आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

को-या पाटीवरचे लेखन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकत्याच आटोपलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी या नवजात पक्षाला लक्षणीय यश मिळाले आहे. भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन देऊन ‘आप’ने हे यश मिळवले आहे. मात्र, व्यवस्थेत शिरून व्यवस्था दुरुस्त होईल हे सांगणे कठीण आहे. कारण व्यवस्थेचा स्वभाव ‘आपुल्यासारखे करती तत्काळ’ असा असतो, हे आपण यस प्राइम मिनिस्टरसारख्या टीव्ही मालिकांमधून पाहिले आहे. शिवाय ज्यांना व्यवस्था बदलायची आहे, त्यांना व्यवस्थेत शिरायची घाई का होते हे अनाकलनीय आहे. सद्य:स्थितीतील दोष दाखवणे फारच सोपे असते व ज्यांची पाटी कोरी करकरीत असते त्यांना भरघोस आश्वासने देण्यात त्यांचे काहीच नुकसान नसते. दुस-याला खलनायक ठरवले की, मोहीम सोपी होते. राजकारण्यांना व लोकप्रतिनिधींना चोर म्हणणारेच शेवटी या दीक्षांत समारंभात रांग लावून उभे राहतात. 1977 मध्ये आणीबाणीनंतर होणारी निवडणूक ही शेवटचीच आहे, अशी आवई उठवण्यात आली होती व जयप्रकाशजींच्या मार्गदर्शनाखाली संधिसाधूंनी अशीच सुप्रशासन देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, 28 महिन्यांतच हा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यानंतर पुन्हा एकदा एका इतरांपेक्षा वेगळ्या पक्षाने रामराज्य आणण्याची घोषणा करून सत्ता मिळवली होती. तेव्हा त्यांची पाटी कोरी होती. आधी 13 दिवस, नंतर 13 महिने व त्यानंतर पाच वर्षे एवढ्या मुदतीत त्यांनी सुप्रशासन आणण्याचा प्रयत्न करून पहिला. त्यातूनही जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यांच्या को-या पाटीवर ते काही सुलेखन करू शकले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून 1977 मध्ये जयप्रकाशजींनी बजावलेली भूमिका अण्णा हजारे यांच्याकडे आली. मात्र, त्यांचा अर्जुन त्यांनी सांगितलेली गीता ऐकण्याच्या भानगडीत न पडता सरळ युद्धाला सामोरा गेला व ब-यापैकी शौर्य गाजवून मोकळा झाला. आता अण्णारूपी कृष्णालाही या अर्जुनाच्या राज्याभिषेकाची खात्री वाटायला लागली आहे.
आता व्यवस्था या नवउत्साहींना केव्हा गिळते याची वाट पाहणेच जनतेच्या नशिबी असेल, यात मला तरी शंका वाटत नाही. कारण एखादी व्यक्ती कितीही सज्जन, सुजाण, विवेकी, विचारवंत, प्रामाणिक, निर्भीड, नि:पक्षपाती, कैवारी वगैरे असली, तरी एखाद्या पक्षात काम करणे म्हणजे हायकमांडचे म्हणणे ऐकावेच लागते. स्वत:चा विवेक गुंडाळून ठेवावा लागतो. पक्षासाठी निधी गोळा करावा लागतो. कार्यकर्त्यांची, नातेवाइकांची कामे करावी लागतात. अगदी ब्रह्मचारी असलेल्या पंतप्रधानांनाही मानलेली मुलगी व पर्यायाने मानलेला जावई असू शकतो. जनतेचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, ज्याला चांगला उमेदवार म्हणून निवडून द्यावे, तो चांगलाच राहील याची खात्री देता येत नाही किंवा व्यवस्था त्याला आपल्यात सामावून घेते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद हे उपाय चाणक्यनीतीत सांगितलेले आहेत. ज्या वाहिन्यांनी ‘आप’च्या कार्यकर्त्यांची पालखी डोक्यावर घेतली होती, त्याच वाहिन्या काही दिवसांतच ‘आप’ची काही कुलंगडी बाहेर काढता येतील काय, या खटपटीला लागतील.
एका शास्त्रज्ञाने असे म्हटले होते की, मला या पृथ्वीवर जमिनीपासून तीन फूट वर उभे राहण्यासाठी कुणी जागा उपलब्ध करून दिल्यास मी या पृथ्वीला लाथेने उडवू शकतो. कारण त्याला माहीत होते की, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तीन फूट वर उभे राहायला जागा मिळणे शक्य नाही व पृथ्वीला लाथेने उडवणेही शक्य नाही. तसेच व्यवस्थेत शिरून व्यवस्था सुधारणेही शक्य नाही. हे या तथाकथित समाजधुरीणांना समजत नसेल काय? आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, वाघावर स्वार होणे सोपे असते मात्र पायउतार झालो की, वाघ स्वाराला गट्टम करतो. या वाक्प्रचारात एवढाच फरक करावा लागेल की, आतापर्यंत जे जे या वाघावर स्वार झाले ते पायउतार झाल्यावरही स्वत: सुरक्षित राहिले व वाघ जनतेचाच फडशा पाडत आला.‘आप’ हिकमतीने वाघावर स्वार तर झाला आहे. पाहूया किती मजल गाठतो. कारण सुरुवातीलाच कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा कुणाचा पाठिंबा घ्यायचा हा पेच ‘आप’ समोर उभा राहणार आहे. पाहूया ‘आप’ आपल्या को-या पाटीवर काय लिहितो ते. घोडामैदान जवळच आहे.