आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदारांच्या जाळ्यात सीईओ गारद?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीडशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा जागतिक स्तरावरील प्रशासन पद्धती अनुसरत असल्याचा दावा करणाऱ्या प्रतिष्ठित कॉर्पोरेट घराण्याकडून सुस्पष्ट मनुष्यबळ विकास धोरण अवलंबण्याची अपेक्षा असते.

कोणतेही मोठे बदल करताना बाजार आणि समभागधारकांना धक्का बसू नये, ही माफक अपेक्षा असते. मात्र टाटा उद्योगाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमधून सायरस मिस्त्री यांची थेट हकालपट्टी झाल्याची बातमी आदळताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कॉर्पोरेट क्षेत्रात एखाद्या सीईओच्या हाती तडकाफडकी ‘पिंक स्लिप’ सोपवणे, ही व्यावसायिक पद्धत नाही. टाटांनी ज्या प्रयत्नांनी कॉर्पोरेट क्षेत्रात एवढी प्रतिष्ठा मिळवली, त्यास अनुसरून हे वर्तन नाही. किंवा मग या प्रतिष्ठेला ठोस संस्थात्मक आधार नसावा कारण संस्थेचे नियम अशा पद्धतीने डावलणे सोपे नसते.

टाटा ब्रँडवर कलंक लागला आहे. पाच सदस्यीय समितीसाठी ठोस यश आणि थोडी आत्मप्रतिष्ठा राखणारा दुसरा पर्याय शोधणे कठीण आहे. परिणामी टाटांच्या पुढील सीईओंचा शोध समूहांतर्गतच करावा लागेल. हीदेखील खेदाचीच बाब नव्हे?

टाटा समूहातील या अनैसर्गिक कारवाईमागे तीन शक्यता वर्तवल्या जात आहेत. एक म्हणजे विविध क्षेत्रे आणि व्यापक भौगोलिक प्रदेशात पसरलेले टाटांचे साम्राज्य सांभाळणे मिस्त्रींना कठीण वाटले असेल. नेतृत्व करताना संघटनात्मक आणि संस्था संचालनातील सामंजस्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरत असतील. पण ही शक्यता योग्य नाही. कारण मिस्त्री मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाहीत. गेल्या चार वर्षांतील त्यांची वक्तव्ये पाहता, ही शक्यता दूरदूरवर दिसत नाही. दुसरी शक्यता म्हणजे- त्यांची कामगिरी उत्तम नसेल. मात्र गेल्या वर्षभरात डळमळीत झालेल्या टाटा मोटर्ससह अन्य सर्व टाटा कंपन्यांचे बाजार भांडवल वाढलेले आहे. त्यामुळे ही शक्यताही फेटाळून लावावी लागेल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील टाटांच्या काही माजी निकटवर्तीयांच्या मते, मिस्त्रींकडे संवाद कौशल्याची उणीव होती. ब्रिटन आणि युरोपातील टाटा स्टील कंपन्यांबाबत घेतलेल्या निर्णयांतील चुका किंवा काही टाटा कंपन्यांसाठी सीईओ शोधण्यात मिस्त्री अपयशी ठरले आदी पार्श्वभूमी शक्यतेसाठी सांगितली जात आहे. मात्र ही अत्यंत कमकुवत कारणमीमांसा वाटते. ही तात्कालिक कारणे असली तरी एकूण टाटा उद्योगावर याचा फार मोठा परिणाम होण्यासारखी स्थिती नाही. मात्र बॉम्बे हाऊसच्या दृष्टीने हे योग्य नाही. केवळ काही टाटा कंपन्यांमुळेच एकूण उद्योग समूह फायद्यात असल्याचा युक्तिवाद योग्य नाही, कारण ही तर नेहमीचीच स्थिती आहे.

