आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दगडात अनेक पक्षी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनाथसिंह यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यांनी चांगलीच करमणूक केली आहे. गोपीनाथ मुंडे हे देशाचे कृषिमंत्री असतील, अशी घोषणा त्यांनी प्रचारसभेत केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याऐवजी आपला पक्षच भाजपमध्ये विलीन करून टाकावा, असे इशारेवजा आवाहन बिन बुलाये मेहमान असलेल्या मनसेला त्यांनी केले. घटनेनुसार पंतप्रधान हे कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते द्यायचे हे ठरवत असतात. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आटोपल्यावर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे खातेवाटप करत असतात. मात्र, जर राजनाथसिंह हे मुंडेंना कृषी मंत्रालय जाहीर करत असतील, तर याचा अर्थ पुढील पंतप्रधान ते स्वत:च असतील आणि म्हणून त्यांनी हे खातेवाटप केले असावे. विशेष म्हणजे अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना राजनाथसिंह हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर केले गेले होते आणि याची फार चर्चा होऊ नये म्हणून त्यांनाही देशाचे कृषिमंत्री करण्यात आले होते. मुंडे यांनी गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय यांच्यासारखी महत्त्वाची खाती मागू नयेत (कारण ते लोकसभेत उपनेते असल्याने तिसर्‍या क्रमांकाचे नेते राहतील) म्हणून तर राजनाथ यांनी आधीच मुंडेंचा पत्ता कापलेला नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. राजनाथसिंह यांनी भाजपच्या उमेदवारांविरुद्ध मुंबईत उमेदवार उभे न करणार्‍या आणि शिवसेनेला डिवचून मोदींना स्वत:हून पाठिंबा जाहीर करणार्‍या राज ठाकरे यांना डिवचले आहे. एकीकडे राज्यातील भाजपचे सर्व नेते मोदींना राजने पाठिंबा दिल्याबद्दल आनंद व्यक्त करत असताना राजनाथसिंह यांच्या वक्तव्याने त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उत्तर भारतीय लोकांना मारहाण करणार्‍या मनसेला भाजपने सोबत घेतल्याने बिहार आणि उत्तर भारतात भाजपविरुद्ध ‘आप’ने पोस्टर्स लावली आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांची नाराजी दूर करण्यासाठी आणि मोदी आणि राज यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी, मुंडेंचे राजकीय वजन कमी करण्यासाठी असे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा उद्योग बहुधा राजनाथसिंह यांनी केल्याचे दिसतेय.