आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Sathe Article Bout Kejriwal, Modi And Media

केजरीवाल, मोदी आणि मीडिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीडिया भ्रष्टाचारी आहे, असे केजरीवाल म्हणाले. मीडिया म्हणजे त्यांच्या लेखी टीव्ही चॅनल्स. काहींची नावेही त्यांनी दिली. सत्तेत आलो तर चॅनलवाल्यांना तुरुंगात टाकू, अशी धमकी त्यांनी दिली. त्यामुळे सर्व मीडिया - यात चॅनल्ससोबत वृत्तपत्रेही आली - खवळला. केजरीवाल यांच्याकडे पुरावे काय आहेत, अशी मागणी तो करू लागला. जनतेची स्मरणशक्ती क्षीण असते, असे मीडियावाले नेहमी सांगत असतात. आधुनिक काळातल्या मीडियाची स्मरणशक्तीही क्षीण दिसते. तीन वर्षांपूर्वी हेच केजरीवाल दिल्लीच्या रामलीला मैदानात हीच भाषा वापरत होते. फरक इतकाच की, त्या वेळी ते राजकारणी भ्रष्ट आहेत, असे म्हणत होते.आपण कोणत्या नेत्यांना तुरुंगात टाकू, याची यादी ते वाचून दाखवत असत. त्या वेळी नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे कोणते पुरावे आहेत, असे केजरीवालांना कोणीही विचारत नव्हते. कारण नेते भ्रष्टाचारी असतातच, असे सर्वांनी गृहीत धरलेले होते.

केजरीवाल हे सदैव बेछूटपणे बोलून सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत असतात. त्या वेळी त्यांनी लोकपाल नावाचा ‘चांगुलबुवा’ उभा केला होता. जनतेच्या सर्व प्रश्नांवर लोकपाल हा अक्सीर इलाज आहे, अशी जाहिरात त्यांनी चालवली होती. तेव्हा सर्व टीव्ही चॅनल्सवाले ही जाहिरात फुकट दाखवत होते.(गंमत अशी की या लोकपालाला बहुधा आता केजरीवालही विसरले असावेत. मीडियाच्या भ्रष्टाचाराची लोकपालाकरवी चौकशी करू, असे ते म्हणाले नाहीत. आपणच मीडियावाल्यांना तुरुंगात टाकू, असे त्यांनीजाहीर केले.)

अण्णा-केजरीवाल आंदोलनाने काही महत्त्वाचे मुद्दे जरूर उपस्थित केले; पण आंदोलनाच्या उभारणीत बरीच फसवाफसवी होती. तिला तिथल्या तिथे आक्षेप घेणारे फार थोडे होते. (‘दिव्य मराठी’च्या संपादकीय स्तंभांमधून आंदोलनातल्या भंकसबाजीवर सातत्याने टीका करण्यात आली होती.) पण बहुतांश मीडियावाल्यांना तेव्हा आपण एका फार मोठ्या क्रांतीत सहभागी असल्याचे वाटत होते. आता हाच बिब्बा आपल्या अंगावर उलटल्याबरोबर मीडियावाल्यांना एकदम तारतम्य, जबाबदारीने आणि पुराव्यानिशी बोलणे वगैरेची आठवण झाली आहे.

राजकीय नेते भ्रष्टाचार करतात, हे वास्तव आहे. केजरीवाल यांनी त्यांचे सर्व संसदीय राजकारण हेच भ्रष्टाचारी असते, असे सरसकटीकरण केले होते. आम आदमी पक्ष स्थापल्यानंतर आपण सोडून सर्व पक्ष भ्रष्ट आहेत, असे सरसकटीकरण त्यांनी केले. केजरीवाल ठरवतील ती कृती नैतिक; बाकीच्या सर्व अनैतिक, असे समीकरण याच काळात ठरले. मीडियावरची टीका हा याचा पुढचा भाग होता. केजरीवालांना प्रसिद्धी दिली तर ती नैतिक आणि त्यांच्यावर टीका केली तर ती भ्रष्ट, असे वर्गीकरण त्यांनी केले. लोकपाल आंदोलन झाले तेव्हाही मीडियाचे मालक अंबानी वगैरे लोकच होते. पण तेव्हा केजरीवाल यांना ते खटकले नाहीत. भांडवली मालकांच्या हातातली वृत्तपत्रे हा मुद्दा नेहरूंच्या काळापासून चर्चेत आहे आणि तो रास्तच आहे. पण केजरीवालांना तो आपल्या सोयीने उपस्थित करायचा आहे किंवा झाकायचा आहे. ही लबाडी आहे. पण या निमित्ताने मीडियावाल्यांनीही काही गोष्टींबाबत विचार करण्याची गरज आहे. राजकारणातील एखाद्या नेत्याला हीरो बनवण्याची वा त्या व्यक्तीच्या बाजूने लाट उत्पन्न करण्याची एक पद्धत गेल्या काही वर्षांपासून मीडियाने रूढ केली आहे.