तिसऱ्या शक्यतेशी मी थोडा सहमत आहे. टाटा समूहातील सरदार किंवा प्रभावशाली गटांनी सीईओविरोधात उभे ठाकण्याची ही पारंपरिक रणनीती आहे. पण एक मोठा फरक असा की यापूर्वी रतन टाटांविरोधात उभे ठाकलेले रुसी मोदी, दरबारी सेठ यांचा पराभव झाला होता.
मिस्त्री यांनी टाटा समूहाचा व्याप कमी करून उद्योगाला अधिक व्यावसायिक लक्ष्यकेंद्रित करण्यासाठी बाहरून सल्लागार आमंत्रित केले होते. यामुळे त्यांच्यावर समूहातील अन्य सहकाऱ्यांची नाराजी होती. त्यांना टाटा ट्रस्टचे समर्थन मिळाले. कारण त्यांच्या अध्यक्षांचा दृष्टिकोन कधीही व्यावहारिक नव्हता. अशा प्रकारे समूहांतर्गत मातब्बर आणि ट्रस्ट या दोघांच्याही जाळ्यात मिस्त्री अडकले होते. याउपरही त्यांना ‘माय वे हाय वे’अशा आविर्भावात निर्वाणीचा इशारा देता आला असता. मात्र अशा पद्धतीने त्यांची गच्छंती होणे दुर्दैवाचे आहे. एकूणच हा बदल व्यक्तिप्रेरित होता कारण त्यासाठी ठरावीक पद्धत अवलंबली गेली नाही. विरुद्ध संस्कृतीतील वाद या दृष्टीनेही या घटनेकडे पाहता येईल. पण त्यासाठीही काही ठोस कारणे नाहीत. कारण २००६ पासून सायरस मिस्त्री टाटा सन्सच्या बोर्डावर आहेत. टाटांच्या सांस्कृतिक प्रतिमेकरिता योग्य असा संपन्न वारसा त्यांच्या अंगी आहे. शांततेत काम करणारे, पूर्णपणे लक्ष्यकेंद्रित, व्यावसायिकतेवर विश्वास ठेवणारे, व्यापक अर्थाने कॉर्पोरेट आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवणारे, असे टाटांचे अनेक गुण त्यांच्या ठायी आहेत.

जगभरातील मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उत्तरोत्तर पारदर्शी व्यवस्थापन होत असताना जगात व्यापलेल्या टाटा समूहात एखाद्या सीईओची अशी हकालपट्टी ही दुर्मिळ घटना आहे. एकाच कंपनीच्या सहायक लहान कंपन्या तसेच सहकारी कंपन्यांमधील कामे गुप्त पद्धतीने चालतात. मात्र सध्या अपारदर्शकतेला थारा नाही. भयंकर स्पर्धा आणि उत्पादन पुरवठा साखळी अनेक देशांत विस्तारल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या मूळ उद्योगावर लक्ष केंद्रित करतात. त्यातच जागतिक बाजारपेठेतील बहुतांश भाग व्यापण्याचा प्रयत्न करते. जपानमधील जॅबॅटसस आणि कोरियातील चाएबोल्सनेदेखील या जागतिक पद्धत आणि गरजांनुसार आपल्या कार्यप्रणालीत बदल केले आहेत.

मिस्त्री यांच्या हकासपट्टीचा हा निर्णय टाटा सन्स आणि त्यांच्याशी निगडित अन्य कंपन्यांतील संबंधांना नवे रूप देण्यासाठी घेतला गेला असेल तर ही घटना टाटा समूहाच्या दीर्घ ऐतिहासिक परंपरेत नव्या युगाची नांदी ठरू शकते. अशा स्थितीत टाटांच्या निर्णायक मंडळाला काही प्रश्न विचारावे वाटतात. टाटा सन्स याच समूहातील जागतिक स्तरावर स्पर्धेत उतरलेल्या अन्य कंपन्यांना काही धडा देत आहेत की नाही? या बदलांमुळे भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेला काही सकारात्मक बाह्य लाभ होतील का? तसे असेल तर टाटा समूहाला मोठा लाभ मिळेल. टाटा समूहातील ज्या कंपन्या विशेष कामगिरी करत नाहीयेत त्या देशांतर्गत बाजारासह जागतिक स्तरावर अधिक विस्तार करण्यासाठी नवे प्रयोग आणि विकासावर अधिक भर देऊ शकतील का?
(सीनियरफेलो, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च)
aarkey1951@gmail.com

बातम्या आणखी आहेत...