आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajenrdra Sathe Article On Speculations About Raj Thackeray

राज ठाकरे काय करणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांना शिवसेना-भाजप युतीत येण्यासाठी पुन्हा गळ घातली जात आहे. यासाठी खुद्द नरेंद्र मोदींकडून वाढते निरोप येऊ लागले आहेत अशी चर्चा आहे. गोदा पार्कवाल्या मुकेश अंबानींनाही मध्यस्थी घालण्याचा काहींचा इरादा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यापासून राज यांनी आपल्याच मस्तीत राजकारण केले आहे. त्यांना तसेच यशही मिळाले आहे. त्यामुळे अगदी मोदी झाले तरी त्यांच्या भिडेखातर युतीच्या लोढण्यात आपली मान द्यायला राज तयार होतील असे वाटत नाही, पण यापूर्वी शिवसेना हा क्रमांक एकचा प्रतिस्पर्धी असतानाही त्यांनी अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मुंबई पालिकांच्या राजकारणात त्या पक्षाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली होती, हेही खरे आहे. ते लक्षात घेता तडजोडीला ते अगदीच कबूल नसतील असे नव्हे. मात्र ते आपल्या धोरणाला कशी आणि कोठे मुरड घालतात हे पाहायला लागेल.

नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी लोकसभेची हरेक जागा महत्त्वाची आहे. युतीच्या मतातली फाटाफूट त्यांना परवडणारी नाही. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने बारा जागा लढवल्या होत्या. मुंबईतल्या सहा आणि ठाणे, भिवंडी आणि नाशिक अशा एकूण नऊ जागांवर मनसेने मते खाल्ल्यामुळे युतीचा पराभव झाला. मोदी यांना 2014 मध्ये याची पुनरावृत्ती परवडणारी नाही. पण मनसेने युतीत यावे यासाठी भाजप नेते आणखीही एका कारणास्तव कासावीस आहेत. मनसेने 2009 लोकसभेनंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपचीच मते आपल्याकडे ओढली होती. कल्याण-डोंबिवली हा संघ आणि भाजपचा बालेकिल्ला, पण 2010 मध्ये तिथल्या पालिका निवडणुकीत सेनेच्या नव्हे तर भाजपच्या जागा घटल्या. मनसेने तिथे एकूण 107 पैकी 26 जागा मिळवल्या. नंतर 2012 मध्ये झालेल्या पुणे आणि नाशिकच्या निवडणुकीतही याचेच प्रत्यंतर आले. नाशिकमध्ये तर मनसे सत्तारूढ झाली, पण पुण्यातही 29 जागा मिळवून दुसºया क्रमांकावर आली. तिथेही सर्वात अधिक फटका भाजपला बसला. अलीकडेच जळगाव महापालिकेतही सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीला घालवण्यासाठी एकनाथ खडसे यांनी जंग जंग पछाडले असताना एकूण 75 पैकी भाजपला 15 तर मनसेला जवळपास तितक्याच म्हणजे 12 अशा जागा मिळाल्या.

शहरी, उच्च व मध्यम जाती-वर्गातील मतदार आपलाच आहे असे भाजपवाले मानतात. त्यातच आता मोदी-प्रभावाची कुमक आहे. तरीही हा मतदार धरून ठेवता आला नाही तर विधानसभेतही आपले काही खरे नाही, अशी भीती भाजपवाल्यांना वाटते आहे. मोदींच्या ज्या (विकास, तडकफडक भाषण इत्यादी) आकर्षणापायी तरुण वर्ग त्यांच्याकडे जाईल असा एक समज आहे ते आकर्षण राज्यात मुंडे-तावडे-फडणवीसांपेक्षा राज यांच्याकडेच अधिक आहे. त्यामुळे राज आपल्याबरोबर राहावेत अशी भाजपची आटोकाटी चालली आहे. अर्थात लोकसभेला युती केली म्हणून विधानसभेला ते एकत्र राहतीलच अशी हमी देणे कठीण आहे. कारण राज यांना सध्या तरी केवळ महाराष्ट्राचेच राजकारण करायचे आहे.
शिवसेनेची मन:स्थिती दुविधेची आहे. उद्धव यांनी टाळी देण्याची भाषा करूनही ती राज यांनी फेटाळली. शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यामुळे उद्धव यांना तडजोड जड जाईल. तरीही मोदी यांच्या आग्रहास्तव ते हो म्हणालेच तर त्यात त्यांचा फायदा असा की लोकसभेतील मते खाल्ली जाण्याचा धोका टळू शकेल. जागा वाढतील. त्या वेळच्या कलानुसार अंदाज बांधून विधानसभेसाठी आखणी करता येऊ शकेल.

