आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Sathe Article About Narendra Modi, Divya Marathi

नरेंद्र मोदींना तेरा प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यंतरी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमुळे राहुल गांधी यांचे हसे झाले होते. त्या वेळी राहुल यांना खूपच टोकदार प्रश्न विचारले गेले होते. पण मोदींच्या समोर बसून अशा प्रकारची उलटतपासणी (येथे उलटतपासणी हा शब्द महत्त्वाचा आहे.) करण्याची संधी कोणालाही मिळालेली नाही. मोदी आपल्या प्रचारसभांमध्ये मॅडम सोनिया, शहजादे, शरद पवार, ममता अशा सर्वांना प्रश्न विचारत असतात. त्यांना विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबाबत मात्र ते मौन बाळगतात. आता पंतप्रधान होण्यापूर्वी निदान एकदा तरी मोदींनी काही प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत. असेच काही प्रश्न, त्याच्याशी संबंधित मुद्दे...

1) अमित शहांच्या भाषणांवर निवडणूक आयोगाने आता निर्बंध घातले आहेत. मोगलांच्या काळात अपमानाचा बदला घेण्यासाठी तलवारी होत्या, असा संदर्भ अमित शहा देत होते. म्हणजे ते उघडच मुस्लिमांविरोधात बोलत होते. नरेंद्र मोदी यांचा अमित शहांना पाठिंबा आहे का? असेल तर यापुढे कोणी कोणी, कशाकशाचा बदला कसाकसा घ्यायला हवा, याबाबत मोदी थेट नावे घेऊन एक जाहीर भाषण करतील का? पाठिंबा नसेल तर ते विश्वासू आपले प्रतिनिधी असलेल्या शहांना हटवतील का?

2) गुजरात दंग्यांच्या बाबत आपण निर्दोष आहोत, हे जनतेला मान्य आहे आणि त्या राज्याचा विकास केल्यामुळे जनता आपल्यावर खुश आहे. म्हणूनच जनतेने आपल्याला तीनदा निवडून दिले आहे, असा मोदींचा आजवरचा दावा आहे. काँग्रेसला या देशातील जनतेने साठ वर्षे निवडून दिले आहे. म्हणजेच दिल्लीतील शीख हत्याकांडासहित सर्व दंगलींबाबत काँग्रेस निर्दोष आहे आणि काँग्रेसने या देशाचा महामूर विकास केला असा याचा अर्थ लावायचा का?

3) कोणताही आरोप झाला की मोदी काँग्रेसवाल्यांच्या तशाच काहीतरी भानगडीचा नेहमी उल्लेख करतात. मोदी हे या देशातील जनतेला उत्तर देणे लागतात की काँग्रेसला?

4) काँग्रेसच्या राजवटी असतानादेखील गुजरात हे देशातील एक अग्रगण्य औद्योगिक राज्य होते की नव्हते? अगदी 1950 किंवा साठ सालापासून इतर राज्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्याच तुलनेत आपली प्रगती किती झाली, हे तपासून पाहत असत की नसत? आजही आयटी कंपन्यांची पहिली पसंती कर्नाटक, आंध्र किंवा दिल्ली असते, हे खरे आहे की नाही?

5) गुजरातेत 41 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याची एक आकडेवारी आहे ती खरी की खोटी? खरी आकडेवारी काय आहे? जी काही असेल तितके लोक अजूनही गरीब का? शिक्षण, आरोग्य इत्यादींच्या निकषांवर गुजरातचा क्रमांक सर्व देशात बारावा किंवा चौदावा लागतो, असे रघुराम राजन समितीने म्हटले होते. या अपयशाला मोदी जबाबदार नाहीत का? किंबहुना, गुजरातचा विकास आपल्यामुळे झाला, असे म्हणणारे मोदी जातीय दंगली असोत किंवा कुपोषण अशांसारख्या उणिवांबाबत स्पष्टपणे का बोलत नाहीत? त्यात त्यांना कमीपणा का वाटतो?

6) अदानी उद्योगसमूहाला गुजरात सरकारने दिलेली स्वस्त जमीन तसेच इतर सवलती याबाबत बरेच प्रश्न विचारले गेले आहेत. याबाबत काही खटलेही चालू आहेत. असे असताना याच अदानीचं विमान घेऊन देशाच्या भावी पंतप्रधानाने खुलेआम फिरणे योग्य आहे काय? (ते योग्य असेल तर) देशभरातील बहुसंख्य पोलिस ठाण्यांची अवस्था वाईट आहे. पोलिसांकडे वाहने, शस्त्रे व इतर सुविधांचाही अभाव आहे. विजय माल्या किंवा सुब्रतो रॉय यांचे प्रायोजकत्व घेऊन ही स्थिती आरपार पालटून टाकण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घ्यावा काय?

