आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंनंतर भाजप कुठे जाणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना महाराष्ट्रात झाली. स्थापनेपासून आजतागायत संघाचे बहुतांश बिनीचे नेते मराठी होते-आहेत. पण असे असूनही महाराष्ट्रीय राजकारणात संघाचे राजकारण केंद्रस्थानी येऊ शकले नाही. बराच काळ ते परिघावरही नव्हे तर परिघाच्या बाहेर राहिले. सेक्युलर विचारांची बहुजनवादी काँग्रेस हीच महाराष्ट्राची प्रातिनिधिक विचारधारा राहिली. किंबहुना, त्यामुळेच हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेसाठी संघाला महाराष्ट्राची निवड करता आली नाही. ती उघडली गेली गुजरातेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संघकार्यातील मार्गदर्शकांना नमन करणारे ‘ज्योति:पुंज’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यातील निम्म्याहून अधिक मार्गदर्शक, म्हणजे संघाचे नेते, हे मूळचे महाराष्ट्रातील व मराठी आहेत. गुजरातच्या प्रयोगशाळेत प्रयोग करायला गेलेले हे लोक होते. गुजरातेतील नरेंद्र मोदींची सत्ता हे या प्रयोगाचे फळ आहे. किंबहुना, प्रदीर्घ काळ प्रचारक राहिलेल्या मोदींच्या हातात भाजपची सर्व सूत्रे जाणे म्हणजे संघाच्या प्रयोगातून तंतोतंत अपेक्षित असा निष्कर्ष निघणे असाच अर्थ काढायला हवा.

देशातील इतर राज्यांमध्ये मात्र असे घडू शकले नाही. हिंदुत्वाच्या राजकीय प्रवासाने त्या त्या राज्यांनुरूप वेगवेगळी वळणे घेतली. संघाच्या मूळ अपेक्षांशी ती सर्वस्वी जुळणारी होतीच असे नाही. किंबहुना, जिथे ती नव्हती तिथे भाजपला स्वतंत्रपणे वाढू देणे हे संघाच्या नेत्यांना भाग पडले.

महाराष्ट्रात बराच काळ सत्तेत काँग्रेस आणि समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष वगैरे डावे हे तिचे विरोधक असे द्वंद्व बराच काळ प्रचलित होते. इथले काँग्रेसवाले हे निव्वळ गांधी घराण्याच्या करिश्म्यावर वा जातीपातीच्या समीकरणावर अवलंबून नव्हते. त्यांनी जमेल तितक्या प्रमाणात संस्था उभारणी केली. बहुतांश संस्था सहकारी तत्त्वावरच्या होत्या. त्यामुळे त्यांचा राजकीय पाया भक्कम राहिला. दुसरीकडे विरोधकांची नैतिक ताकद मोठी होती. रस्त्यावरची आंदोलने असोत वा विधिमंडळातील संघर्ष, त्यांचा दबदबा मोठा होता. सुरुवातीचा जनसंघ आणि नंतरचा भाजप यांच्यावर काँग्रेस आणि विरोधक यांच्याच राजकारणाची मोठी छाप कायम राहिली. त्यामुळेच महाराष्ट्रातील भाजपचा तोंडवळा आणि त्याचं प्रत्यक्ष स्वरूप हे गुजरात, राजस्थान किंवा उत्तर प्रदेशातील भाजपच्या स्वरूपापेक्षा भिन्न राहिले.
महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणाच्या या वैशिष्ट्यपूर्ण वाटचालीचे एक साक्षात चालतेबोलते उदाहरण म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तित्वाकडे आणि राजकीय कारकीर्दीकडे पाहता येते. मुंडे हे मराठवाड्याच्या बहुजन शेतकरी कुटुंबातून आले. त्या वेळी मराठवाड्यात एक गाव एक पाणवठा किंवा युक्रांदच्या चळवळी जोरात होत्या, तरीही मुंडे त्यांच्या टप्प्यात आले नाहीत. संघाने त्यांना आपल्याकडे खेचले. पण म्हणून तरुणपणातील त्यांच्या राजकारणाचा पोत हा समाजवादी राजकारणाशी समांतरच राहिला. उदाहरणार्थ, आणीबाणीला विरोध करून ते 19 महिने तुरुंगात राहिले.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतही ते हिरिरीने सहभागी झाले. येथे एक विशेष गोष्ट नोंदवण्यासारखी आहे. 1980 मध्ये गुजरातेत डॉक्टरकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात राखीव जागा ठेवण्याच्या मुद्द्यावरून मोठी दंगल उसळली होती. त्या वेळी तिथले भाजपवाले दलितविरोधी भूमिका घेत होते. त्याच वेळी मुंडे यांच्यासारख्या इथल्या कार्यकर्त्यांची भूमिका भिन्न होती. मुंडे आमदार म्हणून निवडून येऊ आणि गाजू लागले. ते सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतरही त्यांनी आपल्या बहुजनवादी धारणेनुसारच पक्षाला आकार दिला. मुंडे, डांगे, फरांदे ( विशेष नोंद- मुंडेंवरील लेखांमध्ये यांचे नाव कोठेच दिसले नाही. लोकांचीच नव्हे तर मीडियाची विस्मरणशक्तीही भयंकर असते.) यांना पुढे करून बहुजन समाजात स्थान मिळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजप करतो आहे, अशी चर्चा तेव्हा सातत्याने होत असे. ते खरेही होते. पण मुंडे आणि इतर नेते या सर्व राजकीय खेळातले निव्वळ दर्शनी बाहुले किंवा प्यादे राहिले नाहीत. त्यांनी स्वत:ही काही राजकीय आग्रह धरले आणि आपल्या धारणांनुसार भाजपच्या महाराष्ट्रातील राजकारणाला स्वतंत्र असा आकार दिला.