पूर्वी केवळ वृत्तपत्रे होती, तेव्हाही हे घडत होतेच. पण आता टीव्ही चॅनल्सचा प्रभाव त्यांच्या दसपटीने वाढला आहे. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये वेगवेगळ्या वेळी मीडियाने राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि केजरीवाल-अण्णा यांच्या लाटा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी हे काँग्रेसमध्ये अधिकाधिक सक्रिय झाल्यानंतर त्यांच्या बारीकसारीक कृतीचीही स्तुती सुरू झाली. विदर्भातील शेतकर्‍यांना त्यांनी दिलेली भेट, उत्तर प्रदेशातील ग्रामीण दलितांमधला त्यांचा वावर, भट्टापरसोल किंवा ओडिशातील नियामगिरी आंदोलनांमधला त्यांचा धूमकेतूसारखा सहभाग, मुंबईतील लोकलमधली मुशाफिरी यांना मीडियातून अवाजवी प्रसिद्धी देण्यात आली. त्यातून राहुल हा कोणीतरी भारताच्या खर्‍या समस्यांबाबत कुतूहल असणारा हुशार तरुण असल्याची प्रतिमा तयार झाली. प्रत्यक्षात राहुल यांची आकलनशक्ती कमी आहे, हे तेव्हाही दिसत होते, पण मीडियाने तेव्हा त्याच्याकडे डोळेझाक केली. आता त्याचे दुसरे टोक गाठले जात आहे. सध्या राहुल यांची मीडियातून वाटेल तशी टिंगलटवाळी चालू आहे.

केजरीवाल हे राहुलपेक्षा अधिक चाणाक्ष, हुशार आणि नेमकेपणाने बोलणारे होते. शिवाय मीडिया कसा वापरून घ्यायचा, याची त्यांना चांगली जाण होती. काँग्रेससारखी पक्षसंघटना नसूनही केजरीवालांची राहुल यांच्याहूनही प्रचंड अशी लाट तयार झाली. त्या अर्थाने आपचा खरा बाप हा मीडियाच होता. तिसरे उदाहरण नरेंद्र मोदींचे आहे. मोदींना गुजरातेतून दिल्लीत आणून स्थिरस्थावर करण्यात आणि त्यांना देशव्यापी लोकप्रियता मिळवून देण्यात मीडियाचा कमालीचा हात आहे. गंमत अशी की, एकेकाळी सरकारी दूरदर्शनवरून काँग्रेसच्या नेत्यांच्याच छब्या तिन्हीत्रिकाळ दिसत. आपल्यातले सुजाण बुद्धिजीवी त्याला नाके मुरडत. आता खासगी वाहिन्यांची भरमार झाली म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा कळस गाठला गेला, असे कोणाला वाटेल. पण प्रत्यक्षात अजूनही सर्व वाहिन्यांवरून चोवीस तास कोण्या एकाचीच छबी सदैव दिसत राहते.

सध्या तो मान मोदींचा आहे. सतत असे ज्याचे छबीदर्शन घडवायचे, त्याची सदैव केवळ तारीफच होत राहील हे पाहायचे, असे तंत्रही या नव्या मीडियाने विकसित केले आहे. त्यामुळे रामलीला मैदानातील आंदोलनामुळे दिल्लीतील वाहतुकीची कोंडी किंवा लोकांची गैरसोय होत असेल तरी तिच्या बातम्या करायच्या नाहीत, असे मीडिया ठरवून टाकतो. मध्यंतरी मोदी मुंबईत आले असताना विमानतळाजवळ संध्याकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पण त्याविषयी एकही बातमी कोणी दिली नाही. सध्या मोदींच्या विरोधातल्या बातम्यांना मीडियात थारा मिळू द्यायचा नाही, असे खरोखरच धोरण ठरले आहे की काय, असा संशय त्यामुळे तयार होतो.

आपल्या मीडियाचे चालक आणि पत्रकार हे अत्यंत बुद्धिमान आणि उच्चशिक्षित आहेत. एखाद्याच नेत्याच्या प्रसिद्धीची अशी लाट तयार करणे, हे लोकशाहीला मारक असल्याचे त्यांना पूर्णपणे माहीत असते, तरीही रोज जे चालू आहे ते थांबत नाही. आपल्या बुद्धिमान पत्रकारांनाही ते थांबवता येत नाही. पुन:पुन्हा एखाद्या नेत्याच्या लाटा निर्माण करण्याच्या उद्योगात ते ओढले जात राहतात. सध्या मोदींची लाट निर्माण होण्यात अंबानींसारख्या मालकाचा हात आहे, असे केजरीवालांचे म्हणणे आहे. मीडियातील पत्रकारांना ते मान्य नाही. ते ठीक आहे; पण मोदी यांच्यासारख्यांची लाट सुरू कुठून होते आणि ती वाढवण्यात आपला दैनिक सहभाग का चालू राहतो, याचे विश्लेषणही एकदा या पत्रकारांनी करावे. द होल नेशन वुड लाइक टू नो अबाऊट इट.