7) भ्रष्टाचार या विषयावर अशोक चव्हाणांबरोबरच येदियुरप्पा किंवा रेड्डी बंधू यांचाही एकत्रित उल्लेख करून मोदी आपली मते सविस्तरपणे मांडतील काय?

8) पंतप्रधान झाल्यानंतर महिनाभराच्या आत ते 370 वे कलम रद्द करून देशात समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करतील का?

9) कानपूरच्या सभेत मोदींनी उत्तर प्रदेशातून गुजरातेत कामाला येणार्‍या मुलाच्या आईचे उदाहरण दिले होते. जोपर्यंत या मुलाची ट्रेन उत्तर प्रदेशात असते, तोवर आई चिंतेत असते, पण तो गुजरातच्या हद्दीत पोचला की ती म्हणते ठीक आहे, आता मी झोपू शकेन. या पार्श्वभूमीवर आपले परममित्र राज ठाकरे यांच्या पक्षाच्या ‘खळ खट्याक’ कार्यक्रमाविषयी मोदींचे काय म्हणणे आहे?

10) कोलकात्याच्या पहिल्या सभेत मोदी यांनी कोलकात्यात ममता, दिल्लीत मोदी आणि राष्ट्रपती भवनात प्रणवदा असतील तर तुम्हाला फायदा होईल असे बंगाली लोकांना सांगितले होते. पण आता महिनाभरानंतर ममतांचे परिवर्तन खोटे असल्याची कडवट टीका मोदींनी केली आहे. मोदींचे हे मतपरिवर्तन कशामुळे झाले? ममता आपल्याला पाठिंबा देणार नाहीत हे स्पष्ट झाल्यामुळेच नव्हे का? मोदी हे पूर्वी संघप्रचारक होते. त्यामुळे राजकारणी झाला तरी, त्याने असे दुहेरी नैतिकतेने वागू नये, असे त्यांना वाटत नाही काय?

11) अलेक्झांडरचे सैन्य बिहारमध्ये आले होते, तक्षशिला विद्यापीठ बिहारमध्ये आहे किंवा 1942 चा स्वातंत्र्यलढा वर्धा इथून सुरू झाला, अशासारखी त्यांची विधाने ‘ऐतिहासिकदृष्ट्या’ चुकीची होती, हे त्यांना ठाऊक आहे काय? असेल तर त्यांनी याबाबत कधी दिलगिरी का व्यक्त केली नाही? किंबहुना मोदी यांनी आयुष्यात कधी तरी काही चुका केल्या आहेत, असे त्यांना वाटते काय? कोणत्या?

12) अर्थात मोदींची मुलाखत गुजरात दंग्यांच्या उल्लेखाव्यतिरिक्त होऊच शकत नाही. ‘आमनेसामने’च्या मुलाखतीत कायद्याच्या प्रश्नातून पळून जाण्यासाठी नेहमीच बर्‍याच वाटा असतात. म्हणून मोदी यांना असे विचारायला हवे की, 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा स्टेशनात साबरमती एक्स्प्रेसच्या आगीत 59 लोक मृत्युमुखी पडले. मात्र ही आग लावण्याशी ज्यांचा काहीही संबंध नव्हता असे शेकडो मुस्लिम नंतरच्या दंगलीत बळी पडले. ही दंगल माणुसकीला काळिमा फासणारी होती की नाही आणि याबद्दल मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून अपराधी वाटते की नाही? दंगलग्रस्त मुस्लिमांच्या वस्त्यांना मोदींनी आजतागायत का भेट दिलेली नाही? ते कधी भेट देणार?

13) शेवटी, संघ परिवाराशी संबंध असलेल्या माया कोडनानीसारख्या लोकांना या प्रकरणी शिक्षा झालेल्या आहेत. अशा दोषी ठरलेल्या लोकांचा धिक्कार करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय व्यवस्था आहे? या दंगलींच्या पार्श्वभूमीवर एकूणच संघाच्या विचारसरणीची चिकित्सा करण्याची गरज आहे असे मोदी यांना वाटते का?

प्रश्न अनेक आहेत. ते अचूकपणे विचारले मात्र पाहिजेत. अर्थात, शक्यता हीच आहे की हे प्रश्न ना मोदींना कधी कोणी विचारू शकेल, ना मोदी त्यांची खरीखुरी उत्तरे देऊ शकतील.