आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुँह में राम-बगल में नथुराम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदींनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले आहे. परंतु एकूण मुलाखतीचा बाज आणि आशय पाहता खरे म्हणजे त्यांनी नथुराम गोडसेला ‘हिंदू राष्‍ट्रपुत्र’ म्हणून गौरवायला हवे होते! काही वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांनी गांधीजींना राष्‍ट्रपिता म्हणून संबोधणे गैर आहे असे म्हटले होते. ते फक्त राष्ट्रनेता होते, राष्‍ट्रपिता नव्हे, असे महाजनांचे मत होते. तो काळ रामजन्मभूमी आंदोलनाने व रथयात्रेने ‘भारलेला’ काळ होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा लालूप्रसाद यादव यांनी अडवून त्यांना अटक केली होती. त्या वातावरणातील रामनामाचा गजर ऐकून शरद पवार तेव्हा म्हणाले होते की, संघ परिवाराच्या ‘मुँह में राम - बगल में नथुराम’ राजकारणापासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. नरेंद्र मोदींच्या गांधी गौरवापासूनही तसेच सावध राहायला हवे. कारण त्यांच्याही बगलेत नथुरामच आहे. मोदींप्रमाणेच नथुरामनेही स्वत:ला ‘हिंदू राष्‍ट्रवादी’ असे बिरूद लावले होते. त्या चालीवर म्हणायचे तर एपीजे अब्दुल कलाम स्वत:ला ‘मुस्लिम राष्‍ट्रवादी’ आणि डॉ. मनमोहनसिंग ‘शीख राष्‍ट्रवादी’ म्हणून घेऊ शकतील.

देशातील सुमारे 20 टक्के आदिवासी व अन्य, ज्यांनी कोणताच धर्म रीतसर स्वीकारलेला नाही, त्यांनी स्वत:ला काय म्हणायचे? की ते राष्‍ट्रवादी नव्हेतच? शरद पवारांच्या पक्षाचे नावच ‘राष्‍ट्रवादी कॉँग्रेस’ असे आहे. पण ते पक्षवाचक आहे, धर्मवाचक नाही. तेथेही काही विचक्षक मंडळींनी श्लेष काढला होताच की त्यांचा पक्ष राष्‍ट्रवादी तर इतर पक्ष काय राष्‍ट्रद्रोही आहेत का? परंतु मोदींनी त्यांच्या पक्षाच्या अधिकृत भूमिकेलाच सुरुंग लावला आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ‘भारतीय जनता पक्ष’ असे आहे. ‘हिंदू जनता पक्ष’ नाही, तसेच ‘हिंदुस्थानी जनता पक्ष’ असेही नाही. भारताच्या राज्यघटनेनेही ‘इंडिया, दॅट इज भारत’ अशीच व्याख्या केलेली आहे.

मोदींनी मात्र रॉयटर्सच्या मुलाखतीत ‘भारत’ शब्द जवळजवळ टाळून हिंदुस्थान हीच संज्ञा वापरली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘हिंदुस्थान’ वा ‘हिंदोस्तॉँ’ ही संज्ञा रूढ होती आणि त्यासंबंधात आजही कुणी वापरली तर ते आक्षेपार्ह मानले जात नाही. परंतु जेव्हा ती संज्ञा ‘हिंदू राष्‍ट्रवाद’ या संकल्पनेला जोडून येते तेव्हा मात्र ती देशाच्या एकात्मतेलाच आव्हान देते. जर धर्मवाचक राष्‍ट्रवादाचा पुकारा केला तर भारताची पुन्हा फाळणी होऊ शकेल. मोहंमद अली जिनांनी उपस्थित केलेल्या द्विराष्‍ट्रवादाच्या सिद्धांतावरूनच देशाची फाळणी झाली. हिंदू महासभेनेही त्याच चालीवर मांडणी केली. पण पाकिस्तानने जरी इस्लामवर आधारित देश निर्माण केला तरी भारताने मात्र ‘सेक्युलॅरिझम’ स्वीकारला. विशेष म्हणजे धर्मावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तानची 24 वर्षांनी फाळणी होऊन 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानला इस्लाम एकात्मता देऊ शकत नाही हे आणखी एकदा सिद्ध होण्याची शक्यता आहे.

बलुचिस्तान व सिंध या प्रांतांमध्ये ‘स्वातंत्र्य चळवळ’ चालू आहे. इस्लामवादी राज्यकर्त्यांना बंदुकीच्या जोरावर, धर्माच्या नावावर नव्हे, पाकिस्तानची एकात्मता टिकवणे भाग पडते आहे. जर मोदींना अभिप्रेत ‘हिंदुस्थान’ निर्माण झाला तर अतिरेकी शिखांची ‘खलिस्तान’ची चळवळ पुन्हा उग्र रूप धारण करू शकते. त्यांनाही त्यांचा ‘शीख राष्‍ट्रवाद’ जोपासायचा आहेच. त्याचप्रमाणे मग काश्मीरमधील फुटीरतावादी इस्लामी गटही ‘इस्लामी काश्मिरीयत’ च्या नावाखाली स्वतंत्र काश्मीरची मागणी अधिक आक्रमकपणे करू शकतील! खुद्द हिंदू समाज जाती-पातींनी किती पोखरला आहे हे आपण पाहतोच आहोत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तोच मुळी हिंदू धर्मातील अन्याय्य उतरंडीला व विषमतेला विटून जाऊन. जर धर्माच्या नावाने राष्‍ट्रवाद ओळखला जाऊ लागला तर उद्या कुणी आपल्या जातीच्या नावानेही स्वत:चा सुभा वेगळा मागू शकेल. मग जाटांचा आणि यादवांचा, राजपुतांचा आणि कुर्मींचा राष्‍ट्रवाद का नाही? त्या परिस्थितीत ‘तेलगू देसम’ची व्याख्याही मग बदलू लागेल. धर्म, जात, प्रांत, भाषा, संस्कृती यांच्या आधारे राष्‍ट्रवादाची मांडणी केली जाऊ लागली तर देशाची शकले व्हायला वेळ लागणार नाही. काश्मीरमध्ये आणि पंजाबमध्ये, तामिळनाडूत आणि मिझोराम व नागालँडमध्ये अशी अस्मितादर्शक राष्‍ट्रवादाची बीजे आहेतच. जर मोदीप्रणीत हिंदू राष्‍ट्रवादाचा सिद्धांत मूळ धरू लागला तर देशाच्या एकात्मतेलाच आव्हान मिळेल. त्या दृष्टिकोनातून विचार करता नरेंद्र मोदी हे मोहंमद अली जिनांचे वारस म्हणावे लागतील. नाहीतरी मोदींचे गुरू लालकृष्ण अडवाणी यांनी जिनांचा खास गौरव केलाच होता आणि मोदींचे विद्यापीठ, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ हे सांस्कृतिक राष्‍ट्रवादाचे प्रचारक आहेतच. म्हणजेच देशाची फाळणीच नव्हे तर शकले करण्याची सर्व पूर्वतयारी संघ परिवाराच्या विषारी आणि हिंस्र तत्त्वज्ञानात आहे. म्हणूनच त्यांचा रामनामाचा जप हा नथुराम जप आहे हे वेळीच ओळखायला हवे!