एकूण, युतीचे नेते राज यांना मनवू पाहत आहेत, परंतु राज मानत नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे हा सर्वच मामला एकतर्फी असल्याचा समज प्रचलित आहे, पण राज यांच्याकडे असलेले सगळेच पत्ते हुकुमाचे आहेत असेही मानण्याचे कारण नाही. गेल्या लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबई-ठाणे-पुणे नाशिक याच पट्ट्यात तेरा जागा मिळवल्या. त्यामुळे पक्षाचा आलेख यापुढे अधिक चढता राहील अशी अपेक्षा होती, पण पक्षाची मुख्य ताकद जिथे आहे त्या मुंबई आणि ठाण्याच्या पालिका निवडणुकीत (2012) पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. मुंबईत चाळीस जागा मिळतील असे वाटत होते तिथे केवळ 28 तर ठाण्यात केवळ सात जागा मिळाल्या. त्यापूर्वी 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला शह देणे शक्य झाले नव्हते. नवी मुंबईत तर पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. पुण्यात वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ती जागाही राखता आली नव्हती. औरंगाबादेत 2010 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेला अवघी एक जागा मिळाली. जिल्हा परिषदेत आठ जागा मिळवून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. कन्नडची विधानसभा जिंकल्याने मराठवाड्यात मनसेचा प्रवेश झाला असं वाटलं होतं, पण हर्षवर्धन जाधव सेनेत गेल्यानं ते यशही इतिहासजमा झालं आहे. त्यामुळे भूतकाळातील यश ही आगामी लोकसभेतील यशाची हमी असेलच असे सांगता येणार नाही.
राज ठाकरे जातील तेथे झंझावात निर्माण करतात. सोलापूर, जळगाव किंवा जालन्यासारख्या ठिकाणच्या त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी होते. त्यांच्या विरोधकांना धडकी भरावी असाच राज यांच्या सभांचा आणि भाषणांचा माहोल असतो. संघटनेच्या डोक्यावरून थेट मतदारांना आवाहन करू शकण्याची त्यांची क्षमता मोठी आहे. त्या दृष्टीने ते बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत, पण बहुधा याचमुळे पक्षाची संघटना बांधण्याबाबत ते तितकीशी मेहनत घेताना दिसत नाहीत. ठाण्यातील पराभवानंतर त्यासाठी जबाबदारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता, पण तिथली संघटना आजतागायत सावरलेली नाही. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या कथित जमीन घोटाळ्यांबाबत संशयाची हवा निर्माण करून राज यांनी प्रसिद्धी मिळवली, पण राज पुन्हा काही तिथे गेलेले नाहीत. किंबहुना मी येथे सतत येणार आहे असे सांगितले त्या डोंबिवली किंवा पुण्यातही राजकीयदृष्ट्या ते सक्रिय नाहीत. खुद्द मुंबई पालिकेतही सभागृह नेते अचानक बदलल्याने अंतर्गत नाराजी आहे. एकूणच पक्षाच्या बाकीच्या नेत्यांमध्येही ‘निवडणुका आल्या की प्रचंड सभा भरवू, दणकेबाज भाषणे करू, मीडिया आपल्या मदतीला आहेच, त्यासाठी संघटनेचा खटाटोप कशाला,’ अशी भावना तयार झाली असावी.
आपल्या पक्षातील ही स्थिती राज यांना ठाऊक असणारच. त्यामुळे लोकसभेसाठी ते युतीसोबत आघाडीसाठी किंवा मैत्रीपूर्ण मदतीसाठी तयार झालेच तर त्यात सर्वस्वी युतीचाच नव्हे तर त्यांचाही फायदा गुंतलेला असेल. विधानसभेपर्यंत कदाचित त्यांची मूठ झाकलेलीच राहील.