आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साहेबां’ची पोकळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट वगळता भारतातले बहुतेक सर्व पक्ष हे एकखांबी तंबू आहेत. शरद पवार, मुलायम, मायावती, ममता, जयललिता अशा नेत्यांची जागा तत्परतेने घेऊ शकेल, असा त्यांच्या पक्षांमध्ये कोणी नाही. किंबहुना हे नेते बाजूला झाल्यावर ते ते पक्ष निष्प्रभ होण्याची वा लंगडत चालण्याची शक्यता अधिक दिसते.
महाराष्‍ट्रापुरते बोलायचे झाल्यास राष्‍ट्रवादीमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी आहे, हे खरे आहे; पण छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंतराव असे नेते म्हणजे एकेक संस्थान आहे. अजितदादांचे नेतृत्व मान्य करणे त्यांना कठीण जाईल. शिवाय शरद पवारांच्या मनात नक्की काय आहे, हाही वेगळाच प्रश्न आहे. खैर, मुद्दा शिवसेनेचा आहे. तो पक्ष तर सांगून-सवरून एकखांबी होता. बाळासाहेबांच्या करिश्म्याचा आधार नसेल, तेव्हा त्याची स्थिती कशी होईल, याबाबत विविध तर्क-वितर्क केले जात असत; पण बाळासाहेबांच्या हयातीतच विविध स्तरांवरच्या सत्तेचा अनुभव आल्यामुळे सेनेच्या पक्षसंघटनेला स्वत:ची अशी गती प्राप्त होत गेली.
पूर्वी बाळासाहेबांनी पाकिस्तानविरोधी एखादे वक्तव्य करायचे आणि तो इशारा घेऊन गावोगावच्या शिवसैनिकांनी पाकिस्तानचे झेंडे जाळायचे, एवढेच पक्षकार्य असे; पण आता उदाहरणार्थ, औरंगाबादेत स्थानिक नेतृत्वाला जायकवाडीचं पाणी, अतिक्रमणविरोधी कारवाई, विकास आराखडा अशा प्रश्नांवर सतत भूमिका घ्याव्या लागतात. तेच सर्व महाराष्‍ट्रात घडते. यातूनच नेते तयार होतात. पक्ष उभा राहतो. शिवसेना हा अशा रीतीने एक पक्ष म्हणून उभा राहिला आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे सोडून गेल्यावर सेना कमकुवत होईल आणि बाळासाहेबांच्या माघारी उद्धव यांना कारभार सांभाळणे झेपणार नाही, अशीही एक शंका होती; पण बाळासाहेब गेल्यानंतरचा वर्षभरातील अनुभव वेगळा आहे. जागोजागच्या नेत्या-कार्यकर्त्यांचे शिवसेना जिवंत असण्यात चांगलेच हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे कसंही कमी-अधिक असलं, तरी उद्धव यांचं नेतृत्व ‘सांभाळून’ घेऊन काम करायला हे सर्व जण तयार आहेत. त्यामुळे साहेब गेल्यानंतर सेनेची फार पडझड झाली नाही.
बाळासाहेबांचे राजकारण हे कायमच जमातवादी, हिंसक आणि हुकूमशाही थाटाचे होते. मराठी, हिंदुत्व अशा प्रश्नांवर टोकाची भूमिका घेऊन सगळेविरुद्ध आपण, असे ध्रुवीकरण करण्याबाबतचे त्यांचे डावपेच खूप प्रभावी असत. त्यामुळे त्यांच्या बाजूने सर्व स्तरातून कडवे पाठीराखे उभे राहात; पण त्याच वेळी फार मोठा समाज, बहुतांश राजकीय पक्ष आणि माध्यमे त्यांच्या सदैव विरोधात राहत. त्यातून सेना ही एक संकुचित राजकारण करणारी हिटलरवादी संघटना असल्याची प्रतिमा देशभर रूढ होती. बाळासाहेबांच्या शेवटच्या काही वर्षांत मात्र ही प्रतिमा काहीशी सौम्य झाली.
त्यांच्या मृत्यूच्या वेळी तर कळस झाला. त्यांच्या अंत्ययात्रेला लोटलेला मोठा जनसागर आणि सर्वपक्षीय नेत्यांनी लावलेली हजेरी यामुळे बाळासाहेबांच्या हिटलरी राजकारणाची प्रतिमा जणू पुसून गेली.
समाजाच्या सर्व स्तरांशी जोडलेले अफाट व्यक्तिमत्त्वाचे लोकनेते, अशी एक प्रतिमा तिची जागा घेती झाली. त्या काळात टीव्ही वाहिन्यांनी दिवसरात्र ठाकरे यांचं दर्शन घडवलं. सर्व समाज शोकात बुडाल्याचं चित्र त्यातून निर्माण झालं. प्रशंसकाच्या स्तुतीपेक्षा विरोधकाने बोललेले दोन चांगले शब्द हे अधिक परिणामकारक असतात. तसेच झाले. आजवर सातत्याने विरोधात बोलणारी माध्यमे आणि मुख्यत: टीव्ही वाहिन्यांनी आता ही गुणसंकीर्तनाची भूमिका घेतल्याने बाळासाहेबांची प्रतिमा अनेक अर्थांनी लार्जर दॅन लाइफ झाली.
बाळासाहेब आणि पर्यायाने शिवसेनेबद्दल जनतेत एक सांत्वन भावना आणि सदिच्छा तयार झाली. या सदिच्छेचा नक्की कसा उपयोग करायचा, हा एक प्रकारचा पेचच होता. उदाहरणार्थ, मनोहर जोशी शिवाजी पार्कवर त्यांचं स्मारक करण्यासाठी आंदोलन करण्याचा आग्रह धरून आहेत; पण ‘झालेच पाहिजे’ असे म्हणून आपल्या खास शैलीत शिवसेना त्यात उतरली असती की, हा प्रश्न सेनेच्या अस्मितेपुरता सीमित झाला असता.
बाळासाहेबांना मिळालेली सर्वपक्षीय मान्यता लयाला गेली असती. उद्धव यांना ते करायचे नसावे किंवा निदान या घडीला करायचे नसावे, असे त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकेवरून वाटते. शिवसेनेतील राडाप्रेमी लोकांना ही भूमिका पटणार नाही, हेही त्यांना माहीत असणार. तरीही त्यांनी ती घेतली आहे, याबाबत खरे तर उद्धव यांचे अभिनंदन करायला हवे; पण दुसरी बाब त्याहूनही लक्षणीय आहे. ती ही की, बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दाच नव्हे, तर एकूणच बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्तच्या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेने एक प्रकारचा संयम दाखवला आहे. साहेबांच्या नावाने उरबडवेपणा करून भावनिक राजकारण करणे ही शिवसेनेच्या बाबतीत सहज घडू शकणारी गोष्ट होती. कोणत्याही
कारणाने का होईना, पण ती झालेली नाही. याचाच एक अर्थ असा की, बाळासाहेबांच्या करिश्म्याच्या पलीकडे जाऊनही स्वत:चे राजकारण करण्याचा एक आत्मविश्वास सध्याच्या शिवसेनेत आला आहे. कळीचा प्रश्न असा आहे की, या आत्मविश्वासाच्या आधारे शिवसेना निवडणुकीतील यशापर्यंत पोहोचू शकेल काय? मुख्यत: ज्या विधानसभेने गेली दहा वर्षे त्यांना हुलकावणी दिली आहे, तिथे 2014 मध्ये तरी तिचे बहुमत प्रस्थापित होऊ शकेल काय?