या संदर्भात इतर राज्यांमधील दोनच उदाहरणे देण्यासारखी आहेत. कल्याणसिंग किंवा उमा भारती हे दोन नेते मागास समाजातून आले, तरीही ते कडव्या हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करीत. त्यामुळे ते भाजपच्या फार आवडीचे. पक्षाने दोघांनीही मुख्यमंत्री केले. पण उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील भाजपला त्यांनी काही स्वतंत्र आकार दिला असे घडू शकले नाही. ते निव्वळ संघविचारांचे वाहक राहिले. मुंडे यांचे असे झाले नाही. किंबहुना, मुंडेंमधील जबरदस्त ऊर्जा लक्षात घेता तसे ते होणेही शक्य नव्हते.

याच ऊर्जेमुळे मुंडे पुढे साखर कारखाने, सहकारी संस्था, बँका या पारंपरिक काँग्रेसी उद्योगांमध्ये घुसले. तिथे त्यांनी स्वत:ची अशी छाप निर्माण केली. बराच काळ विरोधी पक्षात राहूनदेखील एखाद्या सत्ताधार्‍याच्या रुबाबातच ते राहिले. बीड जिल्ह्याच्या जोडतोडीच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेल्या हुकुमतीमुळे एकेकाळी शरद पवारांनासुद्धा घाम फुटला होता. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे राजकारण हा सर्वस्वी मुंडे यांच्या कल्पनेचा आविष्कार होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंबहुना, जवळपास आम आदमी पक्षाकडे गेलेल्या राजू शेट्टी यांना आपल्याकडे खेचून घेणे, संजय पाटलांना सांगलीची उमेदवारी देणे हे मुंडे यांचेच मास्टरस्ट्रोक होते.

इथे हे लक्षात घ्यायला हवे की, दलित-बहुजनांचे किंवा बेरजेचे जे राजकारण मुंडे यांनी केले तो त्यांचा स्वाभाविक पिंड होता. भाजपचे ब्राह्मणी किंवा काँग्रेसचे मराठा नेते अनेकदा असे राजकारण करतात. पण तो त्यांच्या डावपेचांचा वा देखाव्याचा भाग असतो. या राजकारणाबाबत त्यांना आतून खरी आस्था मात्र नसते. मुंडे यांना ती आस्था वा कळकळ होती. ती त्यांच्या व्यक्तित्वातून प्रगटत असे. त्यामुळेच समाजातील अनेक स्तरांतील लोकांशी त्यांनी संबंध जोडले होते आणि त्यामुळेच बाबरी आंदोलनाच्या ऐन भरातही मुंडे किंवा त्यांच्यासारखेच त्यांचे सहकारी उमा भारती वा अन्य काही नेत्यांसारखी भडक वक्तव्ये करताना दिसले नाहीत.

किंबहुना, भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तम वक्ते असूनही, हिंदू-मुस्लिम पेटवापेटवीशी मुंडे यांचे नाव कधी जोडले गेले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. मुंडे हे भाजपमध्ये आले नसते तर ते काँग्रेसमध्ये सहज सामावले जाऊ शकले असते. कदाचित मुख्यमंत्रीही झाले असते. पण तसे झाले नाही. त्यांनी आपली मूळ विचारधारा सोडली नाही. पण त्याच वेळी या विचारधारेला महाराष्ट्रातील स्थितीनुरूप आणि आपल्या धारणेनुरूप आकार दिला. जितके जमले तितके फुले-आंबडेकरवादी विचारांशी जोडले जावे असा प्रयत्न केला. आपल्या मूळ विचारधारेचा असहिष्णुपणा कमी करण्याचा प्रयत्न केला. यातून महाराष्ट्रातील भाजपला आजचे रूप आले आहे.

आज केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे. मोदी यांनी कितीही अमान्य केले तरी त्यांच्या धारणेत संघ प्रचारकाची घट्ट भूमिका प्रतिबिंबित होत असतेच. मुंडे यांचे राजकारण हे या भूमिकेला काहीसा छेद देणारे होते. या पार्श्वभूमीवर, मुंडे गेल्यानंतरच्या (महाराष्ट्र) भाजपमधील राजकारणाचे स्वरूप कसे राहते हे पाहणे औत्सुक्याचे असेल.