आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raji Salape Article About On Vishvakarma Birth Anniversary, Divyamarathi

प्रभू विश्वकर्मा: सृष्टीचा रचयिता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट विश्वकर्मा परब्रह्म आहेत. सर्व विश्वाचे मूळ तोच पुराणपुरुष आहे. पुराणात सांगितले आहे की, भगवान विश्वकर्म्याला पाच मुख आहेत. पूर्वेकडच्या मुखाचे सद्योजात, दक्षिणक डील वामदेव, पश्चिमेकडचा अघोर, तर उत्तरेला भगवंताचे तत्पुरुष नावाचे मुख आहे. याच पाच मुखांतून पाच दिशांची निर्मिती झाली असे मानले जाते. ईशान्य मुखाला ऋषीप्रमुख अथवा ओंकार म्हणतात. या दिशामधून तसेच पड स्वरूपाने पाचातून दुस-या पाच दिशांची उत्पत्ती झाली. त्यानंतर समस्त नादब्रह्मांची उत्पत्ती विश्वकर्म्यापासून झाली असे मानतात.

पुराणकाळातसुद्धा विराट विश्वकर्मा सर्व जगाचा स्वामी आहे, असे म्हटले जाते. त्याचे सर्व तेजस्वी रूपात अस्तित्व आहे. असा हा परमतेज स्वरूप आहे. सर्वांचा कर्ता-धर्ता अशा विश्वकर्म्याचे सर्व ज्ञान श्रुतीद्वारा प्राप्त केले पाहिजे. ज्या प्रकारे साखर घातलेल्या पाण्यापासून मधाचा स्वाद मिळत नाही, त्याचप्रमाणे दुस-या देवतांच्या पूजनाने माणसाला परमपदांची प्राप्ती होत नाही.

परम विश्वकर्म्याला सोडून माणूस इकडे-तिकडे भटकत राहतो आणि शेवटी नरकात जातो. म्हणून उत्तम गती प्राप्त करण्यासाठी माणसाने प्रयत्नपूर्वक विश्वकर्म्यासंबंधी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. तसेच त्याची आराधना केली तरच त्याला सद्गती प्राप्त होते. सृष्टीच्या निर्मितीनंतर तिन्ही लोकांचा प्रमुख आणि देवांचा राजा इंद्राने विश्वकर्म्याची प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी अमरावती नगरीची रचना केली. इंद्राने विश्वकर्म्याची पूजा केली आणि त्यांना भेटवस्तू दिल्या. भगवान शंकरानेही विश्वकर्म्याची प्रार्थना केली होती. त्यांनी शिवशंक रांची मनोकामना पूर्ण केली. सर्व देवांनीही विश्वकर्म्याची पूजा करून आपली आवडती स्थाने व उपभोगाची साधने प्राप्त करून घेतली.

विश्वकर्म्याच्या पूजनाने मनुष्य अनेक प्रकारचे ऐश्वर्य, सुखोपभोग प्राप्त करू शकतो. विश्वकर्मा सर्वगुणसंपन्न, महाऐश्वर्यवान असून सर्व विद्यांचा प्रवर्तक आणि शिल्पकलेचा सृजनकर्ता आहे. जेव्हा-जेव्हा देवांना जरूर पडली तेव्हा विश्वकर्म्यानी अनेक प्रकारच्या कलांची निर्मिती केली. देवांसाठी आयुधे, अलंकार, त्यांची विविध वाहने, त्यांची विमाने आदी साहित्यांची निर्मिती केली. देवसुद्धा आपल्या इच्छित कार्यासाठी त्यांनाच शरण जात होते. ऋषी, देवता व सा-या प्रजेच्या कल्याणाचा मार्ग आणि सामग्री प्रभू विश्वकर्म्यांनीच तयार केली आहे. विश्वकर्म्यांनीच अनेक देवांच्या प्रतिमांच्या कलामय मूर्तींची निर्मिती केली. एकदा सर्व प्रकारची समृद्धी मिळवण्याच्या इच्छेने देव विष्णूकडे गेले. सर्व प्रकारचे कल्याण आणि समृद्धीसाठी लिंगपूजनाचे महत्त्व आम्ही जाणले आहे. तरी आपण माझी मनोकामना पुरी करा अशी प्रार्थना विष्णूंना केली. विष्णूंनी विश्वकर्म्याचे स्थान इलाचलावर जाऊन प्रार्थना करण्यास सांगितले. सर्व देवांना विश्वकर्म्याने संतुष्ट केले. इंद्राला माणकांचे, कुबेराला सोन्याचे लिंग बनवून दिले. सर्व देवांनाही अधिकारपरत्वे उत्तम लिंग देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण केले. विश्वकर्मा देवस्वरूप असून सृष्टीचा कर्ता आहे.

विश्वकर्म्यांचे स्वरूप अत्यंत उज्ज्वल आहे. एका हातात दंड, दुस-या हातात सूत्रे, तिस-यात जलपात्र व चौथ्यात पुस्तक घेतलेले आहे. आदी-अनादी असा हा परमेश्वर जय-अजय, अलोक-लोकमय, विराट पुरुषांच्या 12 अंगुले उंच आहे. सर्व देवांचा पितामह आणि गुरू आहे. परम शिवस्वरूप कल्याणमूर्ती आहे. ज्याला मर्यादित असे आवरण नाही. रूपरहित दयासागर असा प्रभू त्रिलोकमय आहे. त्याचे स्वरूप पंचविश्व आहे. तो स्वत: सर्व प्राणिमात्रात व्यापलेला आहे. त्याच्या मुखातून अग्निज्वाळा व शंकर, बाहूपासून विष्णू, तसेच बेंबीपासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे. पायापासून इंद्राची मनापासून चंद्राची, डोळ्यातून सूर्यनिर्मिती, तर प्रभूंच्या प्राणांतून वाघ प्रकट झाला आहे. नाभिकमलातून आकाश तर मस्तकापासून सर्व देवांची उत्पत्ती झाली आहे. कानातून दाही दिशा, ब्रह्मा, विष्णू, महेश हे भगवंताचेच अंश आहेत. तसेच दैत्य, सर्व पदार्थ त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहेत. प्राणिमात्रांवर दया करणारा हाच विश्वरूप आहे. अशा या देवाधिदेवाला जयंतीनिमित्त वंदन!