आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Sathe Article About Jayalalitha, Divya Marathi

या देशात काहीतरी कुजले आहे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंधराव्या लोकसभेचे शेवटचे सत्र गेल्या आठवड्यात संपले. सोळाव्या लोकसभेसाठी लवकरच निवडणुका जाहीर होतील. मोकळ्या वातावरणात होणार्‍या निवडणुका हे संसदीय लोकशाहीच्या आरोग्याचे लक्षण आहे. त्या दृष्टीने आपल्या लोकशाहीची तब्येत उत्तम आहे असे निदान करता येऊ शकते. आपली न्यायालयीन व्यवस्था भक्कम आहे. पत्रकारितेवरही जवळपास काहीच बंधने नाहीत. या दृष्टीने भारतीय लोकशाही व्यवस्था ही अत्यंत उत्तम असल्याचेच म्हणायला हवे.

पण वरवर चांगले दिसले तरी या व्यवस्थेत आतून सर्व काही आलबेल नाही. डेन्मार्कच्या राज्यात काहीतरी कुजलेले आहे, असे हॅम्लेट नाटकातला मार्सेलस म्हणतो. त्याप्रमाणे भारताच्या राज्यात सर्व काही ठीक चाललेले नाही, हे दाखवून देणार्‍या घटना वरचेवर घडत असतात.

राजीव गांधी यांच्या खुन्यांची तुरुंगातून सुटका करण्याचा जयललितांचा निर्णय ही अशीच एक घटना आहे. हे खुनी तामिळ आहेत. श्रीलंकेतील तामिळ इलमच्या लढ्यातील सूडाचा एक भाग म्हणून त्यांनी राजीव यांची हत्या केली होती. त्यामुळे तामिळ-तामिळ भाऊ-भाऊ अशा भ्रातृभावातून या खुन्यांबाबत एक सुप्त सहानुभूती काही लोकांमध्ये असेल हे नाकारता येत नाही. किंबहुना, प्रभाकरनच्या राक्षसी हिंसाचाराकडे डोळेझाक करून त्याला पाठिंबा देण्याचे राजकारण तामिळनाडूत पूर्वापार चालत आलेले आहेच. आता जयललितांनी याचेच टोक गाठले आहे.

किंबहुना, एका अर्थाने, सार्वभौम भारतीय प्रजासत्ताक आणि आपली राज्यघटना यांच्याहीपेक्षा आपल्यासाठी तामिळ अस्मिता मोठी असल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले आहे. विशेष नोंदवण्यासारखी बाब अशी की, जयललितांच्या या देशविघातक कृतीबाबत इतर पक्षांची बोलतीही बंद झाली आहे. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी करुणानिधी यांनी पहिल्या दिवशी तर त्यांचे स्वागत केले. दुसर्‍या दिवशी ते इतकेच म्हणाले की, जयललितांनी ही सर्व प्रक्रिया नीट हाताळायला हवी होती. म्हणजे राजीव यांच्या खुन्यांना सोडून देण्याचा निर्णय त्यांना योग्यच वाटतो. केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी विरोधी सूर काढला असला तरी तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनीही जयललिता यांचे अभिनंदन केले आहे. खुद्द काँग्रेसमधूनही जयललितांचा तीव्र निषेध झालेला नाही. चिदंबरम यांनी या एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नावर अत्यंत गुळमुळीत भूमिका घेतली. मी या निर्णयामुळे आनंदी किंवा दु:खी काहीच नाही. कारण, जयललितांनी कायद्यातील एका तरतुदीचा आधार घेऊन हा निर्णय घेतला आहे असे अत्यंत भंपक वक्तव्य भारताच्या या माजी गृहमंत्र्यांनी केले. हा निर्णय घेतला तर आगामी लोकसभा निवडणुकीत तामिळ अस्मितेच्या नावाने आपल्याला काही मते मिळवता येतील असा क्षुद्र हिशेब जयललिता यांनी मांडला, तर या निर्णयाला विरोध केला तर आपली काही मते जातील असा हिशेब विरोधक मांडत आहेत.

