आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Sathe Article About Anna Hazare And Mamata Banerjee, Divya Marathi

हे पाहा आमचे थोर चतुर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणी नेते महाचतुर असतात, असे आपण सगळे जण मानतो. हे लोक खाता-पिता, उठता-बसता चोवीस तास राजकारणाचाच विचार करतात. त्यामुळे एखाद्या कसलेल्या बुद्धिबळपटूप्रमाणे पुढच्या दहा-वीस चालींचा विचार करून ते सदैव सोंगट्यांची हलवाहलव करत असतात, असेच आपल्याला वाटत राहते.

पण गंमत अशी की, हे महाचतुर अनेकदा तद्दन अजागळ डावपेच लढवतात. अशा राजकारणातून नेत्यांच्या वा पक्षांच्या पदरी अपयश नाहीतर मूर्खपणा पडणार आहे, हे कोणाही सामान्य माणसाला दिसत असते. तरीही ही मंडळी असे डावपेच रेटत राहतात. असे ते का करतात हे अनाकलनीय असते. आपल्या शरद पवारांचे उदाहरण घ्या. ज्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नये असे नेते, असा एक बदलौकिक त्यांनी मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावर अधिक उंच भरारी घ्यायची असेल (म्हणजे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहायची असली तर) त्यांनी हा बदलौकिक पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण प्रत्यक्षात दर वेळी ते यात भर कशी पडेल हेच पाहत राहतात. अलीकडेच नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात त्यांनी केलेली उलटसुलट विधाने ही त्याची उदाहरणे आहेत. खरे तर पवारांना मोदींच्या भाजपसोबत जाणे हे अनेक अर्थांनी कठीण आहे. तरीही उद्या ठरवलेच तर ते जाऊही शकतात. आपण राजकीय अस्पृश्यता मानत नाही, असे ते म्हणालेले आहेत. शिवाय, सोनियांच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी फारकत घेऊन नंतर त्यांचेच नेतृत्व मान्य करण्याचा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी आहेच. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदींना कधी थोपट तर कधी धोपट असे करण्यात कोणता फायदा आहे? असे प्रकार अण्णा हजारे नेहमी करतात. अण्णांचा स्वभावच चंचल आणि अस्थिर आहे. पण इतके धुरंधर राजकारणी असणाºया पवारांनीही असे करावे यात नेमके कोणते चातुर्य आहे?

काँग्रेस हा 130 वर्षांचा जुना पक्ष. वर्षानुवर्षांच्या अनुभवामुळे या पक्षाच्या केंद्रस्थानी राजकारणातील चातुर्याचा मोठा खजिना जमा आहे, असे अलीकडपर्यंत दिसत असे. पक्षाला फायदेशीर होईल अशा रीतीने डावपेच लढवण्याची एक प्रदीर्घ खानदानी परंपरा तिथे विकसित झाली होती. पण गेल्या पाच वर्षांच्या काळात ही परंपरा लयाला गेल्याचे दिसते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशातील पक्षाची वाताहत.

याची सुरुवात जगन रेड्डींच्या पक्षत्यागापासून होते. वायएसआर यांच्या मृत्यूनंतर जगन यांना लगेचच मुख्यमंत्रिपद हवे होते. ते नंतर देऊ असे आश्वासन देऊन त्यांची समजूत काढणे हे अत्यंत सहजशक्य होते. ते घडले नाही. नंतरही जगन यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या अनेक संधी होत्या. त्या घालवण्यात आल्या. यामुळे काँग्रेस कमजोर पडली आहे, हे लक्षात आल्यावर राज्याच्या विभाजनाचा घाट घालण्यात आला. रोगापेक्षा औषध भयंकर असा हा प्रकार होता. हे विभाजन कोणत्याच रीतीने आपल्याला फायद्याचे ठरणार नाही हे दिसत असूनही काँग्रेसच्या ज्या कोणत्या नेत्यांनी व ज्या काही कारणास्तव हा निर्णय पुढे रेटला त्यांच्या चातुर्याची आणि आडाख्यांची तारीफ करावी तेवढी थोडीच म्हणावी लागेल.

