्माचे लोक म्हणूनच ‘शिर्डीस पाय लागो’ची भावना मनी धरतात. लांबहून येतात. साईंचा ‘श्रद्धा आणि सबुरी’चा, ‘सबका मालिक एक है’ हा विचार घेऊन जातात. एका अर्थाने शिर्डी हे ‘सेक्युलर’ देवस्थान बनलंय. पण राष्ट्रपतींच्या दौऱ्यात पाथरीचा उल्लेख झाल्याने पाथरीत प्रति शिर्डी उभी करायचा तर सरकारचा मानस नाही ना? अशी शंका शिर्डीकरांनी व्यक्त केलीय. यापूर्वी साईभक्तांनी प्रति शिर्डी, प्रति साई मंदिर उभारायला संघटित विरोध केला होता हा इतिहास आहे. पाथरीच्या उल्लेखाविषयी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, साईंच्या कुठल्याही अधिकृत चरित्रात पाथरीचा उल्लेख नाही. मग बाबांचा पाथरीचा जन्म ही माहिती राष्ट्रपतींना कुणी दिली? ही माहिती खोटी आहे, असं साईभक्त मानतात. उद्या राष्ट्रपतींना माहितीच्या अधिकारात कुणी साई भक्ताने विचारलं की, ही खोटी माहिती तुम्हाला कुणी पुरवली? तर राष्ट्रपतींना माफी मागावी लागेल. या प्रकरणात राष्ट्रपतींची केवढी विश्वासार्हता पणाला लागेल. खोटी माहिती एक विशिष्ट अजेंडा ठेवून पुरवण्यात येतेय, असा साईभक्तांना संशय आहे.

  हा संशय बळावणाऱ्या इतरही काही घटना राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी शिर्डीत घडल्या. सगळीकडे भगवे झेंडे लावले गेले. यापूर्वी असे झेंडे शिर्डीत कधी दिसले नव्हते. मंदिर परिसरात ध्वजस्तंभ उभारला. हा ध्वजस्तंभ कुंभमेळ्यातला आहे. ध्वजस्तंभावर त्रिशूळ आहे. या त्रिशुळाचं शिर्डीत काय काम, असा प्रश्न साईभक्त विचारताहेत. साईबाबांनी सबुरीचं सुफी तत्त्वज्ञान सांगितलं. तिथं एका धर्माशी संबंधित आणि परत ते हिंस्रतेचं प्रतीक, कुणाला तरी मारण्यासाठीचं शस्त्र शिर्डीत का आणलं जातंय? याची चर्चा आता हळूहळू सर्वदूर साईभक्तांत पोहोचत चाललीय. ध्वजस्तंभ हे वैदिकांच्या विजयाचं प्रतीक चिन्ह मानलं जातं. साईभक्तांमध्ये वैदिक-अवैदिक, हिंदू, मुस्लिम असे सर्व जात-धर्मीय आहेत. त्यांना साईबाबांच्या शिर्डीत ध्वजस्तंभ उभारणं खटकल्याशिवाय राहणार नाही. उद्या हा ध्वजस्तंभ हटवा, अशी चळवळ उभी राहिली तर आश्चर्य वाटायला नको. त्याचा जर भाजपविरोधी राजकीय पक्षांनी फायदा घेतला तर शांत शिर्डीत अशांतता पसरायला वेळ लागणार नाही. यापूर्वी एका शंकराचार्यांनी साई हे देव नव्हेत, तिथं हिंदूंनी जाऊ नये, अशी साईबाबांची निंदानालस्ती केली होती. त्याला उत्तर म्हणून शंकराचार्यांचा शिर्डीत निषेध झाला होता. साईभक्तांनी तीव्र आंदोलने केली होती. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर नवी मुंबईतले बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांची साई संस्थानचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हावरे यांच्यावर बांधकाम व्यवसायात आर्थिक गुन्ह्यांच्या केसेस दाखल होत्या. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधिलकी सर्वज्ञात आहे. हावरे यांच्या नियुक्तीलाही साईभक्तांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता नव्याने राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर साईभक्तांची अस्वस्थता आणखी वाढली आहे. पंढरपूर, शिर्डी ही ठिकाणं महाराष्ट्राच्या समन्वयी सांस्कृतिक, अाध्यात्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेली केंद्रं आहेत. पंढरपूरच्या देवस्थानात राजकारण करणं किंवा साईबाबांच्या शिर्डीत त्रिशूळ आणून सबुरी आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाला नख लावणं, भक्तांच्या श्रद्धा दुखावणं या फंदात शहाण्या राज्यकर्त्यांनी पडू नये हेच सोईस्कर असतं. धर्म, अध्यात्म, श्रद्धा या नाजूक गोष्टींशी खेळणारे राज्यकर्ते बदनाम होतात, पुढे धुळीस मिळतात, हा इतिहास सर्वच राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलेला बरा. अन्यथा सिंहासन संकटात आहे हे खुशाल समजावे.
  - राजा कांदळकर, संपादक, लोकमुद्रा rajak2008@gmail.com

Trending