भारत नावाच्या आपल्या देशात कुजले आहे ते हेच. राज्यघटनेच्या आधारावर सार्वभौम भारतीय राष्ट्रीय प्रजासत्ताक अस्तित्वात येऊन आता 64 वर्षे झाली. त्यामुळे घटनेतील मूलभूत तत्त्वे या देशात पूर्णपणे रुजली असणार असे आपण गृहीत धरून चालतो. एखाद्या माणसाचा खून झाला तर एक देश म्हणून सर्व लोक त्याचा टोकाचा निषेध करील असे आपल्याला वाटते. पण तामिळनाडूत आज जे काही चालले आहे त्यावरून तसे दिसत नाही. उलट, खून करणारे जर ‘आपल्या’ समाजाचे असतील आणि समजा त्यांनी तथाकथित ‘आपल्या समाजाच्या भल्यासाठी’ काम केले असेल अशी भावना असेल तर त्या खुन्यांना मोकळे सोडण्यास त्या समाजाची हरकत नसेल असे दिसते. किंबहुना, खुन्यांना मोकळे सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध कोणताही युक्तिवाद करणे हे अधिक घातकी ठरेल, असे चित्र उभे राहते. एखाद्या समाजाची अस्मिता इतकी शिरजोर व्हावी की त्यापुढे दुसर्‍याचा जीव घेण्यासारखी गोष्टसुद्धा किरकोळ वाटावी ही फार भयावह गोष्ट आहे. शिवाय, राजीव गांधी यांचा खून ही एका माजी पंतप्रधानाची हत्या होती. त्यामुळे त्याची राजकीय परिमाणेही अनेक आहेत. तामिळ अस्मितावाल्या जयललिता आणि त्यांच्यापुढे गप्प बसलेले इतर सर्व नेते हे चित्र म्हणजे भारतीय प्रजासत्ताक भक्कम नव्हे, तर नाजूक पायावर उभारलेले आहे असे दाखवून देणारे आहे.

अर्थात, या प्रसंगाच्या निमित्ताने तामिळांचे उदाहरण पुढे आले असले तरी इतर प्रांतातील इतर अस्मितावालेही काही कमी आहेत असे समजायचे कारण नाही. खलिस्तानवादी चळवळ आता नेस्तनाबूत झाली असली तरी पंजाबमधील अतिरेकी विचारवाले स्वस्थ बसले आहेत असे नव्हे. इंदिरा गांधी यांचे मारेकरी बिआंतसिंग आणि सतवंतसिंग यांच्या वारसदारांना गेल्या वर्षी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्याविरुद्ध कोणाही राजकीय पक्षांनी फारसा ओरडा केला नाही. पंजाबात सध्या अकाली दल आणि भाजप यांचे संयुक्त सरकार आहे. हे दोघेही मुळातच धर्माच्या आधाराने राजकारण करणारे असल्याने त्या सरकारने तर याबाबत सोयीस्कर मौन बाळगले.

मराठी अस्मितेच्या नावाने चालणारे शिवसेनेचे आणि आता मनसेचे राजकारणही कधीही या थराला जाऊ शकते असे आहे. राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांविरोधातली माथेफिरू चळवळ जोरात असतानाचे एक उदाहरण आपल्या सर्वांना आठवत असेल. राहुल राज नावाचा एक बिहारी तरुण राज ठाकरे यांच्या मागावर मुंबईत आला आणि त्याने बेस्ट बसमधील प्रवाशांना ओलीस धरण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या चकमकीत अखेर तो ठार झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र आणि बिहार हे जणू एकमेकांचे शत्रुप्रांत आहेत अशा रीतीने या प्रश्नाचे राजकारण झाले. राहुल राज याला मराठी पोलिसांनी मुद्दाम ठार मारले असा प्रचार बिहारात झाला तर तो राज ठाकरे यांना मारण्यासाठी आला होता, त्यामुळे त्याची हत्या समर्थनीयच आहे, असा मतप्रवाह महाराष्ट्रात तयार झाला होता. यामध्ये कोणालाही आपण असंवेदनशील आणि देशविघातक वागतो आहोत याचे भान नव्हते.

उत्तर भारतातील जाटांच्या खाप पंचायतींबाबतही आपल्याला सध्या असेच राजकारण पाहायला मिळते आहे. खाप पंचायती या दलित आणि महिलांचे हक्क सरसकट पायदळी तुडवतात हे वेळोवेळी दिसले आहे. जाटांच्या अस्मितेसाठी खून पाडणे हा तर त्यांना आपला हक्कच वाटतो. असे असूनही आज काँग्रेस-भाजपच नव्हे, तर आम आदमीसारखे पक्षदेखील खाप पंचायती या सांस्कृतिक संघटना असल्याचे म्हणत आहेत. खापच्या नेत्यांना आपल्या पक्षाशी जोडून घेण्याची त्यांची जी स्पर्धा चालू आहे ती तामिळनाडूच्या सध्याच्या चित्राचीच आठवण करून देणारी आहे. या बहुतांश अस्मितावाल्यांचे लागेबांधे निवडणुकांच्या राजकारणाशी जोडलेले आहेत आणि आपल्याकडे युद्धाप्रमाणे निवडणुकीतही काहीही क्षम्य असतं असं सर्वांना वाटू लागलं आहे. पण या पद्धतीच्या राजकारणामुळे कायद्याच्या राज्याची आणि देशाच्या एकात्मतेची मुळेच आपण कापून काढतो आहोत हे त्यांच्या आणि त्यांना मते देणार्‍यांच्या लक्षात येत नाही. भारत नावाच्या देशातील ही कूज वेळीच रोखायला हवी.