2009 मध्ये काँग्रेसचे सर्वात भरवशाचे राज्य आंध्र प्रदेश होते. आता सीमांध्रमध्ये काँग्रेसचे पोस्टर लावायलासुद्धा कार्यकर्ता शिल्लक नाही, अशी जवळपास स्थिती आहे. तामिळनाडूप्रमाणे आता या राज्यातही काँग्रेससाठीचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. दुसरीकडे तेलंगणातही काँग्रेसवाले मूर्ख ठरले आहेत. तिथे तेलंगणा राष्ट्र समिती काँग्रेसमध्ये नक्की विलीन होईल याची योग्य ती तजवीज करायला हवी होती. पण तसे झाले नाही. उलट आता राष्ट्र समितीवाले काँग्रेससोबत जाण्याचे टाळून भाजपच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात आहेत. खरोखर, गेल्या 70 वर्षांत काँग्रेसला इतक्या स्वस्तात कोणीही उल्लू बनवले नसेल. आता समितीवाल्यांच्या पाठिंब्याविना काँग्रेस गलितगात्र झाल्यासारखी बनली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसची भव्य विजयी सभा घेऊन तेलंगणाची आई म्हणून सोनिया गांधींचा गौरव करण्याची एक योजना होती. पण ती सभा भरवणेदेखील पक्षाला जमू शकलेले नाही.

सर्वच राजकीय पक्षांमध्ये असे कमी-अधिक चतुर भरलेले असतात. हे सगळेच जण आपापल्या दृष्टीने स्मार्ट अशा खेळी करीत असतात. कधी त्या जमतात. कधी फसतात. कधी परिस्थिती अशी येते की, यश मिळत नाही. पण मुद्दा हार-जितीचा नसतो. मुद्दा असतो तो बाजी हरली तरीही आपली बाजू उघडी न पडू देण्याचा. परिस्थिती सावरून घेण्याचा. पण एरवी चतुर वाटणारे हे राजकारणी महानुभाव बºयाचदा इतक्या सहजपणे हास्यास्पद ठरतात की विश्वास बसू नये.

अगदी अलीकडचे उदाहरण ममता बॅनर्जींचे. ममता या खरे तर जमिनीवर घट्ट पाय असलेल्या नेत्या. केंद्रात राजकारणाची संधी असतानाही त्यांनी स्वत:ला बंगालच्या राजकारणात गाडून घेतले. एकदा कम्युनिस्टांनी दारुण पराभव करूनही त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. पुढचा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. पण मध्यंतरी त्याच ममता अण्णा हजारेंच्या कानाला लागलेल्या एका फुटकळ पत्रकाराच्या शब्दावर विसंबून पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहू लागल्या आणि देशभर उमेदवार उभे करायचे म्हणू लागल्या हा सर्वच प्रकार गमतीशीर होता. अखेर व्हायचे तेच झाले. दिल्लीत दोन हजार माणसेही जमवता येत नाहीत, असे नाहक अपयश घेऊन त्या कोलकात्याला परत गेल्या.

दुसरीकडे स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ मानणार्‍या कम्युनिस्टांचाही असाच दारुण मोहभंग झाला. तामिळनाडूमध्ये भाजपला शिरकाव करू द्यायचा नाही, या इराद्याने त्यांनी अतिशय घाईघाईने जयललितांसोबत युती केली. आपण फार धोरणीपणा केला असा त्यांचा समज होता. पण अम्मांनी त्यांना असा काही हिसका दाखवला की, केवळ पंधरा दिवसांत ही युती मोडल्याची घोषणा कम्युनिस्टांना करावी लागली.

‘आम आदमी पक्ष’ हा राजकारणातला नवा तारा आहे की धूमकेतू याचा निर्णय अजून व्हायचा आहे. आजवरच्या निवडणूक सर्वेक्षणांनुसार त्या पक्षाला जेमतेम पाच-दहा जागा मिळतील, असा अंदाज आहे. या पक्षाचे नेते मात्र आपले शंभर खासदार निवडून येतील, असे छातीठोकपणे सांगतात. पक्षाची हवा निर्माण करण्यासाठी असा प्रचार आवश्यक आहे. असे त्यांचे डावपेच त्यामागे असावेत. असोत. पण योगेंद्र यादव यांच्यासारखे आजवर निवडणूक विश्लेषणशास्त्रातले आदरणीय अभ्यासकदेखील या डावपेचांचा पुरस्कार करतात तेव्हा राजकीय चतुराईचा हा कोणता प्रकार, असा प्रश्न पडतो.

राजकीय पक्ष आणि नेते जनतेला मूर्ख बनवतात हा आपला नेहमीचा अनुभव झाला. पण अनेकदा बर्‍याच चतुराई दाखवून आखलेल्या राजकीय खेळ्या इतक्या भोळसटपणाच्या का असतात याचेही काहीतरी विश्लेषण असले पाहिजे. उद्या योगेंद्र यादवांसारखे लोक ‘आम आदमी पक्षा’तून बाहेर येऊन पुन्हा अभ्यासकाच्या भूमिकेत शिरले तर ते कदाचित अधिक जाणकारीने त्यावर प्रकाश टाकू शकतील.