आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभ्य प्रशिक्षक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी खेळाडू अनिल कुंबळेची निवड हा स्वागतार्ह निर्णय आहे. क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा (जंटलमन) खेळ म्हटले जाते. अनिल कुंबळेसारख्या खेळाडूंनी या खेळाची सभ्यता आणखी उंचीवर पोहोेचवली. कुंबळेची १८ वर्षांची क्रिकेट कारकीर्द निष्कलंक ठरली. कोणत्याही वादात तो कधी अडकला नाही. कर्णधार म्हणूनही त्याची कारकीर्द त्याच्या खेळाप्रमाणे बहरली. २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुंबळे कर्णधार असतानाच टीम इंडियावर ‘मंकी गेट प्रकरण’चा बाउन्सर आला होता. कुंबळेने हे प्रकरण अत्यंत समजूतदारपणे हाताळले आणि परिपक्वतेची जाणीव करून दिली. कर्णधार म्हणून कुंबळेने त्या वेळी बेजबाबदार किंवा भडक विधान न करता संतुलित विधाने केली होती. त्यामुळे हरभजन त्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर येऊ शकला.

कुुंबळेच्या निवडीनंतर आता भारतीय क्रिकेटची सूत्रे ‘फॅब्युलस फाइव्ह’ (सचिन, गांगुली, लक्ष्मण, द्रविड, कुंबळे) च्या हाती आली आहेत. सचिन-गांगुली-लक्ष्मण सल्लागार समितीमध्ये आहेत. राहुल द्रविड भारत अ संघाचा कोच तर आता कुंबळे सीनियर संघाचा कोच झाला आहे. भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ या पाच दिग्गजांनीच एकत्र गाजवला. हे पाचही जण एकमेकांसोबत प्रदीर्घ काळ खेळले. यामुळे हे पाचही खेळाडू एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. यामुळे प्रशिक्षकपदी कुंबळेची निवड तशी अपेक्षितच होती. कुंबळेचे खेळातील समर्पण, त्याचा शांत स्वभाव, रणनीती कौशल्य, खेळातील नियमांची माहिती, ज्ञान, व्हिजन हे पैलू इतरांवर वरचढ ठरले. सरावाच्या वेळी सर्वात आधी मैदानावर येणारा आणि सर्वात अखेरीस जाणारा खेळाडू म्हणून कुंबळेला ओळखले जायचे. २००२ मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जबड्याला दुखापत झाली असताना कुंबळे मैदानावर उतरला आणि त्याने लाराची विकेट मिळवून दिली. खेळाबद्दल त्याचे हे समर्पण बघून अख्ख्या जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती.

कुंबळेने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणाचा प्रभाव त्याच्या खेळात, स्वभावात दिसतो. कुंबळे भरीव (कन्स्ट्रक्टिव्ह) काम करणारा व्यक्ती आहे. एखादी गोष्ट कशी उभी करायची, हे त्याला चांगले जमते. छोट्या गोष्टीचा तो पुरेपूर फायदा घेतो. यशाने हुरळून न जाता नेहमी सकारात्मक आणि पुढचा विचार करणे त्याचा पिंड आहे. खरे तर याच गुणांमुळे तो सामान्यांच्या गर्दीतून ‘असामान्य’ खेळाडूंच्या पंक्तीत विराजमान झाला. कारकीर्दीच्या सुरुवातीला “चेंडू न वळवणारा स्पिनर’ म्हणून त्याच्यावर जगभर टीका झाली. २००८ च्या विंडीज दौऱ्यावर मायकेल होल्डिंगने कुंबळेवर जोरदार टीका केली होती. ‘भारताकडे वेगवान गोलंदाजांची उणीव आहे. कुंबळेने सरळ रनअप वाढवून वेगवान गोलंदाजी करावी,’ असा टोमणा होल्डिंगने मारला होता. त्याच कुंबळेने त्याच सामन्यात लाराला गुगलीवर गुंडाळले होते. कुंबळेने टीकेला शस्त्र बनवले. चेंडू फारसे न वळवता गुगली, फ्लिपर, टाॅप स्पिनच्या बळावर त्याने तब्बल ६१९ कसोटी बळी घेतले. शेन वॉर्न आणि मुरलीधरन यांच्यानंतर तो सर्वकालीन महान गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाऊन बसला आहे. कुंबळेच्या या ‘कन्स्ट्रक्टिव्ह’ स्वभावाचा टीम इंडियालाही फायदा होईल. भ्रष्टाचाराचा विरोधक म्हणूनही कुंबळेची ओळख आहे.
कुंबळे फक्त मोठा खेळाडू नाही, तो माणूस म्हणूनही ‘थोर’ आहे. सगळे ऐश्वर्य सहज शक्य असताना त्याने विधवा (चेतना कुंबळे) महिलेशी लग्न केले. इतकेच नव्हे तर तिच्या बाळालाही आपले नाव देऊन तिचे पालकत्व स्वीकारले. या घटनेनंतर ‘मोठ्या मनाचा थोर माणूस’ म्हणून त्याची प्रचिती जगाला आली.

कुंबळेसमोर कोच म्हणून आव्हानांचा डोंगरच आहे. नजीकच्या भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोनी-कोहली यांच्यातील नेतृत्वाच्या वादाला टाळणे हे मोठे आव्हान असेल. आयपीएल हे झटपट कमाईचे उत्तम व्यासपीठ असले तरीही खरे क्रिकेट ‘कसोटी’ आहे, हे बीज युवा खेळाडूंच्या मनात रुजवावे लागेल. कसोटीत नंबर वन बनवण्याचे लक्ष्य त्याच्यापुढे असेल. गेल्या अनेक कसोटीत विदेशी खेळपट्ट्यांवर होणारी भारताची नामुष्की भविष्यात टाळण्याचे प्रमुख आव्हान त्याच्यापुढे राहील. शेवटी कोच मार्गदर्शन करतो, क्रिकेटचे बारकावे सांगतो. प्रत्यक्षात मैदानावर कामगिरी खेळाडूंनाच करावी लागते. खेळाडूंना प्रेरित करून त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करवून घेण्यात कुंबळेचा हातखंडा आहे. कर्णधार म्हणून त्याने हे काम आधी केले आहे. आता कोच म्हणून त्याला हे करायचे आहे. भारतीय क्रिकेटचा ‘आधारवड’ असलेल्या कुंबळेच्या हाती आता भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आहे, अशी आशा करायला हरकत नाही.

राजेश शर्मा
(लेखक औरंगाबाद आवृत्तीचे वृत्तसंपादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...